उगवतीचे रंग
निसर्गरूपे - भाग चार
रात्र
निसर्गरूपे या लेखमालेचा आज शेवटचा भाग. या आधीच्या तीन लेखात निसर्गातील पहाट किंवा सकाळ, दुपार आणि रात्र या तीन वेळात दिसणाऱ्या निसर्गरुपांचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला. आज रात्रीच्या विविध रूपांबद्दल आपण बोलू या. मी फक्त या चार वेळातील निसर्गरूपांबद्दल बोलत असलो तरी निसर्ग प्रत्येकच क्षणाला आपले रूप बदलत असतो. प्रत्येक क्षणाला, घडीला, प्रत्येक दिवसाला निसर्गरूपे वेगवेगळीच असतात. आपल्याला फक्त ती पाहता आली पाहिजेत. याचे प्रत्यंतर आपल्याला आपण जेव्हा हिमालयासारख्या एखाद्या पर्वतरांगांच्या ठिकाणी जातो, तेव्हा येते. तिथे निसर्ग क्षणाक्षणाला आपले रूप बदलत असतो. पर्वतशिखरांवर ढग आलेले दिसतात, लगेच त्या ढगांचे आच्छादन दूर होऊन सोनेरी प्रकाशात हिमशिखरे झळाळून उठतात. तर दुसऱ्या क्षणाला पाऊस अचानक सुरु होऊन वातावरण बदलून टाकतो. अशी ही सुंदर निसर्गचित्रे ! अशा वेळी मुकेश यांनी गायिलेले ' ये कौन चित्रकार हैं...' अशा गाण्यांचे शब्द मनात रुंजी घालू लागतात.
अशीच सुंदर आहेत रात्रीची विविध रूपे. चांदण्याची रात्र, अमावस्येची रात्र, पावसाळी रात्र अशा विविध ऋतूत रात्र वेगवेगळी रूपे घेऊन येते. पण मी जेव्हा रात्रीबद्दल विचार करतो, तेव्हा मला रात्रीबद्दल खूप काही विचार मनात दाटून येतात. तुम्हाला दिवस आवडतो की रात्र असा प्रश्न वेगवेगळ्या व्यक्तींना विचारला तर वेगवेगळी उत्तरे येतील. बहुतेक लोक दिवस आवडतो असेही म्हणतील. दिवसा कसा स्वच्छ सूर्यप्रकाश असतो. हव्या त्या गोष्टी, हवी ती कामं करता येतात. रात्री तसा नाईलाज असतो. झोपण्याव्यतिरिक्त फारसे काही करता येत नाही. हे सगळे जरी खरे असले तरी दिवसाची कामे करण्यासाठी ऊर्जा पुरवते ती रात्र ! रात्रीची गाढ झोप तुम्हाला ताजेतवाने करते आणि दिवसाला एका नव्या उत्साहाने तुम्ही सामोरे जाता. म्हणून दिवस जेवढा महत्वाचा आहे, तेवढीच रात्र सुद्धा !
एखादा सिनेमा जेव्हा आपण पाहतो, तेव्हा पडद्यावरील कलाकार फक्त आपल्याला दिसतात. पण तो चित्रपट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक पडद्यामागील कलाकारांची मेहनत असते. ती आपल्याला दिसत नाही. पण ज्याच्याकडे ती दृष्टी असेल, त्याला ती जाणवू शकते. दिवसा घडणाऱ्या अनेक घटनांची नोंद इतिहास घेतो, आपणही घेतो. ते ते दिवस आपण साजरे करतो. पण या दिवसांमागे खंबीरपणे उभी असते ती रात्र ! एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एखादी स्त्री असावी तशी ! अनेक क्रांतिकारकांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी रात्री जागून काढल्या आहेत. त्यांच्या अस्वस्थेतेच्या अनेक रात्रींनी त्यांना विचारांचे बळ दिले आहे. म्हणून तर कुसुमाग्रजांसारखा शतकातून एखादा होणारा कवी सुंदर ओळी लिहून जातो,
' कशास आई भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल.
सरणावरती आज आमची पेटतात प्रेते
उठतील त्या ज्वालांतून भावी क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायामधले खळखळा तुटणार
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार.
अशा अनेक प्रकारच्या क्रांती आणि क्रांतिवीरांना रात्रींनी बळ दिले आहे. अनेक लेखक आणि कवींना जशी पहाटेच्या वेळेने स्फूर्ती दिली आहे, तशीच रात्रींनीही दिली आहे. ' अन्नदाता ' या चित्रपटात एक गाणे आहे,
रातोंके साये घने, जब बोझ दिल पे बने
न तो जले बाती, ना हो कोई साथी
फिर भी न डर अगर बुझे दिये
सहर तो हैं तेरे लिये.
कवी म्हणतो, ' रात्र जरी अंधारी असली, कोणताही दिवा लागलेला नसला आणि कोणीही जोडीदार सोबत नसेल तरी घाबरू नकोस. तुझ्यासाठी ( सहर ) पहाट होणार आहे. ' एक उज्ज्वल उद्या तुझी वाट पाहतो आहे. केवढे बळ देणारे हे शब्द ! असेच अजून एक गाणे मला आठवते. ' ऍन इव्हिनिंग इन पॅरिस ' या चित्रपटातले हे सुंदर गीत आहे.
रात के हमसफर, थक के घर को चले
झुमती आ रही हैं सुबह प्यार की.
रात्र हे आयुष्यातील कष्टांचे, संकटांचे प्रतीक आहे. तुम्ही कष्ट, संकटे, आयुष्यातील कठीण काळ यांना धैर्याने सामोरे गेलात की मग ' झुमती आ रही हैं सुबह प्यार की ' हे खरे होणारच ! प्रेमाने भरलेली, सुहास्यवदना सकाळ मग तुमचीच ! तुम्ही ज्या रंगात रंगवाल तशी रात्र भासते. तुम्ही आनंदी तर रात्र आनंदी, तुम्ही दुःखी तर रात्र तशीच भासणार. एकटे एकांतात असताना कधी ती भयाण रात्र वाटणार. तर कधी ती आपल्याला हवी तशी. तुमचा जसा मूड असेल, तशी ती तुम्हाला भासेल.
पावसाळ्यातील रात्रींनी निरनिराळी गाणी लिहिण्याची कवींना प्रेरणा दिली. ' अजून आठवे ती रात पावसाळी...' असे एक कवी म्हणतो. तर हिंदीत अनेक कवींनी पावसावर गाणी लिहिली. त्या वर्षावात नायक नायिका आणि चित्रपट रसिकही चिंब भिजले. ' जिंदगीभर नही भुलेगी वो बरसात की रात...' किंवा ' ये रात भिगी भिगी ये मस्त नजारे ...' यासारखी अवीट गोडीची गाणी पावसाळी रात्रीने दिली आहेत. एखादा प्रियकर तर पावसाला विनंती करतो, ' बरखा रानी जरा जमके बरसो, मेरा दिलबर जा न पाये, झूमकर बरसो. ' एखादी प्रेयसी आपल्या प्रियाला विनंती करते, ' जीद ना करो, अब तो रुको, ये रात नही आयेगी. ' झूम झूम ढलती रात, कहीं दीप जले कहीं दिल, ये राते नयी पुरानी, आधा हैं चंद्रमा रात आधी...' अशी खूप गाणी आठवतात.
तरुण आहे रात्र अजुनी, चांद मातला मातला त्याला कशी आवरू, धुंद मधुमती रात रे, उगवला चंद्र पुनवेचा ...' प्रियकर प्रेयसीच्या भावना व्यक्त करणारी अशी असंख्य गाणी. मराठी, हिंदी आणि इतरही भाषेत नक्कीच असणार. रात्रीस खेळ चाले अशी गूढ गर्भ गाणीही आहेतच.
रात्र ही वरदान आहे. रात्र आपल्यासोबत स्वप्ने घेऊन येते. मानवाला भविष्याची उज्ज्वल स्वप्ने दाखवते ती रात्रच ! दिवसाच्या स्वप्नांना दिवास्वप्न म्हटले जाते. रात्र ही म्हटलं तर दुःख विसरायला लावणारे एक नैसर्गिक औषधही आहे. माणसाची दुःखं, थकवा ती पदरात घेते आणि त्याला नवसंजीवनी प्रदान करते.
तर अशी ही रात्र ! बळ देणारी आणि कसोटीही पाहणारी. दिवसभराचा दमलेला सूर्य संध्याकाळी अस्ताला जातो. दिवस मावळतो. संध्याकाळ हळूहळू केव्हा रात्रीत रूपांतरित होते, ते कळतही नाही. एखाद्या आईनं आपल्या झोपलेल्या लेकरांवर मायेनं पांघरूण घालावं तसं रात्रीचं तलम वस्त्र हळूहळू सगळ्या चराचरावर पसरत जातं. रात्र हळूहळू सगळ्या विश्वाला आपल्या कवेत घेते. डोंगर, झाडे, निसर्ग अंधाराची काळी दुलई पांघरून प्रगाढ निद्रा घेतात. हिवाळ्यात पहाटे पहाटे कधी कधी धुक्याची चादरही परिसराला वेढून टाकते. सूर्याची मऊ, मुलायम किरणे मग हळूहळू ही अंधार आणि धुक्याची चादर हलकेच ओढून घेतात. सगळ्या परिसराला एक देखणे रूप प्राप्त होते. तेजाची आरती जणू सृष्टीत सुरु असते. पण हे तेज, हा उत्साह, हा तजेला रात्रीमुळेच प्राप्त झालेला असतो.
सुरेश भटांसारखा एखादा प्रतिभावान गझलकार सहज लिहून जातो 'केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली. ' रात्रीच्या वेळी जे आकाश तारकांनी भरलेलं असतं ते सुद्धा सहज ' उचलून रात्र गेली ' असे कवीला वाटते. तर कधी कवीला न आठवणारी, न सुचणारी एखादी कवितेची ओळ ती रात्र सुचवून जाते. कवी म्हणतो ' स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती, मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली. '
तसा रात्रीला स्वतःचा रंग नाही. पण प्रकाशाचा अभाव म्हणजे रात्र. अंधाराचा रंग काळा भासतो. आपले अनेक देव हे असेच सावळ्या वर्णाचे ! रात्रीचे हे वातावरण त्या सावळ्याच्या रंगात रंगून गेले असे कवीला वाटते. संत एकनाथांच्या समकालीन होऊन गेलेले विष्णुदास नामा यांची एक फार सुंदर रचना आहे. ते म्हणतात
रात्र काळी घागर काळी
यमुनाजळेही काळे वो माय
बुंथ काळी बिलवर काळी
गळा मोतिया एकावळी काळी वो माय .
रात्रीच्या अंधारात सगळेच कृष्णवर्ण झाले आहे. घागरही काळीच भासते आहे. सर्व चराचराला रात्रीने आपल्या रंगात रंगवून टाकले आहे. दिवसा अगदी स्वच्छ दिसणारे यमुनेचे पाणीही काळेच भासते आहे. ती सखी जी पाणी आणण्यासाठी बाहेर पडते आहे ( खरे म्हणजे रात्रीच्या वेळी यमुनेवरून पाणी आणायला जाणे हे एक निमित्तच असावे. कारण त्या निमित्ताने तो मेघश्याम असलेला कान्हा तिथे भेटेल ) तिची अंगावरील ओढणी ( बुंथ ) आणि तिने अंगावर परिधान केलेले दागिने सुद्धा काळ्याच रंगाचे झाले आहेत. एवढा रात्रीचा आणि त्या सावळ्या परब्रह्माचा प्रभाव आहे.
बंदिनी या चित्रपटातलं एक सुंदर गाणं आहे. मीरेच्या रचनांशी साम्य दाखवणारा अर्थ गीतात भरलेला आहे. ती अभिसारिका आपल्या सावळ्याच्या रंगात एवढी रंगून गेली आहे की आपला गोरा रंगही तिला नकोसा वाटतो. नव्हे तो गोरा रंग तर तिला रात्रीच्या अंधारात नकोसाच वाटतो. कोणी ओळखलं तर...? म्हणून ती म्हणते
मोरा गोरा अंग लै ले, मोहें श्याम रंग दै दे
छुपं जाऊंगी रात ही में, मोहे पी का संग दै दे.
रात्रीची किती मनोहर रूपे सांगावीत आणि रात्रीबद्दल किती आणि काय लिहावे ? एका वाक्यात सांगायचं तर रात्र म्हणजे मानवाला ईश्वराने दिलेलं वरदान आहे. पण या ईश्वराने दिलेल्या सुंदर वरदानाची मानवाने अक्षरशः ' रात्रीचा दिवस करून ' वाट लावली आहे. रात्रीची शांतता नाहीशी झाली आहे. प्रखर गडद दिव्यांमुळे रात्र जणू रुसून दूर निघून गेली आहे. मानवाला आरोग्य, शांतता प्रदान करणारी रात्र जणू हरवली आहे. रात्र जणू म्हणते आहे, ' हे मानवा, रात्रीचा दिवस तू करू पाहतो आहेस खरा, पण तू तुझ्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतो आहेस एवढे लक्षात ठेव. ' रात्रीचा हा इशारा मानव कधी गंभीरपणे घेईल का ?
©विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२०/०६/२०२३
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा