मुख्य सामग्रीवर वगळा

( सुरेश पंडित यांच्या ' टेक ऑफ ' या कथासंग्रहासाठी ) 

प्रस्तावना 

माझे ज्येष्ठ मित्र आणि साहित्यिक सुरेशजी पंडित यांनी मला त्यांच्या आगामी ' टेक ऑफ ' या कथासंग्रहासाठी प्रस्तावना  लिहिण्याची विनंती केली. मी त्यांना होकारही दिला. सुरेशजी कविता, कथा लेखन करतात हे मला माहिती होते पण त्यांच्या साहित्याशी मी परिचित नव्हतो. त्यांनी मला त्यांची पूर्व प्रकाशित तीन पुस्तके पाठवली. त्यात त्यांचा ' अद्वैत ' हा पहिला कथासंग्रह, ' अगतिक ' हा काव्यसंग्रह आणि ' निर्णय ' या कथासंग्रहाचा समावेश आहे. ' अगतिक ' या काव्यसंग्रहातील कविता वाचताना जाणवले की सुरेशजींचा पिंड हा एका कवीचा आहे. पण त्यांच्या कथा वाचताना त्यांच्यातील सिद्धहस्त कथा लेखकही प्रत्ययाला येतो. कथा आणि काव्य या दोन्ही साहित्याच्या प्रांतात त्यांची लेखणी सहजतेने विहार करते. त्यांच्या कवितेत प्रेमाचे, अगतिकतेचे, नीतिमूल्यांचे, देशप्रेमाचे रंग आहेत. भावनांचा प्रामाणिकपणा आहे, मायेचा ओलावा आहे, प्रेमाची उब आहे. त्यांच्या कथा या विविधरंगी, विविध विषयांवर आहेत. त्यांच्या अनेक कथांमधून आपल्याला त्यांना असणारी गुप्तहेर किंवा साहसी कथांची आवड दिसते. कथेच्या ओघात निर्माण झालेली एखादी समस्या कशी सोडवायची, तिची तर्कसंगत उकल कशी करायची याचे कौशल्य आणि बुद्धिचातुर्य त्यांच्याकडे आहे. याशिवाय त्यांच्या इतर कथांमधून सर्वसामान्य माणसांच्या जीवनात येणाऱ्या समस्यांचे प्रत्ययकारी चित्रण आपल्याला दिसते. 

गोष्टी ऐकणं किंवा गोष्टी वाचणं आवडत नाही अशी व्यक्ती बहुधा कोणी नसेल. आबालवृद्धांपासून सर्वानाच गोष्टी ऐकायला आवडतात. कथालेखन हा त्यातलाच एक प्रकार ! ही कथा काल्पनिक असो की वास्तवात घडलेली, पण ती सांगणं ज्याला जमलं अशा लेखकांच्या कथा वाचक आवडीने वाचतात. आपण रंगमंचावर एखादं नाटक पाहतो किंवा रुपेरी पडद्यावर एखादा चित्रपट पाहतो, ती सुद्धा व्यापक अर्थाने एक प्रदीर्घ अशी कथाच असते. कोणताही कवी किंवा साहित्यिक प्रचलित समाजात येणाऱ्या समस्यांपासून दूर राहू शकत नाही. वर्तमानाचे प्रतिबिंब त्याच्या साहित्यात पडणे हे अपरिहार्य असते. एक व्यक्ती म्हणून कवी किंवा साहित्यिक जीवनातील समस्यांना सामोरा जातच असतो. या समस्यांना सामोरे जाताना विविध भावभावनांचा कल्लोळ त्याच्या मनात उठत असतो. काही गोष्टी त्याला अस्वस्थ करीत असतात. या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या रूपात त्याच्या साहित्यात प्रतिबिंबित होतात. साहित्यिकाच्या अनुभवाची, संवेदनांची कक्षा जेवढी विशाल असेल, तेवढी त्याच्या जाणिवांची कक्षा रुंदावते. ती समृद्धता त्याच्या साहित्यात येत जाते. कथा भलेही काल्पनिक असेल पण कथाकार आपल्या कौशल्याचा वापर करून वास्तव आणि कल्पना यांचा सुंदर मेळ घालतो. अशा कथा वाचताना वाचकांना आपल्याच अनुभवांचा किंवा भावनांचा आपण प्रत्यय घेतो आहोत असा भास होत राहतो. वाचक अशा कथेशी एकरूप होतात. 

सुरेशजी यांना वाचकांना खिळवून ठेवण्याचे अशाच प्रकारचे कौशल्य प्राप्त झाले आहे. त्यांच्या अनेक कथा वेगवेगळ्या दिवाळी अंकातून प्रसिद्ध होऊन वाचकांच्या पसंतीला उतरल्या आहेत. ही त्यांच्या कथांच्या यशस्वितेची पावतीच म्हणायला हवी. कथा एखाद्या घटनेभोवती फिरते किंवा एकाच कथेत अनेक घटनांचाही समावेश असू शकतो. घटना एक असो की अनेक, त्यांना लेखकाने कसा न्याय दिला ही गोष्ट अधिक महत्वाची. कथेतील पात्रे, त्यांचे वर्णन, वागणे बोलणे, स्वभाव हे सर्व लेखक कसे रंगवतो यावर कथेची यशस्विता अवलंबून असते. कोणत्याही महान कथाकाराचे यश त्याने आपल्या कथांमध्ये पात्रनिर्मिती कशी केली यावर जास्त अवलंबून असते. ही कथांमधील पात्रे जरी काल्पनिक असली तरी जेव्हा त्यांचे स्वभावविशेष, वागणे बोलणे जेवढे नैसर्गिक वा वास्तवाशी निगडित असेल तेवढ्या त्या व्यक्तिरेखा वाचकांना जवळच्या वाटतात, आपल्याशा वाटतात. याशिवाय कथांमधील पात्रांचे आपापसातील संवादही कथेच्या यशस्वीतेमध्ये मोलाचा वाटा उचलतात. सुरेशजींच्या कथांमधील संवाद नैसर्गिक आणि कथाविषयाशी सुसंगत वाटतात. त्यात कृत्रिमता किंवा ओढून ताणून ते लिहिले आहेत असे वाटत नाहीत. या सगळ्या गोष्टींचा विचार करताना, सुरेशजी यांच्या कथा बऱ्याच अंशी वरील कसोट्याना उतरतात असे दिसते. यातच त्यांच्या कथांचे यश सामावले आहे असे मला वाटते. 

सुरेशजी यांच्या ' टेक ऑफ ' या कथासंग्रहात सात कथा आहेत. या वेगवेगळा कथाविषय असलेल्या सात कथा म्हणजे जणू सप्तरंगी इंद्रधनुष्य. भैरवी आणि सुशांत यांच्या तरल प्रेमाची कथा यात लेखकाने चितारली आहे. कॉलेजमध्ये एकमेकांच्या वर्गात शिकणाऱ्या भैरवी आणि संगीता या दोन मैत्रिणी. संगीताच्या भावाशी म्हणजे सुशांतशी भैरवीचे प्रेमाचे सूर जुळतात. हे प्रेम फुलत जाते. पण हे प्रेम जणू त्यांची परीक्षा घेते.  त्या दोघांचा आपल्या प्रेमासाठी असणारा त्याग, विरह आणि प्रतीक्षा यातून दिसते. मनाचा मोठेपणा दिसतो. ' टेक ऑफ ' हे फक्त विमानाच्या उड्डाणाशी निगडित नाही. ते भैरवी आणि सुशांत यांच्या आयुष्याशी सुद्धा निगडित आहे. म्हणून हे ' टेक ऑफ ' प्रतीकात्मक देखील आहे.

' रंगबावरी ' कथेत एका गर्भश्रीमंत आणि प्रतिष्ठित घरातील ' शुभ्रा ' या तरुणीची कथा सुरेशजी रेखाटतात. या ' व्हाईट कॉलर ' असलेल्या श्रीमंत बाबासाहेबांचे शुभ्र रंगाचे वेड म्हणजे जणू त्यांच्या प्रतिष्ठेशी निगडित असते. त्याच्याशी कोणत्याच प्रकारची तडजोड करण्याची त्यांची तयारी नसते. पांढरा रंग म्हणजे जणू त्यांच्या सगळ्या मानसन्मान आणि प्रतिष्ठेशी निगडित असतो. त्यांचे हे वेड इतके टोकाचे असते की आपल्या कॉलेजला जाणाऱ्या ' शुभ्रा ' या लाडक्या मुलीला सगळे पांढऱ्या रंगाचेच कपडे ते वापरायला लावतात. शुभ्रा ही जशी कॉलेजला जाणारी आधुनिक तरुणी आहे, तशीच ती सुधारित विचारांची सुद्धा आहे. ती आपल्या बाबांचा हा ' धवल ' रंगाचा भ्रम कसा दूर करते, वास्तवाची जाणीव त्यांना कशा प्रकारे करून देते हे पाहण्यासारखे आहे. गोऱ्या रंगाला महत्व देण्यापेक्षा माणसाच्या कष्टाचा, कर्तृत्वाचा रंग अधिक उठावदार असतो मग तो रंग सावळा असला तरी चालेल हा संदेश जणू या कथेतून शुभ्राच्या माध्यमातून लेखक आपल्याला देतो. 

' आई ' ही कथा अत्यंत हृदयस्पर्शी आहे. शंकर आणि पार्वती हे मोठया कष्टाने उदरनिर्वाह करणारे एक जोडपे. पुढे त्यांना गणेश नावाचा मुलगा होतो.या एकुलत्या एक असलेल्या मुलाचे शंकर खूप लाड करतो तर पार्वती त्याला शिस्त लागावी म्हणून थोडी कठोर होताना दिसते. जीव तोडून प्रयत्न करते. पण शेवटी व्हायचे तेच होते. शंकरच्या लाडामुळे गण्या बिघडतो. आई त्याला नकोशी वाटू लागते. आजाराने शंकरचे देहावसान झाल्यानंतर तर गण्या आणखीनच उनाड बनतो. आईला वाटेल ते बोलतो. खरं तर आई त्याच्या भल्यासाठीच बोलत असते पण गण्या कधीच तिला समजून घेत नाही. गण्याचे असे हे बेताल वागणे आणि त्याच्यासाठी पार्वतीचा तीळ तीळ तुटणारा जीव आपल्या हृदयाला पीळ पाडतो. या कथेला पुढे लेखक वेगळेच वळण देतो. उनाड असणारा आणि अभ्यासात लक्ष न देणारा हा गण्या यशस्वीपणे उद्योगव्यवसायात कसा रमतो, आणि  सगळे झाल्यावर आईच्या प्रेमाचे महत्व शेवटी त्याला कसे पटते हे लेखकाने अत्यंत प्रभावीपणे चितारले आहे. अर्थात आपल्या आईचा त्याग, प्रेम याची जाणीव गण्याला जेव्हा होते, तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते. ही कथा वाचकाला अंतर्मुख करून जाते. 

' दैव जाणिले कुणी ' ही या कथासंग्रहातील पुढील कथा. जुई आणि सौरभ यांची तरल प्रेमकहाणी लेखकाने यात रंगवली आहे. सुरेशजी यांच्या कथांना एक प्रकारचा वेग आहे, गती आहे. कथा जसजशी पुढे जात राहते, तसतसा वाचकही त्या कथेच्या प्रवाहात वाहत जातो. कथा कुठेही रेंगाळत नाही, संथ होत नाही. ही कथा जुईच्या जन्मापासून तो तिच्या विवाहनिश्चितीपर्यंत आपल्याला सोबत घेऊन जाते. पण विवाह होण्यापूर्वीच एक अनपेक्षित घटना घडते. सौरभच्या गाडीला अपघात घडतो. पुढे काय होते, सौरभ वाचतो का, परत येतो का या उत्सुकतेपोटी आपण कथा वाचत जातो. सौरभचे काय नेमके काय होते यासाठी ही कथा संपूर्ण वाचायलाच हवी. जयंत, जान्हवी, सौरभ आदी पात्रांचे भावबंध लेखकाने छान रेखाटले आहेत. कथेचा शेवट लेखकाने असा काही केलाय की कथेचे ' दैव जाणिले कुणी ' हे नाव अगदी सार्थ वाटते. 

या कथासंग्रहातील पुढची कथा ' सापळा ' ही आहे. या कथेतील रवींद्र आणि रश्मी या गुणी आणि देखण्या जोडप्याला लग्नाला पाच वर्षे होऊन गेली तरी आपल्याला मूल होत नाही याची खंत असते. रवींद्र हा आपल्याला संतती हवी म्हणून एका भोंदू बाबाच्या नादी लागतो पण त्याचे नशीब बलवत्तर म्हणून तो त्या भोंदूबाबाच्या सापळ्यात अडकण्यापासून वाचतो. त्या भोंदू बाबाचे पुढे काय होते, रश्मीला पुढे मूल होते का हे कथा वाचल्यानंतर आपल्याला समजेलच. पण कथेच्या माध्यमातून लेखक आपल्याला एक महत्वाचा संदेश देतो. अंधश्रद्धा, बुवाबाजी इ च्या नादी न लागता आपण आता आधुनिक विज्ञानाची, शोधांची कास धरावी. नाहीतर आपल्याला फसवण्यासाठी असले भोंदूबाबा जागोजागी सापळे लावून बसलेच आहेत ! 

' पेराल तसे उगवते' आपण जसे कर्म करू तसे फळ मिळते हा संदेश आपल्याला ' कर्मफल ' ही कथा देते. व्यसन, वाईट संगत, पापाचरण यासारख्या गोष्टींचा परिणाम वाईटच होतो हे लेखक या कथेतून प्रभावीपणे दाखवतो. शेवंता, शिवा हे कष्ट करून उदरनिर्वाह करणारे जोडपे. शांताराम नावाचा एकुलता एक मुलगा त्यांना असतो. शिवा पुढे दारूच्या आहारी जातो. संसाराची वाताहत होते. एक दिवस दारूच्या अतिआहारी गेलेल्या शिवाचा मृत्यू होतो.  त्याला दारूचे व्यसन लावणाऱ्या शिवाप्पा आणि त्याच्या मुलाला नियती त्यांच्या कर्माचे कसे फळ देते हे मुळातून वाचण्यासारखे आहे. वाईट वागणारी, गैरमार्गाने पैसा कमावणारी माणसे आज जरी सुखी दिसत असली तरी कधी कधी ना त्यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळणारच असते. हीच त्यांची नियती असते. 

' पराभूत ' ही या कथासंग्रहातील शेवटची कथा आहे. यात एका कथालेखकाची कथा आपल्याला वाचायला मिळते. एक प्रथितयश आणि मोठमोठया कथा लिहिणारा हा लेखक असतो. पण एक वेळ अशी येते की त्याला एक छोटीशी कथा देखील लिहिता येत नाही. असे का होते हे समजून घेण्यासाठी ही  कथा आपल्याला वाचावी लागेल. पती पत्नीच्या नात्यातील कंगोरेही या कथेत लेखकाने छान रेखाटले आहेत.पण कुठल्याही गोष्टीत किंवा अगदी आयुष्यातही यशस्वी व्हायचे असेल तर फाजील आत्मविश्वास घातक ठरतो. शिवाय दैवी कृपेची देखील आवश्यकता आपल्या जीवनात असते. त्याशिवाय आयुश्यात एक पाऊलही पुढे टाकता येणार नाही. एखाद्या लेखक किंवा कवीवर जर सरस्वतीची कृपा असेल, दैवी वरदहस्त लाभलेला असेल तर तो अक्षर वाङ्मय निर्मिती करू शकतो. 

आधीच्या तीन पुस्तकांप्रमाणेच या कथासंग्रहालाही वाचकांचा उत्तम प्रतिसाद नक्कीच मिळेल याची खात्री वाटते.  सुरेशजींच्या हातून अशाच उत्तमोत्तम कथा आणि कविता लिहिल्या जाव्यात आणि वाचकांना वाचायला मिळाव्यात अशी इच्छा व्यक्त करतो. पुस्तकाच्या नावाप्रमाणेच सुरेशजींचे साहित्य विश्वातील विमान पुढील वाटचालीसाठी ' टेक ऑफ ' घेऊन गतिमान व्हावे ही शुभेच्छा ! 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...