उगवतीचे रंग
ऐसी अक्षरे रसिके
शर्वरी. एक अत्यंत उत्साही आणि सतत हसतखेळत राहणारी तरुणी ! तिच्या लाघवी स्वभावाने सगळ्यांनाच आपलंसं करून घेणारी. तिचं बोलणं ऐकण्यासाठी सगळेच उत्सुक असायचे. पण अचानक एक मोठा अपघात झाला. शर्वरीची वाचा हरपली. बोलकी शर्वरी एकदमच शांत शांत राहू लागली. तिची जिवलग मैत्रीण सुषमा तिला भेटायला आली. शर्वरी काही बोलू शकत नव्हती. शर्वरीचे डोळे भरून आले. सुषमा आणि शर्वरी एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडल्या. शर्वरी थोडी शांत झाल्यावर सुषमाने आपल्या पर्समधून एक नवीकोरी डायरी आणि पेन काढले. शर्वरीच्या हातात ठेवले. एक पाटी पेन्सिल सुद्धा तिच्या हाती दिली. ' शर्वरी, काही काळजी करू नकोस. जशी तुझी वाचा अचानक अपघाताने गेली, तशीच ती एक दिवस परत सुद्धा येईल. मला विश्वास आहे. पण तोपर्यंत तू तुला जे काही सांगायचं ते या पाटीवर लिहून सांगत जा. जेव्हा तुला वेळ असेल तेव्हा तुझ्या भावना या डायरीत लिहीत जा. ' सुषमा म्हणाली. तशाही परिस्थितीत शर्वरीचा चेहरा खुलला. तिनं पाटीवर लिहिलं, ' सुषमा, बस थोडा वेळ. तू आल्यानं मला किती आनंद झाला ! आपण दोघी थोडी थोडी कॉफी घेऊ या. तू बोलत जा. मी लिहून सांगेन. '
शर्वरी आता बोलत जरी नव्हती, तरी तिला लिहिता येत असल्याने आपल्याला जे काही सांगायचं ते ती लिहून सांगायची. शर्वरीच्या मनात आलं, लिहिण्याची सोयच मानवाला उपलब्ध नसती तर ! कल्पनाच करवत नाही. आज चंद्र आणि मंगळावर पोहोचलेला आणि सूर्यावर चढाई करायची तयारी असलेल्या मानवाची प्रगती झाली असती ? निसर्गाने मानवाला काही वैशिष्ट्ये बहाल केली. त्यामुळेच तो इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आणि वरचढ ठरला. तो दोन पायांवर चालू शकतो आणि हातांचा वैशिष्ट्यपूर्ण वापर आपल्या संरक्षणासाठी आणि प्रगतीसाठी करू शकतो. माणसाला बोलता येतं, तो विचार करू शकतो. त्याला हसता येतं. आपल्या हाताची पाचही बोटं त्याला हवी तशी वाकवता येतात, फिरवता येतात. त्याची ताकदवान मूठ बनवता येते. आणि त्याच वैशिष्ट्यपूर्ण हातांच्या बोटांचा वापर करून तो लिहायला शिकला. माणूस ज्या दिवशी लिहायला शिकला असेल, तो दिवस मानवाच्या इतिहासातील म्हणजे क्रांतिकारी दिवस ! तो दिवस म्हणजे मानवाच्या उज्ज्वल भवितव्याची पहाट !
पण कशी झाली असेल ही सुरुवात ? माणूस बोलायला तर शिकलाच होता. ध्वनीचा अर्थपूर्ण वापर आपल्या विचार आणि भावना दुसऱ्यांना कळवण्यासाठी त्याला करता यायला लागला होता. ही सुद्धा एक मोठी क्रांतीच होती !मग तो बोलू लागला, गाऊ लागला. त्याचं बोलणं, गाणं इतरांसाठी आनंदाचं झालं. ' नादब्रह्माची ' निर्मिती झाली. पण पुढे पुढे त्याला वाटलं असेल की आपण काय बोलतो, विचार करतो ते लिहून सांगता आलं तर ! हा विचार त्याच्या डोक्यात आला आणि ' नादब्रह्मानंतर ' ' अक्षरब्रह्माची ' सुरुवात झाली. त्याचं बोलणं आता ' अक्षर ' झालं. सुरुवातीला त्याच्या मदतीला असेल धुळीची पाटी आणि बोटांची किंवा झाडाच्या काडीची लेखणी. त्या धुळीत, चिखलात किंवा वाळूवर त्यानं काहीतरी गिरवलं असेल. अक्षर नसेल लिहिलं आणि लिपीचा शोध नंतरचा. पण त्याच्या मनात असणारी कुठली तरी आकृती त्यानं रेघांच्या मदतीनं काढली असेल. एखादा बैल काढला असेल, चाक किंवा बैलगाडी काढली असेल. काहीही असेल पण जे काही त्यानं काढलं ते क्रांतिकारी होतं, त्याला आनंद देणारं होतं. महत्वाचं होतं ते हातात लेखणी धरता येणं.
मानवाच्या हाताच्या लवचिक बोटांमुळे त्याला हे सहज शक्य झालं. हातांना लेखणी धरण्याची सवय झाली आणि मग मानवाच्या मनातील भावनांना, डोक्यातील अमूर्त विचारांना मूर्त रूप प्राप्त झालं. ' ये हृदयीचे ते हृदयी घातले ' अशी अवस्था प्राप्त झाली. प्रगतीच्या दिशेने ही मोठीच झेप होती. लिहिण्याची कला हीच मुळात किती सुंदर गोष्ट ! बघा ना, लिहिताना आपले मन, मेंदू, बुद्धी, डोळे, हात, बोटं, शरीर अशा सगळ्या गोष्टी एकत्र येतात आणि त्यांच्या सहाय्याने ही सुंदर क्रिया घडते. शरीर आणि मन एकत्र येऊन ही सुंदर क्रिया घडवून आणतात. सहकार्याचे, एकतेचे यापेक्षा आणखी सुंदर उदाहरण दुसरे कोणते असू शकेल ?आपल्या मनातील अमूर्त विचार आणि भावनांचे प्रतिबिंब अक्षर रूपात समोरच्या कागदावर किंवा स्क्रीनवर उमटते.
मानवाची जसजशी प्रगती होत गेली तसतशी त्याने आपलं बोलणं व्यक्त करणारी प्रतिकात्मक अक्षरं शोधून काढली असावीत. त्यातूनच लिपी तयार झाली. मानवाच्या लेखनकलेचा ' श्रीगणेशा ' झाला. श्रीगणेश ही विद्येची आणि बुद्धीची देवता ! लेखनाची सुरुवातच श्रीगणेशापासून झाली. महर्षी व्यासांनी जे एक लक्ष श्लोकांचं प्रचंड मोठा आवाका असलेलं महाभारत सांगितलं, ते लिहून घेणं काही येरागबाळ्याचं काम नव्हतंच. व्यासांनी ते न थांबता सांगितलं आणि गणपतीनं सुद्धा प्रचंड वेगानं ते अक्षरबद्ध केलं. आज आपण संगणकावर किंवा मोबाईलवर किंवा अन्य कोणत्याही माध्यमावर जेवढ्या वेगानं टाईप करतो, त्यापेक्षाही त्याचा ( गणपतीचा ) लिहिण्याचा वेग अधिक असावा.
आज आपल्याकडे लिहिण्यासाठी कितीतरी वेगवेगळे पर्याय आणि साधनं उपलब्ध आहेत. पण पूर्वीचा मानव कशाकशाचा वापर करीत असेल ? अणकुचीदार दगड, झाडाची काडी किंवा डहाळी, पक्ष्याचं किंवा मोराचं पीस इ. आणि पुढे जसजशी प्रगती होत गेली तेव्हा बोरू, टाक, पेन्सिल, पेन इ. मग टाईपरायटर, संगणक इ. लिहिण्यासाठी तो पूर्वी भूर्जपत्र, कापड इ. चा वापर करायचा. मग पुढे कागदाचा शोध लागला. त्यापूर्वी मानवाने गुहेत विविध चित्रं काढली. पानाफुलांचे रंग भरले. अशा रितीने आधी चित्रलिपीचा जन्म झाला. लिपीचा शोध लागल्यावर पुढे त्याने दगडावर मजकूर कोरायला सुरुवात केली. त्यातूनच शिलालेखांचा जन्म झाला. राजेमहाराजांचा इतिहास नाणी, शिलालेख, आज्ञापत्र, बखरीच्या रूपाने उपलब्ध झाला. व्यापाऱ्यांना हिशेब लिहिण्याची सोय झाली.
वैदिक वाङ्मय पूर्वी मौखिक स्वरुपात होते. लिहिण्याचा शोध लागल्यामुळे ते लिखित स्वरूपात आले. कल्पना करा की लेखनाचा शोध लागला नसता तर ! ते सगळे ज्ञान त्या त्या लोकांबरोबरच नाहीसे झाले असते. प्राचीन ज्ञानाच्या पायावर मानवाच्या पुढील प्रगतीची इमारत उभी राहिली. रामायण, महाभारत, भगवद्गीता, भागवत यासारखे ग्रंथ, पाणिनीचे व्याकरण, भरतमुनींचे नाट्यशास्त्र आणि इतरही सगळे मौल्यवान ग्रंथ आपल्यापर्यंत पोहोचले ते केवळ लेखनकला मानवाला अवगत झाल्यामुळे. इराकमधील मेसोपोटेमिया या इ.स. पू. ३४०० वर्षांपूर्वीच्या सुमेरियन संस्कृतीत लेखनकला विकसित झाली असे सांगितले जाते. पण त्यापूर्वीही दोन शतके ती इजिप्तमधील नाईल नदीच्या खोऱ्यातील लोकांना अवगत होती असे मानले जाते इतकी ती प्राचीन आहे. ( उगवतीचे रंग - विश्वास देशपांडे )
पण काही असो लेखनकलेने जीवनाच्या सर्व क्षेत्रात क्रांती घडवली. त्यामुळेच विविध विचारवंतांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचले. शिलालेख आले, मृत्युलेख आले. इच्छापत्र आले आणि मृत्युपत्रही आले. प्रेमी जीवांनी एकमेकांना लिहिलेली प्रेमपत्रं आली. रुख्मिणीनं श्रीकृष्णाला लिहिलेलं प्रेमपत्रं त्यामुळेच लिहिलं गेलं. चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना लिहिलेलं ( अर्थातच कोरं ) पत्रही आलं. कविता, लेख, कादंबऱ्या, चरित्रं, आत्मचरित्रं आली. साहित्यविश्व समृध्द झालं. पूर्वी शाळेमध्ये लहान मुलांना अक्षर चांगलं करण्यासाठी कित्ता गिरवायला लावीत. त्यासाठी बोरू किंवा टाकाचा वापर केला जात असे. आजच्या मुलांना बोरू, टाक, दौत इ. गोष्टी दाखवण्यासाठी वस्तुसंग्रहालयातच घेऊन जावं लागेल. पण पूर्वी जे कित्ते गिरवले जायचे त्यावरून एखाद्या व्यक्तीच्या वागण्याबोलण्याचे अनुकरण केले की त्याने अमुक व्यक्तीचा ' कित्ता गिरवला ' असा शब्दप्रयोग रूढ झाला.
आपणही चांगल्या व्यक्तींचा कित्ता गिरवायला हरकत नाही. ज्ञानेश्वर माउली म्हणतात, ' ऐसी अक्षरे रसिके मेळवीन ' आपणही हे अक्षरब्रह्म जपू या. लिहू या, वाचू या. काळाच्या कसोटीवर उतरणाऱ्या, चिरकाल टिकणाऱ्या आणि युगांयुगांचा दीपस्तंभ असलेल्या वांड्मयाला आपण अक्षरसाहित्य म्हणतो. अक्षरसाहित्य हा आपला वारसा आहे, संस्कृती आहे. हे अक्षरब्रह्म आपल्या जीवनाला समृद्धीकडे घेऊन जाणारे आहे.
शर्वरीला प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांची आठवण झाली स्टीफन हॉकिंग यांना आपल्या आजारामुळे अन्य काही करणं शक्य नव्हतं परंतु आपल्या बोटांच्या हालचालींचा आधार घेऊन आपले विचार ते मांडत होते त्यांची आठवण झाली आणि तिच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं. सुषमानं दिलेली डायरी शर्वरीनं हातात घेतली आणि अक्षरब्रह्माची आराधना करण्यात ती रंगून गेली.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
०९/१०/२०२३
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा