उगवतीचे रंग
आणिक स्मृती ठेवुनी जाती...
एके दिवशी सकाळी सहा वाजताच फोन वाजला. एवढ्या सकाळी कोणाचा फोन पाहावं म्हटलं तर तो फोन होता माझे मित्र राजेंद्र चिमणपुरे यांचा. एवढ्या सकाळी काय महत्वाचे असावे असे वाटून मी फोन घेतला. म्हणाले, ' सर, आस्था चॅनल लावा. रामदेवबाबा पोटाच्या तक्रारींवर योगासने आणि औषधे सांगताहेत. सकाळी पाच पासूनच आस्था चॅनलवर त्यांचे मार्गदर्शन सुरु असते. ' ही माहिती मला नवीन होती. एवढ्या सकाळी उठून मी कधी टीव्ही पाहिला नव्हता. एवढ्या तळमळीने आणि आठवणीने फोन करणारा प्रेमळ मित्र दुर्दैवाने आता या जगात नाही.
कधी कधी आपल्या एखाद्या जिवलग मित्राचे असे अचानक अकाली निघून खूप वेदनादायी असते. आपले एखादे जवळचे नातेवाईक गेल्याचे जेवढे दुःख असते, तेवढेच दुःख अशा प्रसंगी होते. तसंच मला या प्रसंगी झालं. आम्ही सगळेच माझ्या या प्रेमळ मित्राला आदराने आणि प्रेमाने ' दादा ' म्हणून हाक मारायचो. दादांची मूर्ती लहान होती. जेमतेम पाच फूट उंची असेल. पण त्याच्या कर्तृत्वाची उंची भल्याभल्यानाही लाजवणारी होती. परमेश्वर काही व्यक्तींच्या बाबतीतही काहीतरी उणे ठेवतो. तशी दादांना बेताची उंची, किरकोळ शरीरयष्टी लाभली होती. हे कमी की काय म्हणून दमा सोबतीला एखाद्या सावलीसारखाच राहायचा. पण त्याच परमेश्वराने त्यांना दुर्दम्य इच्छाशक्ती, विनोदबुद्धी यासारख्या गुणांचे दान त्यांच्या झोळीत टाकले होते. आपल्या शारीरिक आणि आर्थिक अशा विपरीत परिस्थितीत या माणसानं नियतीपुढे हार मानली नाही. त्याने जिद्दीनं झुंज तर दिलीच पण दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर सामान्यातला सामान्य माणूस काय करू शकतो हे दाखवून दिले. तो अनेकांना जगणे शिकवून गेला.
दादा म्हणजे आमच्या हायस्कुलमधील विद्यार्थीप्रिय शिक्षक. जिथे भल्याभल्याना हातात छडी घेऊन शिकवावे लागे, तिथे दादांच्या केवळ बोलण्याने विद्यार्थी शांत होत. प्रत्येकाच्या जवळ जाऊन ते त्या विद्यार्थ्यांची आस्थेने चौकशी करीत. तो विद्यार्थी आर्थिक अडचणीत असेल तर त्याला शक्य ती मदत करीत. एवढी मदत करणारे हे दादा परिस्थितीने खूप श्रीमंत होते का ? तसं अजिबात नव्हतं. दादांचं जीवनच कष्टातून घडलं होतं. त्यांचे वडीलही शिक्षकच होते. त्यांचे आजोबाही शिक्षक होते. असा तीन पिढ्यांचा घरात शिक्षकाचा वारसा. आई खूप लवकर हे जग सोडून गेली होती. पाच बहिणी आणि दोन भावांचं हे कुटुंब होतं. वडिलांच्या तुटपुंज्या पगारात भागणार नव्हतं. वडिलांना मदत म्हणून दादांनी शिकवण्या सुरु करून घरच्या परिस्थितीला हातभार लावला. वडीलही तसे लवकरच गेले आणि घराची जबाबदारी दादांवर येऊन पडली. एक दोन बहिणींची लग्नं झालेली. घरावर कर्जाचा बोजा. पण आपल्या अपार कष्ट, मेहनीतीच्या जोरावर त्यांनी या परिस्थितीला धैर्याने तोंड दिले. बहिणींची लग्ने केली. त्यांची नुसती लग्नं करून तो थांबला नाही. तो त्यांचा मानसिक आधार बनला. नियमितपणे त्यांना फोन करणे, आस्थेने सगळ्यांची चौकशी करणे हे नित्याचेच !
सुरुवातीला शाळेत एका लेखनिकाचे काम करणारा हा राजेंद्र जिद्दीने शिकून शिक्षक झाला. नुसताच शिक्षक झाला नाही तर अनेक नामवंत विद्यार्थी त्याने घडवले. इंग्रजी, गणित, मराठी हे विषय त्याने उत्तम शिकवले. मराठी माध्यमाच्या शाळेत शिकवत असतानाही इंग्रजी माध्यमाच्या अनेक विद्यार्थ्यांना त्याने घडवले. त्यांच्या इंग्रजी, गणिताचा पाया पक्का केला. त्यांच्यामधील माणूस, एक जागरूक नागरिक घडवला. त्याच्या विद्यार्थ्यांतील अनेक जण पुढे मोठमोठ्या पदावर गेले, डॉक्टर, वकील, इंजिनिअर झाले.
त्याच्या या विद्यार्थ्यांमधील लोकप्रियतेचा प्रत्यय मला जेव्हा आमच्या येथील वाचनालयाची निवडणूक लागली तेव्हा आला. निवडणुकीच्या प्रचारासाठी आम्ही फिरत असताना, जिथे जिथे गेलो, त्या त्या घरातील विद्यार्थी येऊन त्याला वाकून नमस्कार करायचे. ' सर, तुम्ही कशाला फिरताय ? तुम्हाला फिरण्याची जरूर नाही. तुम्ही आम्हाला हक्काने सांगा. ' असे सांगायचे. जिथे भली भली मोठी मंडळी मत मागण्यासाठी मतदारांच्या मिनतवाऱ्या करायची, तिथे त्याच्याबद्दलचा असलेला हा आदर पाहून आम्ही भारावून जायचो. तो प्रचंड मतांनी निवडून आला आणि वाचनालयाचा उपाध्यक्षही झाला. वाचनालयात अनेक नवनवीन उपक्रम त्याने राबवले होते. वाचनालय, शाळा आणि रंगगंध नावाची चाळीसगावातील एक नाट्यप्रेमी संस्था या तीनही ठिकाणी अनेक उपक्रम त्याच्या बरोबर आम्ही राबवले.
आम्हा सहकाऱ्यांच्या आणि मित्रमंडळींच्या घरात त्याला थेट स्वयंपाकघरापर्यंत प्रवेश असायचा. आपल्या प्रेमळ, विनोदी आणि खेळकर वागण्याने त्यांना घरातील भगिनी वर्गालाही आपलेसे करून घेतले होते. म्हणूनच त्याचे थेट किचनमध्ये येणे, हास्यविनोद करणे त्यांना कधी वावगे वाटायचे नाही. तो आपल्या घरातील एक सदस्यच वाटायचा. तो घरी आला की मुलामुलींची आस्थेने चौकशी करणार, त्यांना हक्काने काही मार्गदर्शन करणार आणि लागली तर मदतही करणार असं त्याचं वागणं असायचं. त्यामुळे तो सर्वांनाच प्रिय होता. आम्हा सगळ्यांचा तो ' फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड ' होता.
तो उत्तम लिहायचा आणि बोलायचाही छान. एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक, कवी आणि लेखक प्रवीण दवणे यांची आठवण यावी असे रसाळ निवेदन तो करायचा. श्रोत्यांना आपलेसे करून करून घ्यायचा. त्याने अनेक सुंदर कविता लिहिल्या, लेख लिहिले. शाळेच्या नियतकालिकाचे आणि इतरही अनेक ग्रंथांचे संपादन केले. विज्ञान कथा तर तो उत्तमच लिहायचा. त्याच्या विज्ञान कथांना मराठी विज्ञान परिषदेचा पुरस्कार मिळाला. ' उर्वशीचे रहस्य ' हे त्याचे विज्ञान कथांवर आधारित पुस्तक लोकांना खूप आवडले. असा हा हरहुन्नरी माणूस. सदैव हसतमुख राहणारा, काव्य, शास्त्र, विनोदात रमणारा.
राजकपूरच्या ' मेरा नाम जोकर ' चित्रपटातला नायक हृदयात अनेक दुःखे साठवून लोकांना हसवण्याचे, आनंद देण्याचे काम करत असतो. इतरांना आनंदी करणारी माणसे म्हणजे परमेश्वराचीच रूपे असतात. तसाच हा ! आपल्या हृदयातील व्यथा, वेदना त्याने कधीच आपल्या चेहऱ्यावर दिसू दिल्या नाहीत. आपल्या परिस्थितीचे रडगाणे गाणारे अनेक असतात. पण हा माणूस त्या परिस्थितीलाच साधन बनवून आपले ध्येय साध्य करणारा निघाला. सकाळी पाचला उठून नियमितपणे योग, प्राणायाम करून त्याने आपल्या शारीरिक व्याधींवर बऱ्यापैकी मात करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो मोठ्या प्रमाणात यशस्वीही झाला. रश्मी आणि अभिषेक ही त्यांची मुले. दोघेही आज्ञाधारक आणि सुसंस्कारित. त्याची पत्नी म्हणजे आमच्या वहिनी आदराने आणि प्रेमाने सर्वांचे आदरातिथ्य करणाऱ्या. दादाच्या नाजूक तब्येतीची सदैव काळजी घेणाऱ्या.
आपल्या मुलांसाठी त्याने फार काही संपत्ती मागे ठेवली नाही पण संस्काराचे धन मात्र अपार ठेवले. मध्यंतरी अचानक बिघडलेल्या ऊन पावसाच्या वातावरणाने त्याची प्रकृतीही अचानक बिघडली. साथीला असलेल्या दम्याने उचल खाल्ली. हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले. आम्ही भेटायला गेलो, तेव्हा तो अतिदक्षता विभागात दाखल होता. चेहऱ्यावर मास्क लावलेला होता. ऑक्सिजन सुरु होता. पण त्याही परिस्थितीत आम्हाला पाहिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. चार दोन क्षणांसाठी आपल्या चेहऱ्यावरचा मास्क त्याने बाजूला केला. ' तुम्ही भेटायला आलात ना, मग आता मला बरे वाटेल ' असे तो म्हणाला. आम्हीही परमेश्वराकडे त्याच्या लवकर बरे वाटण्याची कामना करीत होतो. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. तो या आजारातून उठला नाही. त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी त्याच्या अंत्ययात्रेला केवढा तरी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
माझ्या घराजवळ स्वामी समर्थांचा मठ आहे. तो स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त होता. कधी कधी मठात आला की मला फोन करायचा. ' सर, घरी आहात का ? मी येतो आहे. आपण भेटू. गप्पा मारू. ' मी सांगायचो, ' अहो दादा, मी घरीच आहे. फोन कसला करताय ? सरळ येत चला. ' आणि त्याला गमतीने म्हणायचो, ' आज तुमची ' दादागिरी ' चालणार नाही बरं का ! तुम्हाला माझ्याकडे चहा वगैरे काहीतरी घ्यावेच लागेल. ' आणि मग थोड्याच वेळात ती वामन मूर्ती माझ्या गेटचे फाटक उघडून आत येताना दिसायची. त्याच्याशी बोलताना मी आनंदी, समाधानी आणि समृद्ध व्हायचो. ती मूर्ती आता मला यापुढे कधी दिसणार नाही. सुधीर फडकेंच्या गाण्यातील शब्दांची आठवण येते. ' अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती. '
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१९/०४/२०२३
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा