उगवतीचे रंग
गाथा एका शूरवीराची
मागील सप्टेंबर महिन्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला. हा कार्यक्रम नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे होता. हा कार्यक्रम बऱ्याच अर्थाने आगळावेगळा होता. ज्यांनी हे पुस्तक लिहिलं त्या श्रीमती कालिंदी हिंगे या आता सुमारे ८५ वर्षांच्या आहेत. कालिंदीताई या राज्य सरकारच्या ' आदर्श पुरस्कारप्राप्त ' मुख्याध्यापिका आहेत. त्यांचं हे पहिलंच पुस्तक आहे ' क्रांतिसूर्य हेमंत लक्ष्मण सोमण ' या नावाचं. हेमंत सोमण हे कालिंदीताई हिंगे यांचे बंधू. गोवा मुक्तीसाठी आपलं आयुष्य झोकून देणाऱ्या या शूरवीराच्या आयुष्याचा प्रेरणादायी पट या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतो. या वयात सगळे संदर्भ मिळवणं , ते सगळे तारीखवार जुळवणं आणि त्या सगळ्यांना एका प्रेरणादायी चरित्राचं रूप देणं हे शिवधनुष्य कालिंदिताईंनी या वयात पेलणं हे सगळंच अद्भुत आणि आश्चर्यकारक ! अर्थात या कामात त्यांना त्यांच्या कुटुंबीयांची मोलाची मदत झाली. खरं तर या वयात कोणी काही लिहिण्याचा ध्यास घेत नाही. समजा कोणाच्या मनात तशी कल्पना आलीच तर कुटुंबीयच अशा व्यक्तीला अशा विचारापासून परावृत्त करतात. ' या वयात कशाला हे उद्योग करायचे ? जमणार आहे का तुला ? ' असे काही न म्हणता हिंगे कुटुंबीयांनी कालिंदीताईना प्रोत्साहनच दिले. कालिंदाताईंची कन्या चारुताई आणि मुलगा ऍड धनंजय यांनी आपल्या आईला हे चरित्र लिहिण्यासाठी सक्रिय पाठिंबा दिला.
' क्रांतिसूर्य हेमंत लक्ष्मण सोमण ' हे पुस्तक वाचताना आपण अंतर्बाह्य थरारून जातो. ' स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यांसाठी मेलास तर जगलास ' असं म्हटलं जातं. हेमंत सोमण यांची क्रान्तिगाथा अशीच प्रेरणादायी आहे. ठरवलं असतं तर हेमंत स्वतःसाठी ऐषारामाचं जीवन जगू शकले असते. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत हा शंभर नंबरी सोन्याचा दागिना घडला होता. प्रतिकूल परिस्थितीच्या आगीत भाजून निघाल्यानंतर हे सोने आणखीनच उजळून निघाले.
नुकताच आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. देशाला ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्या त्यागाची फळे स्वातंत्र्याच्या रूपाने आज आपण चाखत आहोत. या सगळ्या देशभक्तांचे, शूरवीरांचे बलिदान, त्याग यांचे स्मरण यानिमित्ताने ठेवणे हे आपले परमकर्तव्य ! या स्वातंत्र्ययज्ञात अनेकांच्या आयुष्याच्या समिधा अर्पण केल्या गेल्या. त्यातले काही आपल्याला माहिती असतात तर काहींचे योगदान अज्ञात असते. अशाच तेजस्वी देशभक्तांपैकी हेमंत सोमण हे एक नाव ! आजच्या पिढीला फारसे परिचित नसलेले. पण त्यांच्या या महान कार्याचा परिचय करून दिला त्यांच्या भगिनी कालिंदिताईंनी. योगायोगाने २०२२ हे वर्ष म्हणजे हेमंत सोमणांची जन्मशताब्दी. या पुस्तकाच्या रूपाने एका बहिणीने भावाला वाहिलेली ही अनोखी आदरांजली आहे.
सरदार पटेलांनी जरी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतात अनेक संस्थाने विलीन केली तरी पुदुचेरी ( पूर्वीचे पॉण्डेचेरी ) हे राज्य फ्रेंचांच्या ताब्यातून भारतात १९५४ मध्ये विलीन झाले. गोवा, दीव आणि दमण हे भारतात विलीन होण्यासाठी मात्र भारतीयांना १९६१ पर्यंत वाट पाहावी लागली. गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. त्यापूर्वी भारत सरकारने तेथे लष्कर पाठवून कारवाई केली असती तर गोवा कधीच भारतात विलीन झाला असता आणि त्यासाठी ज्या ज्या देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली ती द्यावी लागली नसती. तत्कालीन पंतप्रधान पं नेहरू यांनी ती कारवाई करण्याचे टाळले. कदाचित ' शांतिदूत ' अशी प्रतिमा असणाऱ्या पंडितजींच्या स्वभावाला ते मानवले नसावे. पण गोवा भारतात सामील व्हावे ही सगळ्याच भारतीयांच्या मनातील सुप्त इच्छा होती. भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी ते आवश्यकही होते. भारताला स्वातंत्र्य मिळूनही गोवा भारतात सामील व्हायला उशीर का ? भारत सरकार कारवाई का करत नाही ? हा सल हेमंतच्या मनात होता. गोवा मुक्तीसाठी आपल्या प्राणांची बाजी लावण्याचे या बहाद्दराने मनोमन ठरवले होते.
हेमंत मूळचा नाशिकचा. वडील ध्येयवादी शिक्षक. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थापकांपैकी एक. तो काळ देशभक्ती, देशप्रेमाने भारलेला होता.लक्ष्मणराव सोमणही याच ध्येयवादाने प्रेरित होऊन उज्वल राष्ट्रीय चारित्र्य आणि देशभक्तीने प्रेरित झालेले विद्यार्थी घडवावे म्हणून प्रयत्नशील होते. त्याच उद्देशाने त्यांनी शाळेची स्थापना करून शिक्षण प्रसाराचे कार्य केले. घरातील संस्कार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार यामुळे हेमंतचे उज्ज्वल चारित्र्य घडत गेले आणि एका सुसंस्कृत, संपन्न अशा व्यक्तिमत्वाला आकार मिळाला. पाहताक्षणीच छाप पडावी असे हेमंताचे व्यक्तिमत्व होते. सहा फूट उंची, गौरवर्ण, सुदृढ आणि रेखीव शरीरयष्टी, पाणीदार डोळे आणि हसतमुख चेहरा असलेला हेमंत उत्तम लोकसंघटक होता. त्याचे वागणे, बोलणे समोरच्या व्यक्तीला लगेच प्रभावित करीत असे. व्यायाम आणि खेळांची आवड असल्याने त्याचा मूळचाच सुदृढ असणारा बांधा आणखी रेखीव बनला होता.
हेमंतला बी कॉम झाल्यावर मुंबईत ' बेस्ट ' मध्ये चांगल्या पगाराची अकाउंटंट म्हणून नोकरी मिळाली. घरात त्याच्या लग्नाचे वारे वाहू लागले. पण ' बेस्ट ' मध्ये काम करण्यात हेमंतला स्वारस्य वाटत नव्हते. देशभक्तीने भारलेल्या हेमंतला ' बेस्ट ' मधील निर्जीव आकडेमोड करण्यापेक्षा काहीतरी वेगळे करण्याची उर्मी मनात दाटून आली होती. भारताला स्वातंत्र्य मिळूनही माझ्या देशाचा एक भाग असलेला गोवा अजून पारतंत्र्यात का याचा सल त्याचा मनात होता. आता मनात निश्चय झाला होता. ' बेस्ट इज नो लॉंगर बेस्ट. चलो गोवा. '
एका सहल कंपनीच्या जाहिरातीप्रमाणे ' चलो बॅग भरो और निकल पडो ' अशी हेमंतने बॅग भरली आणि तो तडक पणजीला आला. अर्थात तो गोव्याला काही सहलीला आला नव्हता. त्याचे ध्येय वेगळेच होते. त्याला ते सगळ्यांसमोर उघडही करायचे नव्हते. इथे त्याने आपले नाव बदलून ओळख लपवली. त्याचे गणित उत्तम असल्याने एका शाळेत शिक्षक म्हणून सहज नोकरी मिळाली. मग माणसे जोडायला सुरुवात झाली. परिसराची हिंडून फिरून उत्तम माहिती त्याने करून घेतली. पणजी येथील आग्वाद फोर्टचे ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्व त्याच्या लक्षात आले. याच किल्ल्यावर पोर्तुगीजांची मदार होती. या ठिकाणी त्यांचे महत्वाचे कार्यालय होते. त्यांचे निशाण याच किल्ल्यावर फडकत होते. या निशाणाच्या जागी माझ्या भारताचा तिरंगा कधी डौलाने फडकेल हाच विचार सारखा त्याच्या मनात होता. आता योजना त्याच्या डोक्यात आकार घेत होती. १५ ऑगस्टचा दिवस हेमंतने निवडला. १५ ऑगस्ट १९५४. आपली योजना कार्यान्वित करण्याआधी हेमंतने गोव्याच्या गव्हर्नरला तसे पत्र पाठवून सूचित केले होते. ती सकाळ उजाडली. हेमंत ठरल्याप्रमाणे आपल्या काही साथीदारांसह आग्वाद फोर्टमध्ये पोहोचला.
पहारेकऱ्यांना बोलण्यात गुंतवून त्यांची नजर चुकवून हेमंत सरसर झेंड्यापर्यंत पोहोचला. पोर्तुगीज निशाण खाली खेचून त्याने तिरंगा त्या ठिकाणी प्रस्थापित केला. तिरंगा डौलाने फडकू लागला. भारतमाता की जय, पोर्तुगीज चाळे जाव या सारख्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. हेमंत अनिमिष डोळ्यांनी तिरंग्याकडे अभिमानाने पाहत होता. काही क्षणांच्या अवधीतच पोर्तुगीज सैनिकांच्या संगिनी त्याच्यावर रोखल्या गेल्या. हेमंतला फरफटत एका दालनात नेण्यात आले. तेथे त्याला बेदम लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. हेमंत खाली कोसळला. रक्ताच्या तीन उलट्या होऊन रक्ताच्या थारोळ्यात तो खाली कोसळला. त्याची शुद्ध हरपली. गोमांतक चळवळीचे अध्यक्ष पीटर अल्वारीस त्या ठिकाणी आले. त्यांनी ' तिरंगा फडकवल्यावर तो हुतात्मा झाला आहे. हेमंत इज शॉट डेड ' असे उद्गार काढले. हेमंतच्या मृत्यूची बातमी टाइम्स ऑफ इंडिया आणि अन्य वृत्तपत्रात छापून आली.
ही बातमी हेमंतच्या आईवडिलांपर्यंत पोहोचली. सगळेच सुन्न झाले. हेमंतच्या आईचा मात्र या बातमीवर विश्वास नव्हता. ' हेमंत जिवंत आहे. त्याला काही होणार नाही ' अशी त्या माऊलीची खात्री होती. सगळीकडे मग ' हेमंत सोमण अमर रहे ' च्या घोषणा निनादू लागल्या. पोर्तुगीजांच्या अत्याचाराचा निषेध करणाऱ्या आणि हेमंतला श्रद्धांजली वाहणाऱ्या सभा गावोगावी झाल्या. पुण्यात शनिवारवाड्यावर सगळ्यात मोठी शोकसभा झाली. पुण्यातील मान्यवर मंडळी या सभेला उपस्थित होती.
असे सगळे सुरु असतानाच या परिस्थितीला एक वेगळी आणि नाट्यपूर्ण कलाटणी मिळाली. २१ ऑगस्ट १९५४ ला हेमंतचे वडील बाबुराव यांना एक तार आली. त्यात हेमंत जिवंत आणि सुखरूप असल्याची बातमी होती. दुःखाच्या प्रचंड धक्क्यातून कुटुंबीय बाहेर पडत नाहीत तोच हा सुखद धक्का त्यांना मिळाला होता. हेमंतच्या आईचे म्हणणे खरे ठरले होते. सगळ्यांनाच आनंद झाला. खरोखर हेमंत वाचला होता, तो सुखरूप होता. पुढे त्याला भेटण्यासाठी त्याचे वडील गोव्याला जाऊन आले. नंतर हेमंत आणि इतर सत्याग्रहींना गोवा पोलिसांनी बेळगावपर्यंत पोहोचवले. पण बेळगावातील पोलीस आणि प्रशासनाला त्यांचे महत्व कळले नाही. भारतीय हद्दीत त्यांचे असे अपमानास्पद स्वागत झाले. पण पुढे मात्र मिरज स्टेशनवर त्यांचे स्वागत झाले. त्यांचा जोरदार स्वागत सोहळा पुण्यात झाला. पुण्यातील अनेक मान्यवर संस्थांनी त्यांचा सत्कार केला.
पुढे यथावकाश दिल्लीला जाऊन त्याने पं नेहरूंची भेट घेतली. हेमंतच्या कर्तृत्वाची गाथा ऐकून पंडितजीही प्रभावित झाले. त्यांनी त्याला ' तू आमच्यासोबत काम कर ' असे सांगितले. पण देशभक्ती रोमारोमात असलेल्या हेमंतला राजकारणात रस नव्हता. तो अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनाही भेटून आला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला.
इथे हेमंतच्या आयुष्यातील एक रोमहर्षक पर्व संपले. पुढे त्याने आणखी शिक्षण घेतले. यथावकाश लग्न झाले. प्रतिभा नावाची एक नावाप्रमाणेच प्रतिभासंपन्न आणि सुस्वभावी पत्नी त्याला मिळाली. त्याच्यातील ध्येयवाद संपला नव्हता. त्याने पुढे पुण्यात बी एड, एम एड केले. रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीत शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. या दरम्यान त्यांच्या संसारवेलीवर दोन कन्यापुष्पे उमलली. दरम्यान त्याचे संघकार्यही सुरूच होते. अशातच आफ्रिकेत आदिवासी गरीब मुलांना शिकवण्यासाठी शिक्षकांची गरज आहे अशी जाहिरात त्याच्या पाहण्यात आली. हेमंतने मग आफ्रिकेसाठी प्रयाण केले. तेथे अत्यंत काटकसरीत राहून त्याने आपली सेवा दिली. तेथे दोन वर्षे राहून तो इंग्लंडला आला. तेथून पुढे तो पुण्यास आला. पुण्यात काही दिवस राहून तो अमेरिकेला गेला. तेथे ऑडल्ट एज्युकेशन अंतर्गत प्रौढ शिक्षणाचे वर्ग तो घेऊ लागला. अमेरिकेतच पूर्ण सेवा करून सेवानिवृत्तीनंतर तो भारतात परत आला. पुढे पुण्यात राहू लागला. वयाच्या ८१ व्या वर्षी या गोवा मुक्ती संग्रामातील क्रांतिवीराने अखेरचा श्वास घेतला. कुठल्याही आजाराशिवाय भाग्यवंतास शांतपणे आणि कृतार्थ अवस्थेत येणारा मृत्यू त्याला लाभला. त्याच्या मृत्यूनंतर ' तरुण भारत ' मध्ये त्याच्या गौरवार्थ एक सविस्तर अग्रलेख लिहिण्यात आला होता.
अशा रीतीने हेमंतच्या जीवनातील रोमहर्षक प्रसंगांनी ' क्रांतिसूर्य हेमंत लक्ष्मण सोमण ' हे पुस्तक भरलेले आणि भारलेले आहे. या प्रेरणादायी पुस्तकाचे सर्वांनी विशेषतः तरुणांनी वाचन करावे आणि हा रोमहर्षक आणि अंगावर शहारे आणणारा हा इतिहास जाणून घ्यावा तरच आपल्या स्वातंत्र्याचे मोल त्यांना कळेल. ध्येय म्हणजे काय आणि त्याचा पाठपुरावा कसा करायचा असतो हे कळेल.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२९/१०/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा