आनंदनिधान
दोन शब्द... पुस्तकाच्या अंतरंगात शिरण्यापूर्वी
प्रिय रसिक वाचक
माझं नवीन पुस्तक ' आनंदनिधान ' आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. जॉन किट्स नावाचा कवी म्हणतो A thing of beauty is joy forever, ' आपल्या भाषेत सांगायचं तर हीच गोष्ट ' सत्यं शिवं सुंदरम ' अशी सांगता येईल. सत्य, शिव आणि सुंदराचा मिलाफ असलेली कोणतीही गोष्ट ही चिरंतन आनंदाचा स्रोत असते. आनंदनिधान म्हणजे अशाच चिरंतन आनंद देणाऱ्या गोष्टी. कोणकोणत्या गोष्टी अशा आनंदनिधान असू शकतात याबद्दल मी ' आनंदनिधान ' या लेखात सविस्तरपणे लिहिले आहे. त्याची आता पुनरावृत्ती करीत नाही. आपण ते जरूर मुळातून वाचावं.
मानवी जीवन सुखदुःखांनी भरलेले असते. आपण कधी निराश होतो, तर कधी आनंदी. आपण सारखा सुखाचा शोध घेत असतो. पण सुखदुःखाचा पाठशिवणीचा खेळ सुरु असतो. सुखाचे क्षण किनाऱ्यावर बसून वाळूचे कण हाती घ्यावे आणि हातातील वाळू जशी निसटून जाते, तसेच तेही आपल्या हातातून निघून जातात. तर कधी हुलकावणी देतात. म्हणून सुखाच्या शोधात असलेल्या मानवाला नेमकं सुख म्हणजे काय, ते कशात आहे हे शेवटपर्यंत उमजत नाही. पण जर आनंदाचं निधान गवसलं तर मानवाचा सुखाचा शोध त्या ठिकाणी संपेल.
ज्ञान आणि रंजन हे कोणत्याही अभिजात साहित्याचे अंगभूत गुण असतात आणि असले पाहिजेत असे मला वाटते. अशाच प्रकारचा सुखद अनुभव या पुस्तकातील ललित लेख वाचताना आपल्याला येईल. विविध विषयांवरचे प्रसंगानुरूप लिहिलेले हे लेख वाचताना आनंद तर देतीलच पण एखाद्या विषयाकडे पाहण्याची नवी दृष्टी सुद्धा देतील. प्रत्येक लेखात सकारात्मकता आणि सांगण्यासाठी काहीतरी आहेच. उदाहरणार्थ ' भिंत ' या साध्या विषयावरील लेख ' भिंतीसंबंधीच्या ' अनेक बाजू आपल्यासमोर उलगडेल. वाचनाच्या आनंदाबद्दल बोलणारे काही लेख आहेत. जीवनात हसतमुख असणे किती महत्वाचे आहे हे ' सुहास्य तुझे मनास मोही ' हा लेख आपल्याला सांगेल. या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेवर नुसती नजर टाकली तरी विषयांची विविधता आपलयाला लक्षात येईल. आपल्यासाठी विविध रंगांचा हा मनोहारी गोफ घेऊन मी आलो आहे. हा एक कॅलिडोस्कोप आहे. आनंद आणि सौंदर्य ही याची अविभाज्य अंगे आहेत. कोणताही लेख घ्या. त्यात आनंद, सौंदर्य, सकारात्मकता आणि काहीतरी संदेश आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आत्मस्तुतीचा दोष पत्करूनही मी ही खात्री आपल्याला देत आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे शब्द मला या ठिकाणी आठवतात. माउली म्हणतात
तरी एकले अवधान दीजे । मग सर्व सुखाते पात्र होईजे ।
हे प्रतिज्ञोत्तर माझे । उघड ऐका ।।
माऊलींची जी भावना आहे, तीच माझी आहे. माउली माउली आहेत आणि मी सामान्य ! पण आपण वाचक जाणकार आहात. मी आज जो काही आहे तो आपल्यामुळेच !
हे पुस्तक सुंदर स्वरूपात आपल्या हाती पडावे यासाठी सोहम क्रिएशनचे संपादक मा सुरेंद्र गोगटे आणि सौ स्नेहा गोगटे यांनी जी मेहनत घेतली आहे, त्यासाठी मी त्यांचा ऋणी आहे. पुस्तकाचे नावाला साजेसे मुखपृष्ठ तयार करणाऱ्या प्रथमेश नाझरकर याने आनंदनिधान मूर्तपणे मुखपृष्ठावर साकारले आहे. त्यासाठी त्याचाही मी ऋणी आहे.
माझ्या इतर पुस्तकांप्रमाणेच आपण या पुस्तकाचे स्वागत कराल ही खात्री आहे. हे पुस्तक नावाप्रमाणेच आपल्यासाठी ' आनंदनिधान ' ठरो.
- विश्वास देशपांडे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा