उगवतीचे रंग
सर जो तेरा चकराये...
जॉनी वॉकरचं ' प्यासा ' या चित्रपटातलं ' सर जो तेरा चकराये या दिल डुबा जाये...' हे गाणं जुन्या पिढीतल्या रसिकांना आजही आठवत असेल. जॉनी वॉकरचा अभिनय आणि मोहम्मद रफी यांचा आवाज हे इतकं भन्नाट कॉम्बिनेशन जमलं आहे ना की ज्याचं नाव ते ! मला तर लहानपणी वाटायचं की हे गाणं जॉनी वॉकर यांनींच म्हटलंय. पण नंतर कळलं की गायक रफीसाब आहेत. एकदम जादुई आवाज. दूध, चहा, साखर या सगळ्यांची जशी अप्रतिम भट्टी जमून सुरेख चहा जमावा तशी या गाण्याची भट्टी जमली आहे. रफीचा गारुड करणारा आवाज, जॉनी वॉकर यांनी केलेला अफलातून अभिनय आणि एस डी बर्मन यांचं संगीत. हे गाणं ऐकता ऐकता निराशा, निरुत्साह, आळस कुठल्या कुठे पळून जातो. चेहऱ्यावर छान हसू उमटतं ही या गाण्याची ताकद.
मुंबईच्या चौपाटीवर किंवा अन्य कुठे पर्यटनस्थळी जॉनी वॉकरचे तेल मॉलिश करणारे हे भाऊबंद हमखास भेटतात. बहुतेक न्हावी मंडळी सुद्धा हे काम मोठया कौशल्याने करतात. नापित , नाभिक, वारिक, हजाम इ वेगवेगळे शब्द त्यांच्यासाठी रूढ आहेत. मुंबई, पुण्यासारख्या मोठया शहरातील रेल्वे स्थानकांबाहेर काही नाभिक मंडळी रांगेने आपली दुकाने लावून बसलेली दिसतात. सकाळी सकाळी गाड्यातून उतरणारे मुंबईकर, पुणेकर ज्यांना घरी दाढी करायला वेळ मिळत नाही ते इथे येतात. न्हाव्याच्या ताब्यात आपली मान मुकाटपणे देतात. न्हाव्याकडे येताना दाढी वाढलेली, अस्ताव्यस्त वाढलेले केस अशा अवस्थेत आलेली मंडळी जाताना एकदम फ्रेश होऊन जातात. त्यांचा नूरच पालटलेला असतो. असे रस्त्यावर बसणारे साधेसुधे न्हावी आणि मोठमोठया वातानुकूलित पार्लरमध्ये बसणारे फाईव्ह स्टार न्हावी यांच्यात काही फार फरक आहे असे मला वाटत नाही. कारण कृती आणि परिणाम तोच असतो. फरक फक्त पैशाचा, आरामशीर बसण्याचा आणि आणखी महागडे साहित्य ती मंडळी वापरतात त्याचा.
माझे लहानपण एका अगदी छोट्याशा खेडेगावात गेले. त्या गावात न्हाव्याचे दुकान नव्हते. वंशपरंपरेने काम करणारे एक न्हाव्याचे घर होते. वयोवृद्ध नथूबाबा, त्यांचा भाऊ पुंडलिक आणि मुलगा हिरालाल असे तिघे जण कार्यरत होते. त्यांच्याजवळ हजामत करण्यासाठीची एक लोखंडी पेटी होती. त्यात साहित्य घेऊन ही मंडळी आमच्या आणि आजूबाजूच्या गावात फिरायची. एक दोन महिन्यात त्यांची फेरी आमच्या घरी असायचीच. घराच्या बाहेरच्या ओट्यावर त्यांची बैठक असायची. बसण्यासाठी एखादा जुना तरटाचा तुकडा अंथरला जायचा. बऱ्याच वेळा लहान मुले आपली मान हवी तशी ठेवत नाहीत म्हणून न्हावी त्यांची मान आपल्या दोन्ही गुडघ्यांमध्ये अशी काही पक्की पकडायचा की त्याला हवी तशी कटिंग झाल्याशिवाय सुटका व्हायची नाही. पण बाजूला मोठी माणसे बसलेली असायची त्यामुळे रडाओरडायची सोय नसायची. ओरडले तर पाठीमागून एखादा धपाटा हमखास ठरलेला असायचा. पण न्हाव्याचे कौशल्य मात्र वादातीत असायचे. बहुतेक वेळा मोठी माणसे त्या न्हाव्याला आपल्या मुलाची चांगली बारीक हजामत कर असे सांगायची म्हणजे निदान दोन तीन महिने काळजी नसायची.
आमच्याकडे जो पुंडलिक म्हणून न्हावी यायचा त्याचा आहार उत्तम होता. एक डझन केळी तो सहज पाच दहा मिनिटात फस्त करायचा. कधी कधी जेवायला यायचा तेव्हा चार पाच भाकरी किंवा आठ दहा पोळ्या त्याला लागायच्या. गावात कोणाकडे छोटे मोठे कार्य वा नवस वगैरे असला की हमखास न्हाव्याला बोलावले जायचे. त्याच्याकडे एक वाद्य होते. त्याला भेर म्हणायचे. भेर नावाचे वाद्य पूर्वी युद्धाच्या वेळी सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या अंगात वीरश्री संचारण्यासाठी वाजवले जायचे. पुढे ते आनंदाच्या प्रसंगीही वाजवले जाऊ लागले. गावात भेर वाजत असेल तर कोणाकडे काय कार्यक्रम आहे हे गावातील लोकांना कळायचे. भेर म्हणजे एक लांब पितळेचे तुतारी सारखे वाद्य असून न्हावी किंवा ते वाजवणारा आपल्या तोंडाने जोरात हवा फुंकून हे वाद्य वाजवायचा. या वाद्याचा पुढचा भाग रुंद आणि मोठा असल्याने गावकरी नवरदेव किंवा नवरी किंवा लहान मुलांच्या अंगावरून ओवाळून सुटी नाणी या भेरीच्या पुढील भागात फेकायचे. त्यावेळी अगदी पाच,दहा, वीस, पंचवीस, पन्नास आदी पैशांची सुटी नाणी असायची. नाण्यांनी ती भेर जड झाली की न्हावी ती काढून घ्यायचा. मंगल कार्याच्या प्रसंगी नवरदेव किंवा नवरीला कोणी काय आहेर दिला ते सुद्धा घोषणा करून सांगायचे काम या मंडळींकडे असायचे. आपल्या खास ग्रामीण ढंगात मग ही मंडळी त्याची घोषणा करायची.
पण आता काळानुसार या मंडळींनी स्वतःला बदलले आहे. आताचा नाभिक म्हणजे फक्त पूर्वीचा कैची, वस्तरा घेऊन हजामत करणारा राहिला नाही. अनेक प्रकारची आधुनिक साधने त्यांनी आपल्या व्यवसायात वापरायला सुरुवात केली आहे. ब्लिचिंग, मेकअप, फेसपॅक इ. गोष्टींचे तंत्र शिकून घेतले आहे. बरीच मंडळी तर आपल्या ग्राहकांना केसांची काळजी कशी घ्यावी, कोणते तेल, शॅम्पू वापरावेत यासारखी माहिती देत असतात. आता लग्नात वऱ्हाडी मंडळींना फेटे बांधणे यासारखी कामेही ते चार पैसे मिळवण्यासाठी करताना दिसतात.
अशी ही नाभिक मंडळी. विविध कलांमध्ये निपुण ! गप्पा मारणे हा तर त्यांचा हातखंडा. त्यांच्या पोतडीत विविध बातम्या, रहस्ये दडलेली असायची आणि असतात. गावातील सगळ्या बातम्या त्यांना माहिती असतात. आपण फक्त श्रोत्याची भूमिका घेतली की झाले. गप्पांमध्ये गुंतवून ठेवण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत. बहुतेक ही कला सुद्धा वंशपरंपरेनेच त्यांच्याकडे येते. दुकानात गर्दी असली तरी आपल्याला मोठया आदराने हाक मारून ते बोलावून घेतात. ' बसा साहेब, फक्त पाच मिनिट बसा, एवढे झाले की तुमचाच नंबर...' असे म्हणून तो आपल्या हातात वर्तमानपत्र वगैरे सोपवतो आणि किमान अर्ध्या तासासाठी तो आणि आपण निश्चिन्त होतो.
' शोले ' चित्रपटातील हरिराम नाई आठवतो का ? तो अशाच बातम्या जेलरला देत असतो. त्याच्या याच गोष्टीचा फायदा जय आणि वीरू ( अमिताभ आणि धर्मेंद्र ) करून घेतात. आणि मग चित्रपटात तो पोट धरून हसायला लावणारा प्रसंग घडतो. हरिराम एका माणसाची दाढी करीत असतो. जय आणि वीरू त्याला ऐकू जाईल अशा पद्धतीने ' जेल में सुरंग बन रही हैं ' असं बोलतात. हरिराम ते अगदी कान देऊन ऐकतो. तो ज्या माणसाची दाढी करत असतो, त्याची दाढी आणि अर्धवट कापलेली मिशी सोडून देऊन जेलरला ( असरानी ) ही बातमी सांगायला धावतो. मग पुढील प्रसंग फारच बहारदार आहे. ' अंग्रेजोंके जमानेके जेलर ' असलेल्या असरानीला ते चांगलीच अद्दल घडवतात. असरानीने पण त्याची भूमिका फारच बहारदार आणि जिवंत केली आहे.
राम नगरकर हे नाभिक समाजातील. ते प्रसिद्ध विनोदी नट होते. त्यांनी लिहिलेले ' रामनगरी ' हे पुस्तक अत्यंत रोचक आणि गमतीदार तसेच हृदयस्पर्शी प्रसंगांनी भरलेले आहे. ते एकदा तरी जरूर वाचावं असं आहे.या पुस्तकाला पु ल देशपांडे यांची प्रस्तावना आहे. या पुस्तकावरून 'रामनगरी ' या नावाचा हिंदी चित्रपटही निघाला होता. या पुस्तकात राम नगरकर म्हणतात, ' नाभिक म्हणजे ना- भीक ' आम्ही भीक मागणार नाही. काम करून, लोकांची हजामत करून पैसे मिळवू. '
कोणी कितीही मोठा माणूस असो, तो न्हाव्यापुढे आपली मान तुकवतोच. वर सुरुवातीला उल्लेख केलेल्या सर जो तेरा चकराये या गाण्यात एक कडवे आहे
नौकर हो या मालिक
लीडर हो या पब्लिक
अपने आगे सभी झुके हैं
क्या राजा क्या सैनिक
त्यांच्यापुढे जो जाईल त्याला मान झुकवावीच लागते. पण तुमचे जड झालेले डोके तो मसाज करून हलके करून देतो. केस पांढरे झाले असतील तर कलप लावून देतो. दाढी, मिशा इ सगळे व्यवस्थित करून तुमचे रुपडेच पालटून टाकतो. हजामत करणे हा वाक्प्रचार मराठीत वेगळ्या अर्थाने देखील वापरला जातो. एखाद्याची चांगली खरडपट्टी काढणे या अर्थाने तो वापरतात. बऱ्याच वेळा हा आशय व्यक्त करण्यासाठी ' बिनपाण्याने हजामत केली ' असे म्हटले जाते. नाभिक समाजातील शिवा काशीद याने आपल्या प्राणांचे बलिदान देऊन शिवाजी महाराजांचे प्राण वाचवल्याचे आपल्याला माहिती आहे. तर संत सेना महाराज हे वारकरी संप्रदायातील थोर संत होऊन गेले. ते नेहमी विठ्ठल भक्तीत रममाण झालेले असत. त्यांचा एक अभंग प्रसिद्ध आहे.
आम्ही वारीक वारीक, करू हजामत बारीक
विवेक दर्पण आईना दावू, वैराग्य चिमटा हालवू
उदक शांती डोई घोळू, अहंकाराची शेंडी पिळू
भावार्थाच्या बगला झाडू, काम क्रोध नखे काढू
चौवर्णा देउनी हात, सेना राहिला निवांत.
नाभिकांच्या कर्माला संत सेना महाराजांनी किती उंचीवर नेऊन ठेवले आहे ! त्यांनी सांगितलेल्या या गोष्टी प्रत्येक साधकाने करायच्या ठरवल्या तर परमार्थाची वाटचाल सुकर होईल.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१९/१०/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा