उगवतीचे रंग
मंगल भवन अमंगल हारी
सध्या रामनवमीची धामधूम आहे. गावागावातील राममंदिरे सुंदर रोषणाईने सजली आहेत. रामभक्तीची धून सर्वत्र ऐकू येते आहे. वातावरणात एक अनोखे चैतन्य भरून राहिले आहे. जशी विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीची ओढ लागलेली असते, तशीच रामनवमीची वाट रामभक्त पाहत असतात. चैत्रशुद्ध नवमीला रामभक्तांचे मनोरथ पूर्ण होतात. चैत्र महिना रामभक्तांचा आनंद द्विगुणित करतो. रामभक्तांना रामाइतकेच प्रिय, वंदनीय आणि प्रातःस्मरणीय अशा हनुमंताची जयंती देखील लवकरच म्हणजे चैत्र शुद्ध पौर्णिमेला येते. आबालवृद्ध दर्शनासाठी मंदिरांमध्ये गर्दी करतात. रामाचं आणि हनुमंताचं दर्शन घेऊन धन्य होतात. अयोध्येत तर रामलल्लाच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी जमतेच आहे.
मंगल भवन अमंगल हारी या तुलसीदासांच्या चौपाईत म्हटल्याप्रमाणे श्रीराम हे मंगलाचे धाम आहेत, मंगल करणारे आहेत आणि अमंगल हरण करणारे आहेत. त्यांची म्हणजेच या दशरथनंदनाची कृपा आपल्यावर सदैव राहो. पण रामाची प्रार्थना का करायची ? रामनाम हे श्रेष्ठ का आहे ? रामाचं मोठेपण कशात आहे या प्रश्नांची उत्तरं या लेखात शोधण्याचा प्रयत्न आपण करू या.
आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की रामाने अनीतीने वागणाऱ्या, दुराचारी, अन्यायी आणि अत्याचारी अशा रावणाचा वध केला. दुष्ट अशा वालीचा वध केला. न्याय आणि नीतीचे राज्य स्थापन केले. रामराज्य तर भारतीय संस्कृतीचा सुवर्णकाळ होता असे म्हटले जाते. पण तत्कालीन ऋषीमुनींच्या मते रामाची थोरवी त्याने रावणाला मारले यात नाहीच मुळी ! वाचून नक्कीच आश्चर्य वाटलं असेल पण तशीच ही गोष्ट आहे.
राम जेव्हा लंकेहून रावणाचा वध करून अयोध्येला परत आले आणि त्यांचा राज्याभिषेक झाला, त्याप्रसंगी अनेक ऋषीमुनी येऊन रामाचं अभिनंदन करत होते, त्याला धन्यवाद देत होते. ते म्हणत होते, ' रामा, तू इंद्रजिताचा वध केलास त्याबद्दल तुझं अभिनंदन आहे. ' प्रत्येकाच्या तोंडून अशा प्रकारचे उदगार ऐकून रामाला आश्चर्य वाटले. त्यांनी ऋषींना विचारलं, ' जो रावण तुमच्या यज्ञात, साधनेत अडथळे आणत होता, त्याचा नाश झाल्याबद्दल तुम्हाला आनंद झाला नाही का ? ती गोष्ट तुम्हाला विशेष वाटत नाही का ? त्याबद्दल माझं अभिनंदन न करता तुम्ही इंद्रजिताच्या वधाबद्दल माझं अभिनंदन करत आहात, ते का ? '
यावर ऋषींनी दिलेलं उत्तर श्रीरामांची थोरवी स्पष्ट करणारं आहे. ते म्हणाले, ' रावणाचा वध तर होणारच होता. त्यात विशेष नाही. पण जो इंद्रजित कोणालाही अजिंक्य होता, त्याचा वध तुझ्या हातून झाला ही विशेष गोष्ट आहे. ' इंद्रजिताचे मूळ नाव मेघनाद. हा रावणाचा शूर, शक्तिशाली असा पुत्र होता. त्याचा पराक्रम एवढा होता की त्याने प्रत्यक्ष देवराज इंद्राचा पराभव करून त्याला बंदी बनवून आणले. इंद्रावर विजय मिळवला म्हणून त्याचे नाव इंद्रजित पडले. ' अशा या इंद्रजितावर रामाने विजय मिळवला. यातून आपल्या असे लक्षात येते की रावणाच्या वधापेक्षा इंद्रजिताचा वध करणे ही कठीण गोष्ट होती.
रामाने रावणाचा पराभव करण्यापूर्वी अशा तीन व्यक्ती होत्या की ज्यांनी रावणाचा पराभव केला होता. त्या व्यक्ती म्हणजे बलिराजा, सहस्त्रार्जुन आणि वाली. परंतु रावणाचा पिता असलेले विश्रवाऋषी यांनी विनवणी करून बली आणि सहस्त्रार्जुन यांच्याकडून रावणाची सुटका करून घेतली. तर रावणाने वालीशी तह करून चातुर्याने स्वतःला सोडवून घेतले. या व्यक्तींनी रावणाचा पराभव जरी केला असला तरी त्याचा अंत मात्र रामाच्या हातूनच व्हायचा होता. हीच रावणाची नियती होती. अशा या रावणाचा वध रामाने केला. ती जरी कठीण गोष्ट असली तरी अशक्य नव्हती.
रावण हा महाशक्तिशाली असला तरी तो अन्यायी, अत्याचारी आणि स्त्रीलंपट होता. त्या काळातील अनेक छोट्या छोट्या राज्यांवर त्याची दहशत होती. ऋषीमुनींना आपल्या धर्माचे पालन त्याच्या अत्याचारांमुळे करता येत नव्हते. रामाने मात्र ऋषीमुनींना अभय दिले. अनेक छोट्या छोट्या राजांना लढायला, अन्यायाचा प्रतिकार करायला शिकवले. रावण कितीही मोठा बलशाली, ज्ञानी आणि ऐश्वर्यसंपन्न असला तरी रामाने आपल्या वागणुकीने जे हिमालयाएवढे आदर्श उभे केले की ज्यांची बरोबरी रावणाला कालत्रयीही शक्य नव्हती. राम हा मर्यादापुरुषोत्तम आहे. प्रयत्न केला तर माणसाची देवत्वाकडे वाटचाल होऊ शकते याचे उदाहरण रामाने स्वतःच्या आचरणाने आपल्यासमोर ठेवले आहे. म्ह्णून मला इंद्रजिताचा वध करणारा राम, रावणाचा वध करणारा राम यापेक्षाही रामाचे हे रूप अधिक भावते. जातपात, उच्चनीच भाव सोडून शबरी, निषादराज, सुग्रीव आदींना हृदयाशी धरणारा राम, एकदा ज्याला हृदयाशी धरले, त्याला कदापिही न सोडणारा राम, माता पिता, गुरुजन, स्त्रिया यांचा आदर करणारा राम, आदर्श पुत्र, आदर्श पिता, आदर्श पती, आदर्श मित्र आणि आदर्श शत्रूसुद्धा असलेला राम ही सगळी रामाची रूपे विलक्षण विलोभनीय आहेत. म्हणूनच समर्थ रामदास म्हणतात, ' समस्तांमध्ये कथा गोड या राघवाची. ' आज आपल्याला गरज आहे ती रामाने दाखवून दिलेल्या या मार्गावर वाटचाल करण्याची.
रामराज्य आपल्या सगळ्यांना का हवे असते याचे एक महत्वाचे कारण म्हणजे रामराज्य हे धर्मावर आधारित होते. धर्म म्हणजे आपण पारंपारिक अर्थाने हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असे न समजता सर्वांना मान्य होईल अशा प्रकारची नियमावली, आदर्श आचारपद्धती, जीवन जगण्याची शैली असे समजू या. त्यावर रामराज्य आधारित होते. त्याकाळातही राजदंड अस्तित्वात होता. एखाद्या राजाचा जेव्हा राज्याभिषेक व्हायचा, तेव्हा तो राजदंड हातात घेऊन ' अदंड्योस्मि, अदंड्योस्मि अदंड्योस्मि ' अशी त्रिवार घोषणा करीत असे. याचा अर्थ असा आहे की ' मी सम्राट आणि सार्वभौम आहे. मला शासन करण्याचा कोणाला अधिकार नाही. ' यानंतर तो राजदंड राजगुरुंकडे सुपूर्द केला जाई. त्यावेळी राजगुरू म्हणत, ' धर्म दंड्योस्मि, धर्म दंड्योस्मि, धर्म दंड्योस्मि ' याचा अर्थ असा की हे राजा, तू जरी सम्राट असलास तरी तुला नियमबाह्य, धर्मबाह्य वागण्याचा अधिकार नाही. तू चुकलास तर तुला शासन करण्याचं सामर्थ्य आमच्या या धर्मदंडात आहे. तेव्हा तू ' अदंड्य ' नाहीस हे लक्षात घे.
हा धर्मसतेचा, राजगुरूंचा आणि विद्वज्जनांचा अधिकार रामाने त्याच्या रघुवंशातील राजांनी मान्य केला होता. म्हणूनच राजसत्ता कधीही अनिर्बंध वागली नाही. रामराज्य हे सर्वांनाच हवेहवेसे वाटत होते. त्याच वेळी त्याच काळात असणारे रावण, वाली यांच्यासारखे अनाचारी, अनीतीने वागणारे राजेही होते. त्यांना धर्मसत्ता, गुरूंचा, विद्वज्जनांचा आदेश याच्याशी काही देणेघेणे नव्हते. उलट अशा व्यक्तींचा त्यांनी अनादरच केला आहे. त्यामुळे अशी राज्ये लयास गेली. जिथे गुरुसत्तेचा आदर नसतो, अशी राज्ये काही काळाने नष्ट होतात. इतिहास या गोष्टींचा साक्षी आहे.
या पार्श्वभूमीवर रामाचे ऋषीमुनींना मान देणे, त्यांचा आदर करणे या गोष्टी उठून दिसतात.
रामनामाचे महत्व तर अनेक साधुसंतांनी, ऋषीमुनींनी आपल्याला सांगितले आहे. पण ते किती महत्वाचे आहे याची एक गोष्ट फार सुंदर आहे. ती सांगून या लेखाचा समारोप करू या. मूळ रामायणात जरी चोवीस हजार श्लोक असले तरी रामरक्षेच्या रूपाने ' चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम ' म्हणजे शंभर कोटी श्लोकांएवढा विस्तार होईल एवढे विशाल श्रीरामचरित्र आहे असे सांगितले जाते. एक कथा अशी सांगितली जाते की एकदा देव, राक्षस आणि मानव ब्रह्मदेवाकडे गेले आणि रामायणावर अधिकार आमचाच आहे असे सांगून भांडू लागले. मानव म्हणाला, ' राम हा मानव अवतारात आहे, त्यामुळे रामायण आमचेच. ' देव म्हणाले, ' राम हा देवाचाच अवतार, त्यामुळे रामायणावर आमचाच अधिकार. ' राक्षस म्हणाले, ' यात राक्षसराज रावणाचे वर्णन आहे, त्यामुळे रामायणावर आमचाच अधिकार आहे. ' तेव्हा ब्रह्मदेवांनी हे भांडण भगवान शंकरांकडे नेले. त्यांनी जे सांगितले त्यावर सर्वांचा विश्वास होता. त्यांनी शंभर कोटी श्लोकांची तेहेतीस कोटी, तेहेतीस लक्ष, तेहेतीस हजार, तीनशे तेहेतीस अशी समान वाटणी केली. भगवान शंकरांनी अशा रीतीने हे श्लोक देव, दानव आणि मानव यांना वाटून दिले. तरी शेवटी एक श्लोक उरला. त्यात ३२ अक्षरे होती. त्याची समान वाटणी करता येत नव्हती. मग महादेवांनी त्यातील दहा दहा अक्षरे तिघांना सारखी वाटून दिली. शेवटी दोन अक्षरे उरली. ती अक्षरे होती ' राम ' हे सारस्वरूप रामनाम भगवान शंकरांनी स्वतःकडे ठेवून घेतले. यातूनच रामनामाचे महत्व स्पष्ट होते. ' राम ' हेच जीवनाचे सार आहे. तेच सारस्वरूप आपण ग्रहण करू या. श्रीरामाला आपल्या हृदयस्थानी विराजमान करू या.
Ⓒ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१४/०४/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा