मुख्य सामग्रीवर वगळा

शांतता कोर्टात गेली आहे

 उगवतीचे रंग 

शांतता कोर्टात गेली आहे  

' पहाटेच्या रम्य आणि शांत वेळी...' अशा प्रकारची वाक्ये आता बहुधा कथा कादंबऱ्यातूनच वाचायला मिळतील की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली दिसते. पहाट किंवा सकाळ ही शांत आणि रम्य राहिल्याचे चित्र आता अभावानेच आढळते. निरनिराळ्या आवाजांनी पहाटेची ही रम्य आणि शांत वेळ प्रदूषित केली आहे. सकाळी पाच वाजल्यापासून वाहनांचे आवाज सुरु होतात. काही वाहने लवकर सुरु न झाल्याने त्यांचे मालक अक्सिलेटर वाढवून ती बराच वेळ सुरु ठेवतात. जवळपास असलेल्या काही मंदिर आणि मशिदीवरील भोंगे आरती, प्रार्थना आणि अजान आदी सुरु होतात. तुम्हाला ते  ऐकण्याशिवाय काही चॉईस नसतो. पहाटेची शांत वेळ ध्यान करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी उत्तम असते असे म्हणतात. आता अशा या गोंगाटात ध्यान आणि अभ्यास कसा करणार ? सहा साडेसहा वाजेनंतर शाळेत जाणाऱ्या मुलांच्या रिक्षा आणि बसचे कर्कश हॉर्न सुरु होतात. मुलांनी तयार राहावे म्हणून ते लांबूनच हॉर्न वाजवत येतात. बऱ्याच वेळा मुलं शाळेसाठी तयार होऊन उभीच असतात, पण यांची हॉर्न वाजवण्याची सवय जात नाही. त्यावर काही टॅक्स नाही आणि त्यांना बोलणारं कोणी नाही. कोणी बोललंच तर तो वाईट ठरतो. मुलं शाळेत गेल्यावर कुठं हुश्श करत बसावं तोवर भाजीवाले, फळवाले, भंगारवाले तयार होऊन येतात. त्यांचेही आवाज तुम्हाला ऐकावेच लागतात. आता तर त्यांनी आपल्या गाड्यांवर आवाज रेकॉर्ड केलेले स्पिकर्स लावले आहेत. त्यामुळे त्यांचा ओरडण्याचा ताण कमी झाला पण जनतेला मात्र ते स्पीकर्सचे आवाज सहन करण्यापलीकडे पर्याय नाही. त्यानंतर नगरपालिकेची घंटा/कचरा गाडी येते. तिच्यावर लावलेल्या स्पीकर्समधून विविध प्रकारच्या गाणीवजा सूचना तुम्हाला ऐकाव्याच लागतात. हे सगळे कमी की काय म्हणून कुणीतरी शेजारी जोरात टीव्ही किंवा रेडिओ लावलेला असतो. काही मंडळी मोबाईलवर गाणी वाजवीत जात असतात. आपण म्हणतो सकाळची रम्य आणि शांत वेळ ! पूर्वी कधी तरी नक्कीच पहाट रम्य आणि शांत असावी त्याशिवाय आमच्या ऋषीमुनींना आणि साहित्यिकांना इतक्या सुंदर सुंदर साहित्यरचना कशा सुचल्या असत्या !

 परवाच्या दिवशी एका स्वागतसमारंभाला जाण्याचा योग आला. बरेचसे  नातेवाईक त्या दिवशी एकमेकांना बऱ्याच दिवसांनी भेटत होते. खूप दिवसांनी भेटी होत असल्याने बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी होत्या. पण ज्यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता, त्यांनी त्याच वेळेला एक गाण्यांचा कार्यक्रमही ठेवला होता. एकाच हॉलमध्ये स्टेजवर वधुवर, त्याच ठिकाणी जेवणाची व्यवस्था आणि  तिथेच गाणी. गाण्यांचा ऑर्केस्ट्रा ठेवण्याचा आयोजकांचा उद्देश चांगला असेलही, पण तिथे खूप दिवसांनी भेटलेल्या आप्तेष्टाना एकमेकांशी संवाद साधणे देखील कठीण होत होते एवढा गाण्यांचा आवाज मोठा होता. गाणी ऐकण्याच्या मनस्थितीत फारसं कोणी दिसत नव्हतंच. कोणाशी बोलायचं झाल्यास अगदी दुसऱ्याच्या कानाजवळ तोंड नेऊन बोलावं लागत होतं. उपस्थितांनी तशाच वातावरणात जेवणाचा आस्वाद घेतला. वधूवरांना शुभाशीर्वाद दिले. त्या कर्कश आवाजातील गाण्यांऐवजी जर मंजुळ आणि हळू आवाजातील सनईचे सूर असते, तर सगळ्यांनाच किती छान वाटलं असतं !

माझ्या घराशेजारीच एक लग्न होते. लग्नाच्या आधीच्या दिवशी संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम होता. घरापुढेच मंडप टाकण्यात आला होता. सायंकाळी पाच वाजेपासून कार्यक्रमस्थळी डीजेला सुरुवात झाली. हळदीचा कार्यक्रम पार पडेपर्यंत डीजे सुरु होता. हळदीचा कार्यक्रम पार पडल्यावर डीजे थांबला. मला हायसे वाटले. पण माझा तो आनंद थोडाच वेळ टिकला. जेवणानंतर पुन्हा डीजे सुरु झाला. रात्री वाजेपर्यंत डीजेच्या आवाजात सगळ्यांचे नाचणे झाले. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर मंडप, डीजे. आजूबाजूच्या कोणाला त्रास होत असेल याचा कोणताही विचार नाही. त्याऐवजी असे कार्यक्रम इतरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने आयोजित करता येणार नाहीत का ? पण आमचे सामाजिक भान सुटत चालले आहे. ' इतरांचा काय संबंध ? माझ्याकडे कार्यक्रम आहे ? कोणाला त्रास होत असेल तर मला काय त्याचे ? इतरांकडे कार्यक्रम असतो, तेव्हा ते करतात का असला विचार ? ' प्रत्येकजण असा सोयीस्कर स्वतःपुरता विचार करताना दिसतो. 

पूर्वी फक्त दिवाळीतच फटाके फोडत असत. हल्ली प्रसंग कोणताही असो, फटाके फोडायचे हे ठरलेले असते. लग्न, मिरवणूक, वाढदिवस, पार्टी, क्रिकेटची मॅच, एखादा विजय किंवा यश साजरे करणे हे फटाके आणि डीजे लावल्याशिवाय होताना दिसत नाही. त्यातूनही बरेचसे बहाद्दर रात्री बारानंतर फटाके फोडून लोकांना त्रास देण्यात आनंद मानणारे आहेत. फक्त कोणी गेल्यानंतर अजून फटाके वाजवण्याची पद्धत सुरु झाली हे नशीब ! 

एक गमतीदार प्रसंग सांगतो. काही दिवसांपूर्वी शेगावला गेलो होतो. गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनाला जाताना रस्त्यातून एक मिरवणूक जात होती. कोणीतरी एक जवान सैन्यातून निवृत्त झालेला होता. त्याच्या स्वागताचे आणि अभिनंदनाचे पोस्टर्सही सगळीकडे लावले होते. एका उघड्या जीपमधून त्यांची मिरवणूक सुरु होती. त्या गाडीच्या पुढे कर्कश आवाजात डीजे लावलेला होता. त्यापुढे त्या मिरवणुकीत सामील झालेले बरेचसे स्त्रीपुरुष बेभान होऊन नाचत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जो जवान सैन्यातून निवृत्त झाला होता, तो आणि त्याची पत्नी त्या जीपवर त्या गाण्यांच्या तालावर वेडेवाकडे नाचत होते. कदाचित त्या सगळ्यांसाठी तो आनंदाचा आणि अभिमानाचा प्रसंग असेलही पण मंदिरासमोर असलेल्या छोटया रस्त्यावरून ही मिरवणूक जात असल्याने भाविकांची प्रचंड गैरसोय होत होती. त्याचे कोणालाच सोयरसुतक नव्हते. कोण बोलणार ? देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल मला प्रचंड आदर आणि अभिमान आहे. देशात शांतता राहावी म्हणून सीमेवर हे सैनिक जीवाची बाजू लावून लढत असतात. पण  हे दृश्य पाहून मला खरोखरच वाईट वाटले. 

प्रश्न असा पडतो की आपल्याला खरोखरच शांतता नकोशी झालीय का ? आम्ही गोंगाटप्रिय झालो आहोत का ? इंग्रजीत एक सुंदर वाक्य आहे ' Speech is silver, silence is gold. ' या वाक्याचा अर्थ असा की  व्यर्थ बोलण्यापेक्षा मौन श्रेष्ठ आहे. शांततेचे मोल करता येणार नाही. मानवासहित सर्वच सजीवांच्या निकोप आणि आरोग्यदायी जीवनासाठी शांतता अतिशय महत्वाची आहे. आम्ही आज शाळांमध्ये पर्यावरण हा विषय शिकवतो. त्यामध्ये हवा, ध्वनी, जल इ. प्रकारच्या प्रदूषणांबद्दल शिकतो, बोलतो. पण प्रत्यक्ष आचरणात ते किती आणतो ? ती नुसतीच पोपटपंची राहते. रात्री उशिरापर्यंत डीजे, फटाके वाजवू नयेत असे कायदे आहेत. पण जोपर्यंत त्यांची कडक अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत त्यांचा काही उपयोग नाही. अर्थात नुसते कायदे करूनही उपयोग होत नाही. त्यासाठी समाजजागृती व्हावी लागते. आपल्या अशा वागण्याने इतरांना त्रास होऊ शकतो, ही भावना ज्या दिवशी आमच्या मनात निर्माण होईल, तो सुदीन म्हणायचा. विजय तेंडुलकरांचे ' शांतता कोर्ट चालू आहे ' हे नाटक प्रचंड लोकप्रिय झाले होते. कोर्टात हवी असणारी शांतता आम्हाला प्रत्यक्ष जीवनातही हवी आहे. ती जर मिळणार नसेल तर एक दिवस शांतता सुद्धा रुसून कोर्टात गेल्याशिवाय राहणार नाही. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

११/०३/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...