मुख्य सामग्रीवर वगळा

स्वकर्मकुसुमांची पूजा

उगवतीचे रंग  

स्वकर्मकुसुमांची पूजा 

योगप्रकाश या मासिकाचा नुकताच आलेला दिवाळी अंक हातात घेतला. त्यातील सुरुवातीच्या एका जाहिरातीने लक्ष वेधून घेतले. त्या जाहिरातीत वरच्या बाजूला ज्यांनी आयुष्यभर योगाचा प्रचार आणि प्रसार केला, त्या जनार्दन स्वामींचा फोटो होता आणि त्याखाली ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातील काही ओव्या दिल्या होत्या. त्या ओव्यांनी मला मोहिनी घातली आणि मग दिवसभर, रात्रभर त्याच ओळी माझ्या मनात घर करून राहिल्या. दिवाळी तर नुकतीच संपली आहे, पण माउलींच्या या ओळी कधीही वाचल्या तरी ज्ञानाची आणि आनंदाची दिवाळी अक्षय दिवाळी अनुभवाला येते. त्या ओळी अशा आहेत... 


जेणे जग हे समस्त । आंत बाहेरी पूर्ण भरित ।

जाले आहे दीपजात । तेजे जैसे ।।

तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा ।

पूजा केली होय अपारा । तोषालागी ।।


माउलींच्या या ओव्या म्हणजे जीवनाचे आणि परमार्थाचे सारच ! ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला आणि पसायदानात सुद्धा माउली ज्या सर्वात्मक ईश्वराला प्रार्थना करतात, त्याच सर्वात्मक म्हणजे सर्वांच्या ठायी असलेल्या ईश्वराला या ओव्यांमध्ये काय आवडते ते अर्जुनाला या ठिकाणी भगवान सांगतात. तो ईश्वर या जगात सर्वत्र आणि सर्वांच्या हृदयी विद्यमान आहे. त्याने हे जग व्यापले आहे. ईश्वर जगात सर्वत्र कसा आहे हे सांगताना माउली फार सुंदर सुंदर दृष्टांत देतात. ते म्हणतात की दिव्याचा प्रकाश जसा सर्वत्र पसरतो, तसाच परमेश्वर सगळीकडे हे जग व्यापून राहिला आहे. दिव्याच्या प्रकाशाने दशदिशा उजळून निघाव्या आणि अंधार नष्ट व्हावा, तद्वतच ईश्वर आतबाहेर सर्वत्र व्यापून राहिला आहे. 

मग या सर्वात्मक ईश्वराला काय आवडते आणि त्याची पूजा कशी करावी हे माउली पुढच्या ओळीत फार सुंदर सांगतात. ते म्हणतात, ' त्या सर्वात्मक ईश्वराला हे अर्जुना, स्वकर्म कुसुमांनी केलेली पूजा फार आवडते. त्याने त्याला अपार संतोष होतो. ' कौरव आणि पांडवांमध्ये जेव्हा युद्ध सुरु होणार असते, तेव्हा अर्जुन किंकर्तव्यमूढ होतो. आपले धनुष्यबाण टाकून देतो. खरं म्हणजे अर्जुनावर हा युद्धाचा काही पहिलाच प्रसंग नाही. यापूर्वी अनेकदा त्याने आपल्या पराक्रमाचे दर्शन घडवले होतेच. पण या युद्धाच्या वेळी समोर आपले आप्त, गुरु आदींना पाहून मी यांच्याशी कसा युद्ध करू, त्यांच्यावर शस्त्र कसे चालवू हा प्रश्न त्याला पडला. त्याच्या या प्रश्नाचे निराकरण करण्याकरताच भगवंतांनी त्याला गीतेचा उपदेश केला. 

खरं तर अर्जुन म्हणजे निमित्त. अर्जुनाचे निमित्त करून भगवंतांनी गीता आपल्यासाठीच सांगितली आहे. जीवनात जरी अनेक संकटे आली तरी आपल्या कर्तव्यापासून ढळू नका, आपले कर्म उत्तम प्रकारे करा. तीच भगवंताची खरी पूजा आहे आणि तीच त्यांना अतिशय प्रिय आहे.  हाच गीतेचा संदेशही आहे. 

आपण दररोज परमेश्वराची पूजा करतो. त्याच्या पूजेसाठी उत्तमोत्तम सुगंधी आणि ताजी फुले निवडतो. त्यांचा सुंदर हार करतो आणि तो देवाला वाहतो. खाली पडलेली, खराब झालेली फुले आपण देवाला वाहण्यासाठी वापरत नाही. त्याला जे द्यायचे ते सर्वोत्तम असावे. पण खरं म्हणजे ही देवाची प्रतीकात्मक पूजा आहे. त्याची खरी पूजा बांधायची आपल्या कर्माने. जे काही निहित कर्म आपल्या वाट्याला आले आहे, ते त्याच्याच इच्छेने आहे असे समजून आपले कर्म उत्तम प्रकारे करावे. अशा या स्वकर्मरूपी कुसुमांचा हार त्याला अर्पण करावा. मग देवपूजा करताना जशी उत्तम फुले आपण निवडून घेतो, तशीच आपली कर्मे इतकी सुंदर असावीत, की त्याला अर्पण करताना आपल्यालाही आनंद आणि समाधान वाटावे. 

संत सावता माळी वारीला कधी नियमानं गेले नाहीत असं म्हटलं जातं. वारी म्हणजे नियम, एखादी गोष्ट वारंवार करणं. पण सावतोबांना तसं करण्याची गरज भासली नाही. त्यांनी आपल्या कर्मानेच भगवंताची पूजा बांधली. आपल्या भाजीपाल्याच्या शेतीतच त्यांना ईश्वराचे दर्शन होत होते. ' कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी ' हीच त्यांची भावना होती. आपल्या वाट्याला आलेलं काम आनंदानं करायचं आणि मुखानं ईश्वराचं नाम घ्यायचं यापेक्षा सुंदर अशी ईश्वराची पूजा कोणती असू शकेल ! संत गोरा कुंभार सदैव ईश्वरभक्तीत लीन असायचे. पण आपलं काम त्यांनी कधी त्यासाठी थांबवलं नाही. संत गोरा कुंभार आपल्या एका अभंगात म्हणतात 


केशवाचे ध्यान धरूनि अंतरी । मृत्तिके माझारी नाचतसे ।।

विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळ । नेत्री वाहे जळ सद्गदित  ।।

कुलालाचे वंशी जन्मले शरीर । तो गोरा कुंभार हरिभक्त ।। 


या सगळ्या संतांनी आपले स्वकर्मच मनोभावे करून त्या स्वकर्मकुसुमांची माला ईश्वराच्या चरणी अर्पण केली. केवळ संतच नव्हेत तर सगळ्या महापुरुषांनी आपल्या कर्तव्य पालनाने आपल्याला हाच आदर्श घालून दिला नाही काय ? 

गीता असो वा भारतीय संस्कृती, पोकळ आध्यात्माच्या गप्पा त्यात आपल्याला आढळत नाहीत. गीता किंवा ज्ञानेश्वरीत सांगितलेले हे तत्वज्ञान सर्व धर्मांच्या पलीकडे आहे. किंबहुना आपले कर्तव्य हाच आपला धर्म असे ते सांगते. केवळ माणसातीलच नव्हे तर चराचरात ईश्वराचे रूप पाहायला आपल्याला ते शिकवते. ज्ञानेश्वरीतच माउली म्हणतात 

हे विश्वची माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर ।

किंबहुना चराचर । आपण पैं जाहला ।।

आज ग्लोबलायझेशनमुळे जग जवळ आले आहे. आज आपल्याला कोणी म्हटले की हे विश्वची माझे घर  असे म्हटलं तर फारसं आश्चर्य वाटणार नाही पण माउलींनी हे तेराव्या शतकातच सांगितलं आणि तेही अत्यंत व्यापक अर्थानं. हे जग म्हणजेच एक कुटुंब आहे. मी त्याचा एक भाग आहे. अशी मती स्थिर व्हायला हवी. म्हणजे सर्वाभूती परमेश्वराचे रूप पाहता येईल. 

गीतेत किंवा ज्ञानेश्वरीत जो कर्ममार्गाचा उपदेश केला आहे, तोच आपल्या सगळ्या संतांनी वेगवेगळ्या शब्दात आपापल्या परीने सांगितला. समर्थ रामदासांनी ' सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे ' असे सांगितलेच आहे. आपण शिक्षक असा की डॉक्टर, इंजिनिअर असा की शास्त्रज्ञ, सेवक असा वा साहेब, आपापले कर्म इतकं सुदर करू या की त्या कर्मरूपी फुलांचा सुंदर हार करून तो त्या सर्वात्मक ईश्वराला अर्पण करण्याजोगा होईल. त्यातच आपल्या जीवनाचे सार्थक होईल. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

२४/११/२०२३

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...