उगवतीचे रंग
देणाऱ्याचे हात हजारो...
अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दो कराने असं परमेश्वराच्या बाबतीत म्हटलं जातं. त्यानं द्यायचं ठरवलं तर त्याचे देणारे हजारो हात आणि घेणारे आपले फक्त दोन. मग कसा मेळ घालणार ? ओंजळ अपुरीच पडणार ना ! प्रसिद्ध कवी ग दि माडगूळकर आपल्या एका सुंदर कवितेत म्हणतात ' देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी. ' मला ही कविता आठवण्याचं एक निमित्त झालं. ' द हिडन लाईफ ऑफ ट्रीज ' हे पुस्तक मी नुकतंच वाचायला घेतलं आहे. त्यातील सुरुवातीची दोन तीन प्रकरणं वाचतानाच मी चक्रावून गेलो. मुखपृष्ठावर दिल्याप्रमाणे ' झाडांच्या अबोल विश्वाचं बोलकं दर्शन ' या पुस्तकात लेखकानं घडवलं आहे. त्या सुरुवातीच्या दोन तीन प्रकरणातच मी एवढी माहिती वाचली की आपण ती माहिती गोळा करायची ठरवली तर एका आयुष्यात तरी हे काम होणार नाही. दोन तीन आयुष्य त्यासाठी खर्ची घालावी लागतील. त्या पुस्तकाच्या शेवटी संदर्भाची एक भली मोठी तीन चार पानी यादी दिली आहे. त्यात एकूण ७६ नावे आहेत. इतकी सारी माहिती शोधून त्या लेखकाने ( पीटर वोहलबेन आणि मराठी अनुवाद गुरुदास नूलकर ) फक्त एका दोनशे पानी पुस्तकात आपल्यापर्यंत पोहचवली आहे. बरं यात केवळ त्या विविध पुस्तकातील माहिती आहे असे नाही तर लेखकाने आयुष्यभर जे काही केले त्याचे सारसर्वस्व या पुस्तकात उतरले आहे.
या पुस्तकाचं नाव मी खरं तर एक उदाहरण म्हणून तुमच्यासमोर ठेवतो आहे. ' राजा शिवछत्रपती ' हे बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं पुस्तक पाहिलं तर त्यात शेवटी तीन पानी यादी फक्त आधारग्रंथांची दिलेली आहे. गो नी दांडेकरांचं साहित्यही असंच आहे. बाबासाहेब पुरंदरे, गो नी दा, विश्वास पाटील, शिवाजी सावंत यासारख्या लेखक मंडळीनी आपल्या आयुष्यात केवढी प्रचंड भ्रमंती, केवढे तरी वाचन केले आहे. आपले मारुती चितमपल्ली यांनी तर जंगलातच आपले आयुष्य घालवले. या सगळ्या मंडळींनी जे जे पाहिलं, जे जे वाचलं, ते ते आपल्या पुस्तकातून भरभरून वाचकांना दिलं. अक्षरशः आयुष्यभराचा खजिना त्यांनी आपल्यासमोर रिता केला.
मित्रांनो, या पुस्तकांची आणि या लेखकांची नावं मी केवळ उदाहरणादाखल घेतली आहेत. असे अनंत लेखक आणि त्यांनी पुस्तकरूपाने मागे ठेवलेलं अमूल्य असं धन न संपणारं आहे. आपल्याला काय करायचं आहे ? ते पुस्तकरूपी अक्षरधन फक्त मिळवायचं. विकत घ्या, वाचनालयातून आणा वा कोणाकडून वाचण्यासाठी आणा. ते पुस्तक हातात धरा आणि वाचायला सुरुवात करा. मग माझ्या दृष्टीने तुम्ही जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असाल. मग पीटर, गदिमा, गोनीदा अशी सगळी दिग्गज मंडळी तुमच्याजवळ येऊन तुमच्याशी हितगुज करतील. एखादी गृहिणी आपल्या प्रिय जनांसाठी मोठ्या कष्टाने स्वयंपाक करते. त्यात चवीसाठी तिखट, मीठ, मसाला आदी गोष्टी तर घालतेच पण त्यासोबतच तिचे प्रेम, वात्सल्य यासारख्या भावभावना सुद्धा नकळत मिसळून जातात. एवढेच करून ती थांबत नाही. तर मोठ्या निगुतीने केलेला हा स्वयंपाक ताटात आकर्षक पद्धतीने मांडून ती तुमच्यासमोर ते सुग्रास अन्नाचे ताट ठेवते. तुम्हाला फक्त त्याचा आस्वाद घायचा असतो. ते अन्न तुमचं मन, शरीर आणि आत्माही तृप्त करतं . अशी चव हॉटेलमधल्या पदार्थांना कशी येणार ? गृहिणीने प्रेमाने बनवलेलं सुग्रास जेवण म्हणजे अशी सुंदर सुंदर पुस्तकं. आणि हॉटेलमधलं चमचमीत मसालेदार जेवण म्हणजे टीव्हीवर सुरु असणाऱ्या रटाळ कौटुंबिक मालिका असं मला वाटतं. काय निवडायचं हे आपण ठरवायचं.
अशा सुंदर पुस्तकांची सोबत ही जगातली सगळ्यात चांगली सोबत. वाचनाचा आनंद जगातल्या उत्तम आनंदांपैकी एक. ही पुस्तके देतात विचारांची श्रीमंती, समृद्ध जाणीवा, माहितीचा खजिना, ज्ञान आणि मनोरंजन. त्या बदल्यात ते आपल्याकडे फारसे काही मागत नाहीत. काही मागत असलेच तर तुमचा थोडा वेळ मागतात पण त्या बदल्यात तुम्हाला ते खूप काही देऊन जातात. मी अशा पुस्तकांची, लेखकाची तुलना म्हणूनच सहस्रकर असलेल्या परमेश्वराशी करतो. हजारो हातानी ते आपल्याला देत असतात.
या पुस्तकांसारखीच धनदायी अजून एक गोष्ट आहे. ती म्हणजे नामवंतांची, विचारवंतांची वा लेखकांची व्याख्याने. या व्याख्यानातून ते जे काही देतात, त्याला तोड नाही, उपमा नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर, शिवाजीराव भोसले, राम शेवाळकर, पु ल देशपांडे, आचार्य अत्रे यासारख्या वक्त्यांची व्याख्याने म्हणजे श्रोत्यांना पर्वणी असायची. बाबासाहेब पुरंदरे यांच्या छ. शिवाजी महाराजांच्या जीवनावरील व्याख्यानमालेला श्रोत्यांची तुडुंब गर्दी असायची. एवढेच काय पण बऱ्याच ठिकाणी अशा व्याख्यानमालांसाठी तिकीट ठेवलेले असले तरी लोक गर्दी करायचे. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी हे राजकीय नेते असले तरी त्यांना अमोघ वक्तृत्वाची देणगी लाभलेली होती. डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी तर मुलांसाठी शेकडो भाषणे देऊन प्रज्वलित मने घडवली. आचार्य अत्रेंच्या शब्दात सांगायचे तर अशी माणसे दहा हजार वर्षातून एकदा जन्माला येतात.
नाशिकला गोदाकाठी भरणारी व्याख्यानमाला असो, पुण्यातली वसंत व्याख्यानमाला असो वा अशाच प्रकारच्या अन्य शहरातून सुरु असणाऱ्या व्याख्यानमाला असो, या व्याख्यानमाला म्हणजे त्या त्या ठिकाणच्या श्रोत्यांना एक मेजवानीच असते. ही मागच्या पिढीतील काही वक्त्यांची उदाहरणादाखल नावे मी घेतली पण आजच्या काळातही अनेक नामवंत वक्ते आहेत. त्यांचं भाषण ऐकणं हे काही एखाद्या मेजवानीपेक्षा कमी नसतं. आजच्या काही वक्त्यांची नावं घ्यायची झाली तर अविनाश धर्माधिकारी, प्रा. प्रकाश पाठक, यजुर्वेन्द्र महाजन असे अनेक दिग्गज आहेत.
शिवाजीराव भोसले यांनी त्यांनी ऐकलेल्या अशाच एका भाषणाबद्दल एकदा आपल्या व्याख्यानातून सांगितलं होतं. ते पुण्याला शिकत असतानाचा हा प्रसंग आहे. एकदा काही कारणाने त्यांचे कॉलेजचे तास होऊ शकले नव्हते. तेव्हा वेळ होता म्हणून ते फिरत फिरत टिळक स्मारक मंदिराजवळ आले. तिथे एक मंडप टाकलेला होता. काही वक्त्यांची भाषणे सुरु होती. आधीच्या वक्त्यांची भाषणे संपल्यानंतर एक अगदी किरकोळ शरीरयष्टीचा माणूस बोलण्यासाठी उभा राहिला. आपल्या हातात असणाऱ्या छत्रीचा आधार घेऊन हे गृहस्थ बोलायला उभे राहिले. आता हा असा फाटका दिसणारा माणूस काय बोलणार असा प्रश्न शिवाजीरावांना पडला. पण ते गृहस्थ बोलायला लागले आणि श्रोत्यांवर जणू जादूच झाली. एकही श्रोता जागचा हलला नाही. त्या वक्त्याच्या बोलण्यात विद्युल्लतेचे तेज आणि चापल्य होते, बाणांचा तिखटपणा होता, जिभेवर जणू सरस्वती विराजमान होती. तो वक्ता होता स्वातंत्र्यवीर सावरकर !
अशी माणसे आणि त्यांचे वक्तृत्व आपल्याला मार्ग दाखवतात, जीवनाची दिशा दाखवतात. ' इकिगाई ' हे प्रसिद्ध पुस्तक आपल्याला सांगते आपल्याला आपल्या जीवनाचे ध्येय काय आहे, हे कळले पाहिजे. एकदा ते कळले म्हणजे कोणत्या दिशेने आपल्याला जायचे आहे हे कळणे सोपे होते. अशाच प्रकारे आपल्याला आपल्या जीवनाचे ध्येय दाखवण्यात किंवा गाठून देण्यात अशा पुस्तकांची किंवा अशा वक्त्यांची भूमिका जीवनात अतिशय महत्वाची असते. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर, म. गांधी, पं. नेहरू, डॉ बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल यांच्या भाषणांनी जनजागृती घडवून आणली आणि स्वातंत्र्याची मशाल पेटती ठेवली. सरदार पटेलांनी आपल्या तेजस्वी भाषणांनी अनेक संस्थानिकांना स्वतंत्र भारतात सामील होण्यासाठी मनपरिवर्तन घडवून आणले.
जनतेचे मन परिवर्तन करणे ही सोपी गोष्ट नसते. पण ती या दिग्गजांच्या प्रभावी वक्तृत्वाने सहज घडून आली. पण या गोष्टी आपोआप घडत नाहीत. त्यासाठी वाणीत सामर्थ्य, उज्ज्वल चारित्र्य आणि तपश्चर्या लागते. त्या सगळ्या गोष्टींचं पाठबळ या दिग्गजांना लाभलं होतं. लोकहितवादी, गोपाळ गणेश आगरकर, म. फुले, महर्षी कर्वे,राजा राम मोहन रॉय इ च्या विचार आणि लेखणीने जनजागृती झाली. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात सोनोपंत दांडेकर, डॉ राधाकृष्णन, धुंडामहाराज देगलूरकर, पांडुरंग शास्त्री आठवले, आफळे बुवा यासारख्या नामवंतांची प्रवचने कान आणि मन दोन्ही तृप्त करीत असत. लोकांना अध्यात्माचा सोपा आणि सुयोग्य मार्ग दाखवण्याचे कार्य या मंडळींनी सहज केले.
चाळीसगावलाही शेट ना बं वाचनालयात गेल्या ८४ वर्षांची परंपरा असलेली सरस्वती व्याख्यानमाला नुकतीच संपन्न झाली. या दहा दिवसांच्या व्याख्यानमालेत निरनिराळया वक्त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी चाळीसगावकरांना मेजवानीच मिळाली. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर जगणं आनंदी करणारा हा ज्ञानयज्ञ होता.
अशा प्रकारे विविध पुस्तकांना, व्याख्यानांना आपण आवर्जून हजेरी लावायला हवी. विशेषतः तरुणाईने याकडे वळायला हवे. बऱ्याच व्याख्यानमालेत पन्नाशी उलटलेले श्रोते दिसतात. तरुण पिढीत यासंबधीची जागृती पालक आणि शिक्षक यांनी जाणीवपूर्वक निर्माण करायला हवी. सुरवातीला ज्या गदिमांच्या कवितेचा उल्लेख केला, त्यात ते म्हणतात ' देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. ' तर आपली ही झोळी असे काही घ्यायचे असेल तर, दुबळी राहता कामा नये. ती मजबूत हवी, खोल हवी. अशा झोळीतच हे दान आपल्याला स्वीकारता येईल. अशा पुस्तकांनी आणि अशा वक्त्यांनी अनेक वेळा माझ्या झोळीत भरभरून दान टाकून मला अनेकदा श्रीमंत केले आहे. माझ्या कुवतीप्रमाणे आणि शक्तीप्रमाणे मी माझ्याकडे जमा असलेली ही ठेव इतरांना वाटण्याचा प्रयत्न करीत असतो. आज जागतिक पुस्तक दिन आहे. याच दिवशी माझा वाढदिवस यावा हा एक सुखद योगायोग आहे. अशी मजबूत झोळी आपल्याला लाभो आणि त्या आपल्या झोळीत उत्तमोत्तम विचारांचे दान आपल्याला प्राप्त होवो हीच आजच्या या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने कामना करतो आणि लेखणीला पूर्णविराम देतो.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२३/०४/२०२३
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा