मुख्य सामग्रीवर वगळा

 उगवतीचे रंग

कसं हुईल, काय हुईल...!
प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांचं ' वऱ्हाड निघालं लंडनला ' हा एकपात्री प्रयोग बहुतेकांनी पाहिला असेल किंवा त्याचा ऑडिओ तरी ऐकला असेल. त्याची आठवण येण्याचं कारण म्हणजे डिसेंबर (२०२३) महिन्यात आम्हाला एका लग्नाला जायचं होतं. ते लग्न होतं कर्नाटकात होस्पेट या गावी. तसं म्हटलं तर लग्नाला जाणं आवश्यक होतं . पण त्याआधी त्यांच्या साखरपुड्याला आणि कर्नाटकातील शिमोगा या सारख्या लांबच्या गावी हजर राहिल्यानं लग्नाला हजर नसतो राहिलो तरी ते चालून जाण्यासारखं होतं असा सोयीस्कर विचार आम्ही केला. पण आमच्या सौभाग्यवतीच्या आग्रहापुढे आमचा हा न जाण्याचा विचार फारसा टिकला नाही. ( अर्थात असं होणार याची मनोमन खात्री होतीच. देवानं माणसाला आणि प्राण्यांना सुद्धा जो सिक्स्थ सेन्स ( मराठीत काय म्हणतात माहिती नाही ) दिला आहे, तो प्राण्यांकडे तर आहे पण माणूस निसर्गापासून दूर गेल्याने तो ही मौल्यवान गोष्ट हरवून बसला आहे. पण समस्त नवरे मंडळींना मात्र अशा प्रकारचा सिक्स्थ सेन्स निसर्गानं अजूनही ठेवला आहे. त्यामुळेच पुढचे धोके लक्षात येतात. तर असो. तुम्हाला म्हणून सांगितलं )
त्याआधी शिमोग्याला जाण्याचा अनुभव गाठीशी होता. चाळीसगावहून शिमोग्याला जाण्यासाठी डायरेक्ट कुठलीही गाडी नव्हती. चाळीसगावहून कारने जाण्याचा विचार केला पण लांबचा पल्ला असल्याने तोही विचार रद्द केला. मग पुण्याहून अकरा डिसेंबरचं रेल्वेचं आरक्षण केलं. रेल्वे पुण्याहून भलत्याच वेळेला म्हणजे रात्री १ वा. त्यातही गडबड अशी झाली की आमच्या सुमार बुद्धीनुसार आम्ही ती गाडी रात्री अकरा तारखेला म्हणजेच अकरा तारखेच्या रात्री एक वाजता आहे असे मनात पक्कं धरून चाललो होतो. त्यानुसार अकरा तारखेला रात्री घरून बारा वा निघून स्टेशनवर पोहोचू असे मनाशी ठरवले पण होते. पण तसे गेलो असतो तर रात्री बारा नंतर बारा तारीख लागली असती. आणि आमचेच बारा वाजले असते. आणि मग ' आता जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा ' असं म्हणायची वेळ आली असती. पण आमचे नशीब बलवत्तर ! आमच्या सुनबाईने आमच्या लक्षात ही गोष्ट वेळीच आणून दिल्यामुळे पुढील अनर्थ टळला. आम्ही बरोबर १० तारखेच्या रात्री बारा वाजता घरून निघालो आणि अकरा तारखेची म्हणजेच रात्री एकची गाडी पकडली. असं होतं आमचं. मनात सारखा एकच विचार. कसं हुईल, काय हुईल ? रेल्वे गाडीत बसल्यानंतर तिने वेग घेतला आणि तिच्या तालात मला ' कसं हुईल, काय हुईल ' हेच वाक्य ऐकू येऊ लागले. लांबचा पल्ला तर होताच.
मग आठवू लागलं प्रा.लक्ष्मण देशपांडे यांचं ' वऱ्हाड निघालं लंडनला ' हे एकपात्री नाटक. त्याचे ऑडिओ सुद्धा निघाले आहेतच. पण ते पाहण्यात जास्त मजा येते. काय विलक्षण ताकदीचा माणूस म्हटला पाहिजे हा ! एकाच वेळी एकाच व्यक्तीने रंगमंचावर ५२ पात्रांची भूमिका करणे हे सोपे काम निश्चितच नव्हे. तेही अंगावर फक्त एक शाल घेऊन. आणि मग तीन तास श्रोत्यांमधून हास्याची कारंजी फ़ुलायची.
लक्ष्मण देशपांडे यांच्यानंतर ते सादर करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण मला त्यांनी केलेला मूळ एकपात्री प्रयोगच अधिक भावतो. त्यांच्या आवाजातील चढउतार, चेहऱ्यावरील हावभाव, कमीतकमी शारीरिक हालचाली करून सुद्धा त्यांच्या पात्रांचे उभे केलेले व्यक्तिमत्व मनावर कायमचे गारुड करून जाते. हा माणूस अष्टपैलू कलाकार तर होताच पण मानवी स्वभावाचे त्यांचे निरीक्षण जबरदस्त होते. आपल्या रोजच्या जीवनात येणाऱ्या व्यक्तींच्या लकबी, स्वभाव अचूक हेरून त्यांचे प्रभावी पद्धतीने त्यांनी सादरीकरण केले. खरं तर आपल्याला सुद्धा रोजच्या जीवनात अशा अनेक व्यक्ती भेटत असतात. पण अशा पद्धतीने त्यांचे निरीक्षण करून एखाद्या अजरामर अशा कलाकृतीत त्याचे रूपांतर करणे ही गोष्ट प्रा लक्षण देशपांडे यांच्यासारखा हरहुन्नरी कलाकारच करू जाणे !
या एकपात्री प्रयोगातील काही पात्रे कायम लक्षात राहणारी आहेत. आठवतो का इंग्रजी पत्र लिहिणारा तो बबन्या ? बबन्याचं शिक्षण काय तर म्हणे बबन्या नॉन मॅट्रिक पास आहे. नॉन मॅट्रिक आणि पास ? पूर्वी अकरावी मॅट्रिक होती. ती परीक्षा तशी कठीण असायची. काही जण पंढरीच्या वाऱ्या करतात तसे दरवर्षी या परीक्षेला बसायचे. कोणी पास व्हायचे तर कोणी नापास. जे नापास झाले त्यांना नापास न म्हणता नॉन मॅट्रिक म्हणायचे. ( म्हणजे मॅट्रिक नापास आहे हे सांगण्यापेक्षा नॉन मॅट्रिक आहे असे सांगणे अधिक चांगले असा समज असावा ) तर असा हा बबन्या नॉन मॅट्रिक पास !तो आपला इंग्रजीत दन दन सन पत्र लिहून मोकळा होतो. चुका काढायला आहेच कोण ! मग इंग्रजीत पत्र लिहिताना नाडी, बस्ता यासारखे शब्द लिहिताना बबन्या जी धमाल करतो ती पाहण्यासारखी !
या नाटकाचा हिरो म्हणजे ' बाप्पा '. भरदार आवाज असलेला हा बाप्पा लक्ष्मण देशपांडे यांनी अतिशय प्रभावीपणे उभा केला आहे. मध्यवर्ती भूमिका असलेला हा बाप्पा रंग, रूप, स्पर्श, गंध आदी ज्या काही गोष्टी आपल्या पंचज्ञानेंद्रियाला जाणवणाऱ्या असतात, त्या जाणवून देतो आणि मराठवाड्याची संस्कृती, परंपरा आपल्यासमोर उभी करतो. लक्ष्मण देशपांडे यांच्या निवेदनातून बारदान, दरुजा ( दरवाजा ), वावर, भिताड आदी ग्रामीण शब्द सहज येतात. बोलण्यात तो ग्रामीण बाज असतो.
त्यांच्या सूक्ष्म विनोदबुद्धीची दाद द्यावीशी वाटते. खेड्यापाड्यात आजही गेलं की बाहेरच्या भिंतीवर अनेक फोटो लावलेले असतात. त्या फोटोच्या खाली दररोज सकाळ संध्याकाळ उदबत्ती लावून त्या फोटोच्या काचा काळ्या झालेल्या असतात. त्यावर ते मार्मिक विनोद करतात. ' उदबत्ती लावू लावू फोटोच्या काचा इतक्या काळ्याभंगार पडेल हेत की कधी कधी त्या काचा त्या ग्रहण पाहायला कामात येतात. ' इंग्रजी आणि मराठीचं गमतीदार मिश्रण प्रेक्षकांना हसून हसून लोटपोट करतं. ' द होल वावर इज आवर ' या सारखी वाक्ये धमाल आहेत. जमिनीचा पोपडा नको काढू ना, हातवारे नको करू यासारखी वाक्ये खूप हसवतात. काशिनाथची आई म्हणजे बाप्पाची बायको. तिचं पण व्यक्तिमत्व त्यांनी छान उभं केलंय. तिला ते खटलं म्हणतात. ' आमचं खटलं महाचेंगट, बसली तर उठत नाही, उठली तर बसत नाही, येणार नाही ती बाई लवकर, आयुष्यभर जीव खाल्ला माझा कुरतडून... यासारखी वाक्ये तिची स्वभावैशिष्ट्ये आणि बाप्पाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन दाखवतात. तर ती सुद्धा फार मजेशीर बोलते. ' तुम्ही मला बोलवलं का ? फौजदारासारखं म्हटलं, फौजदार नाही... अशी तिची वाक्ये धमाल उडवतात.
सगळ्यात धमाल उडवतात ती बायकांची एकमेकांबद्दलची वाक्यं. नणंद कशी आहे ते फार छान सांगितलं आहे. बायकांना हळू आवाजात कुजबुजण्याची सवय असते. त्यातून अगदी हळू आवाजात, ' अजिबात काम करत नाही. ही बाई कशाचं श्रेय घेईल काही सांगता येत नाही. काही चांगलं झालं माझ्यामुळं झालं. काही झालं माझ्यामुळं झालं, काही झालं हिच्यामुळं झालं, हरभरी मेली. ' यासारखी वाक्ये प्रेक्षकांना प्रचंड हसवतात.
काशिनाथ जेव्हा आत्महत्या करण्याबद्दल बोलतो, तेव्हाचं बाप्पाचं बोलणं प्रेक्षकांना आतून हलवून टाकतं. जुन्या पिढीनं केलेला त्याग, त्याची जाणीव नव्या पिढीनं ठेवावी असंच जणू सांगून बाप्पा आपल्याला अंतर्मुख करतो.
' जॉनचं ' जानराव असं केलेलं नामकरण अफलातून आहे. जॉन जेव्हा इंग्रजीत बोलतो, तेव्हा तिकडच्या धाटणीचे इंग्रजी उच्चार लक्ष्मण देशपांडे यांनी ज्या पद्धतीने केले आहेत, ते जबरदस्तच म्हणावे लागेल. ज्युडीचं ' जुडी मेथीची की शोपुची ' यासारखी वाक्ये मनमुराद हसवतात. पारावर बसलेल्या आणि तंबाखू मळणाऱ्या लोकांच्या बोलण्याचेही अफलातून सादरीकरण त्यांनी केले आहे. अशा बोलण्यासारख्या आणि सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत.
एकूणच मानवी स्वभावाचं बारीक निरीक्षण दाद घेऊन जातं. व्यक्तींचे स्वभाव वैशिष्ट्य स्पष्ट करतं. मला या ठिकाणी मधुकर तोरडमल यांच्या ' तरुण तुर्क म्हातारे अर्क ' या नाटकाची आठवण येते. या नाटकात सुद्धा तोरडमल यांनी व्यक्तींचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यांच्या लकबी फार उत्तम सादर केल्या आहेत. त्यांची या नाटकातील ' ह ' ची बाराखडी तर धमाल करते आणि प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावते. पुलं सुद्धा याबाबतीत ग्रेटच ! त्यांच्या एकेक कथा सादर करताना त्यांनी त्या त्या पात्रांचे जे गुणविशेष आणि लकबी वर्णन केल्या आहेत, त्याला तोड नाही.
मनुष्यस्वभावाचे बारकाईने निरीक्षण करून अतिशय मनोरंजक पद्धतीने त्या व्यक्तिरेखा सादर करणे, त्यातून मार्मिक भाष्य करणे हे पुलं, लक्ष्मण देशपांडे, मधुकर तोरडमल यांच्यासारख्या लेखकांचे खरे तर आपल्यावर मोठेच उपकार आहेत. कधीही कंटाळा आला, वैताग आला की यांची पुस्तके उघडावी वा नाटके पाहावी. नुसतंच कसं हुईल, काय हुईल म्हणून थोडीच भागणार आहे. कारण आयुष्य हा सुद्धा एक ' लांबचा पल्ला ' आहे.
©विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
११/०२/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...