उगवतीचे रंग
स्वदेशीची जादू - भाग तेरा
स्वयंपूर्ण ग्रामीण भारत
श्यामराव, श्यामलाताई, पिंकी आणि राजेश हे एक आदर्श कुटुंब होते. सतत नवनवीन गोष्टी शिकणे, निसर्गाचा आनंद घेणे याकडे त्यांचा नेहमी ओढा असे. गावातील लोक श्यामराव आणि श्यामलाताईंना एक आदर्श आईवडील म्हणून ओळखत असत तर पिंकी आणि राजेश यांची प्रसिद्धी आदर्श आणि आज्ञाधारक मुले म्हणून होती. गावातीलच रोटरी क्लबच्या वतीने श्यामराव आणि श्यामलाताईंचा आदर्श पालक म्हणून सत्कार करण्यात आला होता. त्याप्रसंगी बोलताना श्यामराव म्हणाले, ' आपण आज आमचा आदर्श पालक म्हणून सन्मान केला आहे त्याबद्दल आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करतो. मित्रांनो, आईवडील होणे सोपे असते पण आदर्श पालक होणे ही कठीण गोष्ट आहे. मुलांना घडवायचं असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासूनच होते असं मी मानतो. आमची मुलं पिंकी आणि राजेश यांना आम्ही ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत याची जाणीव ठेवून वाढवतो. त्यांना ज्या गोष्टींची आवड आहे, त्या करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य देतो पण त्याचबरोबर त्यातील फायदेतोटे त्यांना समजावून सांगतो. महत्वाचे म्हणजे आम्ही कधीच त्यांना हे कर किंवा हे करू नकोस असा कोरडा उपदेश कधीच करत नाही. '
' त्यांनी वाचन करावे असे आम्हाला वाटत असेल तर आम्ही दोघेही स्वतः त्यांच्यासमोर वाचन करताना त्यांना दिसतो. ते पाहून त्यांना वाटतं की आपले आईबाबा किती वाचन करतात, तसं आपणही करावं. मग ते स्वतः होऊनच पुस्तक घेऊन बसतात. त्यासाठी आम्ही स्वतःच टीव्हीवरील कौटुंबिक मालिका पाहणे बंद केले आहे शिवाय मोबाईलचा वापर आम्ही आवश्यक तेवढाच करतो. त्यामुळे मोबाईलचे आकर्षण त्यांनाही विशेष नाही. त्यांना वेगवेगळ्या गोष्टींची, ठिकाणांची माहिती व्हावी म्हणून आम्ही स्वतःच वेळ काढून त्यांना अनेक ठिकाणी सहलीसाठी घेऊन जातो. तेथील माहिती त्यांना देतो. गावात व्याख्यानं असतील तर त्या ठिकाणी त्यांना घेऊन जातो. आता मुलांनाही नवनवीन गोष्टी शिकण्याची, समजून घेण्याची आवड निर्माण झाली आहे. मुलं आपल्या अनुकरणातून, वागण्याबोलण्यातून अनेक गोष्टी आपोआप शिकतात. नुसतं सांगून उपयोग नसतो. ' श्यामरावांचे हे मनोगत संपताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
शनिवारी संध्याकाळी भगवानराव श्यामरावांच्या घरी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आले. त्यांनी श्यामराव आणि श्यामलाताईंचं मिठाई देऊन अभिनंदन केलं. मुलांसाठी स्वामी विवेकानंद आणि सुधा मूर्ती यांच्या गोष्टीची पुस्तके भेट म्हणून आणली आणि त्यांचं कौतुक केलं. भगवानरावांसोबत भार्गवी वहिनी आणि चैतन्य पण आला होता. आज रात्रीचं जेवण सगळे बरोबरच घेणार होते.
भगवानरावांबरोबर मुलांची मैफल छान जमली. पिंकी म्हणाली, ' काका, मागच्या वेळी तुम्ही आम्हाला प्राचीन समृद्ध भारताबद्दल माहिती सांगत होता. पण आपलं बोलणं अपूर्ण राहिलं. तुम्ही म्हणाला होता की पुढील वेळेस आणखी माहिती सांगेन म्हणून. '
' हो, सांगतो ना बाळांनो. पण आपण आज काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊ. आज आपण खेड्यात गेलो की आपल्याला त्यांची दुर्दशा झालेली जाणवते बरं का ! कधी पुरेसा पाऊस पडत नाही, त्यामुळे दुष्काळ पडतो. कधी अति पावसाने शेतीचं नुकसान होतं. पिकं हातात येत नाहीत, म्हणून पैसा नाही. पैसा नाही म्हणून गरिबी,बेकारी, उपासमार हे दुष्टचक्र सुरु होतं. गावातील लोकांना काही कामधंदा नाही. कामधंदा मिळवण्यासाठी लोकांचा ओढा शहरांकडे असतो. बरीचशी खेडी त्यामुळे आजकाल उजाड वाटतात. '
' अगदी बरोबर आहे काका. पण आम्ही सोपानकाकांकडे गेलो होतो, ते गाव आम्हाला आवडलं. पण अशी गावं अपवादात्मक असतील, होय ना काका ? '
' बरोबर आहे बेटा. पण पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. आता मला सांग आपण स्वतंत्र कधी झालो ?'
' १५ ऑगस्ट १९४७ ला, ' चैतन्य पटकन म्हणाला.
' बरोबर आहे, त्यापूर्वी दीडशे ते दोनशे वर्षे आपण पारतंत्र्यात होतो. म्हणजे आताची स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची ७५ वर्षे आणि त्यापूर्वीची दीडशे वर्षे असा दोन अडीचशे वर्षांचा काळ सोडला तर त्यापूर्वी आपल्या भारतातील खेडी स्वयंपूर्ण होती. खेड्यांमध्ये आर्थिक सुबत्ता होती. लोकांना रोजगार आपल्या गावातच उपलब्ध होत होता. '
' म्हणजे बाबा, आज जसे शहरात कारखाने आहेत, तसेच तेव्हा खेडयांमध्ये होते का ? ' चैतन्यने विचारले.
' बाळांनो, आज जसे आधुनिक यंत्रसामुग्रीने संपन्न असे कारखाने आपल्याला दिसतात, तसे त्यावेळी नव्हते. यंत्रक्रांती किंवा औद्योगिक क्रांती अठरा एकोणिसाव्या शतकात युरोपात आधी झाली. पण त्याआधी शेकडो वर्षांपासून भारतातील ग्रामीण भागातील लोक आपले परंपरागत व्यवसाय करीत होते. जवळपास साडेसात लाख खेडी त्यावेळी भारतात होती. या खेड्यांमध्ये केवळ शेतीच नव्हे तर शेतीला, शेतकऱ्यांना आणि तेथील लोकांना उपयोगी आणि पूरक ठरतील असे व्यवसाय लोक करीत होते. ग्रामीण भागात ज्वारी, बाजरी, डाळी आदी सर्व प्रकारचे धान्य तर उत्पन्नच होत होतेच पण त्याशिवाय वस्त्रनिर्मिती, धातूची भांडी तयार करणे, मातीची भांडी तयार करणे, लोखंडाची अवजारे, शस्त्रे तयार करणे, तेल उद्योग आदी अनेक प्रकारचे उद्योग लोक परंपरेने करीत. त्यांच्याजवळ अनुभव आणि परंपरा यातून आलेले समृद्ध ज्ञान होते. तुम्ही सोपानकाकांच्या गावात गेला होता. तेथे तुम्ही बारा बलुतेदारांची माहिती घेतली की नाही ? तर बाळांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण जवळपास दोन हजार प्रकारच्या वस्तू ग्रामीण भागात निर्माण होत होत्या. '
' बापरे, खरंच काका ! म्हणजे त्या काळातील खेडी केवढी गजबजलेली आणि स्वयंपूर्ण असणार ! ' पिंकी म्हणाली.
' बरोबर आहे, पिंकी. अगदी तशीच होती आपली प्राचीन खेडी. आणि गंमत म्हणून तुम्हाला सांगतो. या गावांमध्ये बाहेरून एकही वस्तू आयात होत नव्हती. गावातील लोकांना लागणाऱ्या सगळ्या वस्तूंची निर्मिती गावातच होत होती. फक्त एकच वस्तू ते लोक बाहेरून आयात करीत. काही अंदाज करता येईल का तुम्हाला ? ' भगवानरावांनी हसत विचारले.
पिंकी, राजेश आणि चैतन्यने बराच वेळ डोके खाजवले. पण त्यांना काही लक्षात येईना. राजेश म्हणाला, ' काका, आम्हाला नाही सांगता येत. तुम्हीच सांगा ना ! '
भगवानराव हसत म्हणाले, ' अगदी सोपं आहे. आता मला सांगा की तुमची आई जेवण बनवताना त्यात मीठ टाकायचं विसरली, तर काय होईल ? '
' अहो बाबा, मीठ नसेल तर जेवण किती बेचव आणि अळणी लागेल. ' चैतन्य म्हणाला.
पिंकी म्हणाली, ' काका, आलं लक्षात. बहुधा ते लोक फक्त मीठ आयात करत असावेत. '
' अगदी बरोबर. गावात फक्त मीठच बाहेरून येत होत होते. कारण मीठ हे समुद्रकिनारीच तयार होऊ शकतं. पण गावाला लागणाऱ्या इतर सर्व वस्तू गावातच तयार होत होत्या. केवळ तयारच होत होत्या असं नव्हे तर गावाला पुरुनही उरेल एवढं उत्पादन अनेक वस्तूंचं होत होतं, त्यामुळे ही गावं त्यांची निर्यात करत होती. त्यातून खेडी स्वयंपूर्ण झाली होती. गावात कोणी बेरोजगार, उपाशी किंवा भिकारी नसायचा. शहरांची संख्या मर्यादित होती. त्या शहरांना या गावातूनच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हायचा. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शहरी अर्थव्यवस्था असे दोन स्तर होते. उद्योगासाठी लागणाऱ्या प्राथमिक गरजा किंवा कच्चा माल गावातच उपलब्ध असे. तुम्हाला माहितीच असेल की आपल्या पूर्वजांनी बहुतेक सगळी खेडी किंवा नदीकाठी वसवली आहेत. त्यातून पाण्याची गरज भागत असे. मोठमोठी धरणे नसल्याने, त्याचप्रमाणे जंगलतोड झाली नसल्याने नद्या बाराही महिने वाहत्या असत. विहिरींना मुबलक पाणी असे. '
मध्येच श्यामराव म्हणाले, ' भगवान, अरे मागे आम्ही सोपानच्या गावाहून परत येताना या मुलांना फड पद्धतीचीही माहिती सांगितली होती. '
भगवानराव म्हणाले, ' बरोबर आहे. ती पद्धत ग्रामीण भागासाठी खरोखरच फार उपयुक्त होती. त्यामुळे शेतीतील पिकांचे उत्तम नियोजन व्हायचे. सगळे गावकरी एकत्र येऊन गावाच्या गरजेनुसार पिकांची लागवड करीत. त्यामुळे एखाद्याच शेतीमालाचे प्रचंड पीक येऊन त्याचे भाव पडणे किंवा तो माल वाया जाणे यासारख्या गोष्टीना आपोआप आळा बसत होता. शिवाय पाण्याची बचत होत होती. शेतजमिनीचा कस टिकून राहायचा असे अनेक फायदे होतेच. '
' इंग्रंजांच्या आणि मुघलांच्या आक्रमणापूर्वीची खेडी तर फार स्वयंपूर्ण होती. प्रत्येक गावात पंचायत असायची. या पंचायतीचे काम गावातील भांडण तंटे सोडवण्याचे असायचे. जेवढी समस्या मोठी तेवढी पंचायतही मोठी असायची. समस्या लहान तर पंचायतही लहान ! मोठी समस्या असेल तर कधी कधी दोन तीन गावे एकत्र येऊन पंचायत तयार व्हायची. पण त्यामुळे गावातील भांडणे गावातच सुटायची. या पंचायती अशा प्रकारे कुशलतेने न्याय देत असत की वादी आणि प्रतिवादी म्हणजेच भांडण करणाऱ्या दोन्ही पक्षांचे समाधान व्हायचे. ' भगवानराव म्हणाले.
' किती छान व्यवस्था होती नाही न्यायदानाची ! नाहीतर आजकाल आपण पाहतो न्यायालयात कोण गर्दी असते. वर्षानुवर्षे खटले चालत राहतात. प्रचंड पैसा खर्च होतो. शिवाय न्याय मिळाल्यानंतर दोन्ही पक्षांचे समाधान होत नाहीच. त्यातून मग जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय अशा वाऱ्या सुरु राहतात, ' भार्गवी वहिनी म्हणाल्या.
' नाहीतर काय. मागे एक चित्रपट पाहिला होता. आता नाव आठवत नाही. पण ' तारीख पे तारीख ' अशा अर्थाचे संवाद त्यात न्यायव्यवस्थेला उद्देशून होते. शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये ही म्हण त्यातूनच आली असावी, ' श्यामलाताई म्हणाल्या.
' वहिनी, अगदी बरोबर बोललात, ' भगवानराव म्हणाले आणि सगळेच हसण्यामध्ये सामील झाले.
' आई, मला भूक लागली आहे, ' छोटा चैतन्य म्हणाला.
' अरे हो, गप्पांच्या ओघात मुलांना भूक लागली असेल हे आपण विसरलोच, चला चला, जेवणाची तयारी झाली आहे, ' श्यामलाताई म्हणाल्या आणि सगळ्यांची पावले स्वयंपाकघराकडे वळली. ( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२/९/२०२३
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा