मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग चांदणे तुझ्या स्मरणाचे...

 उगवतीचे रंग 

चांदणे तुझ्या स्मरणाचे... 

कवी ग्रेस यांची  एक सुंदर कविता आहे. ' भय इथले संपत नाही. ' लता मंगेशकरांनी ते फार सुंदर गायिले आहे. मी माझ्या आईच्या संदर्भात जेव्हा विचार करतो, तेव्हा मला यातील दोन ओळी आठवतात. त्यातील पहिली म्हणजे, ' तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला ' आणि  ओळ म्हणजे ' हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे...' 

आई म्हणजे प्रेम आणि वात्सल्याची मूर्तीच ! ती दिसायला जरी खूप सुंदर नव्हती तरी तिच्या व्यक्तिमत्वात एक जादू होती. तिने कोणतीही साडी नेसली, तरी ती तिला कमालीची शोभून दिसायची. तिचं वागणं, बोलणं याची छाप आपोआपच समोरच्या व्यक्तीवर पडायची. आमची परिस्थिती साधारण म्हणावी अशीच होती. तिच्या अंगावर फारसे दागिने नसायचे. पण जे काही मिळाले त्यात ती आनंदी असायची. तिचं वागणं, बोलणं आणि तिचं प्रेमळ हास्य हाच  सगळ्यात मोठा दागिना होता ! तो तिला अत्यंत शोभून दिसायचा. माझी आई फार शिकलेली नव्हती. पण तिला लिहिता वाचता येई. तिच्या विचारांना मात्र आधुनिकतेचा स्पर्श होता. घरातील चालीरीती, परंपरा सांभाळताना त्याला आधुनिकतेची जोड तिने दिली. कोणत्याही गोष्टींना केवळ अंधश्रद्धा किंवा परंपरा म्हणून कवटाळून बसली नाही. त्याचबरोबर घरातल्या सगळ्यांची मने तिने जपली. त्या काळी आम्ही एका लहानशा खेड्यात राहत होतो. वडील गावाचे पोलीस पाटील होते. त्यामुळे सारं गाव तिला प्रेमाने आणि आदराने ' पाटलीणबाई ' अशी हाक मारायचं. 

तिने सांगितलेल्या दोन गोष्टी मला आयुष्यभर उपयोगी पडल्या. मला कधी कधी एखाद्या माणसाचा खूप राग यायचा. तो माणूस आपल्याबरोबर किंवा इतरांशी असे का वागतो हे कळायचे नाही. मग मी चिडून आईला विचारायचो. कोणतीही गोष्ट हक्काने विचारायचे माझे स्थान म्हणजे आई होते. त्या माणसाच्या वागण्याबाबत स्पष्टीकरण देताना आई म्हणायची, ' अरे, तो त्याच्या जागी बरोबर आहे. त्या माणसाचे चिडणे किंवा अमुक एक असे वागणे स्वाभाविक आहे. आपण त्याच्या जागी आहोत अशी कल्पना करावी. अशा परिस्थितीत आपण कसे वागलो असतो ? तसेच ना ! म्हणून जेव्हा जेव्हा दुसरी व्यक्ती अशी का वागते हा प्रश्न आपल्याला पडतो, तेव्हा तेव्हा आपण त्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून पाहावे. ' आईचा हा लाख मोलाचा सल्ला मला एक वेगळीच दृष्टी देऊन गेला. आता कोणत्याही माणसाच्या वागण्याची कारणमीमांसा मला कळू लागली. आपण समोरच्या व्यक्तीला समजून घेतले तर निम्मे प्रश्न सुटतात. बाकीचे प्रश्न मग त्याच्याशी बोलून, समजूत घालून सोडवता येतात. थोडक्यात म्हणजे दुसऱ्यांच्या अंतरंगात शिरण्याची शिकवण तिने मला दिली. 

तिने शिकवलेली दुसरी  गोष्ट म्हणजे ' राखावी बहुतांची अंतरे...' तिने जसे सांगितले तसेच ती वागत आली होती. कधीही समोरच्या व्यक्तीला आपल्या बोलण्याने तिने दुखावले नाही. त्यामुळे घरात आणि बाहेरही ती सर्वानाच प्रिय होती. You cannot please everyone हे जरी खरे असले आणि कधी कधी रागवावेही लागते हे बरोबर असले तरी ते तात्कालिक असावे. काही क्षणांपुरती ती क्वचित रागावली असेलही कोणावर पण नंतर लगेच तिचा मूळ प्रेमळ स्वभाव उफाळून येई. तिने शिकवलेल्या या दोन गोष्टी जणू माझ्या रक्तात भिनल्या. म्हणून ' तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला ' असे मी म्हटले. 

आमच्या गावाला आमच्या बऱ्याच नातलगांची शेती होती. ते कुठेतरी शहरात राहायचे पण शेतीचा हंगाम असला की एक दोन महिने आमच्याच घरी त्यांचा मुक्काम असायचा. पण आईने त्यांचा कधीच कंटाळा केला नाही. तिच्या हातचा स्वयंपाक, तिचे आदरातिथ्य त्यांना खूप आवडायचे. तिच्या हातच्या साध्या भाजी भाकरीला सुद्धा अमृताची चव होती. पूर्वी चुलीवरच स्वयंपाक असायचा. कधी कधी लाकडे ओली असायची. त्या धुराने तिच्या डोळ्यात पाणी उभे राहायचे. पण कोणतीही चिडचिड किंवा राग तिच्या मुद्रेवर कधीही नव्हता. सगळा स्वयंपाक ती अतिशय प्रेमाने करायची. किंबहुना तिच्या प्रेमळ भावना त्या अन्नात मिसळून त्याला एक वेगळीच चव यायची. 

आमचीही थोडीफार शेती असल्याने आणि वडील गावाचे पोलीस पाटील असल्याने आमच्याकडे येणारा जाणारा कायम असायचा. कोणी बडी व्यक्ती असो की अगदी गरिबातली गरीब व्यक्ती, तिच्याजवळ भेदभाव नव्हता. गावातील कोणीही काही मागायला आले तर तिने कोणालाही कधी विन्मुख पाठवले नाही. शेतावर काम करणारा सालदार असो की मजूर किंवा भांडेधुणी करणारी बाई असो, त्यांच्यापैकी कोणी उपाशी दिसले तर प्रसंगी गरम गरम भाकरी पिठले करून घालण्याची तिची तयारी असायची. गावातील बहुतेक लोक गरीब किंवा साधारण परिस्थितीतील होते. कधी कधी त्यांच्या घरी जेवायलाही काही नसायचे. अशा वेळी कोणी तरी अडली नडलेली बाई येऊन ' पाटलीणबाई, घरात काहीच नाही हो. थोडं धान्य तरी द्या ना...' अशी विनवणी करायची तेव्हा आई शेर दोन शेर धान्य तिच्या झोळीत टाकायची. परतीची अपेक्षा न करता. तशी आमचीही परिस्थिती साधारणच होती पण आईने दुसऱ्याला देताना कधीच हात आखडता घेतला नाही. तिच्या रूपाने घरात जणू लक्ष्मीचाच वास होता. त्यामुळे आम्हाला कधी कमी पडले नाही. आम्ही खाऊन पिऊन सुखी होतो. 

तिचं शिक्षण जरी अगदी बेताचं होतं तरी तिला वाचनाची मात्र आवड होती. त्यावेळी आमच्या गावात वर्तमानपत्रे येत नव्हती. आमच्या गावातील प्राथमिक शाळेची एक छोटी लायब्ररी होती. त्यातील बहुतेक पुस्तके तिची वाचून झाली होती. मेजर साळवी यांचं ' काही स्वाधीन काही दैवाधीन ' हे पुस्तक तिला फार आवडलं होतं. अशा पुस्तकांनी तिचा मूळचाच उदार असलेला दृष्टिकोन आणखी विशाल केला होता. ' काही स्वाधीन, काही दैवाधीन ' हे सूत्र माणसाला एकदा समजले की आयुष्याबद्दल त्याची फारशी तक्रार राहत नाही. आपल्या हातात जेवढे आहे, जेवढे करता येणे आपल्याला शक्य आहे, तेवढे कसोशीने करावे. उरलेले दैवावर सोडून द्यावे हे तिचे सांगणे होते. तिने भगवद्गीता जरी अभ्यासलेली नसली तरी ' कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ' हा श्रीकृष्णाने पार्थाला केलेला उपदेश सदैव तिने अमलात आणला. 

आजही मातृछत्र माझ्यावर छाया धरून आहे ही खूप भाग्याची गोष्ट ! पण लहानपणीचा विचार जेव्हा मी करतो, तेव्हा मला तिच्या या साऱ्या गोष्टी आठवतात. तिच्या हळव्या, मंद, गोड बोलांचा माझ्या आयुष्याला स्पर्श झाला आहे एवढेच नाही तर तो बोल माझ्या आयुष्याचे सोने करून गेला आहे असे म्हणावेसे वाटते. बालपण आठवले, आई आठवली की म्हणावेसे वाटते, ' हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे...! ' 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

५/१०/२०२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...