मुख्य सामग्रीवर वगळा

स्वदेशीची जादू - भाग चौदा स्वयंपूर्ण ग्रामीण भारत

 उगवतीचे रंग 

स्वदेशीची जादू - भाग चौदा 

स्वयंपूर्ण ग्रामीण  भारत 

श्यामरावांकडे आलेल्या भार्गवी वहिनी, भगवानराव तसेच चैतन्य आणि पिंकी आणि राजेश यांची छान गप्पा मारत जेवणं झाली. सगळ्यांची जेवणं झाल्यावर सगळे श्यामरावांच्या गच्चीवर आले. श्यामरावांनी गच्चीवर छान बाग केली होती. गच्चीवर सुंदर लाईट्स बसवले होते. श्यामलाताई आणि भार्गवी वहिनी झोपाळ्यावर बसल्या. मुलांनी छानपैकी बुद्धिबळाचा डाव मांडला होता. श्यामराव आणि भगवानराव यांच्याही कुठल्यातरी विषयावर चर्चा सुरु होती. पिंकीने भार्गवी काकूंच्या अंगावरील साडी पाहिली. तिला ती खूपच आवडली होती. ती म्हणाली, ' काकू, ही साडी किती सुंदर आहे ! तुमच्या रंगाला अगदी खुलून दिसते. ' 

भार्गवी वहिनी म्हणाल्या, ' पिंकी, या साडीला कांचीपुरम किंवा कांजीवरम साडी म्हणतात. मागे काका तामिळनाडूच्या दौऱ्यावर गेले होते ना , तेव्हा त्यांनी येताना ही साडी आणली. आज एका ठिकाणी लग्नानिमित्त आयोजित केलेल्या स्वागत समारंभाला जायचे होते म्हणून ही साडी नेसून आले. ' 

' खरंच,  किती तलम आणि नक्षीदार साडी आहे ! या साड्या तिकडेच तयार होतात का ? ' पिंकी म्हणाली.  

तेवढ्यात या गप्पांकडे श्यामराव आणि भगवानरावांचे लक्ष गेले. श्यामराव हसत म्हणाले,' भगवान, आता साड्यांवरून गप्पा सुरु झाल्या. ' बाबा. तू तिकडून येताना वहिनींसाठी साडी आणलीस. आता श्यामला मला म्हणणार, ' बघा, भावजींनी कशी साडी आणली तिकडून येताना वहिनींसाठी. ' 

श्यामलाताई हसत म्हणाल्या, ' अगदी बरोबर बोललात. मला पण तशी साडी हवी आहे बरं का ! ' 

' अहो वहिनी, काही काळजी करू नका आणि त्या श्यामच्या मागे तर अजिबात लागू नका साडीसाठी. तुम्हाला काय वाटलं मी फक्त भार्गवीसाठीच साडी आणली ? मी येताना तुमच्यासाठी सुद्धा साडी आणली आहे. फक्त मला तुम्हाला आताच सांगायचं नव्हतं पण आता तो विषय निघाला आणि मी सांगून टाकलं. पुढच्या महिन्यात तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना, त्या वेळी ती साडी तुम्हाला द्यायची असं ठरवलंय मी आणि भार्गवीनं, ' भगवानराव हसत म्हणाले. 

' वा भगवान, तू तर ग्रेटच आहेस बाबा. मला काही बोलायचंच काम ठेवलं नाहीस. ' श्यामराव म्हणाले. 

' ग्रेट बिट काही नाही. ते महत्वाचं नाही, पण तुम्हाला माहिती आहे का ही साडी तामिळनाडूतील कांचीपुरम इथे तयार होते आणि ती विणणारे जे वीणाकर आहेत, त्यांना महर्षी मार्कंडेयांचे वंशज समजले जाते. ' 

' अरे बापरे ! एवढी प्राचीन परंपरा आहे ही  ! आश्चर्यच आहे ! ' श्यामराव म्हणाले. 

' श्यामराव, हे तर काहीच नाही. खरं आश्चर्य पुढेच आहे. ते मार्कंडयाचें वंशज एवढे कुशल कारागीर होते की पूर्वी ते ही साडी देवतांसाठी विणायचे असे म्हटले जाते. आणि अगदी आताच्या या साड्यांबद्दल बोलायचं झालं तरी ही परंपरा चारशे वर्षांपेक्षाही अधिक जुनी आहे. त्याचे पुरावे सम्राट कृष्णदेवरायाच्या काळापासून आढळतात. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आदी ठिकाणचे कारागीर या साड्या तयार करत. या साड्या हातमागावर तयार केल्या जातात. साडी आणि काठ वेगळे विणले जातात. नंतर ते एकत्र जोडतात. या साडीसाठी शुद्ध अति तलम अशा रेशमाचा वापर केला जातो. त्यावर वेगवेगळ्या डिझाइन्स असतात. साडीचा रंग आणि तिचे काठ यांचा रंग कॉन्ट्रास्ट म्हणजे वेगळा किंवा विरुद्ध ठेवतात. त्यामुळे तिचे सौंदर्य खुलून दिसते. तिच्यासाठी सोने आणि चांदीच्या जरीचा वापर केला जातो. एक साडी बनवण्यवासाठी कधी कधी काही महिनेही लागू शकतात. ' भगवानराव म्हणाले. 

पिंकी म्हणाली, ' काका, इतक्या प्राचीन काळापासून भारतातील लोकांना ही कला अवगत होती ? ' 

' हो तर.  प्राचीन भारतातील लोकांना वस्त्रनिर्मितेचे तंत्र उत्तम प्रकारे अवगत होते. पूर्वीच्या भारतात ढाक्यात तयार होणारी मलमल प्रसिद्ध होती. त्याचप्रमाणे सुरत, माळवा, खंडवा येथील मलमल सुद्धा अतिशय प्रसिद्ध होती. भारताचा परदेशांशी व्यापार चालत होता. भारतीय कापड इतक्या उच्च प्रतीचे होते की आपण मागू त्या किमतीला इतर देशातील व्यापारी ते विकत घ्यायला तयार असत. त्या बदल्यात अगदी सोने मागितले तरी ते दिले जाई. म्हणजेच आपल्याकडील कापडाला सोन्याचा भाव होता आणि सोने ही त्याकाळी विनिमयाची वस्तू होती. म्हणून तर आपला देश अतिशय समृद्ध होता. इंग्रंजांसाठी तो ' सोने की चिडिया ' ठरला. ' भगवानराव सांगत होते. प्राचीन भारतीय संस्कृती हा त्यांच्या आवडीचा विषय होताच. 

श्यामराव म्हणाले, ' अरे भगवान, तू जे हे सांगतोस त्याला काहीतरी आधार नक्कीच असेल, नाही का ? ' 

' अरे जे इंग्रज, स्कॉटिश, डच, पोर्तुगीज इतिहासकार भारतात त्या काळी येऊन गेले, त्यांनी प्राचीन भारताचे वर्णन केले आहे. त्यांनी लिहून ठेवले आहे. त्यातूनच ही माहिती आपल्याला कळते. पण दुर्दैवाने आपल्या मुलांना भारतीय संस्कृतीचा हा समृद्ध इतिहास शिकवला गेला नाही. ' 

' तुम्ही ऐकले असेल की ढाक्याची मलमल इतकी तलम होती की त्याची तयार केलेल्या साडीची घडी एखाद्या आगपेटीत बसेल एवढी लहान होऊ शकायची.हजारो वर्षे या कापडाला जगभरातून पसंती मिळत राहिली.  सोळा टप्प्यातून गेल्यानंतर ही मलमल तयार व्हायची. त्याकाळी हा प्रदेश भारतात होता. तेथील मेघना नदीच्या किनाऱ्यावर खास पिकवलेल्या कापसापासून ही मलमल तयार केली जायची. प्राचीन ग्रीसमधील देवतांच्या मूर्तीसाठी ही मलमल वापरली जायची. तसेच अनेक देशातील राजेमहाराजे यांची वस्त्रं त्यापासूनच तयार व्हायची. नेपोलियन बोनापार्टची पहिली पत्नी जोसेफिन ही सुद्धा भारतातील मलमलची अतिशय चाहती होती. 

 एवढंच नव्हे तर पुढे जे मोगल आक्रमक भारतात आले आणि सत्ताधीश झाले, त्यांची वस्त्रेही याच तलम अशा मलमलीपासून बनवली जायची.  संपूर्ण जगाला या मलमलने वेड लावलं होतं, पूर्वी शाही दरबारात जे कवी होते, ते ढाक्याच्या मलमलीला ' बफत हवा ' म्हणजे ' विणलेली हवा '  असं म्हणत इतकं ते वजनानं हलकं असायचं. अर्थात हे कापड अत्यंत महाग असायचं. ज्यांची ते परिधान करण्याची ऐपत असायची असेच लोक हे कापड वापरायचे. 

हे कापड इतकं तलम आणि पारदर्शक हॉट की त्यातून शरीर दिसायचं. हे कापड म्हणजे आशिया खंडातील एक चमत्कार समजला जाई. परदेशातील काही पर्यटकांना तर ते कापड हाताने तयार केलं आहे यावर विश्वासच बसत नसे. त्यांना वाटे की हे कापड भूत किंवा पऱ्या तयार करतात. हे कापड इतके तलम असे की एकावर एक असे त्याचे थर घातले तरी त्यातून शरीर दिसत असे. औरंगजेबाच्या दरबारातील एक हकीगत याबाबत सांगितली जाते. एकदा औरंगजेबाची मुलगी हे वस्त्र परिधान करून दरबारात आली. तिने एकावर एक असे सात थर किंवा पदर या कापडाचे घातले होते. तरी औरंगजेब तिच्यावर रागावला होता. तुम्हाला त्याची किंमत सांगितली तर आश्चर्य वाटेल. एक फूट मलमलच्या कापडाची किंमत १८५१ मध्ये ५० ते ४०० पौंडाच्या दरम्यान म्हणजे अंदाजे ५००० ते ४०००० रुपये इतकी असायची. ' भगवानराव  म्हणाले.  

ते ऐकून सगळ्यांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. भगवानराव पुढे म्हणाले. आपण कापड मीटरमध्ये मोजतो. पूर्वी ते ' गज ' मध्ये मोजले जायचं बरं का ! '

' गज ' म्हणजे किती हो भाऊजी ? ' श्यामलाताईंनी विचारले. 

' आपल्या मीटरपेक्षा थोडे जास्त म्हणजे गज. साधारणपणे १५ गज कापड म्हणजे आपला आताच चौदा मीटर कपडा. आणि तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की या १५ गज कापडाचं वजन १०० ग्रॅम पेक्षाही कमी होतं. १३ गज कपडा तर एखाद्या अंगठीतून सुद्धा बाहेर पडेल इतका तलम असायचा. ' भगवानराव म्हणाले. 

' खरोखरच त्या काळातील कापड बनवणारे कारागीर किती कुशल असतील नाही ! ' राजेश म्हणाला. 

' होय, अरे मार्टिन नावाचा स्कॉटिश इतिहासकार तर म्हणतो की ज्या काळात इतर देशातील लोक प्राथमिक अवस्थेत जीवन जगत होते, त्या काळात भारतात अशा प्रकारची उत्तम वस्त्रनिर्मिती होत होती. भारताने जगाला कपडा बनवणे आणि कपडा वापरायला शिकवले. रोमन साम्राज्यातील राजे, राण्या भारतातून कापड मागवत असत आणि तीच वस्त्रे परिधान करीत. फ्रेंच इतिहासकार टॅव्हर्नी याने तर भारतीय कपड्यांची तोंड भरून तारीफ केली आहे. इंग्लंडमध्ये सुद्धा कपडा बनवण्याची कला लोकांना इ स १७८० नंतर अवगत झाली. '

' थॉमस मुनरो हा इंग्रज अधिकारी तत्कालीन मद्रासमध्ये दीर्घकाळ गव्हर्नर पदावर होता. त्याला इंग्लंडला परत जाताना तेथील राजाने एक शाल भेट दिली. त्याने ती शाल अनेक वर्षे वापरली. पण ती थोडीही खराब झाली नाही, तिचा रंग विटला नाही. त्याने १८१३ मध्ये इंग्लंडच्या संसदेत भाषण केले, तेव्हा या शालीचा उल्लेख करून भारतातील वस्त्रनिर्मितीबद्दल गौरवोदगार काढले. '

परंतु इतकी सुंदर वस्त्रनिर्मिती करणारे कारागीर काळाच्या ओघात नष्ट झाले. त्यासाठी आवश्यक असणारा धागा किंवा त्या प्रतीचा कापूस मिळेनासा झाला. पुढे पुढे तर इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीने यावर ताबा मिळवला. त्यांनी स्थानिक व्यापाऱ्यांना बाजूला करून स्वतःच या कापडाची खरेदी सुरु केली. हे काम करणाऱ्या कारागिरांना अगदी कमी मोबदला ते देऊ लागले. कारागिरांची उपासमार होऊ लागली. नंतर इंग्लंडमधून मशीनवर तयार होणारं  कापड भारतात येऊ लागलं. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर भारतातील या भव्यदिव्य अशा पारंपरिक वस्त्रनिर्मितीच्या उद्योगाला उतरती कळा लागली. '

आता बराच वेळ झाला होता. छोटा चैतन्यही कंटाळला होता. भगवानराव आणि भार्गवी वहिनींनी सगळ्यांचा निरोप घेतला. पिंकी आणि राजेशला बाय केलं. ( क्रमशः ) 

( या लेखातील माहिती आंतरजालावरून मिळालेल्या माहितीवर आधारित आहे ) 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

८/९/२०२३

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२ 

( कृपया लेख नावासह अग्रेषित करावा )










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...