मुख्य सामग्रीवर वगळा

जा ओलांडूनिया सरिता सागरा

उगवतीचे रंग 

जा  ओलांडूनिया सरिता सागरा 

दसरा आला की माणिक वर्मा यांनी गायिलेले ' विजयपताका श्रीरामाची झळकते अंबरी, प्रभू आले मंदिरी...' हे गाणं आठवतंच. आणखी एक गाणं आठवतं. ' अजि सोनियाचा दिन...' ही ज्ञानेश्वर माउलींची प्रासादिक रचना. या  दोन्हीही रचना एका महत्वाच्या अध्यात्मिक गोष्टीकडे अंगुलीनिर्देश करतात. पहिल्या रचनेत श्रीराम रावणावर विजय मिळवून परतले आहेत. ते अयोध्येत परतले. पण प्रभू आले मंदिरी म्हणजे आपल्या  हृदयमंदिरात आजच्या या पवित्र दिवशी त्यांची स्थापना, त्यांचे आवाहन करायला  खरा दसरा. दुसऱ्या रचनेत माउली म्हणतात, ' सबाह्य अभ्यंतरीं अवघा व्यापक मुरारी...' अखिल विश्वात तोच भरून राहिला आहे याची जाणीव ज्याला झाली त्याला तोच मुरारी आपल्या देखील अंतर्यामी भरून राहिला आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. ही जाणीव जेव्हा होते, ती वेळ म्हणजे दसरा. तेच खरे सीमोल्लंघन. 

खरं तर दसरा या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. दहा गोष्टींवर केंद्रित झालेलं आपलं लक्ष एकाच गोष्टीवर केंद्रित करणं म्हणजे दसरा. त्यालाच ' दशहरा ' असेही म्हटलं जातं. दशहरा म्हणजे  माझ्या दहा दोषांचं हरण होवो. दहा दोष नष्ट होवो. आपली पंच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेंद्रियं असे मिळून दश इंद्रियं होतात. आपण आयुष्यभर या पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रियांना एखाद्या रेसच्या घोड्यासारखे पळवत असतो. जे आनंदनिधान आपल्याला परमेश्वराच्या रूपाने प्राप्त करून घ्यायचं असतं ते या दशेंद्रियांच्या पलीकडे आहे. ती सीमा ओलांडायची. एकाकडेच लक्ष केंद्रित करायचं. हा झाला अध्यात्मिक अर्थ. पण आपण दुसऱ्याही बाजूने विचार करू. 

दसरा आपण का साजरा करतो ? दसरा हा दिवस म्हणजे विजयाचं प्रतीक आहे. वाईटावर चांगल्याचा, अपप्रवृत्तीवर सत्प्रवृत्तीचा असे अनेक अर्थ आपल्याला घेता येतील. रामाने रावणावर विजय मिळवला. दुर्गादेवीने दुष्ट प्रवृत्तीच्या राक्षसांचा नायनाट करून दुष्ट प्रवृत्तीचाच नाश केला. विजयादशमीच्या आधी आपण नवरात्र साजरं करतो. प्रत्येक रात्र ही नवरात्रच असते. या नऊ रात्रीत साधना करून सामर्थ्य प्राप्त करायचे असते. तरच ' विजयाची दशमी ' साजरी करता येते. 

दसरा हा दिवस स्वत्वाची जाणीव करून देणारा दिवस आहे. आयुष्याच्या धकाधकीत आपण ' स्वत्व ' विसरलो असतो. ते या निमित्ताने पुन्हा प्राप्त करायचं असतं. रामाला अयोध्येच्या राज्याला पारखं व्हावं लागलं होतं. प्राणप्रिय अशा सीतेला गमवावं लागलं होतं. विजयादशमीला हे सगळं त्याला प्राप्त झालं. अर्थात स्वकर्तृत्वाने ! राम-रावण युद्ध म्हणजे वादळ ! दसरा म्हणजे या वादळानंतरची शांतता प्रस्थापित करणारा. याच दिवशी अज्ञातवासात गेलेले पांडव पुन्हा आपल्या मूळ रूपात आले. जे ' स्वत्व ' अज्ञात राहून त्यांना गमवावा लागलं होतं, ते त्यांनी पुन्हा प्राप्त केलं. अज्ञातवासात बृहन्नडेची भूमिका पार पाडणारा अर्जुन आपल्या मूळ धनुर्धर रूपात आला. शमीच्या झाडावर लपवून ठेवलेली आपली शस्त्रास्त्रे पांडवांनी बाहेर काढली. अर्जुनाच्या गांडीव धनुष्याचा टणत्कार पुन्हा आसमंतात घुमला. भीमाने आपली गदा हातात घेतली. महाभारतात जे युद्ध पुढे होणार होते, त्या वादळापूर्वीची ही शांतता होती. पुढच्या विजयाची ही तयारी होती. 

आपल्यालाही आपल्या स्वत्वाचा शोध घ्यायचा आहे. आपलं आयुष्य म्हणजे सुद्धा रात्रंदिवस चाललेली एक लढाईच असते. कधी मानसिक तर कधी शारीरिक. संत तुकाराम महाराज म्हणतात, ' रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग ' अशी ही लढाई सतत सुरु असते. मग पांडवांनी जशी आपली शस्त्रं परजली, तशीच आपल्याला सुद्धा परजावी लागतील. आपली शस्त्रं कोणती ? आत्मविश्वास, महत्वाकांक्षा, संयम, साहस, ऊर्जा, उत्साह. आपणच आपल्या स्वतःला काही बंधनं घालून घेतली असतात. मला हे जमणारच नाही. ते माझं काम नाही वगैरे आपण म्हणतो. या आपणच आपल्याला घालून घेतलेल्या सीमा असतात. त्याच आपल्याला ओलांडायच्या असतात. 

सीमा या आपल्याला बंदिस्त करतात . आपण त्यातच अडकून पडलो तर आपली प्रगती होणार कशी ?म्हणून सीमा ओलांडायच्या . मग त्या सीमा रूढी परंपरांच्या असतील ,वाईट विचारांच्या असतील . त्यात वर्षानुवर्षे आपण स्वतःला जखडून ठेवलेले असते . त्यातून मुक्त कधी होणार ? आपण काळाची पावले ओळखून स्वतःमध्ये बदल करायला शिकले पाहिजे . मला या ठिकाणी कुठेतरी वाचलेली अरब आणि उंटाची गोष्ट आठवते . एका अरबाजवळ पुष्कळ उंट होते . तो त्यांना बांधून ठेवत असे . उंटानाही त्याची सवय झाली होती . एकदा त्या अरबाकडे एका उंटाला बांधून ठेवण्यासाठी दोर नव्हता . तेंव्हा तो एक युक्ती करतो . त्या उंटाला खुंटाला  बांधून ठेवण्याचे फक्त नाटक करतो आणि काय आश्चर्य !सकाळी जेंव्हा सगळे उंट सोडले जातात तेंव्हा तो उंट (न बांधलेला )आपल्या जागेवरून हलत नाही . शेवटी त्या अरबाला पुन्हा त्या उंटाला सोडण्याचे नाटक करावे लागते तेंव्हा तो हलतो . ही कथा आपल्याला बरेच काही सांगून जाते . त्या उंटाप्रमाणेच आपणही सवयीचे गुलाम झालेलो असतो . एका  अदृश्य शृंखलेने आपण आपल्याला जखडून घेत असतो , एवढे पक्के की ,आपले आपल्यालाही कळत नाही . जेंव्हा कोणी आपल्याला त्याची जाणीव करून देतो ,तेव्हाच ते आपल्या लक्षात येते . कधीकधी याच अदृश्य शृंखला आपली प्रगती कुंठीत करतात ,कारण आपण आपली क्षमताही पूर्णपणे ओळखलेली नसते . आपला न्यूनगंड आपली प्रगती होऊ देत नाही. 

तुम्ही म्हणाल इतकं का सहज आहे हे सीमा ओलांडणं ? पण मला ' आराम हराम आहे ' या चित्रपटातलं गाणं आठवतं. ' आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. ' हा सोन्याचा पिंजरा म्हणजेच आपलं कंफर्ट झोन सोडून आपण काहीतरी नवीन करण्याचा निश्चय करायचा आहे. त्यासाठी या गाण्यात म्हटल्याप्रमाणे ' तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने '. हे पंख आपल्याजवळ आहेतच. त्यांचाच कल्पक वापर आपल्याला करून घेता येईल. हे पंख म्हणजे आपली बुद्धी, प्रसंगावधान, साहस, आत्मविश्वास यासारखे गुण. 

आज आपण आपट्याची पानं सोनं म्हणून वाटतो. आपल्या सोन्यासारख्या माणसांना ती देतो. एकवेळ सोन्याचं तरी मूल्य करता येतं, पण माणसांचं ...? ती तर सोन्यापेक्षाही अधिक मौल्यवान. म्हणून त्यांना जपायचं आहे. भेदांच्या सीमा ओलांडायच्या आहेत. आपपर भावाच्या पलीकडे जाऊन त्यांना मदतीचा हात द्यायचा आहे. असे अनेक हात आपल्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. या हातांना बळ दिलं तर येणारं प्रकाशाचं पर्व म्हणजेच दीपावली आपल्यासाठी आनंद, उत्साह आणि समाधान घेऊन नक्कीच येईल. आपणा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !


© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 
२४/१०/२०२३
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...