मुख्य सामग्रीवर वगळा

तुम पुकार लो...

 तुम पुकार लो... 

' तुम पुकार लो...'हे गीत कानावर पडलं की आठवण येते ती सदाबहार गीते देणाऱ्या हेमंतकुमारची. या आवाजात एक वेगळाच गोडवा आणि खुमारी आहे. साथ सत्तरच्या दशकात हेमंतकुमारच्या गाण्यांनी तरुणाईला वेड लावले होते. बीस साल बाद, खामोशी, नागीन, कोहरा यासारख्या त्यांच्या चित्रपटातील गाण्यांनी अफाट लोकप्रियता मिळवली होती. एखाद्या कार्यक्रमात एखाद्या तरुणाला किंवा तरुणीला गायला सांगितले तर हेमंतकुमारांच्या चित्रपटातील गाणी त्यांच्या सहजच ओठांवर येत. अशी प्रचंड लोकप्रियता मिळवणारा संगीतकार आणि गायक विरळा. 

त्या काळात तरुण गायकांवर त्या वेळच्या प्रसिद्ध गायक असलेल्या कुंदनलाल सैगल यांचा जबरदस्त प्रभाव होता. कोणत्याही गायकाला आपण के एल सैगल यांच्यासारखे गावे , त्यांच्यासारखी लोकप्रियता मिळवावी असे वाटत असे. हेमंतकुमार देखील त्याला अपवाद नव्हते. साधारणपणे चाळीसच्या दशकात हेमंतदा मुंबईत आले आणि त्यांची भेट झाली ती प्रख्यात संगीतकार नौशाद यांच्याशी. सैगल यांचा प्रचंड प्रभाव असलेल्या हेमंतदा यांनी काही गाणी नौशाद यांना म्हणून दाखवली. हेमंतदा यांच्या गायकीवर नौशाद फिदा झाले आणि त्यांनी लगेच त्यांनी आपल्या चित्रपटांसाठी दोन गाणी गाऊन घेतली. ' शबाब  ' चित्रपटातलं ' चंदन का पलना रेशम की डोरी ' आणि ' इन्साफ की डगर पे बच्चों दिखाओ चलके...’ हे ‘गंगा जमना’ या चित्रपटातील गीत. ही दोन्ही गाणी लोकप्रिय  ठरली. या गीतांनी हेमंतदा यांच्या चित्रपट कारकिर्दीची उत्तम सुरुवात करून दिली. 

१६ जून १९२० रोजी जन्मलेल्या हेमंतदांचे बालपण बंगालमधील एका खेडेगावात गेले. संगीताची आवड हेमंतदांच्या रक्तातच होती. लहानपणी गावात येणारी नाटके, संगीताचे, लोकगीतांचे कार्यक्रम म्हणजे त्यांच्यासाठी मेजवानीच असायची. अभ्यासात उत्तम गती असलेल्या हेमंतदांनी कोलकात्यात इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला. साहित्य क्षेत्रातही त्यांना रस होता. नाटक, कथा, कविता लेखनही त्यांनी केले. पण संगीताची आवड त्यांना स्वस्थ बसू देईना. ईश्वरदत्त प्रतिभेमुळे संगीत आणि गाणं त्यांच्या रोमारोमात होतं. शिक्षणात त्यांचं मन लागेना. संगीताच्या वेडापायी त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला आणि आपलं आयुष्य संगीतासाठी वाहून घ्यायचं ठरवलं. असं कुठलं तरी वेड डोक्यातघेतलेली माणसेच आयुष्यात काहीतरी करून दाखवतात. हेमंतदांचा हा संगीताला आपले आयुष्य वाहून घेण्याचा निर्णय योग्य ठरला हे पुढे काळाच्या कसोटीवर त्यांनी सिद्ध केलं. हेमंत मुखोपाध्याय आपल्या पुढील आयुष्यात रसिकांचा लाडका हेमंतकुमार, हेमंतदा बनला. 

संगीत जरी हेमंतदांच्या रोमरोमात होते आणि ईश्वरदत्त प्रतिभेची देणगी लाभली होती, तरी पुढील वाटचालीसाठी शास्त्रीय संगीत शिकणे आवश्यक होते. उस्ताद फैयाज खान यांच्या शिष्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे रीतसर शिक्षण घेतले. त्यांनी अनेक बंगाली आणि हिंदी चित्रपटांना संगीताचा साज चढवला. गायक म्हणून गाणीही गायली. हेमंतदांच्या तोडीचा कोणी गायक बंगाली चित्रपटसृष्टीत  झाला नाही असे त्यांच्याबद्दल बोलले जाते. मुंबईला सुप्रसिद्ध संगीतकार यांच्या सहवासात आल्यावर हेमंतदांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपले पाय रोवायला सुरुवात केली. जन्मजात संगीत आणि गायकीची प्रतिभा लाभलेले हेमंतदा आपल्या कर्तृत्वाने हिंदी चित्रपटसृष्टीत लवकरच एक प्रतिष्ठित संगीतकार म्हणून उदयास आले. 

त्यांनी गायिलेली आणि संगीतबद्ध केलेली गाणी तरुणाईच्या मनात रुंजी घालत असत. त्या गीतांमध्ये तरुणाईला जणू आपल्याच  प्रेमाच्या भावना व्यक्त झाल्या आहेत असे वाटे. तुम पुकार लो, तुम्हारा इंतजार है..., जाने  वो कैसे लोग थे..., ये नयन दरे दरे, ना तुम हमे जानो यासारखी त्यांची गाणी तरुणाईच्या ओठांवर होती. ' तुम पुकार लो ...' या गाण्याची सुरुवात हेमंतदांनी ' हमिंग साउंड ' ने केली आहे. ही त्यांची अनोखी सुरुवात कमालीची लोकप्रिय तर ठरलीच पण पुढे हेमंतदांच्या गाण्यांचे एक वैशिष्ट्य बनली. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ती हेमंतदांची ' सिग्नेचर स्टाईल ' बनली. ' ममता ' चित्रपटातलं त्यांनी लतादीदींबरोबर गायिलेले ' छुपा लो दिल में यूं प्यार मेरा...' हे गीतही रसिकांनी डोक्यावर घेतलं. 

सुप्रसिद्ध संगीतकार सलील चौधरी यांनी हेमंदांच्या गाणी आणि आवाजाबद्दल फार सुंदर उद्गार काढले आहेत. ते म्हणतात, ' परमेश्वराला जर कधी गायची इच्छाच झाली, तर तो हेमंतदांच्या आवाजात गाईल. ' लतादीदी हेमंतदांबद्दल बोलताना म्हणाल्या होत्या, ' हेमंतदांचं गाणं म्हणजे मंदिरात बसून एखादा साधू किंवा पुजारी गाणं गातो आहे असं वाटतं. असा हा भावविभोर करणारा पवित्र स्वर आहे ! ' थोडक्यात सांगायचं तर हा ईश्वरी आवाज आहे. 

१९६२ सालची गोष्ट आहे. लतादीदी प्रचंड आजारी होत्या. त्यांना दीपथेरिया नावाचा घशाचा आजार झाला होता. त्यातून त्या बाहेर पडतील की नाही आणि बाहेर पडल्या तरी पुन्हा पूर्वीसारखे गाऊ शकतील की नाही अशी भीती लतादीदींसह सर्वांच्याच मनात होती. निर्मात्यांचे चित्रपट लतादीदींच्या गाण्यांआभावी रखडले होते. लतादीदींनी स्वतःशी गाऊन पाहिले. सूर तर चांगला लागत होता. पण चित्रपटगीत रेकॉर्ड होताना तो तसाच लागेल का, आपल्याला पुन्हा गाता येईल अशा अनेक शंका दीदींच्या मनात होत्या. अशा सुमारास हेमंतदा लतादीदींच्या घरी गेले. त्यांनी दीदींना धीर दिला आणि तुम्ही पुन्हा पहिल्यासारख्या गाऊ शकाल अशी हिंमत दिली. एवढेच नव्हे तर माईंना सांगीतले, '  मी दीदींना माझ्यासोबत स्टुडिओत घेऊन जातो आणि मी स्वतःच त्यांना परत घेऊन येईन. तुम्ही कोणतीही काळजी करू नका. ' हेमंतदा दीदींना आपल्यासोबत घेऊन गेले. त्यांनी दीदींना गायला सांगितलं. दीदी नेहमीप्रमाणे गायल्या. मग त्या म्हणाल्या, ' आता करायचं का गाणं रेकॉर्ड ? ' हेमंतदा म्हणाले, ' गाणं तर केव्हाच रेकॉर्ड झालंय दीदी. ' ते गीत होतं बीस साल बाद या चित्रपटातलं. ' कहीं दीप जले कहीं दिल...' हे गीत प्रचंड लोकप्रिय झालं. 

 १९४७ च्या सुमारास हेमंतदाना उत्तम ब्रेक मिळाला. बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या कादंबरीवर ' आनंदमठ ' या चित्रपटाची निर्मिती झाली. या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी हेमंतदांवर सोपवली होती. हेमंतदांनी या संधीचे सोने केले. या चित्रपटातील 'वंदे मातरम ' हे लतादीदींच्या आवाजातील गीत कमालीचे लोकप्रिय झाले. आजही हे गीत विशेष प्रसंगी खास म्हणून गायलं जातं. अंगावर रोमांच उभे करण्याची ताकद या गीतात आहे. गुरुदत्तनिर्मित ' जाल ' चित्रपटातील ' ये रात, ये चांदनी फिर कहाँ ..' हे त्यांचं गीत लोकप्रिय झालं.  सोपवली. नंतर गुरुदत्त यांचा ' प्यासा ' चित्रपट आला. या  चित्रपटातील त्यांनी गायिलेले ' जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला ' हे गीत रसिकांच्या ओठांवर खेळू लागले. 

' नागीन ' चित्रपटातील गाणी कमालीची लोकप्रिय झाली. त्यातील ' तन डोले मेरा मन डोले ...' या गाण्यातील पुंगीचा आवाज रसिकांचे मन मोहून गेला. पण खरं तर हा पुंगीचा आवाज नव्हता. ही हेमंतदांनी लढवलेली एक क्लुप्ती होती. त्यांच्या प्रतिभेचा एक अनोखा अविष्कार होता. क्ले व्हायोलिन वाजवणारे संगीतकार कल्याणजी आणि हार्मोनियमाच्या सुरांचे जादूगार मास्टर रवी यांच्याकडून त्यांनी ही संगीताची धून तयार करून घेतली होती. असे प्रयोगशील संगीतकार होते हेमंतदां. गुरुदत्त निर्मित ' साहिब, बीबी और गुलाम ' या चित्रपटाला हेमंतदांनी संगीत दिले आणि या चित्रपटाची गाणीही अफाट गाजली. या चित्रपटात त्यांनी गायिका आशा भोसले, गीतादत्त यांना संधी दिली. त्यांनीही त्या संधीचे सोने केले. त्या काळात संगीत आणि चित्रपट क्षेत्रात हेमंतदांइतका व्यस्त असणारा क्वचितच कोणी संगीतकार होता. हेमंतदाना बहुतेक वेळा कोलकाता ते मुंबई असा विमानप्रवास दररोज करावा लागे. एअर इंडियाने तर त्यांना ' डेली पॅसेंजर ' हा किताब बहाल केला होता. 

 फिल्मिस्तान स्टुडिओ बंद पडण्याच्या मार्गावर असताना  हेमंतदांनी ' गीतांजली ' स्टुडिओची निर्मिती केली आणि संस्मरणीय चित्रपटांना संगीत दिले.  त्यांना रहस्यमय चित्रपटांची आवड होती. त्यांची संगीतबद्ध केलेली  ' बीस साल बाद ' मधील ' कहीं दीप जले कहीं दिल, ' कोहरा ' मधील ' झूम झूम ढलती रात ' या सारखी गाणी रसिक कधीच विसरू शकणार नाहीत. आज मान्यता आणि प्रतिष्ठा पावलेल्या अनेक गायक, गायिकांना हेमंतदांनी आपल्या चित्रपटातून गाण्याची संधी दिली. 

 त्यांनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटांमध्ये ' आनंदमठ ', ' दुर्गेशनंदिनी ' , ' नागिन ', ' ' ताज ', साहिब बीवी और गुलाम ', बीस साल बाद ' बिन बादल बरसात, कोहरा, मिस मेरी, खामोशी इ चित्रपट प्रमुख आहेत. खामोशी चित्रपटाने तर त्यांना अमाप लोकप्रियता मिळवून दिली. या चित्रपटातील सगळीच गाणी गाजली. या चित्रपटातील लतादीदींच्या आवाजातील ' हमने देखी हैं इन आँखों की महकती खुशबू ' हे गाणं म्हणजे मास्टरपीसच ! कितीही वेळा ऐकलं तरी कंटाळा येत नाही. याच चित्रपटातील हेमंतदांचं ' तुम पुकार लो..' आणि किशोर कुमार यांच्या आवाजातील ' वो शाम कुछ अजीब थी ..' ही सदाबहार गाणी तर आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.  हेमंतदांना आपल्या कारकिर्दीत अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरले.  फिल्मफेअर पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तसेच  गायक म्हणून, संगीतकार म्हणून अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. रवींद्र भारती विश्वविद्यालयाने त्यांना सन्माननीय डी लिट प्रदान केली आहे. 

हेमंतदांनी मराठी चित्रपटातही काही गाणी गायिली आहेत आणि मराठी रसिकांची ती आवडती आहेत.  हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातील ' गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ' तसाच लतादीदींसोबत असलेलं ' मी डोलकर डोलकर दर्याचा राजा ' ही गाणी कमालीची लोकप्रिय झाली. दर्यावरी रं, चालली होरी रं..., प्रीतीच्या चांदराती, प्रीती तुझी मनमोहिनी ही त्यांची मराठी भावगीते देखील लोकप्रिय आहेत. अशा या प्रतिभादत्त संगीतकार आणि गायकाचे २६ सप्टेंबर १९८९ रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने कोलकाता येथे देहावसान झाले. आज ते जरी आपल्यात नसले तरी आपल्या गाण्यांच्या रूपाने ते अजरामर आहेत. ' तुम पुकार लो...' 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
१५/०६/२०२३
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...