उगवतीचे रंग
पुण्यातीलआनंदाश्रम संस्था : एक दीपस्तंभ
गेल्या फेब्रुवारी ( २०२४ ) महिन्यात माझ्या पुण्यातील वास्तव्यात मी पेपरमध्ये एक बातमी वाचली. पुण्यातील बुधवार पेठेतील आनंदाश्रम या दुर्मिळ हस्तलिखितांचे आणि पुस्तकांचे प्रदर्शन २३ ते २५ फेब्रुवारी या दरम्यान भरले होते. हस्तलिखितांचे प्रदर्शन क्वचितच बघायला मिळते. मुळात हस्तलिखितेच पाहायला मिळत नाहीत इतकी ती दुर्मिळ झाली आहेत. त्यामुळे मी आवर्जून या ठिकाणी जाण्याचे ठरवले. २५ फेब्रुवारी या दिवशी मी या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी गेलो. संस्थेचे नाव आनंदाश्रम आहे. तिथे गेल्यानंतर खरोखरच 'आनंदाश्रम ' हे नाव सार्थ असल्याची अनुभूती मला आली. आनंदाश्रम ही संस्कृतच्या अध्ययन आणि संशोधनासाठी वाहून घेतलेली संस्था आहे. पुण्यातील अप्पा बळवंत चौकात या संस्थेची वास्तू दिमाखात उभी आहे. पुण्यातील भरवस्तीत असलेली ही प्राचीन दगडी वास्तू आजही आपले सौंदर्य राखून दिमाखात उभी आहे. १३५ वर्षांपूर्वी जरी ही वास्तू बांधली गेली तरी अजून किमान शंभर वर्षे तरी ती उत्तम स्थितीत राहील याची खात्री वाटते.
संस्थेत प्रवेश केल्यानंतर समोरच एक भव्य दुमजली इमारत दिसते. या इमारतीच्या तळमजल्यावर ग्रंथालय आहे. वरच्या मजल्यावर भगवान शंकरांचे मंदिर आणि भव्य सभागृह आहे. या इमारतीच्या डाव्या बाजूला एक सुंदर भव्य दगडी अशी तीन मजली इमारत आहे. प्राचीन पद्धतीचे बांधकाम असलेली ही वास्तू आपले लक्ष वेधून घेते. या वास्तूचा वापर विद्यार्थ्यांचे वसतिगृह म्हणून केला जातो. भरवस्तीत असलेल्या आणि इतक्या सुंदर इमारतीत राहणारे आणि शिकणारे हे विद्यार्थी खरंच किती भाग्यवान असतील असा विचार माझ्या मनात येऊन गेला. गरीब आणि गरजू मुलांना या वसतिगृहात प्रवेश दिला जातो. कमीत कमी शुल्क त्यासाठी आकारले जाते. मात्र विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होतील आणि ते निर्व्यसनी राहतील याची काळजी घेतली जाते. येथे विद्यार्थ्यांची गर्दी न करता प्रत्येकाला व्यवस्थित मोकळी जागा मिळेल याची काळजी घेतली जाते. प्रत्येक विद्यार्थ्याला टेबल, खुर्ची, पलंग, गादी, वीज आदी गोष्टी उपलब्ध करून दिल्या जातात. त्याबदल्यात विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षण घ्यावे, त्यांनी उत्तम नागरिक होऊन आपल्या देशाची आणि समाजाची सेवा करावी एवढीच माफक अपेक्षा संस्थाचालकांची असते. गेल्या १३५ वर्षात ५०० हुन अधिक ध्येयवादी आणि सुसंस्कारित विद्यार्थी येथे राहून शिकून गेले आहेत आणि समाजात उत्तम नागरिक म्हणून कार्यरत आहेत.
संस्थेत वेळोवेळी वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. मी गेलो त्यावेळी रामायणावरील व्याख्यानमाला सुरु केली. एका अतिशय उत्तम अशा व्याख्यानाचा लाभ मला त्यावेळी झाला. त्याशिवाय दरवषी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संस्कृत स्तोत्र पाठांतर स्पर्धा घेतली जाते. संस्कृत मुख्य विषय घेऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हस्तलिखित संवर्धन कार्यशाळेचे आयोजन केले जाते. या सगळ्या उपक्रमातून प्राचीन भारतीय संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम संस्था करते. त्याशिवाय जवळच संस्थेचे समृद्ध असे संदर्भ ग्रंथालय आहे. येथे राहून त्या ग्रंथांचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या व्यक्तींची व्यवस्था संस्था आनंदाने करते.
संस्थेच्या तळमजल्यावरील ग्रंथालयात दुर्मिळ अशी हस्तलिखिते जीवापाड जपून ठेवली आहेत. बरीचशी हस्तलिखिते संस्कृत भाषेत आहेत. काही मराठी आणि काही तमिळ भाषेतील आहेत. 'ही हस्तलिखिते जतन करणे म्हणजे एक आव्हानात्मक काम असते. बरीचशी हस्तलिखिते जीर्ण झाली आहेत. त्यांना वाळवी लागण्याचा धोका असतो. सुरुवातीच्या काळात त्या हस्तलिखितातील पानांमध्ये वेखंडाची भुकटी टाकून कापडी गाठोड्यात ती बांधून ठेवली जायची. पण आता प्रत्येक हस्तलिखिते ब्रशच्या साहाय्याने हळुवार साफ केली जातात. त्यांची विषयावर विभागणी करून ती लोखंडी कपाटात ठेवली जातात. त्यांना कीड लागू नये म्हणून वेखंडाची पावडर, कडू जिरे, लवंग, मिरे पावडर इ. चा वापर केला जातो. ही हस्तलिखिते आम्लमुक्त ( Acid free ) अशा कागदामध्ये गुंडाळून लाल रंगाच्या कपड्यात बांधली जातात.
या संस्थेत साधारणपणे किती हस्तलिखिते असतील ? आपण कल्पना करू शकणार नाही पण येथील हस्तलिखितांची संख्या १५,१०३ आहे आणि ही हस्तलिखिते २६ वेगवेगळ्या अशा विषयांवर आहेत. येथे ' ज्योतिषरत्नमाला ' नावाचे हस्तलिखित सर्वात जुने म्हणजे शके १३७१ ( सन १४४९ ) मधील आहे. भारतभर फिरून मोठ्या कष्टाने त्यांचा संग्रह करणारे महादेवजी आपटे आणि त्यानंतर त्यांचे निगुतीने जतन आणि संवर्धन करणारे ध्येयवादी विश्वस्त आणि कर्मचारी यांच्या प्रशंसेसाठी शब्द कमी पडतात. या ठिकाणी अत्यंत शांत आणि प्रसन्न वातावरण असते. आपणही शांततेच्या वातावरणाचा भंग होणार नाही आणि या मौल्यवान ठेव्याला धक्का पोहोचणार नाही अशा पद्धतीने हा दुर्मिळ खजिना पाहणे अपेक्षित असते.
२०२२ पासून या संस्थेने ' आनंदाश्रम परिक्रमा ' हा एक नवीन उपक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत प्रत्येकाला संस्थेमध्ये उपलब्ध असलेला हस्तलिखितांचा संग्रह पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार, शनिवार व रविवारी या हस्तलिखितांचे प्रदर्शन भरवले जाते. या निमित्ताने संस्थेने पुनर्मुद्रित केलेल्या ग्रंथांची माहिती सुद्धा लोकांपर्यंत पोहोचते. या प्रदर्शनाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आतापर्यंत फक्त पुणेकरांनीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील असंख्य लोकांनी याचा लाभ घेतला.
आपण पर्यटनानिमित्त अनेक निसर्गरम्य ठिकाणी जातो. पण प्राचीन काळातील आपला हा ठेवा पाहायचा असेल आणि पुढील पिढीला माहिती करून द्यायचा असेल तर आपल्या मुलांसह आवर्जून अशा ठिकाणी जायला हवे. या ठिकाणी गेल्यानंतर हस्तलिखित म्हणजे काय, कोणकोणत्या भाषेमध्ये ती आहेत, त्यांचे विषय कोणते आहेत, त्यांचे जतन आणि संवर्धन कशा प्रकारे केले जाते याची माहिती आपल्याला मिळू शकते.
ही संस्था नेमकी आहे तरी कशी, तिची स्थापना कोणी आणि कशासाठी केली हा इतिहास जाणून घेणे मनोरंजक आणि प्रेरणादायी आहे. एके काळी मुंबई उच्च न्यायालयात प्रसिद्ध वकील असलेले महादेव चिमणाजी आपटे हे एक ध्येयवादी व्यक्तिमत्व होते. वकील म्हणून आपल्या क्षेत्रात त्यांनी नावलौकिक कमावला होता. ' जोडोनिया धन उत्तम व्यवहारे..' अशा प्रकारचे त्यांचे जीवन होते. वृत्ती धार्मिक होती. आपल्या पूर्वजांनी केलेल्या कामाबद्दल प्रचंड आदर त्यांच्या मनात होता. प्राचीन ग्रंथात आणि हस्तलिखितांमध्ये अपार ज्ञान सामावले आहे आणि हा दुर्मिळ ठेवा जर आपण सांभाळून ठेवला नाही, तर भावी पिढ्या या मौल्यवान वारशाला पारख्या होतील असे त्यांना वाटत होते. त्यामुळे संपूर्ण भारतभर भ्रमंती केली. त्या काळात आजच्या इतके उत्तम रस्ते आणि वाहनांची सुविधा नव्हती अशा काळात त्यांनी प्रवास केला. हस्तलिखितांचा शोध घेतला. पडेल ते मोल देऊन ही हस्तलिखिते स्वतःसोबत आणली.
४ नोव्हेंबर १८८७ या दिवशी त्यांनी आनंदाश्रम या संस्थेची हा मौल्यवान ठेवा जतन करण्यासाठी स्थापना केली. आपल्या आयुष्यात सचोटीने कमावलेली सारी रक्कम त्यांनी या वास्तूच्या उभारणीसाठी वापरली. आपण कष्टाने कमावलेला पैसा खरे तर त्यांना आपल्या वारसांना वाटता आला असता पण तसे न करता त्यांनी ही संस्था उभारली. सन १८८८ मध्ये वासुदेव बापूजी कानिटकर आणि आणखी चौघा समर्पित आणि ध्येयवादी वृत्तीच्या व्यक्तींना घेऊन त्यांनी एक विश्वस्त मंडळ स्थापन केले. प्रख्यात ऐतिहासिक कादंबरीकार आणि मराठी आणि संस्कृत भाषेचे विद्वान हरी नारायण आपटे हे त्यांचे पुतणे होते. हरी नारायण आपटे यांनी १९१२ मध्ये अकोला येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवले होते. अशा या व्यासंगी व्यक्तिमत्वाची त्यांनी आनंदाश्रम या संस्थेचे पहिले व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली. सध्या वसंत अनंत आपटे आणि इतर विश्वस्त सेवाभावनेने संस्थेचे काम पाहत आहेत.
संस्थेतील वसतिगृहाच्या तळमजल्यावर एक संग्रहालय साकारले आहे. त्यात विविध प्राचीन वस्तू आहे. या वस्तू अमूल्य आहेत. त्यात अत्यंत जुना असा टाईपरायटर, संस्थापक महादेव आपटे यांना प्रदान करण्यात आलेले आणि राणी व्हिक्टोरिया यांचा शिक्का असलेले एल एल बी चे प्रमाणपत्र, प्राचीन समया, भांडी आदी गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. संस्थेचा सिंहगडावर एक बंगला देखील आहे. तेथून सभोवतालचे मनोरम दृश्य दिसते. या बंगल्याच्या निगराणीचा खर्च दरवर्षी साधारण एक लाख रुपयांपर्यंत जातो. पर्यटकांना हा बंगला भाड्याने दिला जातो.
संस्थेच्या इमारतीचे आणि वसतिगृहाचे वैशिष्ट्य म्हणजे या वास्तूतील फर्निचर ' बर्मा वुड ' या वैशिष्ट्यपूर्ण लाकडापासून बनवलेले आहे. दालनाच्या खिडक्यांना रंगीत इटालियन काचा लावलेल्या आहेत. दालनातील फरशी सुद्धा १३५ वर्षांपूर्वीची आहे. तिला अजून साधा ओरखडाही पडलेला नाही. आजकाल आपण भक्कम वास्तू होण्यासाठी निरनिराळ्या सिमेंटचा वापर करतो पण या प्राचीन काळातील इमारतीची बरोबरी ते करू शकत नाही. समर्पित वृत्तीने कार्य करणाऱ्या संस्थापक महादेवजी आपटे यांनी आपल्या आयुष्याची अखेरीस संन्यास घेतला. त्यांची तळमजल्यावर समाधी आहे. वर असणाऱ्या शंकराच्या मंदिराच्या अभिषेकाचे तीर्थ या समाधीवर पडण्याची व्यवस्था आदरणीय आपटे यांच्या इच्छेनुसार करण्यात आली आहे.
काळाची पावले ओळखून संस्थेने दिल्लीतील ' नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट ' या संस्थेची मदत घेऊन २०१२ मध्ये आपल्याकडील असलेल्या हस्तलिखितांच्या अनमोल ठेव्यातील ९०% हस्तलिखिते डिजिटाइज्ड केली आहेत आणि बाकी हस्तलिखिते स्वखर्चाने केली आहेत. अशा प्रकारे आता संस्थेचा सर्व दुर्मिळ संग्रह नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सुरक्षित करण्यात आला आहे. ' संस्कृतस्य उन्नत्यर्थमेव निर्मित : ' हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. त्यानुसार गेल्या १३५ वर्षात संस्थेने भारतीय संस्कृतीसंबंधातील विविध विषयांवरचे १४६ शास्त्र ग्रंथ संस्कृतमध्ये छापले आहेत. या ग्रंथाचे एकूण १९७ खंड आहेत. विविध विषयांवरील हस्तलिखितांचे संशोधन करून ते प्रकाशित केले आहेत. हे सोपे काम निश्चितच नाही. आज अशा प्रकारचा अभ्यास करून संशोधन करणारे संस्कृत विद्वान दुर्मिळ होत चालले आहेत ही संस्थाचालकांची खंत आहे. त्यामुळे आता मागणीप्रमाणे जुन्या प्रकाशनांचे पुनर्मुद्रण करण्यात येते. कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत जेवढे पाठशाळा, मठ, संस्कृत विद्यापीठे आणि अभ्यासक आहेत, त्यांना हे ग्रंथ अल्प किमतीत उपलब्ध करून दिले जातात.
प्राचीन वारसा, भारतीय संस्कृती याबद्दल आदर असणाऱ्या ग्रंथप्रेमी मंडळींनी एकदा तरी या संस्थेला आवर्जून भेट द्यायला हरकत नाही.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा