मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग कर्तव्याने घडतो माणूस

उगवतीचे रंग 

कर्तव्याने घडतो माणूस  

कधी कधी आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात की माणूस अगदी खडबडून जागा होतो. स्वतःबद्द्दल फिरून विचार करायला लागतो. गेल्या आठवड्यात अशाच दोन घटना घडल्या. त्या घटना सांगण्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमी आपल्याला सांगणे आवश्यक आहे. 

सध्या पावसाळा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही नुकतेच पुण्याहून आलो होतो. आमच्या भागात येथील नगरपालिकेने काही दिवसांपूर्वीच भूमिगत गटारांचे काम केले होते. त्यासाठी रस्त्याच्या मधोमध खड्डे खोदून पाईपलाईन टाकण्यात आली होती आणि चेंबर्स बांधण्यात आले होते. नगरपालिकेचे आणखी काही नियोजन असेल, ते माहिती नाही पण त्यांनी ते खोदलेले रस्ते नीट न करता वरवर केवळ माती लोटून ते भरले होते. व्हायचे ते झाले. आधीच रस्ते वेगवेगळ्या कारणांनी खराब झालेले होते. तशात हे काम. थोडाफार पाऊस झाला आणि रस्त्यांना चिखलाचे स्वरूप आले. एवढा प्रचंड गारा आणि चिखल झाला की गाड्या त्यात फसू लागल्या. काही टू व्हीलर चालवणारे तोल जाऊन पडले. घरासमोर इतका चिखल की पाय टाकण्याचीही पंचाईत. तेथून कसेबसे बाहेर पडावे तर चारही बाजूला रस्त्यांची तीच अवस्था. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन झाले होते, त्यावेळी इच्छा नसतानाही घरात बसावे लागले होते. आता मात्र इच्छा असली तरी बाहेर जाणे नको वाटत होते. कदाचित नागरिकांची सहनशक्ती वाढावी हा ही नगरपालिकेचा उदात्त हेतू असावा. त्यांनी त्यातूनही न कुरकुरता वाट काढावी आणि आपले कर्तव्य बजावावे असे नगरपालिकेला वाटत असल्यास नवल नाही. 

पण आम्ही पडलो मुलखाचे रडे. सदोदित कुरकुर. आमच्याच वाट्याला का असे रस्ते आले ? घर नेमके इकडे घेतले ते चुकलेच की काय ? वगैरे वगैरे असे नको ते विचार करत असताना एक अशी गोष्ट घडली की आम्ही खडबडून जागे झालो आणि आपण किती मुर्खासारखे विचार करतो हे आमच्या लक्षात आले. झालं असं की गेल्या आठवड्यात आमच्या सेवानिवृत्त शिक्षक संघाची वार्षिक सभा होती. आम्ही त्याचे सभासद आहोत. या संघाचे अध्यक्ष आहेत निवृत्त मुख्याध्यापक ल. बा. तथा दादा सोनार. तर हे दादा स्वतः चक्क माझ्या घरी सकाळीच सभेचा अजेंडा देण्यासाठी आले. तुम्ही म्हणाल की यात काय विशेष ? तसे ते माझ्या घरापासून जवळच पाच मिनिटांच्या अंतरावर राहतात. आता तुम्ही म्हणाल की मग तर काहीच विशेष नाही. 

पण तुम्हाला म्हणून सांगतो. दादांचे वय आता आहे ८८ वर्षे. उत्साह अजून तरुणाला लाजवील असा आहे. तर दादा चक्क हा चारही बाजूचा चिखल तुडवीत या वयात माझ्या घरी सभेचा अजेंडा देण्यासाठी आले. मला आग्रहाने म्हणाले, ' सर, सभेला जरूर या. ' दादांबद्द्दल मला खूप आदर आहे. आयुष्यभर आपले कर्तव्य बजावत असताना शिक्षक संघटनेत सक्रिय राहिलेली ही व्यक्ती. मंत्री, आमदार, खासदार आदी सगळ्या लोकांशी जवळून संबंध असलेले दादा. शिक्षकांच्या हक्कासाठी आयुष्यभर कार्यरत राहिले. ज्या शिक्षकांवर अन्याय झाला आहे, त्यांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. त्यांना मार्गदर्शन केले. प्रसंगी त्यांच्यासाठी नायायालयातही उभे राहिले. शिक्षणविषयक कायदे आणि तरतुदी यांचे चालतेबोलते विद्यापीठ म्हणजे दादा. तर असे हे दादा. आज वयाच्या ८८ व्या वर्षीही कार्यरत आहेत. गौरवर्णीय, घारे डोळे आणि चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज असलेले दादा आज वयामुळे थोडे वाकले आहेत, थोडे थकले आहेत पण उत्साह आणि जिद्द मात्र प्रेरणा घेण्यासारखी. 

दादा माझ्या घरी अशा परिस्थितीत स्वतः अजेंडा देण्यासाठी आले. मी ओशाळलो. मला स्वतःचीच लाज वाटू लागली. आपण बाहेर पडण्यासाठी किती कंटाळा करत होतो, परिस्थितीला दोष देत होतो आणि हा माणूस खुशाल या वयात चिखल तुडवीत येतो ! बऱ्याच वेळा आपण म्हणतो की आजकाल ज्यांच्यापुढे आदराने झुकावे, असे पाय दिसत नाहीत. पण अशी माणसे पाहिली की माणूस आपोआप त्यांच्यापुढे झुकतो. मी दादांना आदराने नमस्कार केला आणि दुसऱ्या दिवशी वेळेपूर्वी त्या सभेला उपस्थित राहिलो. आणखीही ज्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी अशी ज्येष्ठ माणसे त्या सभेत होती. त्या निवृत्त शिक्षक संघाचे सचिव पंडित सर आता ऐंशीच्या घरात आहेत. सहसचिव शिंपी सर यांनी पंचाहत्तरी ओलांडली आहे. 

आणखीही एक दुसरी घटना घडली. ' फिटे अंधाराचे जाळे ' या पुस्तकाचे लेखक आणि सेरेब्रल पाल्सीची शिकार झाली आहे अशा वल्लरी करमरकर हिचे वडील भालचंद्र करमरकर यांचे निधन झाले. या वल्लरीताईंवर मी ' फिटे अंधाराचे जाळे ' याच नावाचा लेख लिहिला होता. तो ही योगायोग असा झाला की माझाच एक लेख भालचंद्र करमरकर उर्फ भाऊ यांनी वाचला होता. तो वाचून मला त्यांचा फोन आला. मी त्यांना विचारले की आपण काय करता ? ते किंचित हसले आणि म्हणाले, ' मी ? आता काय करणार या वयात ? माझे वय ९३ वर्षे आहे. ' ते ऐकून मी उडालोच. एक ९३ वर्षांची व्यक्ती माझा लेख वाचून मला फोन करते, याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही. मग वल्लरीची हकीगत त्यांच्याकडूनच कळली. ते सगळे ऐकून तर त्यांना माझे हात आपोआप जोडले गेले. ' तेथे कर माझे जुळती. ' अशा ठिकाणी हात आपोआप जोडले जातात. सांगावे लागत नाही. भाऊंचा मोठेपणा असा की त्यांनी माझा पत्ता विचारून घेऊन मला त्यांनी लिहिलेले ' फिटे अंधाराचे जाळे ' हे पुस्तक पाठवले. शिवाय त्या पुस्तकावर ' विश्वासरावांना आवडेल या विश्वासाने ' असे लिहून सही करून पाठवली. मला सांगा अशा ठिकाणी काही बोलण्यासारखे आहे काय ? फक्त नतमस्तक व्हावे, अशा माणसांच्या पायावर डोके ठेवावे. पण मला अशी संधी मिळण्यापूर्वीच भाऊंनी वृद्धापकाळाने या जगाचा निरोप घेतला. वल्लरी आणि तिची आई एकटे पडले. वल्लरीची काळजी घेणारी आत्या तर कधीच गेली होती. 

खूप वाचकांना माझा हा लेख आवडला. मी तो पुनर्प्रसारित केला होता. खूप वाचकांचे विविध ठिकाणांहून फोन आले. काहींचे संदेश आले. काहींना ते पुस्तक कुठे मिळेल याची माहिती हवी होती. आणि काय दुर्दैव बघा ! मी तो लेख पुनर्प्रसारित केला आणि त्याच दिवशी भाऊंनी जगाचा निरोप घेतला. तो लेख म्हणजे एक प्रकारे श्रद्धांजली ठरली. दोन दिवसांनी माझ्या मेहुण्यांचा अकोल्याहून फोन आला. ते डॉक्टर आहेत. डॉ. राजेंद्र मेंडकी. मला म्हणाले, ' विश्वासराव, एक दुःखद बातमी आहे. वल्लरीचे वडील भाऊ करमरकर गेल्याचे तुम्हाला कळले का ? ' मी म्हटले, ' हो, ही दुःखद बातमी मला त्याच दिवशी समजली आणि मलाही धक्का बसला. ' करमरकर कुटुंबीय आणि डॉ राजेंद्र मेंडकी यांचे अगदी जवळचे संबंध होते. भाऊ, वल्लरी आणि तिची आई अकोल्याला त्यांच्या घरी काही दिवस राहून गेले होते. 

डॉ. राजेंद्र पुढे म्हणाले, ' मला ही बातमी कळल्यावर मी काकूंना ( वल्लरीच्या आई, त्यांचे वय आता ८५ वर्षांच्या आसपास आहे. ) फोन केला. त्यांना म्हटले की काकू अतिशय दुःखद घटना घडली. तुमच्या दोघींचा आधार गेला. वल्लरीचे पितृछत्र हरपले. ' त्यावर काकू म्हणाल्या, ' झाल्या गोष्टीला इलाज नाही. आता मला आणखी कणखर झाले पाहिजे. मी वल्लरीला म्हटले की वल्लरी, आता भाऊही मीच आणि तुझी आईही मीच. ' त्यांचे उद्गार ऐकल्यावर डॉ राजेंद्र त्यांना म्हणाले, ' काकू, धन्य आहे तुमची. आता या वयात आम्ही अजून काय काय शिकायचं तुमच्याकडून ? ' 

हे सगळे ऐकल्यावर माझे डोळे नकळत पाणावले. हात नकळत जोडले गेले. गीतेत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपले कर्तव्य करण्याचा उपदेश केला आहे.' परिस्थिती कशीही असो, हे अर्जुना तू आपल्या कर्तव्यापासून विन्मुख होऊ नकोस. ' आपण सारे अर्जुन या नावाचे व पु काळे यांचे एक पुस्तक आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे आपण सारेच अर्जुन असतो. सभोवतालच्या परिस्थितीशी आपल्याला लढा द्यायचा असतो. अशा परिस्थितीत अशी व्यक्तिमत्वे आपल्याला मार्गदर्शन करतात, प्रेरणा देतात. ते जणू म्हणतात, ' अरे असे हातपाय गाळून बसू नकोस. आमच्याकडे जरा बघ. ' अशा जित्याजागत्या प्रेरणा आजही आपल्या अवतीभवती विद्यमान आहेत. अशा वेळी सुधीर फडके यांनी गायिलेले ' विमोह त्यागून कर्मफलाचा सिद्ध होई पार्था, कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था ' हे सुंदर गीत कानात घोळत राहतं. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

३०/०७/२०२३

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...