उगवतीचे रंग
परिस्थितीच अशी आहे
परिस्थितीच अशी आहे, कविता म्हणावी की न म्हणावी
घडी अशी आहे की गाणी गावी किंवा न गावी
माणुसकीच्या सरोवरातले प्रेमजलं आता आटत चालले आहे
प्रेमजलावर फुलणारी कमळे आता खुरटताना दिसत आहेत
स्वार्थाच्या तुफानात आशेचा नंदादीप फडफडतो आहे
घडी अशी आहे की आस तरी कोणाची धरावी ।। १ ।।
काल परवाच थोडा थोडा पाऊस पडला होता
आशेचा डोंगर हिरव्या रंगाने खुलला होता
काळ्या निळ्या डोहाच्या तळाशी अपार माया होती
प्रेमाच्या स्पर्शाने पुलकित झालेली काया होती
कुठून तरी हवेपणाचे दाहक ऊन पडले
हिरवे झालेले डोंगर पुन्हा बोडके दिसू लागले
तळ्यातले प्रेम, माया सुकून गेली
सगळेच झाले कोरडे तर आशा तरी कोणाची धरायची ।। २ ।।
पण गाणे तर गायचेच आहे, कविता तर म्हणायचीच आहे
तुफानात फडफडणाऱ्या नंदादीपाला तेवत ठेवायचे आहे
वातीच्या अवतीभवती निर्धाराची काच संरक्षण म्हणून ठेवायची आहे
ज्योत आता तेवत राहील, तुफानाची भीती नाही
उघड्या बोडक्या डोंगरावर पुन्हा प्रेमजलाचा वर्षाव करायचा आहे
कोरडे झालेले तळेही काठोकाठ भरून टाकायचे आहे
प्रेमासाठी तहानलेल्या जीवांना अपार माया, प्रेम द्यायचे आहे
माणुसकीच्या सरोवरातील सुकलेली कमळे मग फुलू लागतील
कविता होऊन शब्द ओठांवर पिंगा घालू लागतील
कवितेचे होईल मग सुरेख असे गाणे
म्हणून म्हणतो काही झाले तरी
कविता म्हणायचीच आहे, गाणे गायचेच आहे. ।। ३ ।।
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१८/०१/२०२३
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया कविता नावासहित अग्रेषित करावी )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा