उगवतीचे रंग
जरा थांबा, विचार करा - पुस्तक परीक्षण
बऱ्याच दिवसांनी एक सुंदर पुस्तक हाती लागले. हे पुस्तक आहे अलका काकडे यांचं. पुस्तकाचं नाव आहे ' जरा थांबा, विचार करा ! ' हे पुस्तक उन्मेष प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. साधारणपणे १७० पानी असणारे हे पुस्तक कमी वेळात वाचून पूर्ण होऊ शकते. पण त्यातील आशय मात्र विचार करायला लावणारा आहे. त्यामुळे नुसतेच वाचून सोडून देण्यासारखे हे पुस्तक नाही. त्यातील अनेक लेख आपल्याला आपल्या स्वतःशीच संबंधित आहेत असे वाटतात. त्यामुळे हे लेख पुन्हा पुन्हा वाचून विचार करण्यासारखे आहेत. असे असले तरी पुस्तकाची भाषा ओघवती आणि वाचकांशी संवाद साधणारी आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचताना कुठेही कंटाळवाणे होत नाही. मानसशास्त्राच्या अभ्यासक असणाऱ्या आणि अनेक वर्षांपासून समुपदेशन करणाऱ्या अलकाताई यांनी हे पुस्तक कुठेही कंटाळवाणे, क्लिष्ट, निरस होणार नाही याची काळजी घेतली आहे. सुरुवातीला या पुस्तकातील लेख दै. संचार मधील ' विचारयात्रा ' या सदरात प्रसिद्ध झाले. नंतर ते लेख आपल्यासमोर पुस्तकरूपाने आले आहेत.
अगदी मुखपृष्ठापासूनच हे पुस्तक आपले लक्ष वेधून घेते. मुखपृष्ठावरील चित्र पुस्तकाचे अंतरंग स्पष्ट करणारे आहे. एका सीमारेषेवर असणारी एक व्यक्ती पुढे पाऊल टाकताना आपल्याला दिसते. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी आपले पाऊल पुढे टाकतो, तेव्हा ते विचारपूर्वकच टाकायला हवे. त्यासाठीच ;' जरा थांबा, विचार करा ! ' असे लेखिका आपल्याला सांगते. हातात घेतल्यापासूनच हे पुस्तक मनाची पकड घेतं. दैनंदिन जीवनातील आपल्याला परिचित असणारी उदाहरणे किंवा घटनांचे संदर्भ देऊन लेखिका वाचकांशी सहज संवाद साधते. एखादा विषय कसा खुलवत, फुलवत न्यावा याचं उत्तम भान लेखिकेकडे आहे. रोजच्या जीवनातील छोट्या छोट्या समस्यांनी खचून जाणाऱ्या, निराश होणाऱ्या व्यक्तींसाठी हे पुस्तक अतिशय मोलाची भूमिका बजावतं. असं असलं तरी सर्वानीच एकदा जरूर वाचावे असे हे पुस्तक आहे.
या पुस्तकातील पहिला लेख ' जरा थांबा, विचार करा ' याच शीर्षकाचा आहे. हा लेख वाचताना, 'अरेच्चा, असं आहे तर ! आपण कधी असा विचारच केला नाही ' असे वाचकाला वाटते. दुसरा लेख ' सुगंध दरवळू द्या ' या नावाचा आहे. नावाप्रमाणेच या लेखातील शब्दाशब्दातून मन प्रसन्न करणारा शब्दसुगंध दरवळतो आहे. जीवनातील एखादी छोटीशी गोष्ट किती महत्वाची असते ते यात सहजपणे पटवून दिले आहे.लेखिकेच्या माहेरी मोठे कुटुंब होते. लेखिकेची आई माठातील पाण्यात टाकण्यासाठी जेव्हा वाळा उपलब्ध नसायचा तेव्हा, रोज माठात एक छोटेसे मोगऱ्याचे फुल टाकायची. ते छोटेसे फुल माठातील सगळे पाणी सुगंधित करायचे. आपल्या साड्या खराब होऊ नयेत म्हणून त्यांची आई ज्या पेटीत त्या साड्या ठेवायची, त्या पेटीत एक केवड्याचे पान ठेवायची. ते एक छोटेसे पान पण किती सुदंर किमया करायचे ! साड्याना कसर तर लागायची नाहीच पण त्या साड्याना एक सुदंर सुगंध प्राप्त व्हायचा. अशाच प्रकारची किमया काही व्यक्ती आपल्या जीवनात करून जातात. एखादी वाऱ्याची झुळूक मन प्रसन्न करून जावी तसे या व्यक्तींचे आपल्या जीवनात येणे, त्यांचे आपल्याभोवती वावरणे, त्यांचे बोलणे मन प्रसन्न करून जाते.
' अंदाज अपना अपना ' या लेखात लेखिका म्हणते की समोरच्या व्यक्तीच्या वागण्याबोलण्यावरून आपण त्याच्या वागण्याचा अंदाज बांधतो. एखाद्या विशिष्ट परिस्थितीत तो अमुक एका पद्धतीनेच वागेल किंवा त्याने वागायला हवे असे जणू आपण ठरवूनच टाकतो. पण एखाद्या विशिष्ट परिस्थितीत जेव्हा ती व्यक्ती आपल्याला अपेक्षित असे वागत नाही, तेव्हा मात्र आपल्याला धक्का बसतो. पण मुळातच अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. एखादी व्यक्ती विशिष्ट परिस्थितीत अमुक एक प्रकारेच वागेल किंवा प्रतिसाद देईल असे सांगता येत नाही कारण प्रत्येक व्यक्तीचा ' अंदाज अपना अपना '. त्यातील मर्म लेखिका उलगडून सांगते.
भोवतालच्या निसर्गाबद्दल, गोष्टींबद्दल आपण सारख्या तक्रारी करत असतो. त्याऐवजी त्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली तर... ? सारेच बदलून जाईल. जगात सगळेच वाईट असते असे नाही. खूप चांगल्या गोष्टी आपल्या अवतीभवती असतात. जोपर्यंत आपण त्यांच्याकडे त्या दृष्टीने पाहत नाही, तोपर्यंत आपल्याला त्यांच्यातील सौंदर्य, चांगुलपणा, गोडवा यासारख्या गोष्टी लक्षात येणार नाहीत. सुंदरता टिपण्याची सुद्धा दृष्टी विकसित करावी लागते.. ' सृष्टी नव्हे, तर दृष्टी बदला ' असा सुरेख संदेश हा लेख आपल्याला देतो.
प्रसिद्ध ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ डॉ स्टीफन हॉकिंग यांना मोटरन्यूरॉन हा दुर्मिळ आजार झाला होता. त्यांना आपल्या हाताची केवळ तीन बोटेच हलवता येत. पण मेंदू मात्र तल्लख होता. शारीरिक व्याधींमुळे निराश न होता हा महान शास्त्रज्ञ आपले संशोधनकार्य करीत राहिला. एवढेच नव्हे तर ते जगभर फिरले. भारतातही आले. जयपूर फूट बसवलेली भारतीय नर्तिका सुधा चंद्रन. आपल्या अपंगत्वावर मात करून जिद्दीने तिने आपल्या नृत्याची साधना सुरु ठेवली. या लोकांजवळ कुठून आले एवढे बळ ? ' निश्चय ! निश्चय ! ' या लेखात लेखिकेने अशा लोकांची उदाहरणे देऊन आपल्यातील कार्य करण्याचा आत्मविश्वास जागवला आहे.
काही लोक उत्साहाने एखाद्या गोष्टीला सुरुवात तर करतात पण लवकरच कंटाळून ती सोडून देतात. चिकाटीने एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा ते करत नाहीत. एखादी गोष्ट पूर्ण केल्याशिवाय त्यातील आनंद तुम्हाला कसा मिळणार असे आपल्याला ' पूर्णत्वाचा आनंद ' या लेखात त्या सांगतात. ' हो... आहे ' या लेखात त्या आपल्याकडील असणाऱ्या गोष्टींचे भान आणून देतात. आपल्याजवळ नसणाऱ्या गोष्टी उगाळत बसून आपण उगाचच दुःख करीत बसतो. पण आपल्यापेक्षा विपरीत परिस्थितीत दिवस कंठणाऱ्या इतर लोकांकडे पाहिले तर आपण किती भाग्यवान आहे हे आपल्याला कळते. आणि सगळेच चांगले गुण, सगळ्याच चांगल्या गोष्टी आपल्याकडे असतील असे नाही. पण म्हणून दुःखी कशाला व्हायचे ? आपल्याजवळ जे चांगले आहे, त्याचा शोध घेऊन ते वाढवण्याचा प्रयत्न का करू नये ?
असे सकारात्मक विचार देणारे आणि आनंद आणि ऊर्जेने काठोकाठ भरलेले अनेक लेख या पुस्तकात आहेत. काही लेखांची शीर्षकेच पहा ! उसळू द्या उत्साहाचा झरा, फक्त मी आहे म्हणा, रत्नपारखी व्हा, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, ठिणग्या नको, प्रकाश हवा, काटे नव्हे गुलाब पहा, ताकद मनाची, झोपा शांत मनाने उठा प्रसन्न मनाने, दुखवायचं की सुखवायचं, जग स्वतःपलीकडचं, काळजी करण्यापेक्षा काळजी घ्या, निरागस हास्याचा झरा बना असे जवळपास ९०-९२ लेख या पुस्तकात आहे. काही लेख अगदी छोटेखानी आहेत पण त्यातील आशय मोठा आहे. लेखांची लांबी रुंदी न बघता लेखांची खोली बघावी. पुस्तक हातात घेऊन कोणताही लेख वाचायला घेतला तरी चालते असे हे पुस्तक आहे. काही पुस्तके केवळ वाचायची असतात, तर काही पुस्तके वाचून त्यावर विचार करावा आणि त्यावर अंमल करावा अशी ती पुस्तके असतात. अशी पुस्तके जगण्याचे भान देतात. ' जरा थांबा, विचार करा ' हे असेच पुस्तक आहे !
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१७/०७/२०२३
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा