उगवतीचे रंग
असे देश असे नेते - भाग तीन
सिंगापूरचा भाग्यविधाता - ली क्वान यू
पंतप्रधान ली आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने सिंगापूर आणि सिंगापूरवासियांसाठी अनेक कल्याणकारी योजना कल्पकतेने राबवल्या. अमेरिका आणि इतर युरोपीय देशात लोक आरोग्य विमा काढत, त्याचे हप्ते भरत. अशा व्यक्तींना मग डॉक्टर सुद्धा नको ती औषधे देऊन हॉस्पिटलचा खर्च वाढवत. ली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठरवले की लोक प्रॉव्हिडंड फंडासाठी जसे पैसे भरतात तसेच आपल्या पुढील काळात साधारणपणे दोन टक्के एवढी रक्कम त्यांनी आपल्या आरोग्य खर्चासाठी म्हणून मेडिफंड मध्ये भरावी. ही त्यांची योजना खूपच यशस्वी ठरली. सरकारी दवाखाने अत्याधुनिक सामुग्री आणि औषधांनी सुसज्ज करण्यात आले. त्यांचा दर्जा सुधारण्यात आला. आवश्यक ते उपचार सगळ्या रुग्णांना मिळू लागले. अत्यावश्यक सोयीसुविधा, औषधे आणि डॉक्टर्स सर्वांसाठी समान होते. त्याव्यतिरिक्त आणखी काही सुविधा हव्या असतील तर त्यासाठी रुग्णांनी वेगळे पैसे मोजावेत. यामुळे सर्वसामान्यांना आवश्यक ते उपचार मिळू लागले. रुग्णालयातील प्रचंड रांगा कमी झाल्या. निवृत्तिवेतनासाठीही कर्मचाऱ्यांनीच आपले पैसे जमा करावेत. तेच पैसे सरकार निवृत्तीवेतन म्हणून कर्मचाऱ्यांना देते. कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंड फंडातील पैसे इतर फायदेशीर योजनांमध्ये गुंतवण्याचा पर्याय सुद्धा कर्मचाऱ्यांना सिंगापूर सरकारने दिला.
पर्यटकांना आकर्षित करता यावे म्हणून अतिशय सुंदर असा पर्यटनस्थळांचा विकास करणात आला. जागेचा अभाव असताना आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन दुसरा अत्यंत आधुनिक असा चांगी विमानतळ उभारण्यात आला. त्यासाठी समुद्रात भराव घालायला लागला. हे विमानतळ आज पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. सिंगापूरमधील विविध महामंडळानी आर्थिक आणि औद्योगिक क्रांती घडवून आणली. कामगार संघटनांची पुनर्बांधणी करण्यात आली. स्वच्छ आणि हरित सिंगापूरचे स्वप्न प्रत्यक्षात आले. रोमच्या बाबतीत जसं म्हटलं जातं की ' रोम वॉज नॉट बिल्ट इन या डे ' तसंच सिंगापूरच्या बाबतीत म्हणता येईल. त्यामागे ली, त्यांचे सहकारी आणि त्यांच्या देशातील नागरिकांचे अविरत कष्ट होते, ध्येयपूर्तीचा ध्यास होता.
ली यांची पत्नी चू क्वा गेक हिची त्यांना समर्थ साथ होती. चू ही अतिशय बुद्धिमान स्त्री होती. उच्चशिक्षित होती. ली पंतप्रधान होईपर्यंतच्या सगळ्या घटनांची साक्षीदार होती. पण तिने ली यांच्या राज्यकारभारात कधीच ढवळाढवळ केली नाही. ली यांना पूर्ण स्वातंत्र्य व सहकार्य दिले. पण त्याच वेळी ती ली यांची एक चांगली मैत्रीणही झाली आणि जिथे जिथे आवश्यक असेल तिथे तिथे ली यांना आवश्यक तो सल्लाही दिला. म्हणूनच त्यांचा संसार दृष्ट लागण्यासारखा होता. त्यांच्या संसारवेलीवर तीन फुले उमलली. दोन मुलगे आणि एक मुलगी. ली आणि चू यांनी आपल्या मुलांना शक्य असतानाही जास्त सवलती घेऊ दिल्या नाहीत. त्याचे कारण म्हणजे त्यांना सर्वसामान्यांसारखे जगता यावे. सरकारी निवासस्थान उपलब्ध असूनही ली दाम्पत्य सरकारी बंगल्यात राहायला गेले नाही. आपल्या वडिलोपार्जित घरात राहणेच त्यांनी पसंत केले.
मोठा मुलगा ली हैसन लुंग हा अत्यंत बुद्धिमान. ट्रिनिटी कॉलेज ऑफ केम्ब्रिजमधून त्याने गणितातली ' रँग्लर ' ही पदवी मिळवली. पुढे गणितात प्रगत अभ्यास आणि संशोधनाची संधी असतानाही तो सिंगापूरला परत आला आणि लष्करात दाखल झाला. त्यात पुढे तो कर्नल पदापर्यंत पोहोचला. नंतर राजकारणात येऊन पुढे क्रमशः मंत्री आणि सिंगापूरचा उपपंतप्रधान झाला. आज तेच सिंगापूरच्या पंतप्रधानपदी आहेत. यांग हे ली यांचे दुसरे सुपुत्र. त्यांनी १५ वर्षे लष्करात काम केले. आज ते सिंगापूर टेलीकॉम्स मध्ये काम करतात. ली यांची मुलगी ली वेई लिंग ही डॉक्टर असून न्यूरॉलॉजिस्ट आहे.
ली आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी योग्य वेळी मंत्रिमंडळातून निवृत्ती घेऊन कुशल आणि कार्यक्षम अशी नवीन पिढी तयार करून तिच्या हातात सिंगापूरच्या प्रगतीची सूत्रे सोपवली. पंतप्रधान म्हणून निवृत्त झाल्यानंतर ली यांची त्यांच्या पुढील वारसदारांनी त्यांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून ' पालकमंत्री ' किंवा सल्लागार म्हणून नेमणूक केली. ली यांचा आजही सिंगापूरवासियांवर प्रचंड प्रभाव आहे. काहींच्या मते ली हे वादग्रस्त व्यक्तिमत्व होते, ते हुकूमशहा होते असे म्हटले जाते. पण काही असले तरी आजच्या प्रगत, स्वच्छ, सुंदर, भ्रष्टाचार मुक्त आणि विकसित देश म्हणून सिंगापूरच्या विकासाचे श्रेय ली यांना द्यावेच लागेल.
देशोदेशींचे नेते ली यांची भेट आणि मार्गदर्शन घेण्यासाठी येत असत. एकदा एका आफ्रिकन नेत्यांच्या शिष्टमंडळाने ली यांची भेट घेतली. त्यातील एकाने ली यांना विचारले की आमचे देश खूप मागासलेले आहेत. एके काळी सिंगापूरची देखील अशीच परिस्थिती होती. मग ही अविश्वसनीय अशी प्रगती आपण कशी साध्य केली. यावर ली यांनी दिलेले उत्तर फार सुंदर आहे. ते म्हणाले, " राष्ट्र मोठे असो वा छोटे, एकवंशीय असो वा विविध धर्मी, सागरकिनारी असो वा पर्वताच्या कुशीत लपलेले असो; जगातल्या सर्व राष्ट्रांची प्रगती व तेथील लोकांचे भवितव्य एका गोष्टीवर अवलंबून असते आणि ती म्हणजे सिंहासन ! सिंहासनावर बसणाऱ्यांवर तुमचा अंकुश आहे का ? सिंहासनाला पायऱ्या आहेत का ? आमच्या इथे उच्चपदावरील नियुक्ती होण्यासाठी अनेक कसोट्या असतात. केवळ लोकप्रियतेच्या आधारावर तुम्ही पंतप्रधान बनू शकत नाही. त्यासाठी तुमची योग्यता हवी. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये येण्यासाठी पुरेसा अनुभव आणि क्षमता हवी. "
ली यांचा एक सहकारी संसद सदस्य म्हणाला, " सिंगापूरमध्ये कोणीही मंत्री वा खासदार शासकीय अधिकाऱ्यास तोंडी आदेश देऊ शकत नाही. तसे आढळल्यास अशा मंत्री किंवा खासदाराला आपले पद तर सोडावे लागतेच पण काही महिन्यांचा तुरुंगवास अटळ असतो. त्यांना सर्व सूचना लिखित स्वरूपात द्याव्या लागतात. सिंगापूरचे राज्यकर्ते या कायद्यांचे कसोशीने पालन करतात. सिंगापूरच्या प्रगतीत त्या देशातील प्रशासनानेही महत्वाचे योगदान आहे. " आपल्याला या छोट्याशा देशापासून शिकण्यासारख्या अशा खूप गोष्टी आहेत.
संदर्भ
एका दिशेचा शोध - संदीप वासलेकर
सिंगापूरची नवलकथा - वैदेही देशपांडे.
याशिवाय आंतरजालावरील उपलब्ध माहितीचा वापर
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
०२/०५/२०२३
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा