चांदणे शब्दफुलांचे
दोन शब्द... पुस्तकाच्या अंतरंगात शिरण्यापूर्वी
मुळात चांदणं हा शब्दच किती आल्हाददायक ! त्यात हे चांदणं शब्द फुलांचं ! आपल्या असामान्य कार्यकर्तृत्वाने काळाच्या पडद्यावर आपल्या ठसा उमटवून जाणाऱ्या काही व्यक्तींच्या जीवनगाथेची ओझरती का होईना पण ओळख करून देण्याचा हा प्रयत्न. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे हा एक सुखद योगायोग ! कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी बहरून आलेले हे ' चांदणे शब्दफुलांचे ' आपल्यासारख्या रसिक वाचकांच्या हाती सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे.
हे पुस्तक म्हटलं तर ललित लेखन आहे पण यातील विविध व्यक्तिरेखांचे मनोहर कोलाज आपल्याला भावविभोर करतील. या पुस्तकात अगदी राम, कृष्ण, गणेश, परशुराम, संत ज्ञानेश्वर, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्यासारख्या अध्यात्मिक आणि पौराणिक व्यक्तिरेखा तर आहेतच. त्याशिवाय बालगंधर्व, पंडित शिवकुमार शर्मा, बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारखा अलीकडच्या काळातील आपापल्या क्षेत्रात महान कार्य करणाऱ्या व्यक्तींची शब्दचित्रेही रेखाटण्याचा मी प्रयत्न केला आहे. समर्पित जीवनाचा आदर्श असलेल्या योगी अरविंदांच्या शिष्या मां उर्फ मीरा अल्फासा या देखील आपल्याला इथे भेटतील. एखाद्या कार्याला वाहून घेणे म्हणजे काय असते हे अशा व्यक्तींकडे पाहिले की लक्षात येते.
वृक्षांवर प्रेम करणारा महान वनस्पती शास्त्रज्ञ ल्युथर बरबँक, ज्याने पोलिओची लस शोधून जगाला पोलिओमुक्त केलं असा महान शास्त्रज्ञ डॉ जोनास साक, कीटकनाशक आणि तणनाशकांविरुद्ध लढा देणारा आणि त्याचे दुष्परिणाम जगासमोर आणणारा शास्त्रज्ञ डॉ टायरॉन हेज यांचेही प्रेरणादायी कार्य आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. कलंदर कवी कवाफी आणि त्याच्या कवितांबद्दलचा आगळावेगळा लेख आपल्याला वाचायला मिळेल.
चित्रपट संगीताच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे आणि अवीट गोडीची गीते देणारे संगीतकार हेमंतकुमार आणि मदन मोहन यांचीही शब्दचित्रे आपल्याला आवडतील.
या पुस्तकात जशा या महान व्यक्ती आहेत, तशाच काही सामान्यातील असामान्य व्यक्तीही आहेत. त्यांनी आपापल्या क्षेत्रात समर्पित भावनेने जे कार्य केले आहे, ते सामान्यांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. मुंबई, पुण्यात दवाखाना थाटून भरपूर पैसे आणि नावलौकिक मिळवणे सहज शक्य असतानाही शहाद्यासारख्या आदिवासीबहुल भागात राहून त्यांना वैद्यकीय सेवा पुरवणारे डॉ अलका कुलकर्णी आणि डॉ शशांक कुलकर्णी हे दाम्पत्य आपल्याला भेटेल. अनेक महान कलाकारांना, राजकारणी व्यक्तींना आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांना वैद्यकीय सेवा देणारे डॉ जी के देशपांडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी विभाताई देशपांडे यांची ओळख एक रात्र मंतरलेली आणि आनंदयात्री या लेखातून करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
फिटे अंधाराचे जाळे या लेखात आपल्याला सेरेब्रल पाल्सीची शिकार झालेली वल्लरी करमरकर आणि तिचा सांभाळ करणारे तिचे आईवडील आणि आत्या आपल्याला भेटतील. या माणसांची सहनशक्ती, आपल्या मुलींसाठी केलेला सुखाचा त्याग आपल्याला अक्षरशः अचंबित करतो. हा लेख लिहिल्यानंतर काही महिन्यांनी वल्लरीचे वडील भाऊ करमरकर यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आणि वल्लरीचे पितृछत्र हरपले. पण जगावं कसं याचा आदर्श भाऊंनी घालून दिला आहे.
होरेगल्लू , तिसरा डोळा, सावळ्या रंगाची बाधा यासारख्या लेखात कुठल्याही विशिष्ट व्यक्तिरेखा आपल्याला भेटत नाहीत पण त्या लेखांमध्ये असलेल्या व्यक्तींची स्वभाववैशिष्ट्ये वाचल्यानंतर तशा प्रकारच्या व्यक्तिरेखा आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतील. माती भिडली आभाळा या लेखात ज्ञानेश्वर माउलींचा नेवासे येथील खांब ( पैस ) पाहिला आणि अक्षरशः थरारून गेलो. तोच अनुभव या लेखात शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.
चांदणे तुझ्या स्मरणाचे या लेखात लौकिक अर्थाने फारसे न शिकलेल्या परंतु आयुष्याच्या विद्यापीठात राहून जीवनाचे तत्वज्ञान मांडणारी, मला शिकवणारी, मला घडवणाऱ्या माझ्या आईची ओळख आपल्याला होईल. . अस्तित्व आणि स्मृती ठेवुनी जाती या लेखांमधून माझे मित्र आणि नातेवाईक यांच्याबद्दल लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. अशा व्यक्तींचे जाणे मनाला चटका लावून जाणारे असते. गाथा एका शूरवीराची या लेखात आपले आयुष्य देशासाठी समर्पित करणारा क्रांतिकारक हेमंत सोमण याच्याबद्दल आपल्याला वाचायला मिळेल.
या पुस्तकात आपल्याला निष्ठेने आणि प्रामाणिकपणे आपले काम करणारी अतिशय सामान्य माणसे भेटतील. पण त्यांची व्यक्तिचित्रे आपल्याला भावविभोर करतील. सामान्यातील हे असामान्यच ! त्यांची दखल कोणी घेतली काय आणि न घेतली काय, ते निरलसपणे आपले काम करीत राहतात. अशा लोकांमध्ये गवंडी काम करणारे तात्या आणि सोमनाथ, कल्हईवाला अशी मंडळी आहेत. सर जो तेरा चकराये या लेखातून नाभिक समाजातील व्यक्तींच्या कार्याकडे एका वेगळ्या आणि आदराच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला आहे.
व्यक्तिरेखा अध्यात्मिक असो की पौराणिक, सामान्य असो की असामान्य त्या आपल्याला जीवन जगण्याचे बळ देऊन जातात. जीवनाचे तत्वज्ञान समजावून सांगतात. हे तत्वज्ञान कोरडे नसते. त्याला या व्यक्तींच्या वागण्याचा आधार असतो. संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे ' बोले तैसा चाले ' असे वागून आदर्श निर्माण करणारी ही मंडळी. आपल्यासारखे सुज्ञ, जाणकार आणि रसिक वाचक या पुस्तकाचे मनापासून स्वागत करतील ही खात्री आहेच ! हे पुस्तक आपल्याला निश्चितच आनंद आणि प्रेरणा देईल या विश्वासासह या मनोगताला पूर्णविराम देतो.
- विश्वास देशपांडे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा