उगवतीचे रंग
नातं रक्तापलीकडचं - भाग दोन
अनाथ लेकरांसाठी आपले सर्वस्व झोकून देणाऱ्या संतोष गर्जे यांच्याबद्दल मी माझ्या आधीच्या एका लेखात सविस्तर लिहिलं होतं. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात गेवराई गावापासून तीन किमी अंतरावर संतोष गर्जे यांचे बालग्राम वसलेले आहे. माझा हा लेख वाचल्यानंतर संतोष गर्जे यांच्या कार्याशी परिचित असणाऱ्या काही वाचकांनी माझ्याशी संपर्क करून त्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. पण एक खंत माझ्या मनात होती. ती ही की अशा या आगळंवेगळं काम करणाऱ्या माणसाचं कार्य प्रत्यक्ष पाहण्याचा योग मला आला नव्हता. एकदा संतोषजी साधारणपणे पाच वर्षांपूर्वी चाळीसगावला एका व्याख्यानासाठी येऊन गेले होते, तेवढाच माझा त्यांचा परिचय. त्यानंतर आम्ही फोनवरून एकमेकांच्या संपर्कात होतो.
या दिवाळीसाठी आम्ही आमच्या व्याह्यांकडे सोलापूरला गेलो होतो. तेथून चाळीसगावला परतताना आपण गेवराईला जावं आणि संतोषजींच बालग्राम प्रत्यक्ष पाहावं असा विचार मनात आला. निघण्याच्या आदल्या दिवशी संतोषजींना फोन केला. त्यांना म्हटलं, ' संतोषजी, आम्ही दोघं तुमची संस्था पाहण्यासाठी उद्या येऊ इच्छितो. आपल्याला वेळ आहे का ? ' त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणाले, ' काका, अवश्य या. आपण सोबतच जेवण घेऊ या.' संतोषजींनी मला लोकेशन शेअर केले होतेच. त्याप्रमाणे १७ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी बाराच्या सुमारास आम्ही बालग्रामला जाऊन पोहोचलो.
बालग्रामचा सुंदर, शांत आणि रमणीय परिसर पाहून प्रवासाचा शीण कुठल्या कुठे पळून गेला. संतोषजी येईपर्यंत आम्ही त्यांच्या कार्यालयात बसलो. त्याचे कार्यालय म्हणजे एक प्रशस्त हॉल आहे. या हॉलमध्ये दोन प्रचंड उंचीच्या जमिनीपासून ते छतापर्यंत पोहोचलेल्या शोकेस होत्या. या जवळपास दहा बारा फूट उंचीच्या शोकेस विविध प्रकारच्या शिल्ड्स, कप्स, मेडल्स, सन्मानपत्रे आदींनी गच्च भरलेल्या होत्या. सुरुवातीला मला वाटले की बहुधा बालग्राममधील विद्यार्थ्यांना मिळालेली ही पारितोषिके असतील. पण जवळ जाऊन निरीक्षण केल्यावर ते सगळे सन्मान संतोषजी आणि त्यांना त्यांच्या कार्यात बरोबरीने साथ देणाऱ्या प्रीतीताई यांना मिळाल्याचे लक्षात आले. त्यांच्या कार्याचा विविध संस्थांनी केलेला हा गौरव होता. समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेतल्याचाच हा पुरावा होता.
दुसऱ्या एका बाजूला विद्यार्थ्यांना मिळालेल्या विविध पारितोषिकांनी भरलेली एक शोकेस होती. तर एका ठिकाणी बालग्राम मधील कार्यासंबंधी आणि तेथील विद्यार्थ्यांसंबंधीच्या गुणगौरव करणाऱ्या बातम्यांची कात्रणे झळकत होती. एवढ्यात चहा आला आणि त्यापाठोपाठ संतोषजींचे आगमन झाले. आल्याबरोबर त्यांनी आम्हा दोघांना वाकून पदस्पर्श केला. खरं तर आमच्यासारख्या सामान्य व्यक्तींना त्यांना दिलेला हा सन्मान त्यांच्या मनाचं मोठेपण दाखवत होता. आम्हीच ज्यांचे पाय धरावे अशा व्यक्तीचे हे वागणे पाहून आम्ही भारावून गेलो. एवढे मोठे कार्य करणाऱ्या या व्यक्तीचे पाय जमिनीवर आहेत. त्यांच्यातील पूर्वीचाच साधेपणा, सौजन्य कायम आहे आणि आपण करीत असलेल्या कार्याबद्दल अहंकाराची बाधा कुठेही नाही हे नंतरही त्यांच्या वागण्याबोलण्यातून स्पष्ट झाले.
ऊसतोडणी करणाऱ्या मजुराच्या घरातील जन्मलेली ही व्यक्ती. घरात अठराविश्वे दारिद्र्य. मोठया बहिणीचे बाळंतपणात निधन झाले. त्यांना अतिशय प्रिय असणारी ताई एका कोवळ्या जीवाला मागे ठेवून हे जग सोडून गेली. या तिच्या अकाली जाण्याने त्यांना मोठा धक्का बसला. पण त्याहीपेक्षा एकेक मोठे धक्के त्यांना बसत गेले. घरच्या परिस्थितीचा मनावर आघात होऊन वडील परागंदा झाले. बहिणीचं कुटुंब आणि त्यांचं स्वतःचंही कुटुंब उध्वस्त झालं होतं. पोरकेपणाची जाणीव जीव पोखरून टाकत होती. मनुष्यस्वभाव असा आहे की आपल्याला आपलंच दुःख मोठं वाटतं. पण संतोषजी यांना स्वतःपेक्षाही जास्त दुःख त्या पोरक्या झालेल्या त्या निष्पाप जीवाचं वाटत होतं, ज्या निष्पाप जीवाला काही कळण्याच्या आधीच त्याची आई हे जग सोडून पोरकं करून निघून गेली होती.
अशी किती मुलं असतील की नियतीनं त्यांचा आधार काढून घेतला असेल ! अशा मुलांचा कोण आधार होईल ? ही भावना संतोष यांच्या मनात कायम होती. त्यांच्यासाठी आपल्याला काही करता येईल का, त्यांना आधार देता येईल का या विचारातून वयाच्या केवळ १९ व्या वर्षी आपण यापुढे जगायचं ते अनाथ मुलांसाठीच असा त्यांनी निश्चय केला. २००४ साली सहारा अनाथालयाची स्थापना त्यांनी केला. ज्याला स्वतःलाच आधाराची गरज होती, तो इतरांचा आधार बनला. सुरुवातीला लोकांनी त्यांना वेड्यात काढलं. नातेवाईकांनी तर कधीच पाठ फिरवली होती. पण जी नियती निष्ठुरपणे मनावर आघात करते, तीच नियती इतरांसाठी जीवन जगण्याचं बळही देते. संतोषजींना असेच बळ नियतीने दिले. त्यांच्या या कार्यात त्यांना पुढे त्यांच्या सहधर्मचारिणी प्रीतीची साथ मिळाली. बालग्रामची बाग संतोष आणि प्रितीने बहरू लागली.
बोलता बोलता संतोषजी संस्थेची माहिती देत होते. या संस्थेने अशा मुलांना मायेचा आधार दिला आहे की जी मुलं पूर्णपणे निराधार झाली आहेत. काही मुलांचे आईवडील तुरुंगात शिक्षा भोगत आहेत पण त्या मुलांचा काही दोष नाही. पण आईवडिलांच्या हातून घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा समाज त्यांना देतो आहे, त्यांच्याकडे तिरस्काराने पाहतो आहे. काही मुले देह व्यापारातून शोषणाच्या बळी पडलेल्या महिलांची आहेत. काही मुले आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची आहेत. तर काही मुले एकच पालक असलेल्या आईवडिलांची आहेत. समाजातील या अश्राप जीवांकडे एरव्ही कोणी लक्ष दिले नसते, अशांचा सांभाळ करताहेत संतोषजी. त्यांना प्रेम देत आहेत, त्यांचं शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक भरणपोषण करताहेत. समाजातील हे उपेक्षित घटक पुढे चालून आपल्या पायावर उभे राहावे, त्यांनी उत्तम नागरिक बनावे यासाठी प्रयत्न करीत आहेत.
संतोषजींनी स्वतः आमच्यासोबत फिरून आम्हाला संस्थेच्या कार्याचा परिचय करून दिला. मुलामुलींची राहण्याची सुंदर व्यवस्था, त्यांच्यासाठी जेवणाचा हॉल त्यांनी आम्हाला दाखवला. आम्ही गेलो तेव्हा मुलामुलींची जेवणं सुरु होती. नंतर त्यांच्यासाठीच तयार केले गेलेले जेवणच आम्ही संतोषजींसोबत घेतलं. अनुराधा आणि प्रतीक्षा या अनुक्रमे दहावी बारावीत असणाऱ्या मुलींनी आम्हाला अतिशय आग्रहाने आणि प्रेमानं वाढलं. या प्रसंगी स्वतः संतोषजी आणि प्रीतीताई आमच्यासोबत होते. दोघेही अतिशय हसतमुख आणि मनमोकळं बोलणारे.
संस्थेचा हा प्रकल्प तीन एकराच्या परिसरात बहरला आहे. अतिथी निवासाची व्यवस्था आहे. सुंदर बाग आहे. संस्थेच्या सेवाभावी कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था आहे. मुलांसाठी सुंदर असा अभ्यास कक्ष आहे. सुसज्ज असे वाचनालय आहे. या वाचनालयाला ज्ञात्रा वाचनालय असे सुरेख नाव दिले आहे. ज्ञात्रा म्हणजे ज्ञानाची यात्रा. या ठिकाणी महान व्यक्तींची आत्मचरित्रे, कथा, कादंबऱ्या, सकारात्मक दृष्टी देणारी पुस्तके आहेत. पुस्तकांशी मैत्रीचं नातं जोडणारं अनोखं असं हे ज्ञात्रा वाचनालय. या वाचनालयात आता माझीही पुस्तके दाखल झाली याचा आनंद झाला.
आजच्या काळात संगणक शिक्षणाला पर्याय नाही हे ओळखून संतोषजींनी संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु केलं आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना संगणकाचे प्राथमिक आवश्यक ज्ञान करून दिले जाते. वरच्या बाजूला एक मोठा हॉल विद्यार्थ्यांना योग, प्राणायाम किंवा अन्य शारीरिक व्यायाम करता यावा म्हणून आहे. आणखी एक हॉल विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आहे. बालरंग शिबीरात विद्यार्थ्यांना विविध सामाजिक, भावनिक अडचणींना सामोरं जाता यावं यासाठी मार्गदर्शन केलं जातं. बालवयात आणि कुमारवयात पदार्पण करताना होणारे शारीरिक आणि मानसिक बदल, अभ्यास, पुढील वाटचाल या सगळ्यांबद्दल मार्गदर्शन केलं जातं. मनात सकारात्मकतेची बीजं पेरली जातात.
बालग्राममधील बालकं आनंदी राहावी म्हणून रंग दे बसंती सारखे उपक्रम. विविध सण उत्सव साजरे होतात. या रंगहीन लेकरांचे भावविश्व जाणून घेण्यासाठी, त्यांच्या भावनेशी समरस होण्यासाठी आणि त्यांच्यावर प्रेमाची उधळण करण्यासाठी सामाजिक जबाबदारीचं भान असणारी मंडळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून होळी पौर्णिमेच्या दिवशी एकत्र येतात. येथील मुलांच्या रंगात रंगून जातात. बघता बघता अवघा रंग एकची होतो. तो रंग असतो मायेचा, आपुलकीचा आणि प्रेमाचा.
बालग्राममधील मुलांना चित्रकला, हस्तकला, तंत्रज्ञान, श्रमदान, संभाषण कौशल्य याबाबतही मार्गदर्शन करून त्यांचे व्यक्तिमत्व फुलवण्याचा प्रयत्न केला जातो. आज बालग्राममध्ये सुमारे एकशे सत्तावीस मुलांचे जीवन फुलत आहे. मुलांना आपला परिसर, आपले राज्य पाहता यावे म्हणून त्यांच्या सहली आयोजित केल्या जातात. सुरुवातीला सगळी मुलं एकमेकांशी अनोळखी असतात. त्यांची एकमेकांशी मैत्री होण्यासाठी मैत्री कट्टा नावाचा उपक्रम चालवला जातो. बालग्राममध्ये विविध प्रकारची फळांची आणि फुलांची झाडे आहेत. येथे भाजीपालाही पिकवला जातो. मुलांना सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली फळे, भाजीपाला खाण्यासाठी उपलब्ध होतो. सुटीच्या काळात तसेच फावल्या वेळात मुले शेतीच्या कामात सहभागी होऊन त्याची माहिती घेतात. थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या कार्याचा प्रभावही संतोषजींच्या कार्यावर जाणवतो. बाबा आमटे म्हणायचे, ' एकत्र जेवण आणि एकत्र जीवन ही पद्धतच माणसाला माणूस बनवते. घासातला अर्धा घास देण्यासाठी संस्कार रुजतो. एकमेकांच्या मनामध्ये आपुलकीची, प्रेमाची नाती विणली जातात. एक घास चिऊचा, एक घास काऊचा असे करत करत नात्यांची शृंखला वृद्धिंगत होत असते. '
एकंदरीत विद्यार्थ्यांच्या शारीरिक भरणपोषणासोबतच त्यांचे मानसिक, भावनिक आणि बौद्धिक भरणपोषणही व्हावे म्हणून काळजी घेतली जाते. बरीचशी मुले शाळेत जाणारी आहेत, तर काही कॉलेजात जाणारी. संस्थेच्या बसने या विद्यार्थ्यांना शाळेत सोडले आणि आणले जाते.
बालग्राममधील अनेक विद्यार्थी विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा पास होऊन वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. बालग्राममधील शिक्षण, सेवाभाव आणि संस्कार घेऊन मोठ्या झालेल्या काही मुलींची लग्ने संतोषजी आणि प्रीती ताईंनी करून दिली आहेत. संतोषजी आणि प्रीतीताई यांना तेथील सगळे आई आणि बाबा म्हणतात. खरोखरच आई आणि बाबा या शब्दांना अत्यंत व्यापक अर्थ त्यांनी प्राप्त करून दिला आहे.
साधारणपणे मुलांचे अठरा वर्षांचे वय झाले की कुठलाही अनाथाश्रम त्यांना ठेवून घेत नाही. पण तोपर्यंत मुले त्यांच्या पायावर उभी राहिलेली नसतात. त्यांना प्रेमाची, आधाराची गरज असते हे ओळखून संतोषजींनी आता संभाजीनगर येथे अठरा वर्षांवरील अनाथ मुलामुलींसाठी युवाग्राम हा प्रकल्प सुरु केला आहे. आजमितीस येथे बारा मुले मुली स्वतःच्या बौद्धिक क्षमतेनुसार शिक्षण घेत आपल्या भावी आयुष्याच्या स्वप्नांना आकार देत आहेत. याच ठिकाणी ग्रामीण आणि शहरी भागातील विधवा, परित्यक्ता महिलांना लघु उद्योग उभारण्यासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन केले जाते. मोबाईल पर्स, सिल्क थ्रेड ज्वेलरी, खाद्यपदार्थ इ. तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न केला जातो.
बालग्रामला शासनाचे कोणत्याही प्रकारचे अर्थसहाय्य मिळत नाही. समाजातील दानशूर व्यक्तींच्या योगदानातून हे मानवतेचे मंदिर उभे राहिले आहे. गेल्या अठरा एकोणीस वर्षांपासून हजारो समाजसेवी हातानी हा परिसर सावरून धरला आहे. संतोषजी आणि प्रीतीताई यांच्या मनात अजून खूप काही करण्याची इच्छा आहे. गरज आहे ती मदतीचे हात पुढे येण्याची. इथे येणाऱ्या लोकांसाठी सुंदर शब्दात लिहिलं आहे, ' यांना मोठं करताना, आम्हाला तुम्ही हवे आहेत... कारण, यांना घडविताना आम्हाला एक हात तुमचा लागणार हे.... भविष्याची स्वप्नं दाखवताना तुमच्या पाऊलखुणा दाखवणार आहोत.... यांच्या पंखांना बळ देण्यापूर्वी त्यांना तुमची भरारी दाखवणार आहोत... सुजाण नागरिक घडवताना आम्ही तुमचाच आदर्श पुढे ठेवणार आहोत.. आम्ही तुमच्यामध्ये बघतो त्यांचे आई, बाबा, बहीण, भाऊ, नाती गोती, आपली माणसं, त्यांची माणसं... आम्ही स्वप्न बघतो आहोत एका सुसंस्कृत समाजाचं जिथे आयुष्य ओझं वाटणार नाही, जगण्याचा धाक वाटणार नाही, जीवन असेल एक आनंददायी प्रवास... या प्रवासात अनाथ लेकरांच्या जीवनाला आकार देण्यासाठी आम्हाला आपली साथ हवी आहे... बालग्राम परिवार- शिल्पकार जीवनाचे. '
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१९/११/२०२३
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा