उगवतीचे रंग
समर्थ रामदास आणि श्रीराम
समर्थ रामदास आणि श्रीराम यांचं नातं म्हणजे दुधात विरघळलेली साखर. वेगळं करता येणं शक्यच नाही. श्रीराम म्हणजे समर्थांचा श्वास आणि ध्यास. हा श्रीरामाचा ध्यास घेऊनच समर्थांनी अगदी बालवयातच घर सोडले.
रामा तुजकारणे । जिवलगांचा संग सोडला
असे समर्थ सांगतात. समर्थांना रामाचा जो ध्यास लागला होता, तो एकाएकी निश्चितच नव्हता. समर्थांच्या घरात गेल्या २२ पिढ्यांपासून श्रीरामांची उपासना चालत आली होती. त्याची पूर्वपुण्याई सूर्याजीपंत ठोसर आणि राणूबाई यांच्या पोटी जन्म घेतलेल्या नारायणाच्या पाठीशी होती. समर्थांचा जन्मही चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी म्हणजे रामनवमीला झाला. याला केवळ योगायोग म्हणता येणार नाही तर समर्थांच्या हातून पुढे जे धर्मरक्षणाचे आणि रामाच्या उपासनेचे कार्य व्हायचे होते त्याचा हा एक दैवी संकेत होता. श्रीरामांच्या भेटीचा ध्यास घेतलेल्या नारायणाने नाशिकजवळील टाकळीस रामनामाचे पुरश्चरण सुरू केले. बालवयातच पाण्यात उभे राहून त्यांनी कठोर साधना केली आणि प्रत्यक्ष रामरायांचे दर्शन त्यांना घडले. श्रीराम हेच त्यांचे गुरु होते. ते स्वतःला या रामाचा दास म्हणवून घेत. ते म्हणत असत
साह्य आम्हांसी हनुमंत । आराध्यदैवत श्रीरघुनाथ ।
श्रीगुरु श्रीरामसमर्थ । काय उणें दासासी ।।
वेदाध्ययन, विविध ग्रंथांचे अध्ययन, मंदिरातील पुराणश्रवण आदी गोष्टी तर त्यांनी या काळात केल्याच पण सूर्यनमस्कार घालून उत्तम आरोग्य संपादन केले. व्यायाम, उपासना आणि अध्ययन या तिन्ही गोष्टींना समर्थांच्या जीवनात महत्वाचे स्थान होते.समर्थांचे भाग्य एवढे थोर की साक्षात प्रभू रामचंद्राकडून त्यांना मंत्रदीक्षा मिळाली होती. त्यामुळे साहजिकच श्रीराम हेच त्यांचे आराध्यदैवत होते. कुटुंबात रामोपासनेची परंपरा होतीच.
त्यानंतर समर्थांनी भारतभ्रमण केले. अवघ्या भारतवर्षाची पायी तीर्थयात्रा त्यांनी केली. या यात्रेत त्यांना जे भारतदर्शन घडले, त्याचा मोठाच परिणाम समर्थांच्या मनावर झाला. त्यांना भारतातील विदारक परिस्थितीचे दर्शन झाले. भारतातील लोक दारिद्र्याने पिचले होते. अंगात गुलामगिरीची वृत्ती भिनली होती. लोक स्वत्व, स्वाभिमान आणि स्वधर्म विसरले होते. मोगली सत्ता क्रूर, अन्यायी आणि अत्याचारी होती. तिला विरोध करण्याचे लोक जणू विसरूनच गेले होते. धर्म बुडाला होता. मंदिरे नष्ट होत होती. मूर्तींची विटंबना होत होती. स्त्रियांचे तर अनन्वित हाल होते. स्त्रिया सुरक्षित नव्हत्या. त्या अन्याय, अत्याचाराच्या बळी ठरत होत्या. त्यांचे संरक्षण करण्याचे सामर्थ्य असलेली मनगटे कमजोर पडली होती. आपल्या दुर्दैवाचे दशावतार पाहण्यापलीकडे सामान्य जनता दुसरे काहीही करू शकत नव्हती. ही भयंकर परिस्थिती समर्थ रामदासांना विषण्ण करून गेली.
भारतभ्रमण करतेवेळी हिमालयात समर्थांना प्रभू रामचंद्रांचे दर्शन घडले. श्रीरामांकडून त्यांना धर्माच्या रक्षणासाठी कार्य करावे अशी प्रेरणा मिळाली होती. पुढे श्रीनगरमध्ये त्यांची भेट शिखांचे सहावे गुरु हरगोविंदसिंग यांच्याशी झाली. हरगोविंदसिंग आपल्याबरोबर दोन तलवारी बाळगत असत. शिवाय त्यांच्याजवळ सशस्त्र अशी फौज असे. हे पाहून समर्थांना आश्चर्य वाटले. त्यांनी त्याचे कारण विचारले. तेव्हा हरगोविंदसिंग म्हणाले, ' एक तलवार स्वसंरक्षणासाठी आणि दुसरी तलवार स्त्रियांच्या शील रक्षणासाठी आणि माझ्याजवळ असलेला फौजफाटा धर्माच्या रक्षणासाठी. जगात दुर्बलांना काही किंमत नसते. आपले संरक्षण आपल्याला करता आले पाहिजे. ' समर्थ त्यांच्या या विचारांनी प्रभावित झाले. यानंतर पुढे ते त्यांच्यासोबत सुवर्णमंदिरात गेले. आपल्यालाही धर्मरक्षण करावयाचे असेल तर काय केले पाहिजे याचा अंदाज समर्थांना आला. त्यानंतर ते स्वतःजवळ शस्त्र बाळगू लागले. त्याला ते गुप्ती म्हणत. त्यांच्या जप करण्याच्या कुबडीत एक तलवार लपवलेली असे. आपल्या शिष्यांनाही समर्थांनी स्वाभिमान, स्वत्व आणि सामर्थ्याचा संदेश दिला. दृढनिश्चयी, पोलादी आणि कणखर मनगटाचे आणि मनाचे शिष्य तयार केले.
समर्थांच्या घराण्यात गेल्या ३२ पिढ्या श्रीरामांची उपासना असली तरी पूर्वीच्या अनेक पिढ्यांपासून विठ्ठलाची उपासना आणि वारकरी परंपरा देखील होती. समर्थ श्रीराम आणि विठ्ठल यांच्यात भेद मानत नव्हते. दोन्हीही श्रीविष्णूचीच रूपे. परंतु मोगलांच्या अन्यायी आणि जुलमी सत्तेचा प्रतिकार तर करायला हवाच होता. विठ्ठलाचे शांत आणि सौम्य रूप लोकांमध्ये अन्यायाविरुद्ध जागृती करण्यासाठी उपयोगी पडणार नाही. प्राप्त काळाचा विचार करताना समर्थांना असे एखादे दैवत हवे होते की ज्यायोगे लोकांच्या मनात अन्यायाचा प्रतिकार करण्याची उर्मी जागृत होईल. स्वत्व आणि स्वाभिमान जागृत होईल. गुलामगिरीची वृत्ती अंगी भिनलेल्या आणि शक्तिहीन झालेल्या समाजाला नवचैतन्य देईल अशा देवतेची उपासना त्यांना हवी होती. त्यांना त्याचा साक्षात्कार श्रीरामांच्या उपासनेत झाला. कोदंडधारी राम त्यांना आदर्श वाटला. अन्यायी, अत्याचारी अशा रावणाचे पारिपत्य करून त्याच्या बंदिवासात असलेल्या देवांना ज्याने मुक्त केले तो श्रीराम म्हणजे देवांचा देव. त्याला साह्य करणारा हनुमंत म्हणजे बल, बुद्धी, चातुर्य, स्वामीनिष्ठा आणि भक्तीचे प्रतीक. हातात शस्त्र घेऊन राक्षसांचे पारिपत्य करणारी आणि अभय देणारी तुळजाभवानी ही दैवते समर्थांना त्या काळाच्या दृष्टीने आदर्श वाटली. त्यांच्याच उपासनेचा आदर्श लोकांसमोर ठेवण्याचा त्यांनी निर्धार केला.
श्रीराम आणि हनुमंताची उपासना जाणीवपूर्वक स्वीकारताना समाजातील नेभळटपणा, करंटेपणा, अंगात भिनलेली गुलामीची वृत्ती जावी हा त्यांच्या अंतरीचा हेतू होता. लोकांमध्ये बलोपासनेची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी गावोगावी मारुतीची स्थापना केली. आखाडे सुरु केले. मारुतीरायांच्या उपासनेतून प्राप्त झालेल्या सामर्थ्याचा उपयोग कसा करायचा हे समजण्यासाठी रामोपासनेचे महत्व सांगितले. राम आणि मारुती यांच्या उपासनेद्वारे लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण करून समर्थांनी जणू मातीच्या पुतळ्यांमध्ये प्राण फुंकले. राम आणि मारुती यांच्या उपासनेत लोकसंग्रह, समाजकल्याण, मानवता आणि राजकारण ही सर्व तत्वे समर्थांना अंतर्भूत आहेत असे वाटले. (उगवतीचे रंग -विश्वास देशपांडे )
रामराय तर समर्थांच्या मनीध्यानी सतत होतेच. आता जनतेलाही रामभक्तीचे महत्व पटवून देण्यासाठी त्यांनी कृष्णातीरी कार्य सुरु केले. समर्थांचे भारतभ्रमण झालेच होते. त्यातून आलेल्या अनुभवातून ते उद्गारले
बहू हिंडता सौख्य होणार नाही ।
शिणावे परी नातुडे हीत काही ।
विचारे बरे अंतरा बोधवीजे ।
मना सज्जना राघवी वस्ती कीजे ।।
समर्थ म्हणतात
सदा सर्वदा योग तुझा घडावा ।
तुझे कारणी देह माझा पडावा ।।
या दोन ओळी अतिशय महत्वाच्या आहेत. यात दोन गोष्टींची मागणी समर्थांनी रामाकडे केली आहे. पहिली म्हणजे सदासर्वदा तुझे सान्निध्य असावे. तुझा आणि माझा कधीही वियोग होऊ नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्या कारणात म्हणजेच तुझ्या कार्यातच माझे आयुष्य व्यतीत व्हावे. समर्थांच्या चरित्राकडे दृष्टिक्षेप टाकला असता त्यांच्या या दोन्ही मागण्या रामरायाने पूर्ण केल्याचे दिसते. रामाचा आणि त्यांचा कधीही वियोग झाला नाही. श्रीरामांचे चरित्र, त्यांचा आदर्श ,त्यांची शिकवण यांचा आदर्श त्यांनी समाजापुढे ठेवला. आपले आयुष्य त्यांनी त्यातच व्यतीत केले. श्रीरामाची उपासना करताना त्यांनी श्रीरामांपुढे किती सुंदर आणि भव्य मागणी केली आहे पहा !
कोमळ वाचा दे रे राम । विमळ करणी दे रे राम ।।
प्रसंग ओळखी दे रे राम । धूर्त कळा मज दे रे राम ।।
मागो नेणे दे रे राम । मज न कळे ते दे रे राम ।।
तुझी आवडी दे रे राम । दास म्हणे मज दे रे राम ।।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी जनजागृती करून समर्थांनी अनुकूल पार्श्वभूमी निर्माण करून मोठे साहाय्य केले. शिवरायांच्या स्वप्नातील स्वराज्य जेव्हा प्रत्यक्षात अवतरले, तेव्हा समर्थांचा आनंद पुढील शब्दात प्रकट झाला आहे.
बुडाला औरंग्या पापी । म्लेंच्छसंव्हार जाहला ।।
मोडिली मांडली क्षेत्रे । आनंदवनभुवनी ।।
श्रीरामाची उपासना करताना समर्थांना पुढील प्रचिती आली. तोच उपदेश त्यांनी जनसामान्यांना उद्देशून केला. ते म्हणतात
मनी धरावे ते होते । विघ्न अवघेचि नासोन जाते ।
कृपा केलिया रघुनाथे । प्रचिती येते ।।
लोकांनी सजग व्हावे, सावधान व्हावे, ज्ञान मिळवावे. रामोपासना करावी यासाठी ते रामरायाला साकडे घालतात
कल्याण करी रामराया । जनहित विवरी ।
अपराधी जन चुकतचि गेले । तुझा तूचि सावरी ।।
हे त्यांचे वैश्विक कल्याणासाठीचे रामरायाला मागणे आहे. आजही समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या मठांतून रामभक्तीचा प्रसार, हनुमंताच्या बलोपासनेचा आदर्श आणि समर्थांनी उपदेश केलेल्या ' आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका ' या दिशेने कार्य सुरु आहे.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१७/१/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा