मुख्य सामग्रीवर वगळा

अजूनही चांदरात आहे - दोन शब्द

 अजूनही चांदरात आहे 

दोन शब्द 

आज कोजागिरी पौर्णिमेच्या सुमुहूर्तावर हे  पुस्तक प्रकाशित होत आहे याचा आनंद आहे. त्याचबरोबर आपल्याला आवडणाऱ्या अशा प्रकारच्या ललित लेखनाचे हे नवीन पुस्तक आपल्या हाती सोपवताना हा आनंद द्विगुणित होत आहे. दुधात साखर म्हणतात ते हेच असावे ! ' अजूनही चांदरात आहे ' हे या पुस्तकाचे नाव वाचून कोणाला हा कथासंग्रह आहे असे वाटेल तर कोणाला हा एखादा कवितासंग्रह आहे असे वाटू शकेल. पण हा माझ्या इतर पुस्तकांप्रमाणेच विविधरंगी ललित लेखांचा गुच्छच मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे. मानवी जीवन हेच मुळी सुखदुःख, आनंद, उल्हास, आशा निराशा, चिंता, भय यासारख्या अनेक गोष्टींनी आणि भावभावनांनी भरलेले असते. जीवन एकांगी किंवा सरळसोट अशा प्रकारचे कधीच नसते आणि नसावे. तीच तर खरी त्यातील गंमत आहे. 

या विविध प्रसंगांना, घटनांना सामोरे जाताना मानवी मनात विविध भावभावनांचे तरंग उठणे हे अगदी स्वाभाविक असते. संवेदनशील मनाला तर जीवनातील विविध प्रसंग स्पर्शून जातात. कधी अस्वस्थ करतात, कधी निराशा जागवतात, कधी आनंदी करतात. पण असे असले तरी माणूस जगत असतो ते उद्याच्या आशेवर. त्याला माहित असते की हेही दिवस जातील. निराशेला कधीच आपल्या मनाचा ताबा घेऊ द्यायचा नसतो. म्हणूनच या पुस्तकाचं नाव ' अजूनही चांदरात आहे' . चांदरात, चंद्र, चांदणे या गोष्टी जीवनातील आशेच्या प्रतीक आहेत असे मला वाटते. 

अशा प्रसंगी कुसुमाग्रजांच्या कवितेतील ' कशास आई भिजविसी डोळे, उजळ तुझे भाळ, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल या ओळी मला आठवतात आणि आश्वस्तही करतात. त्याचप्रमाणे अन्नदाता या चित्रपटातील ' रातोंके साये घने  ' हे निराश मनाला उभारी देणारं गाणं मला आठवतं.  जीवनातील विविध प्रसंगानुरूप सुचलेले हे लेख आपल्या मनाला स्पर्शून जातील. 

एखाद्या फुलांच्या हातात जशी विविध रंगांची फुले असावी आणि तो हार शोभून दिसावा, तसेच आपल्या जीवनातील विविध प्रसंग, विषय हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. सण उत्सवापासून ते आजचा सोशल मीडिया, वाचन, कवितांच्या वाचनातून मिळणार आनंद,  माझ्या मायमराठीचे मनोगत, काही पर्यटनविषयक माहिती देणारा एखादा लेख, ब्रायटन सारखे आपल्याला अज्ञात असलेले परंतु आपल्या अभिमानाचे प्रतीक असलेले इंग्लंडमधील ठिकाण, आपली भारतीय संस्कृती असे विविध विषय वेगवेगळ्या लेखातून प्रसंगानुरूप हाताळले आहेत. हा विविधरंगी सुगंधी शब्दफुलांचा हार मनोभावे  आपल्यासारख्या माझ्या प्रिय माझ्या वाचकांना अर्पण करतो आहे.  हे माझे पुस्तक आपल्याला आनंद देईल आणि आपण त्याचे माझ्या इतर पुस्तकांप्रमाणेच स्वागत कराल याची खात्री आहे. 

- विश्वास देशपांडे 







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...