मुख्य सामग्रीवर वगळा

निसर्गरूपे - भाग तीन - संध्याकाळ

उगवतीचे रंग 

निसर्गरूपे - भाग तीन 

संध्याकाळ 

दिवस आणि रात्रीच्या सीमारेषेवरचा काळ म्हणजे संध्याकाळ.  यावेळी निसर्गाचे रूप पालटते. एखाद्या हॉलमध्ये एखादे लँडस्केप किंवा सुंदर निसर्गदृश्य लावलेले असावे आणि काही वेळाने ते बदलून त्या जागी दुसरे लावावे, तशी ही संध्याकाळ वेगळे रूप घेऊन येते. या लेखाच्या निमित्ताने संध्याकाळच्या वेळेचा संगीतमय आणि हृद्य असा आढावा घेण्याचा प्रयत्न करू या. ही संगीतमय सफर तुम्हाला नक्कीच आवडेल. दिवसभराच्या श्रमाने थकलेले सूर्यदेव आता अस्ताला जाण्याच्या तयारीत असतात. पण त्यांचा सकाळचा तोच रुबाब, तेच सौंदर्य कायम असते. एक सुंदर संस्कृत सुभाषित आहे 

उदये सविता रक्तो रक्त:श्चास्तमये तथा।

सम्पत्तौ च विपत्तौ च महतामेकरूपता॥

याचा अर्थ असा की सूर्यबिंब उगवताना जसे लाल रंगाचे असते, तसेच मावळतानाही. थोर पुरुषांचेही वागणे सर्व परिस्थितीत एकसारखे असते. श्रीकृष्णांनी गीतेत स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगितली आहेत, तसेच त्यांचे वागणे असते. थोर पुरुष सुखात आणि दुःखातही विचलित होत नाहीत. मला कवीवर्य भा रा तांब्यांची ' मावळत्या दिनकरा ' ही कविता खूप आवडते. त्या कवितेत ते म्हणतात 

असक्त परी तू केलीस वणवण 

दिलेस जीवन हे नारायण 

मनी न धरिले सानथोरपण 

समदर्शी तू खरा !

हे सूर्यनारायणा, मनात कोणतीही अभिलाषा न बाळगता तू सर्वांना प्रकाश दिलास, जीवन दिलेस. तुझ्याजवळ लहानथोर, गरिबश्रीमंत असा कोणताही भेदभाव नाही. उगवतीलाही तुला गर्व नव्हता आणि आता अस्ताला जातो आहेस पण तरीही प्रभाती जसा प्रसन्न होतास, तसाच भासतोस. नकळत तू आम्हाला खूप काही शिकवून जातोस. सकाळी पूर्वेला जसे रंग भरतोस, तशीच पश्चिमाही तुझ्या आगमनाने आरक्त होते रे ! मावळतीच्या आकाशात मेघांनी निरनिराळे रंग परिधान केलेले असतात. 

सकाळ आणि संध्याकाळ. एक उगवती आणि दुसरी मावळती. दोन्हीचं सौंदर्य वेगळं. संध्याकाळ म्हणजे मला मुक्त केशकलाप सोडलेली तरुणी मला वाटते. ' जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा ' ही मंगेश पाडगावकरांची रचना मला आठवते. असा संध्येच्या बटांना मुजोर वारा उधळत येतो. त्याही रूपात ती मोठी रम्य भासते. तिचे भाळ जणू आभाळ होते आणि बटा होतात पक्षी. पदरावर विविध रंगी नक्षी लेऊन ती येते. आता तिला मात्र ओढ असते ती आपल्या घराची. 

रात्रीच्या अंधारात जशी पहाटेची वाट आपण बघत असतो, तशीच दिवसभराच्या श्रमाच्या, धकाधकीच्या जीवनात सायंकाळची वाट आपण आपण पाहत असतो. आपल्या उबदार घरट्याकडे परत फिरण्याची ही वेळ असते. पक्षी आपल्या घरट्याकडे निघतात. एखादी आई आपल्या मुलांची वाट पाहत असते. तिच्या ओठांवर नकळत शब्द येतात, ' या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या, तिन्हीसांजा जाहल्या...' प्रेमीजनांच्या मनात हुरहूर दाटून येते. आपल्या प्रिय व्यक्तीची ओढ जीवाला बेचैन करते. पावसाळ्याचे दिवस असतील तर तिच्या ओठातून गीत प्रकटते 

श्याम हुई चढ आई रे बदरिया 

अब हूँ न आये मेरे श्याम सांवरिया 

तर दुसरी एखादी प्रेयसी आपल्या प्रियकराची भेट नाही म्हणून म्हणते आहे 

ये शाम की तन्हाईयां ऐसे में तेरा गम... 

झाडांच्या पानांची सळसळ झाली तर तिला आपली प्रिय व्यक्ती आल्याचा भास होतो. ' आह ' या चित्रपटातलं हे गीत लता मंगेशकर यांनी गायिलेले आहे आणि पडद्यावर अभिनेत्री नर्गिसवर चित्रित झालं आहे. या गाण्यातला दर्द, आर्तता मन पिळवटून टाकणारी आहे. 

मग कुठे तरी आपल्या प्रिय व्यक्तीची ती वाट पाहत असते. मावळत्या सूर्याच्या साक्षीने त्याच्या आठवणी ती जागवते. ' जिथे सागरा धरणी मिळते, तिथे तुझी मी वाट पाहते...' हा मावळता दिनकर आपल्या प्रिय व्यक्तीला नक्कीच भेटवेल अशी आशा तिच्या मनात असते. पुन्हा एक कवीवर्य भा रा तांबेंची कविता मला आठवते. ही कविता लतादीदींनी आपल्या अमृतासमान गोड आवाजात गाऊन अमर केली आहे. मराठी रसिकांच्या हृदयात या कवितेने घर केले आहे. ही कविता आहे ' तिन्हीसांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला....' या कवितेतला प्रियकर प्रेयसीला वचन देतो आहे. तो संध्यासमयीला तिचा हात हातात धरून म्हणतो, 'आजपासुनी जिवे अधिक तू माझ्या हृदयाला...'  म्हणजे सखे आजपासून तू मला माझ्या प्राणांपेक्षाही प्रिय आहेस. 

जुन्या हिंदी चित्रपटात हाच नायक राहवत नाही म्हणून दररोज आपला तिच्या घराजवळ जाऊन शिटी वाजवून तिला साद घालतो. भगवान दादांच्या अलबेला या चित्रपटातला हा नायक. मग त्याला उद्देशून नायिका म्हणते 

शाम ढले खिडकी तले तुम सिटी बजाना छोड दो ... 

तर हिंदी चित्रपटातल्या एखाद्या नायकाला ही संध्याकाळची वेळ धुंद, मदहोश करणारी वाटते. त्याला प्रेयसीची ओढ लागलेली आहे. तिच्याशिवाय राहणे त्याला शक्य नाही. अशा वेळी तो म्हणतो 

' ये शाम मस्तानी, मदहोश किये जाय 

मुझे डोर कोई खिंचे 'तेरी ओर लिये जाय...'

संध्याकाळ म्हटली की मला ' सांज ये गोकुळी सावळी सावळी ...' हे गाणं हटकून आठवतं. संध्याकाळचं जेवढं रम्य शब्दचित्र या कवितेत आहे, तेवढे क्वचितच कुठे आढळते. वजीर चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं हे गीत आशा भोसलेंनी गाऊन अजरामर केलं आहे. या गीताची तीनही कडवी अप्रतिम आहेत. पहिल्या कडव्यात कवी म्हणतो 

धूळ उडवीत गाई निघाल्या, श्याम रंगात वाटा बुडाल्या. 

परतती त्या सवे पाखरांचे थवे, पैल घंटा घुमे राउळी. 

दिवसभर चरण्यासाठी बाहेर पडलेली गायी गुरे आता आपल्या घराच्या ओढीने निघाली आहेत. घरी परतण्याचे त्यांचे रस्ते आता अंधारताहेत असे न सांगता कवी मोठे सुंदर शब्द वापरतो. तो म्हणतो ' श्यामरंगात वाटा बुडाल्या. ' श्रीकृष्ण, श्रीराम, विष्णू हे सगळे देव सावळेच ! कृष्णाला तर आपण प्रेमाने ' श्याम ' म्हणतो. संध्याकाळ तर त्याच्याच रंगात रंगून जाते. पाखरे घरट्याकडे निघालेली असतात आणि दूरवर मंदिरातून घंटेचे मंजुळ स्वर कानी येतात. 

दुसऱ्या कडव्यात कवी म्हणतो 

पर्वतांची दिसे दूर रांग, काजळाची जणू दाट रेघ 

होई डोहातले चांदणे सावळे, भोवती सावळ्या चाहुली... 

दूरवर दिसणारी पर्वताची रांग या संध्यासमयी कशी दिसते, तर जणू काजळाची दाट रेघ असल्यासारखी. अंधारून आले आहे. पर्वत आता धूसर होताहेत असे न सांगता कवी त्याला काजळाच्या रेघेची उपमा देतो आणि संध्येचे सौंदर्य आणखी खुलते. आता डोहात चांदणे दिसते आहे. पण सावळ्या रंगाची एवढी मोहिनी सृष्टीला पडली आहे की त्या रंगात ते चांदणं सुद्धा सावळं भासतंय. अवघी सृष्टीच त्या रंगात रंगली आहे. 

कवितेचे शेवटचे कडवे तर कवितेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. 

माउली सांज अंधार पान्हा, विश्व सारे जणू होय कान्हा 

मंद वाऱ्यावरी वाहते बासरी, अमृताच्या जणू ओंजळी. 

संध्याकाळ म्हणजे जणू माउली आणि दाटून आलेला अंधार हा तिने सोडलेला पान्हा. आणि आता सारे विश्वच कान्हा झालेय. त्याच्या रंगात रंगले आहे. वाऱ्याच्या लहरीत संगीत आहे, नाद आहे, शीळ आहे. हा नाद म्हणजे कान्ह्याची, त्या सावळ्याची मंजुळ बासरी. तो वारा आपल्यापर्यंत तिचे सूर पोहोचवतो आहे. हा मंजुळ, शीतल वारा आणि तो घेऊन येत असलेला मंजुळ दैवी स्वर म्हणजे जणू अमृताच्या ओंजळी आहेत. तो भरभरून अमृत वाटतो आहे. तुम्ही त्याचा आस्वाद घ्या. यापेक्षा संध्याकाळचे रमणीय वर्णन काय असू शकते ? 

अशी ही संध्याकाळ विविध रूपांनी समोर येते. कुणाला ती हुरहूर लावते. कोणासाठी उदास असते तर कोणासाठी आनंदाची. मात्र तिला स्वतःचा असा रंग, भाव नसतो. तुमचा मूड जसा असेल तशी ती भासते. 'आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या ' अशीही ती एखाद्या कवीला वाटते. पण सांज ही दिलासा देणारी, विश्रांती समय असलेल्या रात्रीकडे अलगद घेऊन जाणारी सखी आहे. गाणी, कविता,गप्पा गोष्टी, संगीताचे कार्यक्रम यांनी एखादी संध्याकाळ रंगून जाते. संध्याकाळच्या वेळी एखादे नाटक, सिनेमा आपल्याला वेगळ्या दुनियेत घेऊन जातो. एखाद्या संध्याकाळी पाऊसधारा निरखित बसावं आणि त्याचा आनंद घ्यावा. अशा वेळी हातात गरमागरम वाफाळलेला चहाचा कप आणि जुन्या तलतच्या गझला, हेमंत कुमार आणि लताची गाणी किंवा भीमसेन जोशींचं शास्त्रीय संगीत असं काहीतरी ऐकत असावं आणि ती संध्याकाळ तरल, मुलायम आणि रेशमी होऊन जावी. 

आयुष्य संपत आलं की ती सुद्धा जीवनाची संध्याकाळच असते. पुन्हा भा रा तांबे आठवले. त्यांच्याकडे रसिकांनी जेव्हा आणखी कवितांची मागणी केली, तेव्हा ते म्हणाले 

मधु मागसी माझ्या सख्या  परी, मधुघटचि रिकामे पडती घरी. 

ते म्हणतात, ' अरे रसिका, मी थकलो आहे. आता माझ्याकडून अधिक मधुघटाची अपेक्षा करू नकोस. म्हणजेच काव्यरूपी मधु ( मकरंद ) मागू नकोस. ते याच कवितेत पुढे म्हणतात 

ढळला रे ढळला दिन सखया, संध्याछाया भिवविती हृदया 

अता मधुचे नाव कासया, लागले नेत्र रे पैलतीरी. ' 

या ओळी आपले काळीज हेलावून टाकतात. 

अशा संध्याकाळच्या विचारात असताना अशीच एकदा एक संध्याकाळ मला भेटली. ती नेहमीसारखी सुंदरच होती. पण काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते. मी तिला विचारलं, ' कशी आहेस ? मजेत आहेस ना ? ' 

मला म्हणाली, ' हो रे, तशी तर मी ठीक आहे. पण खरं सांगू का ? पूर्वीसारखं प्रसन्न, आनंदी नाही वाटत. काहीतरी हरवलं आहे. आनंद कमी कमी होत चालला आहे. ' 

मला हे ऐकून धक्काच बसला. ' काय सांगतेस ? असं काय झालंय ? जरा मलाही सांग ना...' मी म्हणालो. 

' अरे, काय सांगू बाबा तुला ? सांगितलं तेव्हढं कमी म्हणायचं. पूर्वी माझ्या स्वागताला कसे सगळे तयार असायचे ! घराघरातून देवापुढे समयी, निरांजने लावली जायची. तुळशीजवळ दिवा असायचा. घराघरातून बालगोपाळांचे ' शुभं करोति कल्याणम ' चे सूर ऐकू यायचे. देवाला, घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार केला जायचा. कामावरून आलेली मंडळी, शेतावरून आलेली माणसं हातपाय धुवून घरातल्या मोठया माणसांजवळ बसायची. त्यांची आस्थेनं चौकशी करायची. माणसामाणसात संवाद होता. आज तेच सगळं हरवलंय. टीव्ही, मोबाईल यांच्या नादात घरातल्या जिवंत आणि जवळ असलेल्या व्यक्तींशी संवाद कमी झाला आणि लांबच्या व्यक्तींशी संवाद वाढला. तो इतका वाढला की त्या नादात माणूस स्वतःलाही हरवून बसलाय. स्वतःशी बोलायलाही त्याला वेळ नाही. तुला काय, कसं आणि किती सांगू ? ' 

मी म्हंटलं, ' होय, संध्याताई, तू म्हणतेस ते खरंच आहे. पण आता घड्याळाचे काटे उलट तर नाही ना फिरवता येणार. पण माणसामाणसातला संवाद मात्र नक्कीच वाढवता येईल. टीव्ही, मोबाईल कमी करून एकमेकांच्या अधिक जवळ जाता येईल. पण तुझा निरोप मात्र मी पोहचवतो. ' आता संध्येचा चेहरा पुन्हा पूर्ववत आनंदी दिसू लागला. ती पाठमोरी झाली आणि रात्रीची चाहूल लागली. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

१०/०६/२०२३

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...