मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग चला एका अनोख्या सफरीवर...

उगवतीचे रंग 

चला एका अनोख्या सफरीवर... 

दोस्तांनो, नमस्कार. कसे आहात ? मला माहिती आहे की तुम्ही नक्कीच आनंदात असणार ! का म्हणून काय विचारताय ? लेकांनो, अरे तुम्हाला सध्या सुटी आहे. मे महिना म्हणजे धमाल मस्तीचा, आनंदाचा. शाळेची वणवण नाही, पालकांची तणतण नाही. म्हणून तर म्हणतोय की तुम्ही आनंदात असणार. खरं तर मला खूप दिवस झाले तुमच्याशी बोलायचं होतंच. पण काय करणार ? तुम्ही तुमची शाळा, परीक्षा, निकाल यात बिझी आणि मी माझ्या कामात. पण ' ऋतुपर्ण ' मासिकाचे संपादक असलेल्या सुरेंद्रकाका गोगटेंचा मला फोन आला. मला म्हणाले छोट्या दोस्तांसाठी विशेषांक काढतोय सर आणि तुम्ही मुलांसाठी काहीतरी लिहा. त्यामुळे तुमच्याशी बोलण्याची ही संधी मला त्यांनी मिळवून दिली. 

मी आज तुमच्याशी मनमोकळं बोलणार आहे. असा काही खास कुठलाही विषय नाही. आपल्याला फक्त गप्पा मारायच्या आहेत. तुमच्याशी बोलताना मला माझे लहानपणीचे दिवस आठवतात. एका अगदी लहान खेडेगावात माझं शिक्षण झालं. आमची ती शाळा जिल्हा परिषदेची होती. शाळेची इमारत कौलारू आणि जुन्या पद्धतीची होती. वर्गातल्या जमिनीवर फरशीसुद्धा नव्हती बरं का दोस्तांनो !  जमीन तर शेणानं सारवावी लागायची. तुम्ही म्हणाल, ' शी, असली कसली हो तुमची शाळा ? किती घाण वास येत असेल ! ' पण तसं अजिबात नव्हतं बरं का दोस्तांनो. शाळा सुटली की घरी जाण्यापूर्वी कोणीतरी ती शाळा सारवून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळा भरेपर्यंत ते छान वाळलेलं असायचं. वास वगैरे तर अजिबात यायचा नाही. जमीन स्वच्छ, वर्ग स्वच्छ, मोकळ्या आणि मोठ्या खिडक्या. सगळं कसं प्रसन्न वातावरण. 

शिपाई किंवा कोणीतरी विद्यार्थीच शाळा सुरु होण्यापूर्वी शाळेची घंटा वाजवायचा. गाव छोटं असल्यानं घंटेचा आवाज साऱ्या गावात लगेच ऐकू जायचा. पहिली घंटा झाला की मुलं घरून निघायची आणि दुसऱ्या मिनिटाला शाळेत हजर ! मग छान बाहेरच्या मैदानात शिस्तीनं उभं राहायचं, प्रार्थना, राष्ट्रगीत म्हणायचं. पूर्वेच्या सूर्याची कोवळी किरणं अंगावर झेलत मस्त प्रार्थना ! मग कोणीतरी शिक्षक आम्हाला एखादी गोष्ट सांगायचे. कधी कधी एखादा विद्यार्थीसुद्धा गोष्ट सांगायचा. त्या गोष्टीतून आपोआपच चांगल्या गोष्टींचे संस्कार मनावर व्हायचे. 

गोष्टींवरून आठवलं. आमच्या शाळेत एक मोठं पुरुषभर उंचीचं लाकडी असं पुस्तकांचं कपाट होतं, त्यात नवनवीन गोष्टींची खूप पुस्तकं होती. तेव्हा आजच्यासारखी पुस्तकं सहजासहजी उपलब्ध होत नव्हती बरं का ! म्हणून त्या पुस्तकांच्या कपाटाचं मला खूप आकर्षण वाटायचं. पण आमचे शिक्षक त्या कपाटाला कुलूप लावून ठेवायचे. जणू काही मौल्यवान धनच त्यात ठेवलं आहे ! अर्थात तेच सगळ्यात मौल्यवान धन आहे हा भाग वेगळा कारण पैसा,सोनंनाणं याची चोरी होऊ शकते पण पुस्तकं आपल्याला जे ज्ञान देतात त्याची चोरी होऊच शकत नाही. पैसा, धन दिल्याने कमी होतं पण ज्ञान तर दिल्यानं वाढतं असा त्याचा महिमा ! मग ही ज्ञानाची खाण असलेली पुस्तकं गुरुजींनी मला वाचायला द्यावी म्हणून मी त्यांच्या मागे लागायचो. एका दिवशी गुरुजी एकच पुस्तक द्यायचे. ते वाचून परत केलं की दुसरं. पण ते देतानाही त्यांची एक अट असायची बरं का दोस्तांनो ! ते म्हणायचे, ' आज तू जे काही वाचलंस ते उद्या सकाळी प्रार्थनेनंतर मुलांना सांगायचं. ' मी त्यांची ही अट आनंदानं मान्य करायचो कारण त्या बदल्यात मला नवनवीन पुस्तकं वाचायला मिळायची. 

ती पुस्तकं काही काळासाठी माझी मित्र होऊन जायची. माझा हात धरून मला ती अनोख्या विश्वात फिरवून आणायची. कधी त्यांच्यासोबत जंगलाची सफर करायचो. गर्द हिरवीगार झाडी, उंचच उंच वाढलेली झाडे, प्राणीपक्ष्यांचे आवाज मला वेगळाच आनंद द्यायचे. वाघोबांची डरकाळी ऐकू यायची आणि भीतीने छाती धडकायची. कोकिळा, मोरांचे आवाज, सुंदर पाण्यांची सरोवरे, खळाळत वाहणाऱ्या नद्या ती पुस्तकं मला दाखवायची. दर्यावर्दी सिंदबाद मला विविध देशांच्या सफरीवर नेऊन सुरस आणि चमत्कारिक कथा सांगायचा.तो उसळलेला दर्या, येणारी संकटं मी श्वास रोखून पाहायचो.  भा रा भागवतांचा बनेश म्हणजेच फास्टर फेणे विविध रहस्यांचा शोध घ्यायचा. हा छोटा गुप्तहेर भल्याभल्यांची मती गुंग करायचा.  

अकबराच्या दरबारातले कोणालाही न सोडवता येणारे असे कठीण प्रश्न चतुर बिरबल सहज कसे सोडवायचा ! त्याचा विचार करताना मती गुंग होऊन जायची. चांदोबातल्या विक्रम वेताळाच्या गोष्टी तर वेगळ्याच विश्वात घेऊन जायच्या. बिरबलासारखेच त्या वेताळाच्या कठीण प्रश्नांना विक्रमाने कशी उत्तरं दिली आणि आपली सुटका कशी करून घेतली, ते वाचताना मजा यायची. कधी ती पुस्तकं पऱ्यांच्या राज्यात घेऊन जायची तर कधी क्रूर राक्षसांच्या ! एखादा देखणा, शूर आणि चतुर असलेला राजपुत्र आपल्या बुद्धिचातुर्याने त्या बलाढ्य राक्षसाचा पराभव करून त्याच्या बंदिवासात असलेल्या राजकन्येला कसा सोडवून आणायचा हे वाचताना वेळ कसा जायचा हे कळायचं नाही. अरबी सुरस आणि चमत्कारिक कथा मला वेगळ्याच दुनियेत सफर करून आणायच्या तर विष्णुशर्मांच्या पंचतंत्रमधील प्राणी माझ्याशी चक्क हितगुज करायचे. त्यांच्याशी बोलता बोलता मानवी व्यवहार आणि संबंधातील खूप काही गोष्टी आपोआपच कळायच्या. 

अशाच पुस्तकांमध्ये काही थोर व्यक्तींची चरित्रं पण वाचायला मिळायची. ती वाचताना कळायचं की कुणी जन्मतःच थोर असत नाही. ही माणसं तुमच्याआमच्यासारखी  सामान्यच होती. पण ती थोर झाली ती आपल्या कर्तृत्वाने. त्यांनाही अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण दोस्तांनो, आपण सामान्य माणसे आणि अशी आपल्या कर्तृत्वाने महान झालेली मंडळी यांच्यात मोठा फरक असतो. तो कोणता ? तर आलेल्या संकटांनी ही माणसे निराश होत नाहीत, आपले प्रयत्न सोडून देत नाही. उलट ते त्या संकटांना आपल्या ध्येयापर्यंत पोहचण्याचे साधन बनवतात. अडचणी, संकटे यापासून शिकत जातात. त्यातून मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या मजबूत होत जातात. मित्रांनो, शाळेत तर मी शिकतच होतो ना ! पण अशा खूप काही गोष्टी माझे मित्र झालेली पुस्तके मला नकळत शिकवून गेली. त्यांचे हे माझ्यावर अनंत उपकारच आहेत !

सुट्यांमध्ये मी शेतात, जंगलात भटकत असायचो. कडाक्याचं ऊन पडलेलं असायचं. त्याचवेळी शेतात विशाल पसरलेला आम्रवृक्ष आपले प्रचंड बाहू उंचावून मला त्याच्याकडे बोलवायचा. वसंत ऋतूत त्याला इतका सुंदर मोहर फुटायचा की त्या झाडानं जणू अलंकार परिधान केले आहेत असं वाटायचं. त्याचा तो धुंद सुवास मला मोहित करायचा. मी त्याच्या तळी छान विसावायचो. कधी त्याच्या अंगाखांद्यावर बागडायचो. तो मला कधी रागवायचा तर नाहीच पण प्रेमभराने मला आपली फळे खायला द्यायचा. चिंचेच्या झाडाला आलेली कोवळी फुले, कच्च्या पण गाभुळलेल्या चिंचा तोंडाला वेगळीच चव आणायच्या. बांधावर जाळीत बोरांची झाडे असायची. हा सगळा रानमेवा माझ्या कमालीचा आवडता. त्याने माझे खिसे भरलेले असायचो. तेव्हा त्या दृष्टीने मी श्रीमंतच असायचो. तेव्हा ही चिंचा, बोरं खाऊन कधी खोकला आला नाही की आजारी पडलो नाही. आजकालच्या जाहिरातीत सारखं अमुक एक घ्या आणि इम्युनिटी वाढवा असं सांगतात ना, तर आमची इम्युनिटी अशीच आपोआप या पदार्थांमुळे वाढत गेली. 

चिंचा, बोरं, कैऱ्या पडताना आम्ही कधी कधी झाडाला दगड मारायचो. ती फळं खाली पडायची. झाडं कधीच आमच्यावर रागावली नाहीत. लोकांनी दगड मारले तरी आपण गोड फळेच द्यावीत हे झाडं मला नकळत सांगून गेली. काही तासांसाठीच उमलणाऱ्या क्षणभंगुर आयुष्य असलेल्या फुलांनी आपल्या सुंदर रंगांनी आणि सुवासाने दुसऱ्यांना आनंदच द्यावा हे शिकवलं. कुणाच्या स्वागताला वापरा, देवाला वाहा किंवा माळेत ओवा, ती सारख्याच निर्विकारपणे तयार असायची. दोस्तांनो, निसर्गसारखा शिक्षक नाही. खूप वेगवेगळ्या पद्धतींनी न सांगता खूप काही शिकवत असतो. निसर्गातले फुलासारखे छोटे घटक सुद्धा कसं जगावं हे आपल्याला शिकवून जातात. 

मित्रांनो, जाता जाता मला एक जुनं गाणं आठवलं. ते किशोरकुमार यांनी गायिलेले आहे. फार सुंदर गाणं आहे. दूर गगन की छांवमे या चित्रपटात ते आहे. त्यातील नायक तुमच्यासारख्या अशाच एका छोट्या दोस्ताला म्हणतो

आ चल के तुझे मैं लेके चलू इक ऐसे गगन के तले

जहाँ गम भी न हो आंसू भी न हो 

बस प्यार ही प्यार पले 

इक ऐसे गगन के तले . 

तेव्हा दोस्तांनो, सुटीत असंच काहीतरी करा. निसर्गाचा, खुल्या आकाशाचा आनंद घ्या. झाडं, प्राणी, पक्षी यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. आणि हो, जमलंच तर पुस्तकांचं बोट धरून त्यातील अनोख्या विश्वाची सफर करून या. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 

©विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

०५/०५/२०२३

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )









 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...