मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग साहित्य अभिवाचनाची पंढरी : चाळीसगाव नगरी

उगवतीचे रंग 

 साहित्य अभिवाचनाची पंढरी  : चाळीसगाव नगरी 

फेब्रुवारी २०२३ मध्ये पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. या सांस्कृतिक महोत्सवाला जसे देशभरातून साहित्यिक आणि साहित्य रसिक हजेरी लावतात, मायमराठीचा जागर होतो, विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, वाङ्मयीन चर्चा होतात आणि तीन दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमांची सांगता होऊन उपस्थित असणारे सगळेच काहीतरी मौल्यवान असे देऊन जातात आणि घेऊनही जातात ; अगदो तसाच अभिवाचनाचा महोत्सव दरवर्षी चाळीसगावला भरतो आणि साहित्य अभिवाचनाच्या वारकऱ्यांची पाऊले चाळीसगाव नगरीच्या दिशेने वळतात. यावर्षी हा  सांस्कृतिक महोत्सव २४, २५ आणि २६ फेब्रुवारीला चाळीसगावमध्ये नुकताच संपन्न झाला. जी संस्था दरवर्षी ही सांस्कृतिक यात्रा भरवते, त्या संस्थेचं नाव आहे रंगगंध कलासक्त न्यास. संस्थेचं नाव जेवढं सुंदर आणि अर्थपूर्ण आहे, तेवढंच संस्थेचं कार्यही. चाळीसगावमधील ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ मुकुंद करंबेळकर हे या संस्थेचे प्रमुख आणि सर्वेसर्वा. हसतमुख, प्रसन्न आणि मृदू व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या डॉ मुकुंद करंबेळकर यांना तेवढीच समर्थ साथ डॉ मीनाक्षी वहिनींची लाभली आहे. 

डॉ मुकुंद करंबेळकर हा मुळातच प्रचंड कलेचं आणि नाटकांचं वेड असलेला माणूस ! व्यवसायानं डॉक्टर, शल्यकर्म करून नवनिर्मितीचा वसा घेतलेले हे सर्जनशील हात, कलेच्या क्षेत्रात देखील काहीतरी नवीन करावे यासाठी आसुसलेले होते. ' शल्यशोभा ' हे त्यांच्या हॉस्पिटलचं अनेक अर्थांनी अर्थपूर्ण असणारं नाव ! या माणसाच्या मनात चाळीसगावात एखादी नाट्यसंस्था नाही, नाट्यगृह नाही हे शल्य बोचत होतं. आपला व्यवसाय करता करता सतत डोक्यात असलेला नाटकाचा किडा या माणसाला स्वस्थ बसू देत नव्हता. त्यातून त्यांनी मग १९९४ मध्ये एकांकिका बसवायला सुरुवात केली. स्थानिक कलाकारांना हाताशी धरले. चार पाच वर्षे आपल्या लिखित, दिग्दर्शित एकांकिका घेऊन महाराष्ट्रभर फिरले. कुठे बक्षीस मिळालं, कुठे नाही. पण प्रयत्नात मात्र कसूर केली नाही. स्वतः डॉक्टरांनी काही एकांकिका लिहिल्या, दिग्दर्शित केल्या. 

चाळीसगावातील विद्यार्थ्यांना काहीतरी सकस आणि चांगले वाचायला मिळावे आणि वाचनाची आवड त्यांच्यात जोपासली जावी या हेतूने डॉक्टरांनी अनेक वर्षे ज्ञानप्रबोधिनीच्या ' छात्र प्रबोधन ' या मासिकाचा प्रचार आणि प्रसार केला. त्या कामात माझ्यासारख्या काही शिक्षकांनी त्यांना सहकार्य केले. 

इ.स. २००० मध्ये प्रसाद वनारसे आणि अतुल कुलकर्णी यांनी ' रंगवर्धन नाट्यव्यवस्था ' सोलापुरात सुरु केली. त्यावेळी त्यांचं ' गोष्टीच्या गोष्टीची गोष्ट ' हे नाटक खूप चर्चेत होतं, या नाटकाचे अनेक प्रयोग झाले होते. त्यानिमित्ताने नाटक, त्याची प्रक्रिया इ. बद्दल जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक नाट्यसंस्था एकत्र येत होत्या. या चळवळीत चाळीसगावचे हे डॉक्टर आणि त्यांच्यासोबत जोडले गेलेले कलाकार सहभागी झाले. त्याचा खूप फायदा सगळ्यांना झाला. एखाद्या नाट्यसंस्थेची निर्मिती कशी करावी, नाटक कसं बसवावं, त्यात येणाऱ्या अडचणी कशा सोडवाव्यात या सगळ्या गोष्टींचा वस्तुपाठच त्यांना या ठिकाणी मिळाला. नाटक बसवणं, दिग्दर्शित करणं या गोष्टींसोबतच आपल्याला नाटक आवडीनं पाहणारा प्रेक्षकही तयार करायला हवा याची जाणीव त्यातून झाली. समोर जाणकार रसिक प्रेक्षक असेल तरच या श्रमांचं चीज होईल हे लक्षात आलं. त्यातूनच मग चाळीसगावची ' रंगगंध कलासक्त न्यास ' ही संस्था आकाराला आली. या संस्थेचं हे रोपटं लावण्यात डॉ करंबेळकर यांच्यासोबतच सहभागी होते चाळीसगावातील एक रसिक आणि ज्येष्ठ नाट्यकर्मी अशोक अडावदकर, डॉ. च्या सौ. डॉ मीनाक्षी करंबेळकर. हळूहळू हे रोपटं रुजलं आणि बहरलं. ते वाढवण्यात अनेक स्थानिक कलाप्रेमींनी सुद्धा हातभार लावला.

रंगगंधच्या निर्मितीत प्रतिमा घाटे, डॉ. पुष्कर घाटे, डॉ. समिता घाटे, शैलेन्द्र मराठे, प्रशांत कोतकर, संजय चौधरी, जयराज भालेराव, दिनेश जोशी, प्रदीप पगारे, जितेश पोतदार, यशराज काळे, तुषार मुजुमदार, पद्मजा खराडे. किरण लद्दे, मेघा बक्षी, विकास शुक्ल, अभिषेक कासोदे, दिग्विजय मगर, निनाद पाठक, चेतन चौधरी, सिद्धेश खैरनार, रजनी आर्य, अदिती राजपूत, प्राजक्ताअमृतकार असे कलाकार जोडले गेले तर सक्रिय कार्यकर्ते म्हणून प्रकाश कुलकर्णी, विश्वास देशपांडे,राजेंद्र चिमणपुरे, प्रवीण अमृतकार, शालिग्राम निकम, रमेश पोतदार, सुजीत माळी, अविनाश सोनवणे, रवी शिरूडे असे कार्यकर्ते जोडले गेले. या सगळ्यांचंच योगदान ' रंगगंध ' च्या विकासात आहे. २०१६ मध्ये रंगकर्मींची शिखर संस्था असणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाट्यसंस्था म्हणून ' रंगगंधचा ' गौरव केला. 

या सगळ्यांच्या सहकार्यानं सुरु झाली ' वार्षिक प्रेक्षक सभासद योजना. ' वर्षभरासाठी अत्यंत माफक शुल्क घेऊन रंगगंधने चाळीसगावच्या प्रेक्षकांना अनेक व्यावसायिक प्रथितयश नाटकांसह अनेक दर्जेदार प्रायोगिक नाटके, संगीताचे आणि सांस्कृतिक कार्यक्रम अनेक वर्षे सलगपणे दिले. चाळीसगावच्या प्रेक्षकांना बघायला क्वचितच मिळाले असते असे कलाकार आणि त्यांचे दर्जेदार सादरीकरण अगदी समोर बसून अनुभवायला मिळाले.  त्यातूनच कला आणि सांस्कृतिक दृष्ट्या चाळीसगाव अधिक समृद्ध झालं. चाळीसगावच्या सांस्कृतिक इतिहासात रंगगंध नावाचा मानाचा तुरा खोवला गेला. 

एवढ्यावर थांबतील तर ते डॉ करंबेळकर कसले ? मुलांना, शिक्षकांना नाट्यप्रशिक्षण द्यावे, त्यांचे व्यक्तिमत्व अधिक समृद्ध करावे, कलेविषयीच्या जाणिवा समृद्ध कराव्यात या हेतून अथक परिश्रमातून आणि पाठपुराव्यातून त्यांनी चाळीसगावला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची मान्यता असलेला नाट्यशास्त्राचा कोर्स सुरु केला. त्यातून अनेक यशस्वी विद्यार्थी, व्यावसायिक आणि कलाकार घडवले. नाट्यशास्त्राच्या अभ्यासातून केवळ नाट्यविषयक जाणिवाच नव्हे तर आपले संपूर्ण व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होते, आपण ज्या कोणत्याही क्षेत्रात काम करत असू, त्या क्षेत्रात अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतो याची अनुभूती हा नाट्यशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना मिळाली. हे प्रशिक्षण देण्यासाठी चाळीसगावात समर नखाते, प्रभाकर भावे, अतुल पेठे, शुभांगी दामले, चिन्मय केळकर, यादव खैरनार, शशिकांत बऱ्हाणपूरकर, लक्ष्मीकांत धोंड यासारखे मान्यवर येऊन गेले. 

कोरोना काळातही रंगगंधने विविध उपक्रम सुरूच ठेवले. दर रविवारी विविध प्रकारचे ऑनलाईन कार्यक्रम घेतले गेले. त्यात चित्रकला, गायन, नाटक, संगीत नाटके, कथाकथन, मुलाखती आदींचे आयोजन करून त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींना सह्भागी करून घेतले गेले. यात काही वेळा परदेशातील मंडळी देखील सहभागी झाली. या काळातील हे सगळे व्हिडीओ यु ट्यूबवर रंगगंध कलासक्त न्यासच्या चॅनलवर उपलब्ध आहेत. 

संस्थेची आश्वासक पाऊले दमदारपणे पडतच होती. दरवर्षी नियमाने सुरु असलेला  मराठी साहित्य अभिवाचन महोत्सव ' कोरोनामुळे होऊ शकला नव्हता. ज्येष्ठ नाटककार आणि दिग्दर्शक स्व. पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे नाव या अभिवाचन महोत्सवला देण्यात आले आहे. या महोत्सवामुळेच रंगगंध आणि चाळीसगावचा लौकिक सर्वदूर पसरला. कमळाकडे भ्रमर आकर्षित व्हावे तसे साहित्याचे रसिक, नात्याची, वाचनाची आवड असणारे भ्रमर मग चाळीसगावला साहित्य अभिवाचनाच्या निमित्ताने रुंजी घालू लागले. सुरुवातीला खान्देश स्तरावर सुरु केलेला हा अभिवाचन महोत्सव पाहता पाहता राज्यभर लोकप्रिय झाला. पुढे तर त्याने राज्यांची सीमा ओलांडली आणि या अभिवाचनात इंदूर, भोपाळ, अहमदाबाद, बडोदा, हैदराबाद, गोवा, बेळगाव आदी ठिकाणांचे संघ सामील होऊ लागले. एकदा तर चक्क दुबईहून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेशिका आली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चाळीसगावचे नाव या अभिवाचन महोत्सवाने नेले. कोरोनाचा धोका कमी झाला आणि पुन्हा हा महोत्सव म्हणजेच या अभिवाचन स्पर्धा पुन्हा एकदा दिमाखात सुरु झाल्या. 

कशासाठी हा अभिवाचन महोत्सव ? कशासाठी या स्पर्धा ? श्रोत्यांना वाचनाची नाट्यपूर्ण अनुभूती देणं म्हणजे अभिवाचन. वाचनातून म्हणजे वाचिक अभिनयातून साहित्यातील जाणिवा श्रोत्यांपर्यंत पोहोचवणे म्हणजे अभिवाचन. अभिवाचन ही अशी गोष्ट आहे की ती वाचणाऱ्याला आणि ऐकणाऱ्यालाही समृद्ध करते. नाट्यात्म अनुभूती देते. या अभिवाचन स्पर्धेत दोन ते पाच जणांचा संघ सहभागी होऊ शकतो. कुठलीही नाट्यात्म अनुभूती देणारी २५ ते ३० मिनिटांची संहिता त्यांनी निवडायची. ती दिग्दर्शित करणारा एखादा दिग्दर्शक असावा. अमुकच एक संहिता आपण का निवडली, त्यातून आपण श्रोत्यांना कोणता संदेश देऊ इच्छितो याचेही स्पष्टीकरण संस्थेतर्फे मागवले जाते. नवीन लेखकांना उत्तेजन मिळावे म्हणून स्वलिखित दर्जेदार संहितांना स्पर्धेत पारितोषिक देण्यात येते. हा अभिवाचन महोत्सव म्हणजे मायमराठीच्या विकासात संस्थेने दिलेले मोठेच योगदान आहे. 

विविध प्रमुख शहरांमध्ये या स्पर्धेची प्राथमिक फेरी घेतली जाते. त्यात एक स्थानिक आणि एक बाह्य असे दोन परीक्षक काम पाहतात. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांचा संघ मग अंतिम फेरीसाठी चाळीसगावात येतो. यावर्षी तब्बल १६० संघ या प्राथमिक फेरीत सहभागी झाले होते. हे या स्पर्धेचे मोठेच यश म्हणावे लागेल. त्यातून २८ संघांची निवड अंतिम फेरीसाठी झाली. २५ संघांनी या स्पर्धेसाठी उपस्थिती दिली. या वेगवेगळ्या संघांनी खूप विविध विषय हाताळले. विषयांचे वैविध्य, सादरीकरणातले नावीन्य, सहजता, उत्स्फूर्तता या सगळ्या गोष्टींमुळे उपस्थित रसिकांना उत्तम आणि सकस मराठी साहित्याची मेजवानी मिळाली. काय वाचावे, कसे वाचावे याबरोबरच लेखन कसे करावे, सादरीकरणासाठी कोणती संहिता निवडावी, सादरीकरण कसे करावे याचा वस्तुपाठच या स्पर्धेने स्पर्धकांना आणि उपस्थितांनाही दिला. 

या अभिवाचन महोत्सवाच्या निमित्ताने रंजन आणि अविष्कार दारव्हेकर, डॉ गिरीश ओक, आरती आपटे, वीणा देव, अशोक शिंदे, श्रीकांत मोघे, श्याम पेटकर, राजन खान, गिरीश पतके ही मंडळी चाळीसगावला येऊन गेली. या महोत्सवाला प्रमोद लिमये, चंद्रकांत मेहेंदळे आणि शुभांगी दामले दरवर्षी न चुकता हजेरी लावत असत. 

या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे अभिवाचन ऐकण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उपस्थित असणारा गट. या वेळी दोन शाळातील दहा दहा विद्यार्थ्यांचे तीन गट उपस्थित होते. त्यांच्यातही स्पर्धा ठेवण्यात आली होती. परीक्षकांच्या निकालाशी मिळतेजुळते समीक्षण लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटाला बक्षीस होते. प्रत्येक सादरीकरण ऐकून त्यांनी वहीत आपली समीक्षा लिहायची होती. उत्कृष्ट समीक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटाला पारितोषिक होते तसेच प्रत्येक सादरीकरणानंतर विद्यार्थ्यांना त्यावर आपले मत व्यक्त करण्याची संधी दिली जात होती. उपस्थित तीन परीक्षकांची प्रतिक्रिया, विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया आणि श्रोत्यांची प्रतिक्रिया अशी मनमोकळी चर्चा खुल्या वातावरणात होत होती. अर्थात परीक्षक देणार असलेल्या निकालाशी त्याचा संबंध नव्हता. त्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया होत्या. विद्यार्थ्यांच्या या स्पर्धेतील सहभागाने एकूणच स्पर्धेची रंगत वाढली. इयत्ता आठवी नववीच्या विद्यार्थ्यांची विषयाची समज आणि प्रगल्भता पाहून उपस्थितांनाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहिले नाही. परीक्षक देखील या विद्यार्थ्यांवर खुश होते. या वर्षी उत्कृष्ट समीक्षण केल्याबद्दल डॉ काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाले. 

या स्पर्धेत सांघिक पारितोषिके, वैयक्तिक दिग्दर्शन, वैयक्तिक वाचिक अभिनय, सर्वोत्कृष्ट संहिता लेखन आदी पारितोषिके देण्यात आली. सांघिक बक्षीसातील प्रथम पारितोषिक श्री साईनाथ बालक मंदिर या संस्थेच्या शिक्षिकांनी सादर केलेल्या ' वसा वारीचा ' या सादरीकरणाला मिळाला. दुसरे बक्षीस ' बाईच्या कविता ' या अखिल भारतीय नाट्य परिषद, मलकापूर, अकोला शाखेने पटकावले. आकांक्षा क्रिएशन्स कल्याण या संस्थेने ' अनुभूती ' या सादरीकरणाला तिसरे पारितोषिक मिळाले. उत्तेजनार्थ पहिले व दुसरे अनुक्रमे इरसाल स्टोरी टेलर्स यांच्या ' पायथ्यागोरसचे प्रमेय ' आणि गाभा, ठाणे यांच्या ' जॅक आणि जिल ' यांना मिळाले. सर्वच संघांचे सादरीकरण उत्तम होते. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अविनाश कोल्हे, मुंबई, मानसी देशमुख, नाशिक आणि अजय धवणे, चंद्रपूर यांनी काम पाहिले. समारोपाच्या कार्यक्रमासाठी पुणे येथील ज्येष्ठ रंगकर्मी डॉ प्रदीप वैद्य उपस्थित होते. गेल्या काही वर्षांपासून पुण्यात स्थायिक असलेले अशोक अडावदकर या स्पर्धेच्या आयोजनात मदत करण्यासाठी दरवर्षी चाळीसगावला येतात. 

स्पर्धकांच्या राहणे, जेवण आदींची व्यवस्था उत्तम होती. स्पर्धेने सर्वांनाच एक उत्तम आणि समृद्ध असा अनुभव दिला. इथे आलेल्या स्पर्धकांनी आणि मान्यवरांनी स्पर्धेचे आयोजन, व्यवस्था आणि चाळीसगावकरांबद्दल  गौरवोद्गार काढले. जेव्हा जेव्हा चाळीसगावचा सांस्कृतिक इतिहास लिहिला जाईल, तेव्हा तेव्हा ' रंगगंधचे ' नाव त्यात अग्रभागी असेल हे नक्की. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

०३/०३/२०२३

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...