उगवतीचे रंग
फिटे अंधाराचे जाळे
आपण कौतुकाने एखादे झाड लावतो. कधी एखादी वेल लावतो. आपण लावतो तेव्हा ते किती नाजूक असते ! किती काळजी घ्यावी लागते, किती जपावे लागते ! अशीच एक वेल सांगलीच्या करमरकर कुटुंबीयांनी लावली. ती मोठी व्हावी म्हणून जीवापाड जपले. या वेलीचं नावच वल्लरी. तिची कहाणी मोठी रोचक आणि प्रेरणादायी आहे. या रोमहर्षक कहाणीपर्यंत मी योगायोगानेच पोहोचलो. त्याचे झाले असे की माझा ' सावळबाधा ' या नावाचा लेख सांगलीचे श्री भालचंद्र करमरकर यांना व्हाट्सअपवर वाचायला मिळाला. त्यांना तो आवडल्याने त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यांनी लेख आवडल्याचे सांगून माझी चौकशी केली. मी त्यांना सहज विचारले ' आपण काय करता ? ' ते म्हणाले, ' मी शिक्षक होतो. आता माझे वय ९४ वर्षे आहे. ' हे ऐकून मी उडालोच. वयाच्या ९४ व्या वर्षी व्हाट्सअपवर एखाद्याचा लेख वाचून त्याला प्रत्युत्तर देणे ही गोष्ट माझ्या दृष्टीने तरी आश्चर्यकारक आणि कौतुकास्पद आहे. मी या पितृतुल्य व्यक्तीला फोनवरूनच नमस्कार केला. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याचे माझे कुतूहल शमले नव्हते. मग ते सांगू लागले की माझी पत्नी आता ८५ वर्षांची आहे. मग मी त्यांच्या मुलांबद्दल चौकशी केली. तसे ते म्हणाले, ' मला एक मुलगी आहे वल्लरी नावाची. '
थोडी अधिक चौकशी करताना मला कळले की वल्लरी ही चारचौघांसारखी सामान्य नाही. तिची विशेष काळजी घ्यावी लागते. ती मेंदूच्या पक्षाघाताची ( cerebral palsy ) लहानपणीच शिकार बनली. ती आयुष्यभर अशीच राहणार आहे हे कळूनही करमरकर कुटुंबीयांनी दुसरे मूल होऊ दिले नाही. त्या मुलीला तळहाताच्या फोडासारखे आयुष्यभर जपले. त्यांची तपश्चर्या अडीच तीन तपाहूनही अधिक काळ. जी वल्लरी काहीही करू शकत नव्हती, ती जिद्दीने बी ए झाली, एम ए संस्कृत प्रथमवर्गात उत्तीर्ण झाली. हे सगळं ऐकून मी थक्क झालो. त्यांनी वल्लरीबद्दल, तिची हुशारी, तिची स्मरणशक्ती, गाण्यांची आवड याबद्दल अशा काही गोष्टी सांगितल्या की वल्लरीबद्दलचे माझे कुतूहल आणखीनच वाढले. मी त्यांना म्हणालो, ' काका, मला वल्लरीबद्दल, तिच्या प्रगतीबद्दल, तुम्ही केलेल्या प्रयत्नांबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल. ' तसे ते म्हणाले, ' अहो विश्वासराव, आपण मी लिहिलेले ' फिटे अंधाराचे जाळे ' हे पुस्तक वाचा. त्यात आपल्याला सगळी माहिती मिळेल. ' मी त्यांना म्हटले, ' मी आमच्या वाचनालयात हे पुस्तक उपलब्ध आहे का ते बघतो, नसेल तर पुण्याहून मागवून घेतो. ' यावर ते म्हणाले, ' तुमचा पत्ता कळवा. मी पुस्तक पाठवतो. ' आश्चर्य म्हणजे तीनचार दिवसांनी मला त्यांनी पाठवलेले पुस्तक मिळाले सुद्धा ! त्या पुस्तकावर त्यांनी छानशी स्वाक्षरी करून लिहिले होते, ' विश्वासरावांना आवडेलच या विश्वासाने.' ते सगळं पाहून माझा त्यांच्याविषयीचा आदर आणखीनच दुणावला.
करमरकर काकांशी बोलताना ते ज्या परिस्थितीतून जात आहेत त्याचा अंदाज मला आला होता. करमरकर काका आणि काकू दोघेही वयोवृद्ध. एकुलतं एक अपत्य म्हणजे वल्लरी. तीही चारचौघींसारखी सामान्य नाही. वल्लरी आता पन्नास वर्षांची झालीय. आपण सामान्य माणसे आपल्याच फूटपट्ट्या लावून सगळ्यांना मोजत असतो. तसाच मीही विचार करायला लागलो. कोण बरं सांभाळेल आता यांना या वयात ? म्हातारपणाची काठी ज्याला आपण म्हणतो असा मुलगा नाही. अर्थात मुली पण हल्ली मुलांपेक्षा काही कमी नाहीत. पण इथे तर सारेच विपरीत ! आईवडिलांची काळजी घेण्याऐवजी या मुलीचीच काळजी त्यांना घ्यावी लागते. घरामध्ये तिघेच राहतात. जेवणाचा डबा शेजारून येतो. पण निराशा, दुःख, हताशपणाचे उद्गार ? छे ! निराशा, दुःख, उद्वेग कुठेही नाही. दैवाला दोष देणे नाही.
करमरकर काका भरभरून बोलले. आपल्या बोलण्यातून आनंद, दुःख, विषाद या सारख्या भावना सहजपणे समोरच्या व्यक्तीला लक्षात येतात. पण इथे तर करमरकर काकांच्या बोलण्यातून आनंदच झिरपत होता. तो थेट माझ्या हृदयापर्यंत पोहोचला. मी मनाशी म्हटले, ' अरे बघ, आपण किती साध्या साध्या गोष्टींवरून चिडचिड करतो, वैतागतो, दैवाला दोष देतो. इथे बघ. किती विपरीत परिस्थिती असताना ही माणसे आनंदात आहेत ! आपल्या वागणुकीचा आदर्श इतरांसमोर ठेवून दिव्याने दिवा लावावा तसा यथाशक्ती परिसर उजळत आहेत. दिवाळी तर नुकतीच संपली होती. पण इतरांना वाट दाखवणारी अनोखी दिवाळी करमरकर कुटुंबीय कायम साजरी करत आहेत. खरोखरच त्यांनी लिहिलेले ' फिटे अंधाराचे जाळे ' हे पुस्तकाचे नाव किती सार्थ आहे !
वल्लरीचा सेरेब्रल पाल्सीचा आजार करमरकर कुटुंबीयांनी लहानपणीच लक्षात आला. पण निराश न होता याच मुलीला आपल्या परीने शिकवायचे, वाढवायचे याचा ध्यास भालचंद्र करमरकर, सौ विद्याताई करमरकर आणि वल्लरीची आत्या या तिघांनी घेतला. हा निर्णय तर घेतला पण तो अमलात आणणे सोपी गोष्ट नव्हती. नियतीने त्यांची कठोर परीक्षा घेतली. त्यांना आपल्या आवडीनिवडी, हौसमौज आदी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्या लागल्या. काहींनी त्यांना नावही ठेवली. अनाहूत सल्ला दिला, उपदेश केला. पण आपल्या निश्चयापासून ही माणसे यत्किंचतही ढळली नाहीत. समर्थांच्या उक्तीप्रमाणे ही सगळीच मंडळी म्हणजे जणू ' निश्चयाचा महामेरू '. त्यांच्या जागी कोणीही असते तर अशा मुलीसाठी त्या पालकांनी व्रतवैकल्यं, बुवाबाजी इ चा मार्ग अनुसरला असता. ते स्वाभाविकही म्हटले गेले असते. पण करमरकरांनी यातली कोणतीही गोष्ट केली नाही. त्यांनी कास धरली ती वैद्यकीय उपचारांची, विवेकाची आणि प्रयत्नांची. असे करताना त्यांच्या सहनशक्तीची, संयमाची कसोटी लागली. पण त्यांनी आपली जिद्द, चिकाटी सोडली नाही. ते असं करत असताना वल्लरीची सुद्धा त्यांना मनापासून साथ होती. आपल्याला शिकायचंय, मोठं व्हायचंय या जिद्दीने वल्लरी सुद्धा त्यांच्या प्रयत्नांना साथ देत होती. अखेर करमरकर कुटुंबीयांपुढे दैव हरलं. प्रयत्नांना यश आलं. वाटा उजळल्या.
या प्रयत्नांची सुरुवात वल्लरीला साधं नीट बसता येत नव्हतं. काही खाता पिता येत नव्हतं यासारख्या गोष्टींपासून झाली. हातापायांमध्ये, स्नायूंमध्ये शक्ती नव्हती. कोणतीही गोष्ट हातात धरता येत नव्हती. या सगळ्या साध्या साध्या गोष्टींपासून सुरुवात करून वल्लरीला शाळेत घेऊन जाणे, तिला शिकवणे, परीक्षा द्यायला लावणे आणि तिने एम ए संस्कृत प्रथमवर्गात उत्तीर्ण होण्यापर्यंत मजल मारणे या सगळ्या खऱ्या तर अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी. पण करमरकर कुटुंबीयांनी अथक प्रयत्नांनी त्या साध्य केल्या. मला त्यांना भगीरथाचे वंशज म्हणावेसे वाटते. भगीरथाने अथक प्रयत्न केले. स्वर्गातील गंगा पृथ्वीवर आणली. म्हणूनच कोणी प्रयत्नांची पराकाष्ठा केली की आपण त्याला ' भगीरथ प्रयत्न ' केले असे म्हणतो. या अर्थाने करमरकर हे भगीरथाचे वंशज आहेत.
' फिटे अंधाराचे जाळे ' वाचताना आपला प्रवास वल्लरीबरोबर होत असतो. जसजशी तिची प्रगती होते, तसतसे आपणही त्याचे साक्षीदार होत जातो. हे पुस्तक भाऊंनी ( भालचंद्र करमरकर ) इतके सुंदर लिहिले आहे की वल्लरीची जीवनगाथा जणू जिवंत होऊन आपल्यापुढे उलगडते. ती तीनचाकी सायकल चालवायला शिकते, बुद्धिबळ शिकते तेव्हा तिच्या पालकांना होणारा आनंद आपल्यालाही होतो. ती वाचायला शिकते, शाळेत जाते, परीक्षा देते, लुनावर बसायला शिकते, संगणकावर लिहायला शिकते या सगळ्या प्रगतीच्या आनंदाचे साक्षीदार हे पुस्तक वाचताना आपण होत जातो. तिला परीक्षेसाठी रायटर मिळवताना भाऊंना करावी लागणारी कसरत त्यांच्या सहनशक्तीचेही परीक्षा घेणारी असते. पण त्यात जेव्हा ते यशस्वी होतात, तेव्हा त्यांच्याइतकाच आनंद आपल्याला होत जातो. आज वल्लरी स्वतः लिहू शकते, गाणे म्हणू शकते, कॅसिओ वाजवते. जवळपास सगळी मराठी, हिंदी गाणी, कविता तिला तोंडपाठ आहेत. गाणे आणि कवितांचा वल्लरी म्हणजे जणू एनसायक्लोपीडिया. सर्वच दृष्टीने ' फिटे अंधाराचे जाळे ' हे पुस्तक म्हणजे जणू एक लखलखते झुंबर आहे. त्यात प्रयत्नांचे सौंदर्य, परिश्रमांची गाथा, आणि जिद्दीचा प्रवास आहे.
वल्लरीसारखी मुले इतरही पालकांना असतात. कितीतरी मुलांना जन्मजात अपंगत्व आलेले असते. ते त्या मुलांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करीत नाहीत असे नाही. पण शेवटी ते हताश होतात, प्रयत्न सोडून देतात. दुसऱ्या अपत्यासाठी प्रयत्न करतात. ज्या मुलांना दुर्दैवाने वल्लरीच्या मात्यापित्यांसारखे आईवडील लाभत नाहीत, त्यांची अवस्था फार वाईट होते. अशा कळ्या बहुधा फुलण्याआधीच गळून पडतात. अशा मुलांच्या पालकांसाठी या पुस्तकात पावलापावलावर मार्गदर्शन आहे. वल्लरीच्या प्रगतीतले सगळे टप्पे, सगळ्या अडचणी भाऊंनी काळजीपूर्वक नोंदवून ठेवून सगळ्यांसाठी एक या पुस्तकाद्वारे एक मोलाचे मार्गदर्शन केले आहे. ही अथक जिद्दीची कहाणी आहे.
भाऊ आणि सौ विद्याताई, वल्लरीची आत्या आणि स्वतः वल्लरी यांच्याबद्दल ऐकून भल्याभल्यानी तोंडात बोटे घातली. त्यांच्या अथक प्रयत्नांना सलाम केला. वल्लरीला भेटायला तर सुधीर फडके, श्रीधर फडके सांगलीला गेल्यावर आवर्जून जात असत. प्रख्यात गायिका आशा भोसलेंनी सुद्धा वल्लरीचे कौतुक केले. तरुण भारतचे माजी संपादक आणि व्यासंगी लेखक चं प भिशीकर वेळ मिळाला की तिच्या भेटीसाठी येत असत. तिला पत्र पाठवीत असत. आज भाऊ आणि विद्याताईंना लोक वल्लरीचे आईवडील म्हणून ओळखतात. यातच त्यांच्या प्रयत्नांचे यश आहे.
वल्लरीच्या जीवनकथेने प्रेरित होऊन नीलकांती पाटेकर यांनी ' लाईफ इज ब्युटीफुल ' ही २४ मिनिटांची इंग्रजी शॉर्टफिल्म बनवली. ही फिल्म पाहून मुंबई दूरदर्शनचे मुकेश शर्मा यांना ' प्रेरणा पुरस्काराची ' कल्पना सुचली. पहिल्या प्रेरणा पुरस्काराचे मानकरी ठरले वल्लरी आणि तिची आई. मेहता पब्लिकेशन फाउंडेशन तर्फे तिला ' जिद्द ' पुरस्कार देण्यात आला. एप्रिल २००५ मध्ये वल्लरीला ' नवरत्न ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. असे अनेक मानसन्मान वल्लरी आणि करमरकर कुटुंबियांच्या वाट्याला आले. प्रश्न असा पडतो की त्यासाठी कौतुक कोणाचे करायचे, श्रेय कोणाला द्यायचे ? वल्लरी, भाऊ, विद्याताई की तिची आत्या ? हे श्रेय या सर्वांचेच आहे. ' ये कहानी हैं दियेकी और तुफानकी...' विपरीत परिस्थितीचे भयंकर तुफान आले पण या सर्वानी आशेचा, प्रयत्नांचा दीप मालवू दिला नाही. त्यातूनच प्रकाशाच्या वाटा उजळल्या. आपण हे पुस्तक वाचले नसेल तर जरूर वाचावे आणि एका अनोख्या प्रवासाचे साक्षीदार व्हावे.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१३/११/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा