मुख्य सामग्रीवर वगळा

मोदी सरांच्या वर्गात...

उगवतीचे रंग 

मोदी सरांच्या वर्गात... 

परवा सहज टीव्ही लावला आणि त्यावेळी टीव्हीवर मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ' परीक्षा पे चर्चा ' हा कार्यक्रम सुरु होता. उत्सुकता म्हणून पाहत राहिलो. तसेही आयुष्य शिक्षकी पेशात गेल्याने विद्यार्थी कोणते प्रश्न विचारतात आणि मोदी सर त्यांना काय उत्तर देतात याचे कुतूहल नक्कीच होते. यापूर्वीही मोदीजींची अनेक भाषणे जरी प्रत्यक्ष नाही तरी टीव्हीवर ऐकण्याची संधी मिळाली होती. त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली होती की मोदीजी हातात कुठलाही कागद न घेता उत्स्फूतपणे बोलतात, सहज बोलतात आणि समोरच्यांची मने जिंकून घेतात. तोच सुखद अनुभव यावेळीही आला. बुद्धिमान अशा तीन साडेतीन हजार विद्यार्थ्यांसमोर पंतप्रधान उभे राहून बोलत होते. त्याचवेळी देशाच्या विविध भागातील विद्यार्थी ऑनलाईन प्रश्न विचारत होते. या प्रश्नांना शांतपणे, खंबीरपणे आणि अत्यंत आत्मविश्वासाने मोदीजी उत्तरे देत होते. खरे तर हुशार विद्यार्थ्यांसमोर मार्गदर्शनासाठी उभे राहणे हीच एक मोठी गोष्ट आहे आणि त्यांना समर्पक उत्तरे देऊन त्यांचे समाधान करणे ही त्यापुढील गोष्ट !एखाद्या अनुभवी आणि कसलेल्या शिक्षकालाच ही गोष्ट शक्य आहे. पण मोदी सरांची गोष्टच वेगळी ! त्यांनी अगदी लीलया आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत या प्रश्नांची उत्तरे दिली. कधी कधी नर्म विनोद करून मुलांना हसवले देखील. हसत खेळत बोलता बोलता त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली. 

त्याआधी त्यांनी प्रगती मैदानावर विद्यार्थ्यांनी भरवलेल्या एका विज्ञान प्रदर्शनाला भेट दिली. विद्यार्थ्यांनी साकारलेले प्रकल्प मोठ्या कौतुकाने पाहिले. त्यासंदर्भात मुलांना प्रश्न विचारले. त्या विद्यार्थ्यांना किती आनंद झाला असेल याची कल्पना आपण करू शकतो. देशाचे पंतप्रधान आपल्या प्रकल्पाला भेट देतात, तो कौतुकाने पाहतात आणि पाठीवर शाबासकीची थाप देतात, ही गोष्टच त्यांना केवढी प्रेरणा देणारी आणि त्यांच्या भावी आयुष्यावर प्रभाव टाकणारी आहे. 

मला आठवले की गेल्या डिसेंबर महिन्यात मी पुण्याला गेलो होतो. त्यावेळी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात १६ ते २४डिसेंबर २०२३ या कालावधीत पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला मी सलग दोन दिवस भेट दिली. विविध पुस्तक प्रकाशन संस्थांचे जवळपास २५० च्या वर स्टॉल्स होते. एखाद्या साहित्य संमेलनात असावेत तसे. पण या पुस्तक महोत्सवात मला साहित्य संमेलनापेक्षाही अधिक उत्साह जाणवला. पुणेकर रसिकांचा भरभरून प्रतिसाद होता. आजूबाजूच्या गावातील, शहरातील  लोकही येथे येत होते. या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे पालक आपल्या मुलांसह येत होते. त्यांना पुस्तक प्रदर्शन दाखवत होते. मुलांना प्रत्यक्ष पुस्तकं हाताळण्याची संधी मिळत होती. काही लेखकांच्या मुलाखती, परिसंवाद असे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. 

याच महोत्सवात येणाऱ्या प्रत्येकाची नोंद घेतली जात होती. त्यांचे नाव, मोबाईल नंबर लिहून घेतला जात होता. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दोन पुस्तके आवर्जून भेट दिली जात होती. त्यातील एक पुस्तक होते मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ' एक्झाम वॉरियर्स ' आणि दुसरे होते ' हिंदवी स्वराज्य स्थापना ' हे मोहन शेटे यांनी लिहिलेलं पुस्तक. फुकट मिळणारी ही पुस्तकं म्हणून प्रत्येक जण ते आवर्जून घेत होता आणि आपल्या बॅगेत ठेवून देत होता. जी गोष्ट सहजपणे अगदी कुठलेही मूल्य न देता प्राप्त होते, त्याची किंमत आपल्याला वाटत नाही. तसे बऱ्याच जणांनी केलेही असेल. पण ही पुस्तके म्हणजे खरोखरच एक मौल्यवान अशी भेट होती. ज्यांनी ही पुस्तके वाचून पाहिली असतील,त्यांना हे नक्कीच लक्षात आले असेल. 

त्यातील ' एक्झाम वॉरियर्स ' हे पुस्तक मला अतिशय आवडले. या पुस्तकात मा प्रधानमंत्र्यांनी विद्यार्थी आणि पालकांना केलेलं मार्गदर्शन सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांनी आवर्जून वाचावं असं आहे. नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाने या पुस्तकाची सुरेख छपाई केली आहे. पाहिल्याबरोबर हे पुस्तक आपलं मन आकर्षून घेतं. या पुस्तकात विद्यार्थी आणि पालकांसाठी मिळून एकूण ३४ प्रकरणे म्हणजेच ३४ मंत्र आहेत. यातील पहिले १ ते २८ मंत्र विद्यार्थ्यांसाठी आहेत. तर २९ ते ३४ ही प्रकरणे ( मंत्र ) पालकांसाठी आहेत. या पुस्तकात शेवटी आदरणीय मोदींनी शिक्षकांना लिहिलेलं एक पत्र आहे. ते वाचताना ' अब्राहम लिंकनचे हेडमास्तरास पत्र ' याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. विद्यार्थी हा जसा बौद्धिक दृष्ट्या संपन्न असावा, तसाच त्याचा उत्तम शारीरिक आणि मानसिक विकासही व्हावा याचीही काळजी यात घेण्यात आली आहे. शेवटी एक परिशिष्ट योगासने आणि प्राणायाम यांचे जोडण्यात आले आहे. वियार्थ्यांना यातून नियमित व्यायामाचा संदेश पंतप्रधानांनी दिलेला आहे. शिक्षकांना मार्गदर्शन करताना शिक्षकांनी सुद्धा आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखावे असे सांगून त्यांना देखील मोदीजी योगासने आणि प्राणायाम नियमितपणे करण्याचा सल्ला देतात. पंतप्रधानांचे हे सांगणे म्हणजे नुसताच कोरडा उपदेश नाही. ' आधी केले मग सांगितले ' असे त्याचे स्वरूप आहे. 

विद्यार्थ्यांसाठी जी पहिली २८ प्रकरणे आहेत, त्यातील काही प्रकरणांची ही नुसती शीर्षके पहा. 

* परीक्षा एक उत्सव - उत्साह व आनंदाने साजरा करू या.
* परीक्षा तुमच्या सध्याच्या अभ्यासाची आहे, आयुष्याची नाही ! मजेत राहा ! 
* दुसऱ्याशी नाही तर स्वतःशी स्पर्धा करा. 

पालकांसाठी जे मार्गदर्शन आहे, त्याचीही शीर्षके पहा 

* तुमचे बोलच त्यांची प्रेरणा, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. 
* मुलांचे मित्र बना, निराशेला दूरच ठेवा. 
* तुमची स्वप्ने त्यांच्यावर लादु नका. 

परीक्षा - एक उत्सव या पहिल्या प्रकरणात मोदीजी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणतात , ' सण, उत्सवांची आपण वर्षभर वाट पाहतो, तयारी करतो. या प्रसंगी माणसांकडच्या सर्वोत्तम गोष्टी बाहेर येतात. व्यक्ती आणि समाज यांच्या चांगुलपणाचे दर्शन घडते. परीक्षाही याचकरता असतात, जेणेकरून आपल्यातले जे सर्वोत्तम आहे, ते बाहेर यावे. आपल्याला आपल्या क्षमतांची जाणीव व्हावी. ' आणखी एका प्रकरणात ते मुलांना म्हणतात, ' कोणासारखं तरी व्हायचं नव्हे तर काहीतरी करून दाखवण्याचं स्वप्न पहा. ' 

आजकाल पालकांची तक्रार असते की आपला मुलगा स्क्रीन जास्त पाहतो. अभ्यास करत नाही. त्यावर बोलताना ते म्हणतात, ' आपल्या मुलाबरोबर तुम्ही कधी पायी लांब फिरायला गेला आहात का ? तुम्ही आपल्या मुलाला कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये सामील करून घेता का ? उदा. एखादा नातेवाईक रुग्णालयात असताना. 
तुमचे उत्तर नाही असे असेल तर, तुमच्यात आणि तुमच्या मुलात अंतर आहे. ज्यामुळे तुमच्या मुलाला यांत्रिक उपकरणांचे व्यसन लागते आहे. ' 

हे पुस्तक ' करा व शिका ' म्हणजेच कृतिजन्य अनुभवांवर भर देते. जेव्हा आपण एखादी नवी गोष्ट शिकतो, ती प्रत्यक्ष करून पाहिल्याने संपूर्णतः अवगत होते. याकरताच या पुस्तकात प्रत्येक मंत्रानंतर छोटया छोट्या मनोरंजक आणि रचनात्मक कृती सांगितल्या आहेत. या सगळ्यात मोदी यांची भूमिका एका परिपूर्ण शिक्षकाची आहे. अगदी पाचवी सहावीच्या विद्यार्थ्यांपासून तर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे. 

शिक्षकांशी संवाद साधताना ते म्हणतात, ' आपण शिक्षक आहात त्यामुळे आपल्या विद्यार्थ्याहून अधिक सक्षम होण्यासाठी प्रयत्न करा. संशोधन कधीही थांबवू नका. सर्वसामान्यांपेक्षा काहीतरी वेगळं वाचा आणि लिहा. यामुळे आपल्या वैयक्तिक जीवनात आपण पुढे तर जालच पण शिक्षक म्हणून आपल्या भूमिकेतही आपण अग्रेसर राहाल. ' 

एकूणच विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या सर्वांसाठीच हे एक परिपूर्ण असं पुस्तक आहे. घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीने ज्याप्रमाणे सल्ला द्यावा किंवा मार्गदर्शन करावे, तशा प्रकारचं हे मार्गदर्शन आहे. शिक्षणक्षेत्र हे मोदींच्या आवडीचं क्षेत्र आहे. लिहिणं, वाचणं आणि लोकांशी संवाद साधणं या त्यांच्या आवडीच्या गोष्टी आहेत. ज्यांना सर्वाधिक फॉलो केले जाते अशा जगातील नेत्यांमध्ये ते प्रमुख आहेत. सोशल मीडिया आणि नरेंद्र मोदी ऍपच्या माध्यमातून ते लोकांशी जोडलेले आहेत.

या पुस्तकातील आपल्या मनोगतात लेखक या नात्याने पंतप्रधान म्हणतात, ' २०१८ या वर्षांपासून ' परीक्षा पे चर्चा ' हा कार्यक्रम सुरु झाला आणि तेव्हापासून दरवर्षी तो आयोजित होत आहे. एक्झाम वॉरियर्स या पुस्तकाचा अकरा भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. या पुस्तकातील एखाद्या मंत्राचा मला खूप उपयोग झाला असे जेव्हा एखादा तरुण मित्र मला सांगतो, तेव्हा मला अतिशय आनंद होतो. ' 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 
४/२/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...