उगवतीचे रंग
ज्योत दिव्याची मंद तेवते....
वेळ संध्याकाळची. थोडा अंधार पडायला लागला होता. घरातले दिवे लावले. पण देवाजवळही दिवा लावल्याशिवाय बरं वाटत नाही. किंबहुना आपली परंपराच आहे ती ! थोडा वेळ दिवा लावून देवाजवळच शांत बसून राहावं. त्याच्यासारखं सुख नाही. देवाजवळच्या समईच्या वातींना थोडा गुल ( कार्बन ) आला होता. तो बाजूला केला. समईत थोडं तेल घातलं आणि काडी पेटवली. वातींनी पेट घेतला. समईच्या ज्योतीकडे पाहिलं. सुरुवातीला ज्योत काही क्षण निळसर भासली. नंतर ती पिवळ्या सोनेरी रंगाची झाली. काही वेळानं समईतलं तेल संपल्यानंतर ती जेव्हा मालवली तेव्हा किंचित काळ लालसर होऊन शांत झाली.
या ज्योतीकडे पाहत असताना मानवी जीवनासंबंधी मनात विविध विचार आले. सुरुवातीला ती ज्योत निळसर दिसली. हा निळा रंग म्हणजे आपले बाल्य. ती ज्योत जशी क्षण दोन क्षण निळी दिसते तसेच आपले बाल्यही रम्य असते. अल्पकाळ टिकणारे असते. कधी संपते ते कळत नाही. म्हणून तर बालपणीचा काळ सुखाचा असे आपण म्हणतो. निळ्या रंगाचे हे पक्षी केव्हा भुर्रकन उडून जातात ते कळत नाही. पण आठवणी मात्र जन्मभरासाठी ठेवून जातात.
पण ही सुरुवातीची ज्योत वादळवाऱ्यापासून खूप जपावी लागते. तिला थोडाही वाराही सहन होत नाही. म्हणून सुरुवातीला तिचे रक्षण करावे लागते. कधी ज्योतीभोवती आपण काच लावतो, तर कधी हातांचा आडोसा करतो. घरात पंखा सुरु असेल तर पंखा बंद करावा लागतो. बाल्य जपायचे असेल तर ते सांभाळणाऱ्या हातांना सुखाचा त्याग करावाच लागतो. तरच ही ज्योत तेवत राहते.
एकदा का ज्योत पुरेशी प्रकाशमान झाली की थोड्याशा वाऱ्यापासून तिला फारशी भीती नसते. आणि आता तिला वाऱ्याला भिऊन चालणारही नसते. तिला प्रकाशायचे असते. बालपणीची निळसर झाक कुठल्या कुठे विरून जाते आणि तारुण्याचा सोनेरी प्रकाश उजळतो. ही ज्योत प्रकाशमान होण्यासाठी दिव्यातल्या दोन वाती एकत्र येतात. त्या जळत जातात, कणाकणाने झिजत जातात. या दोन वाती म्हणजे आपले आईवडील. मुलांचं आयुष्य उजळावं म्हणून ते कणाकणानं झिजत असतात. कष्ट, त्रास आनंदानं सहन करतात. स्नेहाचं, प्रेमाचं तेल त्यांनी त्या दिव्यात घातलेलं असतं. जोपर्यंत ते आहेत, तोपर्यंत ते हे स्नेहाचं, प्रेमाचं तेल कमी पडू देत नाहीत. स्नेहाचं तेल आणि वाती असतात म्हणूनच ज्योत प्रकाशमान होते, हे ज्योतीनं कधी विसरू नये.
आता त्या ज्योतीसमोर एकच लक्ष्य असतं. तिच्या भोवती जो अंधःकार असतो, त्याला नाहीसं करणं. तेच तिचं जीवनकार्य असतं. लहानपणी वाचलेली घरभर प्रकाश ही गोष्ट आठवते का ? एक वडील आपल्या मुलांना प्रत्येकी दहा रुपये देतात आणि त्या दहा रुपयात घर भरेल अशी वस्तू आणायला सांगतात. त्या मुलातील एक मुलगा मोठ्या हुशारीने आपले डोके चालवून चार पणत्या घेऊन येतो आणि संध्याकाळच्या वेळी त्या घरात लावतो. संपूर्ण घर प्रकाशाने उजळून जाते, अंध:कार नाहीसा होतो. तेच काम दिव्याचे असते.
या प्रकाशमान ज्योतीवर आणखी एक जबाबदारी नकळत येते. ती म्हणजे दिव्याने दिवा पेटवणं. आपल्या आयुष्यात जेवढे दीप आपल्याला प्रज्वलित करता येतील, तेवढे करायचे असतात. तरच दिव्याचा जन्म सार्थकी लागतो. ज्ञानेश्वर माउली म्हणतात
जैसी दिपकळिका धाकुटी । परी बहू तेजाते प्रगटी ।
तैसी सद्बुद्धी हे थेंकुटी । म्हणो नये ।।
दिव्याची ज्योत जरी छोटी किंवा लहान असली तरी तिचे तेज पुष्कळ असते. त्या तेजात अंधार दूर करण्याचे सामर्थ्य असते. तसेच माणसाजवळ थोडी जरी सद्बुद्धी असेल, तर ती त्याचा जन्म सार्थकी लावण्यास पुरेशी असते. ती त्याची जन्ममृत्युपासून सुटका करते. या ज्योतीने एक काळजी मात्र घ्यायची असते. ती म्हणजे ' अहंकाराचा वारा ।न लागो राजसा । माझिया विष्णुदासा । भाविकांसी ।। संत नामदेव महाराज म्हणतात अहंकाराचा वारा लागू देऊ नका. त्यामुळे भल्याभल्यांचा नाश झाला आहे. नम्रता हा फार मोठा गुण आहे. ' महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती असे आपण म्हणतो ते खरे आहे.
महाभारतातील कर्णाचे उदाहरण इथे आठवते. कर्ण उदार होता,शूर होता पण आपल्या श्रेष्ठत्वाचा अहंकारही त्याला होता. माणसाला अहंकार असला की योग्यायोग्यतेचा विवेक त्याला राहत नाही. तो अधर्माने वागतो. युद्धात कर्णाच्या रथाचे चाक भूमीत रुतले. तेव्हा कर्ण अर्जुनाला म्हणतो, ' तू शूर आहेस, सदाचारी आहेस, धर्माने वागणारा आहेस. तेव्हा माझ्या रथाचे चाक निघेपर्यंत थांब. ' ते ऐकून श्रीकृष्ण कर्णाला म्हणाले, ' तुम्ही सगळ्यांनी मिळून अधर्माने एकट्या अभिमन्यूची हत्या केली. द्रौपदी वस्त्रहरण केले . अशा प्रसंगी तुला धर्म आठवला नाही. आणि आता तू धर्माच्या गोष्टी करतोस. पण आता वेळ गेलेली आहे. ' सरतेशेवटी कर्णाचा अंत झाला. अहंकार असला की माणसाच्या प्रगतीचे, उद्धाराचे चाक जमिनीत रुतून बसते. त्यातच त्याचा अंत होतो. वासुदेवानंद सरस्वती म्हणतात, ' मोक्ष स्वर्गात वा आकाशात वगैरे नाही. जो अहंकार नष्ट करतो, अशा व्यक्तीच्या अंतरात तो असतो. '
रावणाला सुद्धा आपल्या शक्तीचा गर्व झाला होता. आपल्याला कोणीच काही करू शकत नाही. आपण वाटेल ते करू शकतो हा अहंकार त्याच्या ठायी होता. त्या अहंकारामुळेच सीतेसारख्या पतिव्रतेला उचलून आणून आपण पाप करतो आहोत याचा विवेक त्याला राहिला नाही. त्याला योग्य तो सल्ला देणाऱ्या मंदोदरी, बिभीषण आदींना त्याने तुच्छ लेखून त्यांचा उपमर्द केला. परिणामी रावणालाही नष्ट व्हावे लागले. अशी खूप उदाहरणे इतिहासात आणि पुराणात आपल्याला सापडतात. म्हणूनच ज्योतीला अहंकाराच्या वाऱ्यापासून जपायचे असते.
दिव्यातील तेल संपत येईपर्यंत इतरांना प्रकाश द्यायचा असतो. अस्ताला जाताना सूर्यबिंब जसे लाल असते, तशीच ज्योतही लाल रंगाची होते. सूर्य दिवसभर प्रकाश देऊन कृतार्थ मनाने अस्ताला जातो. इतरांना त्याने जीवन दिलेले असते. आपणही असेच कृतार्थ जीवन जगावे. दिव्यासारखा प्रकाश द्यावा. समईतील जळणाऱ्या वाती मला हा प्रकाशरूपी संदेश देऊन गेल्या. त्या दिव्याच्या प्रकाशामुळे जसे देवघर उजळले होते तसेच माझे अंतरंग ही उजळून निघाले.
बा भ बोरकरांच्या ' लावण्यरेखा ' या कवितेत फार सुंदर ओळी आहेत. त्या मानवी जीवनाची कृतार्थता सांगतात. कवी म्हणतो
देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके
चांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्यासारखे
देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा
अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१७/०९/२०२३
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा