मुख्य सामग्रीवर वगळा

रामायणातील ' प्रेम ' रस

उगवतीचे रंग  

रामायणातील ' प्रेम ' रस 

' रामायण ' चार अक्षरी शब्द ! शतकानुशतके भारतीय मनाला मोहिनी घालणारे महाकाव्य ! रामायणात प्रेमरसाचा मंगल कलश काठोकाठ ओसंडून वाहतो आहे. ' वाल्मिकीच्या भाव मनीचे ' प्रामुख्याने प्रेमरसात भिजूनच बाहेर पडले आहेत. राजा, गुरु, पिता, पुत्र, माता, बंधू, सखा, भक्त, सेवक आदी नात्यातील हिमालयाएवढ्या उंचीचे आदर्श तर रामायणाने उभे केले आहेतच पण प्रेम काय असते, प्रेमातील समर्पण कसे असते याचे जे आदर्श रामायणात आहेत, ते अन्यत्र कोठेही आढळत नाहीत. प्रेमाचा सप्ताह आणि त्यातील विविध दिनविशेष साजरे करणे, व्हॅलेंटाईन डे ला भेटवस्तू आदी देऊन आपल्या प्रेमाचे प्रकटीकरण करणे या गोष्टी आज मोठया प्रमाणावर होत असताना  रामायणातील विविध व्यक्तिरेखा प्रेम कसे असावे या विषयावर मोठा सुंदर प्रकाश टाकतात. या प्रेमात काय नाही ? त्याग, सेवा, समर्पण आहे. आकाशाची उदात्तता आहे, सागराची खोली आहे, हिमालयाची उंची आहे, गंगाजलाचे पावित्र्य आहे, कुसुमांचा मंद दरवळणारा सुगंध आहे आणि अमृताचे माधुर्य आहे. 

' राम ' शब्दाचा अर्थच मुळी आनंद देणारा असा आहे. ' रम ' या शब्दापासून ' राम ' शब्द तयार झाला आहे. ' रमन ' म्हणजे वास करणे. सर्व प्राणिमात्रांच्या हृदयात जो ' रमतो ' तो राम. ' रमते कणे कणे इति राम. ' प्रेम असल्याशिवाय कोणाच्या हृदयात निवास शक्य तरी आहे का ? रामाला आपण मर्यादापुरुषोत्तम म्हणतो. त्याचा पराक्रम कळिकाळालाही भय वाटेल असा आहे, सागराहूनही उदारहृदयी तो आहे. पण सर्वगुणसंपन्न असलेला राम मर्यादापुरुषोत्तम आहे. पुरुषानं कसं वागावं याचा आदर्श म्हणजे राम आहे. त्याचं वागणं म्हणजे नराकडून नारायणाकडे जाण्याचा प्रवास आहे. पण हा प्रवास भावनाशून्य किंवा कोरडा नाही. तो प्रेमानं ओथंबलेला आहे. किंबहुना प्रेम असल्याशिवाय असा प्रवास शक्यही नाही. 

आपल्या मातापित्यांवर रामाचं अपार प्रेम आहे. त्यांच्या आज्ञेखातर  आणि इच्छेखातर वनवास देखील आनंदाने पत्करण्याची त्याची तयारी आहे. आपल्या भावांसाठी कोणताही त्याग करण्याची त्याची तयारी आहे. भरताला तो आनंदाने राज्य देतो एवढंच काय पण जेव्हा स्वतः भरत त्याला परत घेऊन जाण्यासाठी वनात येतो, तेव्हाही राज्यमोह त्याला अडवू शकत नाही. ' रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई ' हे रघुकुलाचे ब्रीद आहे. आपल्या वडिलांना दिलेला शब्द पाळून आपण कृतार्थ होऊ या असे सांगून तो भरताला परत पाठवतो. 

पती म्हणून सीतेवर त्याचे अपरंपार प्रेम आहे. तिच्यासोबतचा वनवास त्याला सुखावह आहे. मात्र जेव्हा रावण तिला पळवून नेतो, त्यावेळी तिच्या विरहाने कमालीचा शोकाकुल होणारा तो पती आहे. आपल्या प्रिय पत्नीखातर रावणासारख्या बलाढ्य शत्रूचे पारिपत्य करून तिला परत आणण्याची धमक त्याच्यामध्ये आहे. रामाच्या आयुष्यात भावना आणि कर्तव्य यांचा मोठा संघर्ष बघायला मिळतो. आपल्या प्रिय पत्नीवर प्रेम असतानाही राजा म्हणून केवळ लोकापवादासाठी तो तिचा त्याग करतो. पण तिचे आपल्यासोबत नसणे त्याच्यासाठी प्रचंड दुःखदायी आहे. सगळ्यांनी सांगितले तरी तो दुसरा विवाह करीत नाही. जेव्हा सीता भूमीत प्रवेश करते, तेव्हा सीतेच्या विरहामुळे प्रचंड शोकाकुल झालेला पती म्हणजे राम आहे. 

जसं रामाचं सीतेवर प्रेम आहे, तसंच आणि तेवढंच उत्कट सीतेचं देखील रामावर प्रेम आहे. राम हा तिचा श्वास आहे. एका रामाशिवाय तिला काहीही प्रिय नाही. वनवासातील रामाबरोबरचा काळ हा तिच्या दृष्टीने स्वर्गसुखापेक्षाही अधिक सुखकर आहे. सगळ्या देवांना बंदी बनवणारा आणि तिला विविध प्रलोभनं दाखवणारा रावण तिला भुलवू शकत नाही. हनुमंत लंकेत जाऊन तिचा शोध घेतो आणि नंतर तिला आपल्यासोबत रामाकडे चालण्याची विनंती करतो, तेव्हा ती त्या गोष्टीला नकार देते. कारण एका रामाशिवाय अन्य कोणाचाही स्पर्श तिला नको असतो. राम आणि सीता ही प्रेम, त्याग आणि समर्पण यांची एक अजरामर कथा आहे. 

रामायणातील भावाभावांचे प्रेम तर किती उदात्त ! वनवास तर एकट्या रामाला झाला होता. वास्तविक लक्ष्मणाने त्याच्यासोबत वनात जाण्याचे काही कारण नव्हते. त्याचाही नुकताच विवाह झाला होता. तो राजप्रासादात राहून सुखाचा उपभोग घेऊ शकला असता. पण रामाशिवाय तो राहूच शकत नव्हता. लक्ष्मण म्हणजे रामाची सावली होता. तो त्याला सोडून क्षणभरही राहत नव्हता. वनवासात राम आणि सीतेसाठी लक्ष्मणाने आपल्या झोपेचा सुद्धा त्याग केला. भरत आणि शत्रुघ्न ही सुद्धा राम लक्ष्मणासारखी दुसरी जोडी. ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. पण या सगळ्यांचे रामावर आणि रामाचे त्या सगळ्यांवर अपार प्रेम होते. ज्या भरतासाठी कैकयी राज्य मागून घेते आणि रामाला वनवासात पाठवते, त्याच भरताला एका रामाशिवाय दुसरे काहीही प्रिय नाही म्हणून त्याला परत आणण्यासाठी तो वनात जातो. राम येत नाही म्हणून त्याच्या पादुका गादीवर ठेवून तो राज्य करतो. राम वनवासात आहे, कंदमुळे भक्षण करतो म्हणून भरतही  नंदिग्रामी राहतो, जमिनीवर झोपतो, कंदमुळं सेवन करतो आणि व्रतस्थ वृत्तीने राहतो. बंधुप्रेमाचा आदर्श म्हणजे हे चौघे बंधू. आजच्या काळात एवढ्यातेवढ्या संपत्तीवरून  वाद निर्माण करून एकमेकांना कोर्टात खेचणारे भाऊ कुठे आणि एकमेकांसाठी राज्यत्याग करणारे आणि सर्वस्व समर्पण करायला तयार असणारे रामायणातील हे सगळे बंधू कुठे ?  

जसा लक्ष्मणाचा त्याग रामासाठी आहे, तसाच त्याच्या पत्नीचा म्हणजे उर्मिलेचा त्याग लक्ष्मणासाठी आहे. तिचा त्याग आणि समर्पण सीतेपेक्षा यत्किंचितही कमी नाही. ती सुद्धा नवविवाहिता. सीतेसोबतच लग्न होऊन अयोध्येच्या राजप्रासादात आलेली. तिचीही संसाराची काही स्वप्ने नक्कीच असतील. पण केवळ आपल्या पतीच्या शब्दाखातर ती अयोध्येच्या राजप्रासादात राहते. ती राजप्रासादात असली तरी तिच्या नशिबी हा एक प्रकारचा वनवासच आहे. चौदा वर्षे आपल्या पतीचा वियोग सहन करणे ही तिची एक मोठी साधनाच आहे. 

त्याग, सेवा आणि समर्पण यांचे आणखी एक मोठे उदाहरण रामायणात आहे. ते म्हणजे हनुमंताचे. सेवक कसा असावा, भक्त कसा असावा याचा हनुमान म्हणजे मूर्तिमंत आदर्श ! एका रामाशिवाय त्याला काहीही प्रिय नाही. आपल्या स्वामींवर पराकोटीची निष्ठा असलेला हा रामसेवक आहे. लंकेत सीतामाईच्या शोधात निघालेला असताना हनुमानाची विविध प्रकारची परीक्षा सुरसा राक्षसी, मैनाक पर्वत इ. मार्फत घेतली जाते. पण केवळ ' रामकाज करने को आतुर ' असलेला हनुमान या परीक्षेत लीलया उत्तीर्ण होतो. हनुमंताच्या हृदयी राम आहेत पण रामाच्या हृदयात हनुमंताने कायमस्वरूपी स्थान मिळवले आहे. सीतेच्या शोधात आणि राम रावण युद्धात हनुमंताच्या योगदानाशिवाय विजय मिळवणे शक्य नव्हते. त्याच्या या मदतीची जाणीव रामाला आहे. ते शेवटी हनुमंताला विचारतात की मी तुला काय देऊ ? तुला द्यावं असं काही माझ्याजवळ नाही. पण माझ्या प्रेमाचं प्रतीक असलेलं आलिंगन मी तुला देतो. रामाचं आलिंगन ही हनुमंतासाठी सर्वश्रेष्ठ भेट आहे. 

मर्यादापुरुषोत्तम असलेल्या रामाच्या हृदयातील प्रेमाला मात्र कोणतीही मर्यादा नाही. त्यानं एकदा ज्याचा हात धरला, त्याला कधीच सोडलं नाही. एकदा ज्याला हृदयाशी धरलं, त्याला कधीच दूर केलं नाही. एकदा जो त्याला शरण गेला, तो कायमस्वरूपी त्याचा झाला. सुग्रीव, बिभीषण, निषादराज या मित्रांना रामाने एकदा जे हृदयाशी धरलं, ते शेवटपर्यंत. एवढंच नाही तर अयोध्येत परतल्यानंतर राज्याभिषेकासाठी पहिलं निमंत्रण धाडलं ते या सगळ्या मंडळींना. 

आपल्या प्रिय व्यक्तींना उराशी धरणे, त्यांच्या कार्याची प्रशंसा करणे, त्यांच्यासाठी सर्वस्वाचा त्याग करायला तयार होणे या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रेमाच्या चढत्या पायऱ्याच ! रामायणात या सगळ्या गोष्टी आपल्याला भरभरून बघायला मिळतात. म्हणून खरं प्रेम काय असतं, कसं असतं ते समजून घेण्यासाठी का होईना रामायणातील हा ' प्रेमरस ' आम्ही समजून घेण्याची गरज आहे. प्रेमाची महती सांगताना संत कबीर म्हणतात, ' पोथी पढी-पढी जग मुआ, पंडित भया न कोय, ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय. '  

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१३/०२/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...