मुख्य सामग्रीवर वगळा

मी प्रतिज्ञा करतो की...

उगवतीचे रंग 

मी प्रतिज्ञा करतो की... 

शालेय पाठ्यपुस्तकात सुरुवातीला एक प्रतिज्ञा दिलेली असते. ती उजवा हात सरळ समोर पुढे करून म्हणायची असते. आपल्या साऱ्यांनाच ती परिचित आहे. ' भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.' ही प्रतिज्ञा करावयाची असते केवळ म्हणायची नसते. नित्यनियमाने प्रतिज्ञा म्हणणे ही एक औपचारिकता झाली आहे. शाळेची प्रार्थना असो की प्रतिज्ञा, ती अर्थ लक्षात घेऊन मनापासून म्हणायची असते. एकदा एखादी प्रतिज्ञा केली की ती जीवापलीकडे जपायची असते, पाळायची असते. महाभारत वाचताना भीष्माचार्यांनी आजन्म ब्रह्मचर्य पाळण्याची आणि हस्तिनापूरशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा घेतली होती असे आपण वाचतो. ती त्यांनी शेवटपर्यंत पाळली. त्यामुळे एखादी प्रतिज्ञा करून जो ती कसोशीने पाळतो, त्याला भीष्मप्रतिज्ञा असे नाव पडले. 

आजची आमची प्रतिज्ञा म्हणजे ' शब्द बापुडे केविलवाणे ' अशी अवस्था झाली आहे. प्रतिज्ञेमध्ये आपण ' सारे भारतीय माझे बांधव आहेत ' असे म्हणतो खरे पण ते कितपत गांभीर्याने घेतो ? खरंच मानतो का आपण सगळ्यांना आपले बांधव ? मला जॉर्ज ऑरवेलच्या ' ऍनिमल फार्म ' या पुस्तकातले एक वाक्य आठवते. ते वाक्य असे आहे, ' ऑल आर इक्वल, बट सम आर मोर इक्वल. ' सारे भारतीय माझे बांधव आहेत. पण त्यातही काही जवळचे आहेत. ( काहींना मी बांधव मानतो. काही बांधव असू शकतात आणि काही... ) 

नुकतेच दहावी बारावीचे निकाल लागले. या निकालानंतर ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही त्यांनी परिस्थितीशी दोन हात करत जे उज्ज्वल यश मिळवले अशा गुणवंत विद्यार्थ्यांचे फोटो विविध वर्तमानपत्रात प्रसिद्ध होतात. त्यांच्या पंखांना बळ हवे म्हणून वाचकांना आवाहन केले जाते. या विद्यार्थ्यांपैकी कोणाचे वडील मोलमजुरी करतात, तर आई भांडी धुणी करते. कोणाला आई नाही, तर कोणाला वडीलच नाहीत. कोणी पत्र्याचे छप्पर असलेल्या एका खोलीत राहतात, तर कोणी झोपडपट्टीत. बऱ्याच मुलांना घरात अभ्यासाला जागा नसते, वातावरण नसते. त्यातील कोणी फुटपाथवर,बागेत, रेल्वे प्लॅटफॉर्मवर, एस टी स्टॅण्डवर अभ्यास करतात. अशा सगळ्या परिस्थितीत त्यांनी मिळवलेले यश म्हणजे खणखणीत नाणे असते. त्या यशाला परिश्रमाचा, मेहनतीचा, जिद्दीचा, चिकाटीचा सुगंध असतो. 

अशा मुलांशी कोणी मैत्री करण्याचा विचार करतो का ? ज्यांची बंगलेवजा मोठी घरे आहेत, अनेक खोल्या रिकाम्या आहेत, घराबाहेर दोन दोन चारचाकी आहेत, हवे ते सगळे मिळते आहे अशी माणसे ठरवले तर सहज अशा मुलांना मदत करू शकतात. त्यांच्या मुलांना अशा मुलांशी मैत्री करायला सांगू शकतात ? पण छे छे ! मी भलतेच काहीतरी बोलतो आहे, असे तुम्हाला नक्कीच वाटेल. आणि तुमचे बरोबरच आहे. तुम्ही म्हणाल, ' अहो, या झोपडपट्टीतील किंवा गरीब घरातील मुलांनी असे उज्ज्वल यश मिळवले असले तरी सगळीच मुले चांगली नसतात. त्यांच्यावर संस्कार नसतात. ती घाणेरडं बोलतात, शिव्या देतात. त्यांच्या संगतीत आमची मुले बिघडणार नाहीत का ? ' होय मंडळी, तुमचे म्हणणे थोडेसे खरे आहे, पण पूर्णांशाने नाही. 

आजकाल आपले मैत्रीचे निकषच बदलले आहेत. मैत्री कोणाशी करायची तर, ज्याचा आपल्याला उपयोग होईल, त्याच्याशी. आपल्यापेक्षा ज्याची परिस्थिती अधिक चांगली असेल त्याच्याशी. कारण तो आपल्या उपयोगी पडू शकतो. आपल्या मुलांचे मित्र कोण असावेत हे त्यांच्यापेक्षा आपणच ठरवतो. एखाद्या मुलाचे वडील डॉक्टर, वकील, अधिकारी, प्राध्यापक वगैरे असे काही असतील, तर तो मुलगा आपल्या मुलाशी मैत्री करायला लायक. एखाद्याचे वडील कारकून, शिपाई, हमाल वगैरे असतील तर...? ' बिलो डिग्निटी ' आपल्या प्रतिष्ठेच्या आड नाही का येत ती गोष्ट ! त्याचप्रमाणे एखाद्याची आई भांडी धुणी करणारी असेल, स्वयंपाक करणारी असेल, मोलमजुरी करणारी असेल तर तिचा मुलगा किंवा मुलगी काय मैत्रीसाठी अयोग्य ठरते ? एखादी आई डॉक्टर असेल, इंजिनिअर असेल,  बँकेत असेल वा अन्य कोणी उच्चपदस्थ अधिकारी वगैरे असेल, तर तिचा मुलगा किंवा मुलगी मैत्रीला पात्र ! 

आपल्या मुलांसाठी हे मैत्रीचे निकष पालक म्हणून आपण ठरवले. आपला मुलगा जर आपल्यापेक्षा खालच्या परिस्थितीतील घरातला असेल, तर आपण मुलाला सांगणार, ' त्याच्यात जात जाऊ नकोस रे खेळायला. त्याच्याशी मैत्री करू नकोस. आणि आणखी बरेच काही. ' नकळत आपणच आपल्या मुलावर भेदभावाचे संस्कार लहानपणापासून करत असतो. 

गरिबांच्या घरात, झोपडपट्टीत राहणाऱ्यांच्या घरात मुलांवर चांगले संस्कार होत नाहीत हे जरी काही अंशी मान्य केले तरी श्रीमंतांच्या घरात ते चांगल्या प्रकारे होतातच असे कोणी छातीठोकपणे सांगू शकत नाही. परवा मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. त्या ठिकाणी समाजातील उच्चभ्रू वर्गातील बरीच मंडळी कार्यक्रमासाठी आली होती. बहुतेक सगळी मंडळी मोठमोठ्या गाड्यातून आली होती. या मोठ्या म्हणवल्या जाणाऱ्या मंडळींच्या घरातील काही तारुण्यात पदार्पण केलेल्या कुमारिका, काही मुली, काही सुना अशा काही उत्तान आणि भडक पोशाखात आल्या होत्या की मला त्यांच्याकडे नुसते पाहताना सुध्दा कसेतरी होत होते. त्यांचे आईवडील पण त्यांच्यासोबत होतेच. खरे तर आईवडिलांनीच हे त्यांना सांगायला हवे होते की आपण एका सार्वजनिक कार्यक्रमात जातो आहोत. तिथे सगळ्यांसमोर असले कपडे चांगले दिसणार नाहीत. पण अलीकडे चांगले दिसण्याची, चांगले असण्याची आणि चांगले वागण्याची आमची व्याख्याच बदलली आहे, त्याला कोण काय करणार ? 

चांगल्या वाईटाच्या कल्पनाही काळानुसार बदलत जातात. पूर्वी जे चांगले होते, त्याला वाईट म्हणायची वेळ आज येते तर पूर्वी आपण ज्या गोष्टीला नावे ठेवत होतो, त्या गोष्टींना आज प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. फाटलेले कपडे घालणे हे पूर्वी गरिबीचे लक्षण समजले जात होते. आज ते प्रतिष्ठेचे लक्षण झाले आहे. अंगावरील जीन्सची पॅन्ट जितकी जुनी, मळकट आणि ठिकठिकाणी ( खरं म्हणजे नको तिथे )फाटलेली असेल तर क्या कहने ! शक्य असेल तर आम्ही आमची चांगली पॅन्ट देऊन तिच्या मोबदल्यात अशी पॅन्ट घेऊ ! 

आपल्याकडील प्रचंड विषमताही कधी कधी आश्चर्यात टाकणारी आणि विचार करायला लावणारी आहे. एका बाजूला साड्यांची कपाटं भरलेली आहेत पण एखाद्या कार्यक्रमात जायचं म्हटलं तर मनासारखी साडी, मनासारखे कपडे कधीच नसतात.जे कपड्यांच्या बाबतीत तेच खाण्याच्या बाबतीत. एका बाजूला खाऊन खाऊन आजारांना निमंत्रण आणि दुसऱ्या बाजूला काय खावं ही विवंचना. एका बाजूला चिमुरड्याना खेळण्याच्या, शिक्षणाच्या सगळ्या सोयी उपलब्ध,तर दुसऱ्या बाजूला त्यांचा कुपोषणाशी सामना.  पादत्राणांचीही कपाटं भरलेली. एवढं करून नवीन चकचकीत मॉल्स मध्ये जाऊन खरेदी करणं किंवा प्रत्येक वेळी ऑनलाईन वस्तू मागवणं सुरूच असतं. त्यांनी ते करू नये असं नाही पण कुठेतरी आणि कधीतरी आपल्या गरजा आणि चैन कमी करून ज्याच्याजवळ काहीच नाही त्याला काही देता येईल का यातला आनंदही अजमावून पाहायला हवा. तकदीर ता हिंदी चित्रपटात एक सुंदर गाणं आहे. ' आईये बहार को हम बाट ले , जिंदगी के प्यार को हम बाट ले. ' असं खरंच प्रत्यक्षात झालं तर...! 

इंग्रजी माध्यमांच्या आणि भरमसाठ फी घेणाऱ्या शाळांचे पेव फुटले आहे. पुण्यातील एका शाळेची दुसऱ्या तिसऱ्या वर्गाची वार्षिक फी चक्क पंचाहत्तर हजार रुपये आहे. अर्थात बालवाडी किंवा नर्सरीपासून यापेक्षाही जास्त फी घेणाऱ्या शाळा आहेतच ! मला वाटतं एवढी फी पूर्वी फार तर मेडिकल, इंजिनिअरिंगला असायची. एवढे सगळे करूनही त्या शाळा काय शिकवतात, विद्यार्थ्यांवर कोणते संस्कार करतात याचाही प्रश्न पडतो. या शाळा विद्यार्थ्यांना एवढा प्रचंड गृहपाठ देतात की रोज त्यांच्या पालकांना त्याकडे लक्ष देऊन तो गृहपाठ करून द्यावा लागतो. मग आमच्या सरस्वती प्राथमिक विद्या मंदिर, शारदा विद्या मंदिर वगैरे असे नाव असलेल्या मराठी माध्यमाच्या शाळा काय वाईट आहेत ? पण असल्या नावांच्या शाळांना प्रतिष्ठा नाही. ' फ्रावशी, डून, गुड शेफर्ड, केम्ब्रिज, एन्जेल्स, ग्रीनवूड यासारख्या शाळांचा विद्यार्थी असला तर तो उत्तम ! 

आज खरे तर हे चक्र उलट फिरवण्याची गरज आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळातून मुलांना काढून मराठी माध्यमात शिकवायलाच हवे. अशा अधिकाधिक शाळा निघतील, आणि त्यांचा दर्जा उत्तम राहील यासाठी शासनावर दबाव आणायला हवा. फुकटचे वही पुस्तके,पोशाख इ. गोष्टी देण्यापेक्षा मराठी शाळातून उत्तम आणि संस्कारयुक्त शिक्षण कसे मिळेल याकडे शासनाने लक्ष द्यायला हवे. पालकांनी त्यासाठी शासनाला भाग पाडायला हवे. शिक्षण ही राष्ट्राची भविष्यकाळासाठी केलेली गुंतवणूक आहे या दृष्टीनेच त्याकडे पाहायला हवे. त्यासाठी शिक्षणासाठीचा अर्थसंकल्पातील निधी वाढायला हवा. डॉ रघुनाथ माशेलकरांसारखे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ अशाच मराठी शाळातून शिकले होते. अर्थात त्यांचे नाव उदाहरण म्हणून घेतले. अशी अनेक उदाहरणे आहेत. 

गुणवंत विद्यार्थ्यांना समाज धुरिणांनी एकत्र येऊन उत्तेजन द्यायला हवे. गरीब आणि विपरीत परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जबाबदारी समाजाने आणि शासनाने घ्यायला हवी. विद्यार्थ्यांची जात पात न पाहता केवळ एक विद्यार्थी म्हणून आपण जेव्हा त्याच्याकडे पाहायला लागू त्या दिवशी खरी सामाजिक समरसता येईल. शाळांनीही केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर आणि गुणांच्या शर्यतीत धावणारे परीक्षार्थी तयार करण्यापेक्षा प्रेम, आदर, सहकार्य, बंधुभाव, देशप्रेम, श्रमप्रतिष्ठा आदींचे मूल्य जाणणारे भविष्यातील नागरिक कसे घडतील याकडे जास्त लक्ष द्यायला हवे. मग आपण खरंच अभिमानाने म्हणू शकू, ' मी प्रतिज्ञा करतो की सारे भारतीय माझे बांधव आहेत ' या प्रतिज्ञेतील शब्दांना तेव्हाच खरा अर्थ प्राप्त होईल. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

२५/०६/२०२३

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...