मुख्य सामग्रीवर वगळा

असे देश असे नेते - भाग एक


उगवतीचे रंग 

असे देश असे नेते - भाग एक 

सिंगापूरचा भाग्यविधाता - ली क्वान यू  

जगातील अनेक देशांवर ब्रिटिशांचे साम्राज्य होते. पण हळूहळू हे देश पारतंत्र्याच्या बंधनातून मुक्त झाले. हे देश जसजसे स्वतंत्र झाले, तसतशी त्यांच्या क्षमतेनुसार, नैसर्गिक साधनसंपत्तीच्या उपलब्धतेनुसार त्यांनी प्रगती केली. अनेक अविकसित राष्ट्रांचे विकसित राष्ट्रात रूपांतर झाले. या प्रगतीत त्या त्या देशातील जनता आणि त्या जनतेला दिशा देणारे नेतृत्व यांचा मोठ्या प्रमाणावर हात होता. 

आपल्या देशाला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले.  त्यानंतर १८ वर्षांनी स्वातंत्र्य आणखी एका देशाला स्वातंत्र्य मिळाले. आग्नेय आशियातला हा टिकलीएवढा देश. ना शेतीयोग्य जमीन, ना नैसर्गिक साधनसंपत्ती. क्षेत्रफळ म्हणाल तर भारतातील एखाद्या राज्याएवढे. केवळ ७१०चौ. किमी चे हे बेट. त्याच्याजवळील ६३ बेटांचा समावेश या देशात होता. किमी. लोकसंख्या असेल साधारणपणे ५८ लक्ष. त्यातही विविध  धर्म, विविध भाषिक, विविध वंशाचे लोक, गरिबी पाचवीला पुजलेली, अशिक्षित लोक, भ्रष्टाचाराची बजबजपुरी, अस्वच्छतेचे माहेरघर अशा समस्यांनी घेरलेला देश. शेजारील शक्तिमान देशांचे तगडे आव्हान, चीन नावाचा ड्रॅगन आ वासून टपून बसलेला आणि  दहशतवादी हल्ले करणारा इंडोनेशिया सारखा देश. 

आता प्रश्न असा आहे की असा एखादा देश आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्थकारणात, पर्यटनात, सौंदर्यात, स्वच्छतेत, आरोग्य, सुरक्षा, शिस्तपालनात जगातील प्रगत राष्ट्रांनाही मागे टाकेल अशी प्रगती करू शकतो का ? त्यातील एखादे शहर जगातील सर्वात सुंदर हरित शहरांपैकी एक बनू शकते का ? तर मंडळी या वर दिलेल्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर होय असे आहे. अशी नेत्रदीपक प्रगती एका छोट्याशा देशाने करून त्याचा आदर्शच जगापुढे ठेवला आहे. होय, बरोबर आहे तुमचा अंदाज. या देशाचे नाव आहे सिंगापूर. हा देश एवढी घोडदौड करू शकला कारण त्याला मिळालेले अत्यंत कुशल, सक्षम आणि कणखर नेतृत्व. अशा एका व्यक्तीच्या हाती ही सत्ता आली की ज्याने या वादळात या  भरकटलेल्या देशाच्या जहाजाला सुयोग्य दिशा दिली. एखाद्या देशाला असा नेता लाभणे म्हणजे त्या देशाचे भाग्यच ! असा नेता म्हणजे एखाद्या जहाजाच्या कुशल कप्तानसारखाच असतो. त्याच्या हाती देश नुसताच सुरक्षित नसतो, तर प्रगतीची नवनवीन शिखरे गाठतो. सिंगापूरच्या या कुशल कप्तानाचे नाव आहे ली क्वान यू . 

९ ऑगस्ट हा दिवस आपण क्रांतिदिन म्हणून साजरा करतो. ९ ऑगस्ट १९६५ ला मध्ये सिंगापूरमध्ये सुद्धा एक क्रांतिकारी घटना घडली. मलेशिया फेडरेशनमध्ये असलेल्या या छोट्याशा देशाला आपापसात झालेल्या मतभेदांमुळे मलेशियाने वेगळे केले. सिंगापूरसह सशक्त मलेशियाचे स्वप्न पाहणाऱ्या ली क्वान यू  यांचा अपेक्षाभंग झाला होता. ब्रिटिशाना वाटत होते की स्वतंत्र झालेला हा देश एक दिवसही आपल्या मदतीशिवाय जगू शकणार नाही. या अचानक आलेल्या संकटाने ली थोडे गांगरले आणि काही क्षण भावुक झाले. अश्रुपूर्ण नेत्रांनी त्यांनी पत्रकारांसमोर, सिंगापूरवासीयांसमोर आपल्या भावनांना मुक्त वाट करून दिली. त्यांचा हा भावनाउद्रेक साऱ्या जगाने पाहिला. आता सिंगापूर वासियांना पिण्याचे पाणी सुद्धा फेडरेशन ऑफ मलाया यांच्याकडून घ्यावे लागणार होते. अत्यंत बुद्धिमान असलेले ली काही क्षण गांगरले होते. पण त्यांनी स्वतःला सावरले आणि आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने हा आधुनिक विश्वकर्मा सिंगापूरच्या विकासासाठी पुढे सरसावला. सगळ्या जगाने आश्चर्याने तोंडात बोट घालावं अशी प्रगती त्याने करून दाखवली. सिंगापूरचा तो भाग्यविधाता ठरला. 

ली यांनी आपल्या सहकाऱ्यांना पाचारण केले. सर्व खात्यांची पुनर्बांधणी करण्याच्या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा केली. अंतर्गत सुरक्षा व संरक्षण खाते एकत्र करून त्याची जबाबदारी आपल्या अत्यंत विश्वासू अशा गोह केंग स्वी यांच्यावर सोपवली. लिम किन सिम आणि एस राजरत्नम याना अनुक्रमे अर्थ आणि परराष्ट्र खाते दिले. 

मलाया, बोर्निया, सारावाक येथून उपलब्ध होणाऱ्या रबर, टिन , पाम तेल इ. ची निर्यात सिंगापूर बंदरातून होत होती. या व्यापाराला मलेशियाचा आर्थिक, राजनैतिक आधार होता. सिंगापूरची जनता एकसंध नव्हती. विविध प्रकारचे लोक वेगवेगळ्या कारणांनी सिंगापूरला स्थायिक झाले होते. स्थलांतरित चिनी, भारतीय आणि युरेशिअन्स यांच्या जोडीला व्यापारानिमित्त आलेले अरब आणि तेथील स्थानिक मलायी आदी लोकांची वस्ती होती. या सर्वांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण करणे, राष्ट्रविकासात त्यांचा सहभाग घेणे ही अत्यंत आव्हानात्मक गोष्ट होती. व्यापार हा तर सिंगापूरचा प्राण होता. पण हा व्यापार दलालांच्या हाती केंद्रित झालेला होता. तो त्यांच्यापासून मुक्त करून त्याचा फायदा सरकारला तसेच सामान्य जनतेला कसा देता येईल याचा वेगळ्या वाटेने विचार करायला ली यांनी सुरुवात केली. ( क्रमशः ) 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

२७/०४/२०२३

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

 ( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...