उगवतीचे रंग
कृतज्ञता
माझ्या उगवतीचे रंग या सदराचे विविध विषय असतात हे आपण जाणत. आजचे उगवतीचे रंग मात्र कृतज्ञतेच्या रंगात रंगलेले आहेत. माझ्या जीवनात नुकत्याच घडून गेलेल्या एका घटनेच्या निमित्ताने मी ही कृतज्ञता व्यक्त करतो आहे. खरं तर आजचा लेख हा नेहमीप्रमाणे एखाद्या विशिष्ट विषयावर लिहिलेला लेख नाही तर या घटनेच्या निमित्ताने मी तुमच्याशी साधलेला मनमोकळा संवाद आहे. माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवाव्या इतकाच हेतू या लेखनाचा आहे. आपल्या मनातील गोष्टी एखाद्याला सांगितल्या की जसे आपल्याला मोकळे वाटते तीच भावना यामागे आहे.
लेखनाच्या निमित्ताने माझी शेकडो व्यक्तींशी जिव्हाळ्याची नाती जोडली गेली. लेखकआणि वाचक एवढीच ती मर्यादित राहिली नाहीत. ही नाती रक्तापलीकडची आणि प्रसंगी रक्ताच्या नात्यापेक्षाही बळकट असणारी असतात याचा अनुभव मी घेतला आहे, घेतो आहे.
प्रसंग आहे २ डिसेंबर २०२२ चा. मी नाशिकला एका मुंजीच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. तो कार्यक्रम आटोपून मी आणि माझी सौ. श्रद्धा असे आम्ही दोघे कारने चाळीसगावकडे परत येण्यासाठी निघालो. आम्ही निफाड, लासलगाव, मनमाड मार्गे चाळीसगावला येत होतो. मनमाड येथे राहणाऱ्या डॉ वसुधा डोंगरगावकर यांचे माझे लेखनाच्या निमित्ताने संबंध आले. क्वचित आमचे फोनवर संभाषण होत असे. माझ्या लेखांना त्यांच्याकडून अभ्यासपूर्ण अशी प्रतिक्रिया येई. त्या त्यांचेही लेख मला पाठवत. मध्यंतरी त्यांनी गायिलेली काही गाणी देखील मला पाठवली होती. वसुधाताईंची प्रत्यक्ष कधी भेट झालेली नसली तरी आम्हाला एकमेकांची कधीतरी भेट व्हावी असे वाटत होते. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदराचे स्थान होते. त्या दिवशी मला वेळ असल्याने मी त्यांना भेटायला जाण्याचा विचार केला. पण ती दुपारची वेळ असल्याने त्यांच्याकडे अशा अवेळी जाणे मनाला योग्य वाटत नव्हते. त्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला. पण वसुधाताईंनी याच म्हणून आग्रह केला आणि आम्ही त्यांच्याकडे जाण्याचे ठरवले.
त्यांच्या घराचा पत्ता त्यांनी सांगितला होता पण आम्हाला ते गाव तसे अपरिचित असल्याने आम्ही त्यांनी सांगितलेल्या एका ठिकाणी थांबलो. त्यांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या एका व्यक्तीला आम्हाला घेण्यासाठी पाठवले. तो पुढे आणि त्याच्यामागे आमची गाडी असे आम्ही जाऊ लागलो. गाडी अगदी हळू होती. त्याच सुमारास माझ्या बाजूने एक मुलगा मोटारसायकलवरून पुढे गेला. आमच्या गाडीचा धक्का त्याला लागेल असे वाटल्याने मी ब्रेक दाबला पण अचानक काय झाले ते कळले नाही. अचानक गाडीचा वेग वाढला आणि त्या बाईकस्वाराला गाडीने जोरदार धक्का दिला. बहुधा माझा पाय ब्रेकऐवजी चुकून अक्सिलेटरवर गेला असावा. मी त्या बाइकस्वाराला वाचवण्यासाठी अजून जोराने ब्रेक दाबला पण हायरे दैवा गाडीचा वेग अजूनच भयानक वाढला आणि मी पुढील दुर्घटना टाळण्यासाठी गाडी जोराने डाव्या बाजूला वळवली. मला काही कळण्याच्या आतच धाडकन आवाज झाला. जोराचा धक्का बसला. गाडी कशाला तरी जोरात धडकली होती. गाडीत एक क्षण धूर आणि जळका वास येऊ लागला. तो क्षण इतका भयकंर होता की आम्हाला वाटले बस आता सगळे संपले. हा आपल्या आयुष्यातील शेवटचाच क्षण. थोड्याच वेळात आम्ही भानावर आलो. भोवताली गर्दी जमली होती. सुदैवाने गाडीचे दोन्ही दरवाजे उघडले. आम्ही बाहेर आलो. मृत्यूचे दर्शन घेऊन आम्ही जणू बाहेर आलो होतो. गाडीच्या पुढील दोन्ही एअरबॅग्ज उघडल्या गेल्या होत्या. त्यामुळेच आम्ही बचावलो होतो.
गाडी जवळच असलेल्या मंगल कार्यालयाच्या संरक्षक भिंतीला धडकून थांबली होती. गाडीच्या पुढच्या भागाचे बरेच नुकसान झाले होते. गाडीची ती भयानक अवस्था पाहून आम्हालाही प्रचंड धक्का बसला. माझ्या गाडीला मी एक निर्जीव वाहन म्हणून कधीच पाहिले नव्हते. मी कुठूनही लांब जाऊन आलो की तिला स्पर्श करून मला सुखरूप आणल्याबद्दल तिचे मनोमन आभार मानत असे. आजही तिने मला वाचवले होते. माझ्यावरील संकट जणू तिने स्वतःवर घेतले होते. सीटबेल्ट लावल्याने आणि गाडीच्या दोन्ही एअरबॅग्स ओपन झाल्याने आमचे प्राण वाचले होते.
पण झाल्या घटनेचा बसलेला मानसिक धक्का प्रचंड होता. काहीच सुचत नव्हते. लोकांनी आम्हाला खाली बसवले. पिण्यासाठी पाणी आणले. बाईकवरून खाली पडलेल्या मुलाच्या डोळ्याजवळून रक्त वाहत होते. त्याचे वडील आमच्याजवळ येऊन तावातावाने बोलू लागले. त्यांचेही बरोबर होते. पण घडणारी घटना घडली होती. आमच्या हातात काहीच राहिले नव्हते. त्याच वेळी डॉ वसुधाताई आणि त्यांचे यजमान डॉ सुहास डोंगरगावकर त्या ठिकाणी आले. त्यांनी लोकांना शांत केले. चाळीसगाव येथील हे मोठे लेखक आहेत. ते आमचे नातेवाईक आहेत. दुर्दैवाने ही घटना घडली आहे असे सांगून लोकांना शांत केले. आमच्या गाडीतील आमच्या सामानाच्या बॅग्ज त्यांच्या गाडीत टाकल्या आणि आम्हाला घेऊन सरळ डॉ अजय भन्साळी यांचे सिद्धार्थ हॉस्पिटल गाठले. डॉ अजय यांना त्यांनी आधी फोन केल्यामुळे ते आणि त्यांचा स्टाफ तयारच होता. गेल्याबरोबर लगेच त्यांनी आमचे ब्लडप्रेशर, कुठे लागले याची चौकशी केली. आम्हाला कोणतीही काळजी करू नका असे सांगून धीर दिला. एक्स रे घेतले. सुदैवाने त्यांना कुठे फ्रॅक्चर आढळले नाही. मुका मार मात्र आम्हाला दोघांनाही लागला होता. त्यावर उपचार करून धनुर्वाताचे वगैरे इंजेक्शन देऊन काही औषधे लिहून दिली. मला मान, पाठ आणि सौ ला कमरेच्या भागाला मार लागला होता. हे सगळे होईपर्यंत डॉ सौ निधी यांनी आमच्यासाठी कॉफी करून आणली. तुमचे लेख आमच्या डॉक्टरांच्या ग्रुपवर येतात, आम्ही ते वाचतो. तुम्ही खूप छान लिहिता असे डॉ अजय, डॉ सुहास आणि डॉ सौ निधी यांनी सांगितले.
डॉ वसुधाताई आणि त्यांचे यजमान हे नेत्रतज्ज्ञ. त्यांनी त्या बाईकवर जखमी झालेल्या मुलाच्या डोळ्यावर उपचार केले. आम्हा दोघांना ते आपल्या घरी घेऊन गेले. डॉ सुहास यांच्या मातोश्री घरी होत्या. आम्ही घरी गेल्यावर परमेश्वराचे आभार मानले. देवाला आणि डॉ च्या आईंना नमस्कार केला. तेवढ्या वेळात डॉ सुहास यांनी विविध ठिकाणी फोन करून माझी गाडी टो करून मालेगावच्या सर्व्हिस सेंटरमध्ये नेण्याची व्यवस्था केली. याच सुमारास या अपघाताचे वृत्त कळल्याने तेथील नगरसेवक श्री केकाणे आणि इंजिनिअर श्री लाळे हे आम्हाला भेटायला आले. त्यांचीही सगळ्या गोष्टीत खूप मदत झाली. डॉ सुहास यांनी स्वतः माझ्या पाठीला स्प्रे मारून दिला. नाकावरील झालेल्या छोट्याशा जखमेची मलमपट्टी केली. थोडा वेळ आराम करण्यास सांगितला. मी थोडा वेळ पडलो असताना डॉ सौ वसुधाताईंनी माझ्या अंगावर मायेची ऊब देणारी रजई पांघरली. डॉ. कडे काम करणारे भगवान, धनंजय, लोकेश आदी मंडळींनी पण अतिशय प्रेमाने आम्हाला सगळी मदत केली. वसुधाताई आणि डॉ सुहास आम्हाला आता एकदोन दिवस येथेच राहा, विश्रांती घ्या आणि मग चाळीसगावला जा असे सांगितले. आम्ही आमची गाडी आणि ड्रायव्हर देऊन तुम्हाला तेथे सोडून देऊ असे सांगितले. त्यांचा तो अकृत्रिम जिव्हाळा पाहून मन भरून येत होते. देवाला तर मी प्रत्यक्ष पाहिले नव्हते पण या माणसांच्या रूपाने त्यानेच दर्शन देऊन साहाय्य केले होते.
तोपर्यंत मी फोन करून माझ्या नाशिक येथील धाकट्या भावाला ही घटना कळवली होती. संध्याकाळी माझा तो तेथे आला. त्याच्यासोबत त्याच्या गाडीने आम्ही पुन्हा नाशिकला आलो. नाशिकला आल्यावर पुण्याहून मुलगा,मुलगी, जावई, सून भेटायला आले. त्यांना भेटूनही खूप धीर आला. दुसऱ्या दिवशी नाशिकच्या भावाने आम्हाला चाळीसगावला त्याच्या गाडीने पोहोचवून दिले.
घडणारी घटना घडून गेली होती. गाडीला धक्का बसला होता तसा मनालाही धक्का बसला होता. मुक्या माराने अंग ठणकत होते. झाली घटना डोळ्यापुढून जात नव्हती. मन सुन्न झाले होते.पण घडलेली घटना खूप काही शिकवून गेली. त्या घटनेने माणसातील परमेश्वराचा प्रत्यय आणून दिला. वसुधाताईंचे आणि माझे बहीण भावाचे नाते दृढ झाले. रक्तापलीकडील नात्याचा प्रत्यय परमेश्वराने आणून दिला होता. ऋणानुबंध असल्याशिवाय अशा गोष्टी होत नाहीत हेही अनुभवाने लक्षात आले. पण घरी आलो तेव्हा पाहिले की बागेत सुंदर गुलाबाची फुले फुलली होती. त्या फुलांनी मला सांगितले की अरे जरा आमच्याकडे बघ. आम्ही काट्यांवरच फुललो आहोत. काट्याना घाबरायचे नसते. सगळे विसरून फुलायचे असते. घरात प्रवेश केल्यावर समोरच माझी आवडती पुस्तके दिसली. ती म्हणाली अरे आम्ही आहोत ना.
मग माझ्या काही वाचक मित्रांना ही घटना जसजशी कळत गेली, तसतसे त्यांचे फोन, मेसेज येऊ लागले. ते म्हणाले, ' सर, तुम्हाला काही होऊच शकत नाही. तुम्ही दररोज लोकांना आनंद वाटता आहात.' त्यांच्या या प्रेमाने मी भारावून गेलो. पु ल देशपांडे, मंगेश पाडगावकर, ग दि माडगूळकर, व पु काळेआदी सारस्वतांना अफाट लोकप्रियता मिळाली, लोकांचे प्रेम या मंडळींनी अनुभवले. मी त्यांच्या तुलनेत कुठेच बसत नाही. तुलना करण्याचा प्रश्नच नाही. सांगण्याचा उद्देश एवढाच की त्या मंडळींना रसिकांकडून जे प्रेम अनुभवायला मिळाले त्याचा किंचित का होईना पण अंश माझ्या वाट्याला आला हे माझे भाग्य.
म्हणून मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे कृतज्ञता व्यक्त करतो आहे. कृतज्ञता गाडीची, जिने आमचे संकट स्वतःवर झेलून आमचे प्राण वाचवले. कृतज्ञता डॉ वसुधाताई, डॉ सुहास डोंगरगावकर यांच्याबद्दलची. डोंगरासारखेचे विशाल हृदय असणारी ही माणसे. कृतज्ञता डॉ अजय आणि डॉ सौ निधी यांच्याबद्दल. कोणताही परिचय नसताना एवढे अगत्यपूर्वक उपचार केल्याबद्दल. इंग्रजी शब्दांचा वापर करून सांगायचे झाले तर याठिकाणी ' हॉस्पिटल अँड हॉस्पिटॅलिटी कम्बाइन्ड टुगेदर. ' कृतज्ञता या सगळ्याच प्रसंगात धीर देणाऱ्यांबद्दल. कृतज्ञता तुमच्यासारख्या माझ्या प्रिय वाचकांबद्दल जे माझ्यासमोर नसूनही माझ्यावर प्रेम करतात. सगळ्यात शेवटी कृतज्ञता त्या दयाघनाबद्दल जो चराचरात अस्तित्वात आहे. त्याच्यामुळेच माझेही अस्तित्व आहे.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
६/१२/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा