उगवतीचे रंग
होय, मला शिक्षक व्हायचं आहे
मी शाळेत शिकत असतानाची गोष्ट. आमच्या वर्गावर मराठीचा तास घेणारे अमृतकार सर इतके तन्मयतेने शिकवायचे की आम्ही त्यात रंगून जायचो. तास कधी संपला हे कळायचे नाही. त्यातूनच आमची मराठीच्या अवांतर वाचनाची आवडही त्यांनी फुलवली. कधी कधी भा. ल. कोतकर सरही आम्हाला मराठी शिकवायचे. अमृतकर सर आम्हाला इंग्रजीही शिकवायचे. गणिताचे के पी वाणी शिक्षक कठीण समीकरणे, प्रमेये अशा काही खुबीने शिकवायचे की घरी ते सोडवताना मजा यायची. विक्रम पाटील, करंदीकर सर विज्ञानाचे शिक्षक कधी प्रयोगातून तर फळ्यावर काढलेल्या आकृतीतून एखादा विषय छान समजावून द्यायचे आणि ते कायमस्वरूपी लक्षात राहायचे. रावशास्त्री म्हणजे संस्कृतचे विद्वान. असे सगळेच शिक्षक उत्तम शिकवत. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक पी बी देशपांडे सर तर लीलया कुठलाही विषय शिकवू शकायचे. पण एखाद्या कार्यक्रमाच्या दिवशी सगळ्या विद्यार्थ्यांना उद्देशून ते जे भाषण करीत असत, ते मला आजही आठवते. ते म्हणायचे, ' माझ्या शाळेत तुम्ही फक्त मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान शिकण्यासाठी येत नाहीत. ते तर तुम्हाला शिकायचं आहेच पण त्याचबरोबर एक उत्तम नागरिक तुम्हाला व्हायचं आहे. तुम्ही ए बी हायस्कुलचे विद्यार्थी होता, म्हणून बाहेर तुम्हाला ओळखले गेले पाहिजे. या ठिकाणी काही शिक्षकांची नावे मी उदाहरणादाखल घेतली पण सगळेच शिक्षक असे जीव ओतून शिकवणारे होते.
हे सगळे शिक्षक म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर आमचे रोल मॉडेल्स होते. मला असं नेहमी वाटायचं की मी सुद्धा यांच्यासारखंच शिक्षक व्हावं. पण त्यांचा तो वसा घेणं सोपं नव्हतं हे मला जेव्हा मी शिक्षक झालो, तेव्हा अनुभवानं लक्षात आलं. पण शिक्षक होणं हीच मुळात किती भाग्याची आणि छान गोष्ट आहे ! तुम्ही जेव्हा शिक्षक होता, तेव्हा तुमच्यासमोर असतात रसरशीत कोवळे चेहरे, त्या चेहऱ्यांवर उत्सुकता असते, काहीतरी नवीन शिकण्याची उर्मी अंतरात असते आणि नवीन काही शिकल्यानंतर दिसणारे समाधान चेहऱ्यावर स्वच्छ झळकत असते. देशाची भावी पिढी घडवण्याचे भाग्य शिक्षकाच्याच भाळी असते.
पण काळ बदलला. शिक्षक होणं सोपं राहिलं नाही. शाळा, कॉलेजात शिक्षक म्हणून लागण्यासाठी संस्थांच्या वतीने अक्षरशः लाखो रुपयांची मागणी करण्यात येऊ लागली. एवढे पैसे सामान्य माणूस कुठून आणणार ? समजा, अगदी कर्ज काढून किंवा जमीन वगैरे विकून पैशांची व्यवस्था केलीच तरी तो कायम होईल का, त्याचा पगार सुरु होईल का वगैरे प्रश्न असतातच. कोणत्याच गोष्टीची शाश्वती देता येत नाही. अर्थात मी हे जे सांगतो आहे, ते उघड सत्य आहे. या गोष्टी सगळ्यांना माहिती असतात पण सगळेच त्या दबक्या आवाजात बोलत असतात. नियुक्ती करणारे संस्थाचालक, त्या नेमणुकीला मान्यता देणारे अधिकारी, राजकारणी या सगळ्यांची एक साखळीच कार्यरत असते.
एवढे सगळे होऊनही एखादा युवक वा युवती शिक्षक झालाच, तर त्याला त्याच्या मनाने काम करण्याचे कितीसे स्वातंत्र्य उरते ? नेमून दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करणे, अधिकाऱ्यांना सारखी ही ना ती ऑनलाईन माहिती पाठवत राहणे, शाळेतील विविध प्रकारची लेखी कामे करणे, दिनविशेष साजरे करणे, संस्थाचालकांची हाजी हाजी करणे या सगळ्यात तो बिचारा गुंतून पडतो. शिवाय निवडणुका, जनगणना किंवा अशीच काही आणखी कामे यासाठी तो हक्काची व्यक्ती असतो. त्याची निम्मीअधिक शक्ती अशा गोष्टींमध्ये खर्च होते. या सगळ्या गोष्टीतून वेळ मिळेल तसे अध्यापन करणे, आपला अभ्यासक्रम पूर्ण करणे अशी कसरत त्याला करावी लागते.
संस्थाचालकांची सभा असो वा शाळेत एखादा प्रमुख मोठा पाहुणा आलेला असो, शाळेच्या मुख्याध्यापक आणि इतर शिक्षकांना अतिशय सन्मानाने वागणूक दिली आहे, असे क्वचितच आढळते. बऱ्याच ठिकाणी अशा प्रसंगी त्यांना एखाद्या सेवकाप्रमाणे राबावे लागते. त्या शाळेमध्ये शिकणारे हजारो चिमणे डोळे ज्यांच्याकडे आपले आदर्श म्हणून लागलेले असतात, त्यांची अशी परिस्थिती पाहून वाईट वाटल्याशिवाय राहत नाही.
शिक्षक दिनाचा एखादा अपवादात्मक कार्यक्रम सोडला तर शिक्षकांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवावे असे क्वचितच कुणाला वाटत असेल. साहित्य संमेलन असो, एखाद्या उपक्रमाचे उदघाटन असो वा अन्य काही प्रसंग. एखाद्या शिक्षकाला त्या प्रसंगी प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले आहे असे फारसे आढळत नाही. वर्षानुवर्षे ज्यांनी प्रामाणिकपणे आणि अतिशय तळमळीने आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले आहे, अशा गुरुवर्यांना व्यासपीठावरील समोरच्या रांगेत कुठेतरी कोपऱ्यात बसवले जाते. नव्हे तेच संकोचून आपले स्थान मागेच आहे हे समजून स्वतःच त्या ठिकाणी बसतात. ज्यांची त्यांच्या पायाशी बसण्याची लायकी असते, ते सन्मानाने व्यासपीठावर विराजमान होतात. अर्थात सगळेच संस्थाचालक, राजकारणी वा अधिकारी असे असतात असे नाही. काही सन्माननीय अपवादही असतातच पण आज मात्र सगळीकडे असेच दृश्य पाहायला मिळते हे मात्र खरे !
या गोष्टीला दुसरी एक बाजूही आहे. काही लोक असेही म्हणतील की शिक्षक तरी पूर्वीसारखे आपल्या ज्ञानदानाचे काम समर्पित भावनेने कुठे करतात ? तेही आपला स्वाभिमान विसरून संस्थाचालक, राजकारण्यांची हाजी हाजी करण्यात धन्यता मानतात. मग त्यांच्या या अधोगतीला जबाबदार कोण ? हा युक्तिवाद बरोबर वाटत असला तरी टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. अशी परिस्थिती त्यांच्यावर का आली याचाही विचार व्हायला हवा. तरी अशाही परिस्थितीत अनेक शिक्षक बंधू भगिनी आजही समर्पित भावनेने काम करीत आहेतच हेही तितकेच खरे.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ राधाकृष्णन, डॉ ए पी जे अब्दुल कलाम हे आधी आणि नंतरही शिक्षक होते. विद्यार्थ्यांमध्ये रमायला त्यांना अतिशय आवडत असे. हजारो लाखो विद्यार्थ्यांचे ते आदर्श होते. डॉ कलाम जेव्हा राष्ट्रपती झाले, तेव्हा त्यांना आपल्या शिक्षकांची आठवण आली. आपल्या शपथ समारंभाच्या वेळी आपल्या शिक्षकांना त्यांनी अतिशय सन्मानाने आमंत्रित केले. त्या त्यांच्या गुरूंना अशा प्रसंगी किती धन्यता वाटली असेल !
संदीप वासलेकर यांनी त्यांच्या एका लेखात मागे एक प्रसंग सांगितला होता. युरोपात स्वीडन आणि डेन्मार्क या देशांच्या सीमेवर लुंड विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ आपले ज्ञानदानाचे कार्य गेल्या पाचशे वर्षांपासून करीत आहे. काळाच्या ओघात काळाला अनुकूल असे अनेक बदल या विद्यापीठाने आपल्या शिक्षण पद्धतीत केले आहेत.
या विद्यापीठातर्फे एक नियतकालिक चालवलं जात. ते विद्यार्थीच चालवतात. पण त्याचा दर्जा आंतरराष्ट्रीय आहे. सकाळ पेपरमध्ये यावर एक लेख आला होता. संदीप वासलेकर यांनी तिथे जाऊन त्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली. तिथे एक विद्यार्थिनी त्यांना भेटली. त्या विद्यार्थिनीचे आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थकारण, साहित्य इ क्षेत्रातील ज्ञान पाहून ते प्रभावित झाले. ती अत्यंत बुद्धिमान अशी असलेली विद्यार्थिनी नॉर्वेची नागरिक होती व लुंड विद्यापीठात शिक्षण घेत होती. त्यांनी तिला विचारले की पदवी नंतर काय पुढे काय करण्याची इच्छा आहे ? त्या प्रसंगी त्या दोघांमधील झालेला संवाद त्यांच्याच शब्दांत-
ती म्हणाली, ‘‘माझी महत्त्वाकांक्षा खूप मोठी आहे; पण ती मला साध्य करता येईल की नाही, हे मला माहीत नाही.’’
मी विचारलं, ‘‘तुला यूनो, नॉर्वेचं पराराष्ट्र मंत्रालय, नॉर्वेतल्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय कंपन्या इथं मोठ्या जबाबदारीवर काम करण्याची इच्छा आहे का?’’
ती म्हणाली, ‘‘बिलकूल नाही. माझी महत्त्वाकांक्षा खूप मोठी आहे. ती खूप प्रयत्न करूनही साध्य नाही झाली, तर मग परराष्ट्र मंत्रालय, यूनो, वगैरे इतर बाबींचा विचार करता येईल.’’
मी पुन्हा विचारलं, ‘‘तुझी एवढी मोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा आहे तरी काय, हे मला सांगू शकशील का?’’
ती म्हणाली, ‘‘मला नॉर्वेतल्या एका ग्रामीण शाळेत शिक्षिका होण्याची महत्त्वाकांक्षा आहे; पण आमच्याकडं शिक्षिकेची नोकरी अतिशय प्रतिष्ठित समजली जाते. ती मिळवण्यासाठी सर्वांत हुशार विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रयत्न करतात. त्यामुळं प्रवेश मिळणं सोपं नाही.’’
पण अशी इच्छा वा महत्वाकांक्षा असणारी ती विद्यार्थिनी अपवादात्मक नव्हती. युरोपमध्ये ऑक्सफर्ड, केंब्रिज, सोबोर्न, लुंड, उपसाला, हाइडलबर्ग या विद्यापीठांतल्या अनेक युवक व युवती शिक्षक अथवा अध्यापक होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगतात.'
आपल्या देशात अनेक तरुण बुद्धिमान युवक युवती आहेत. बरेचसे परदेशात जाऊन नोकरी करण्याची इच्छा बाळगतात. आपल्या देशातही त्यांनी नोकरी करायची ठरवली, तरी त्यांचे ध्येय शिक्षक होण्याचे नसते. ते संशोधक, अधिकारी होण्याचे स्वप्न पाहतात. त्यांचे बरोबरच आहे. दोष त्यांचा नाही. त्यांना शिक्षक व्हावेसे वाटेल अशी परिस्थिती आपण निर्माण करू शकलो नाही हा आपला दोष आहे. काही मुले कौटुंबिक परिस्थिती अनुकूल नसतानाही आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पुढे येतात. अशी मुले अपवादात्मक असतात. काही मुलांना चांगले पालक लाभतात. ते त्या मुलांच्या शिक्षणाकडे नीट लक्ष देतात, त्या मुलांना घडवतात. अशी मुले खरोखर सुदैवी म्हटली पाहिजेत. भारताची लोकसंख्या १४० कोटींच्या आसपास आहे. अशा विशाल लोकसंख्येच्या देशाला दिशा द्यायची असेल, तर देशात उत्तम शिक्षक निर्माण झाले पाहिजेत. त्यासाठी केवळ अपवादात्मक किंवा सुदैवी विद्यार्थ्यांवर अवलंबून राहून चालणार नाही. वर दिलेल्या उदाहरणातील त्या नॉर्वेतील विद्यार्थिनीला जसे ग्रामीण भागात जाऊन शिक्षक व्हावेसे वाटते, तसे ज्या दिवशी आमच्या देशातील बुद्धिमान युवक युवतींना वाटायला लागेल, तो दिवस भारताच्या दृष्टीने सुदिन असेल. त्याचवेळी आपण डॉ कलाम यांचे उज्ज्वल भारताचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार करू शकू.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
४/९/२०२३
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा