उगवतीचे रंग
इये मराठीचिये नगरी
कानडीने केला मऱ्हाठा भ्रतार । एकाचे उत्तर एका नये ।।असा जगद्गुरू तुकोबारायांचा एक अभंग आहे. एका कानडी स्त्रीने मराठी नवरा केला. ती काय बोलते ते नवऱ्याला समजेना आणि नवरा काय म्हणतो ते तिला समजेना. सगळाच सावळा गोंधळ ! ' एक दुजे के लिये ' हा हिंदी चित्रपट सगळ्यांना आठवत असेल. त्यात ती नटी हिंदी आणि तिचा प्रियकर तमिळ ! त्यांच्यातही अशीच गमतीदार परिस्थिती निर्माण होते. त्यांच्या भाषेतील मजेदार गोंधळ ' हम बने तुम बने एक दुजे के लिये ' या गाण्यात अतिशय मनोरंजक पद्धतीने दाखवला आहे आणि ते गाणं गायलही अतिशय सुंदर आहे ! लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांनी हे गीत अजरामर केलं आहे. ' तुम हो बुद्दू जान लो, यु आर हँडसम मान लो...' हे ऐकताना आपल्याही चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहत नाही.
आपल्या मराठीच्या नगरीतही सध्या अशीच गोंधळाची परिस्थिती आहे. काय बरोबर आणि काय चूक हेच कळेनासं झालंय. इंग्लिश विंग्लिश मराठीत ' मिंग्लिश ' झालंय, तर कुठे हिंदीमुळे ' हिंग्लिश ' झालंय आणि तज्ज्ञांच्या ' टिंगलीस ' वाव मिळाला आहे. आता बघा ना परवा म्हणजे परवा असं म्हणायचं हो. म्हणजे काही दिवसांपूर्वी अस्मादिक ( म्हणजे मी बरं का ! ) मुंबईला गेलो होतो. गाडीत प्रवास करताना काही विक्रेते येतात ( खरं म्हणजे नको इतके, तिकीट काढलेलं असतं त्याच्याबरोबर ही करमणूक फुकट असते ), त्यांची भाषा ऐकून मोठी गंमत वाटते. एक विक्रेता हातात मुलांची खेळणी किंवा स्क्रू ड्राइवर किंवा तसलेच काहीतरी घेऊन येतो. ' दस रुपयेमे आयेगा, बीस रुपयेमे आयेगा.' असलं काहीतरी बोलत असतो. एक जुनं हिंदी गाणं उगाचच आठवलं. ' आयेगा आयेगा. आयेगा आनेवाला. आता येतोच आहेस तर ये बाबा ! विकणाऱ्याच्या हातात आता ती एखादी बाहुली असेल तर ' बीस रुपयेमे आयेगा ' कसं काय ? चक्क लिंगबदल ? त्या बाहुलीला काय वाटेल ? तिला बोलता आलं असतं तर ती म्हणाली असती, ' हम बिलकुल आयेगा नही, अभी हम जायेगा...!' आयेगा नही, आयेगी हवं ना ! पण बिचाऱ्याला कोण सांगणार ! मुंबईतल्या आमच्या एका नातेवाईकाकडे एक कानडी अम्मा काम करत होती. आम्ही त्या नातेवाईकांकडे गेलो की तिला खूप आनंद व्हायचा. ती माझ्या बायकोला म्हणायची, ' तुम आया क्या ?'आम्ही गमतीनं म्हणायचो, 'आया आया. '
आमच्या खान्देशी भाषेत सांगायचं तर ' आयेगा ' नाही. ' भेटेल ' असं म्हणतात. खान्देशातील माणसे मुंबईच्या गाड्यांमध्ये अशा प्रकारे विक्रेते म्हणून आले तर ' ही बाहुली वीस रुपयाला भेटेल, हे हेडफोन पन्नास रुपयात भेटतील ' असे ऐकवतील. एक तर मुंबई, पुणेकरांच्या भाषाज्ञानात आणखी भर पडेल. आणि मग त्यांनाही ही ' भेटीलागी जीवा लागलीसे आस ' असे होईल. आमच्या खान्देशची माणसं मनानं एवढी मोठी की निर्जीव वस्तूनाही त्यांनी माणसांचा दर्जा दिला. पुण्यामुंबईत भलेही वस्तू ' मिळत ' आणि माणसं ' भेटत ' असतील. आमच्याकडे वस्तू सुद्धा ' भेटतात. '
मी लहान असताना चाळीसगावच्या रेल्वे स्टेशनवर गेलो की महाराष्ट्र एक्सप्रेस, पंजाब मेल या गाड्यांबद्दल लोक ज्या पद्धतीने बोलत, त्यामुळे माझं मनोरंजन होत असे. गाडी हा शब्द साधारणपणे आपण स्त्रीलिंगी वापरतो. म्हणून आम्ही म्हणायचो पंजाब मेल आली, महाराष्ट्र एक्सप्रेस आली. बाकी मंडळी मात्र त्यांना महाराष्ट्र आला, पंजाब मेल आला असं म्हणायची. गंमत म्हणजे आता ' ईमेल ' च्या जमान्यात पण ज्या पद्धतीने मेल हा शब्द वापरला जातो, त्यामुळे तो खरोखरच मेल आहे की ' फिमेल ' आहे असा प्रश्न पडावा. ' मी तुला मेल टाकली आहे. मेल भेटली का चेक कर. ' असे बोलणारे भेटतात. तर ' तुला मेल आला का ? आला असेल तर तो मला फॉरवर्ड कर ' असेही बोलणे ऐकू येते. अशा ' भाषाप्रभू ' व्यक्तींना मनापासून नमस्कार करावासा वाटतो. चहा घेतला का असं म्हणणं कॉमन आहे पण ' चहा घेतली/पिली का ' असे म्हणणारेही भेटतात. बोलीभाषेचा प्रभाव, दुसरे काय !
दर दहा कोसांवर भाषा बदलते हे अगदी खरे ! आमच्या चाळीसगावपासून अगदी जवळच असलेल्या जळगावला गेल्यावर वेगळीच भाषा आणि त्या भाषेचा वेगळाच लहेजा ऐकू येतो. आपण म्हणतो ना की मी मुंबईला गेलो होतो तर आमचा एखादा जळगावकर म्हणेल ' अरे हौ ना भो, मी बी मुंबईला गेला होता ना. ' विदर्भात वेगळी बोली आणि मराठवाड्यात वेगळी. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असणारी माणसं ' मी बिमार होतो ' असं म्हणतात. ते ' आजारी ' पडत नाहीत. एकदा संभाजीनगरला ( पूर्वीचे औरंगाबाद ) आमच्या एका नातेवाईकांनी मला बोलावलं. मी त्यांना म्हणालो की अहो, मला तिथली फारशी माहिती नाही. तेव्हा ते म्हणाले ' मी खुद ' तुम्हाला घ्यायला येईल. मराठवाड्यात बराच काळ मोगली सत्ता होती. त्याचा हा परिणाम !' मैं खुद तुम्हे लेने आऊंगा ' असंच त्यांना म्हणायचं होतं. मी बस स्टॅण्डवर उतरल्यावर त्यांना फोन केला की मी आलो आहे. ते म्हणाले, ' मी यायला लागलोय. ' ते येताहेत याचं रूपांतर काही भागात ' ते यायलेत ' असंही होतं.
पूर्वी ' पोस्ट ' म्हटले की आमचं गावागावातलं पोस्ट ऑफिसच डोळ्यासमोर येई. ( ' माझे पौष्टिक जीवन ' या नावाची पुलंनी लिहिलेली एक खुमासदार कथा आहे. तिची लगेच आठवण येते. )पण आता ते पोस्ट राहिले बाजूला आणि इतर पोस्टचाच सुळसुळाट झाला आहे. फेसबुकवरची पोस्ट, व्हाट्सऍपवरील पोस्ट, फॉर्वर्डेड पोस्ट वगैरे वगैरे. आज पुलं असते तर त्यांच्या ' पौष्टिक जीवनात ' कितीतरी भर पडून ते आणखी समृद्ध झाले असते ! खरं तर आता नको तेवढ्या पोस्टचे उदंड पीक आल्यामुळे त्यांची ' पौष्टिकता ' खऱ्या अर्थाने लुप्त होत चालली आहे. असो.
मोबाईल आणि कॉम्पुटर यांचा परिणाम तर इतका भयंकर होतो आहे की भाषेत नवीनच क्रियापदे येऊ लागली आहेत. ' गुगल ' वरून मी गुगल केलं इथपर्यंत ठीक आहे पण लोक म्हणतात ' मी गुगललं '. एखादी पोस्ट पाठवू का याऐवजी ' सेन्डू ' का असाही शब्दप्रयोग करताना काही मंडळी आढळली. भाषेत ही किती मोलाची भर ! शुद्धलेखन हा तर आणखी वेगळाच भाग आहे. त्याबद्दल मी बोलतच नाही. काही मंडळी तर त्याबाबत बोलताना असं म्हणतात की भाषा हे संवादाचं माध्यम आहे. समोरच्याला काय बोलायचं हे कळलं की झालं. शुद्धलेखन वगैरेची फिकीर कोण करतं ! त्यामुळे आपले पूर्वज आणि वडीलधारी माणसं चिडून आता नेहमीसारखा ' आशीर्वाद ' देत नाहीत. तो ' आशिर्वाद ' किंवा बऱ्याच वेळा ' आर्शिवाद ' असतो. जाऊ द्या आपण कशाला नसता ' वाद ' वाढवायचा ! दुकानांच्या नुसत्या इंग्रजी पाट्या बदलून मराठी केल्या म्हणजे सगळं झालं असं होत नाही. त्यामागील हे ' राज ' सुद्धा समजून घायला हवं, नाही का ? तरच आपण म्हणू शकू ' माझा मराठीचा बोल कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. '
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
४/११/२०२३
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा