उगवतीचे रंग
एक लढा असाही - भाग पाच
महिलांचा आंदोलनातील सहभाग - अशिक्षित किंकरी देवीचे योगदान
विकासाच्या चक्रात ( विकास म्हणायचा का हा प्रश्नच आहे ) पर्यावरणाचे अतोनात नुकसान माणसाने केले. वृक्षराजी असलेले हिरवेगार जंगल नष्ट होऊन काँक्रीटची जंगले उभे राहू लागली. नदीकाठी, समुद्रकाठी कारखाने उभे राहू लागले. आपला घातक विषारी धूर वातावरणात सोडून वातावरण दूषित करू लागले. आपले केमिकलयुक्त सांडपाणी सरळ नद्यांमध्ये किंवा समुद्रात सोडून देऊ लागले. या सगळ्या गोष्टींनी पर्यावरणावर जीवघेणे प्रहार केले. पण तुम्हाला आम्हाला याची सवय झाली. विकास प्रक्रियेत हे चालायचेच असे समजून आम्ही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करू लागलो. पण हिमाचलमधील किंकरी देवी हे सहन करू शकली नाही. तिने या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. साधारणपणे आपण असे समजतो की सुशिक्षित लोक अन्यायाविरुद्ध चांगले लढू शकतात. अशिक्षितांना काय कळणार कसे लढायचे ते ? हा समज किंकरी देवीने खोटा ठरवला. मी तर शिकलेली नाही, मी कसे लढू हा प्रश्न तिला पडला नाही. माझे काय होईल, लोक साथ देतील का असे प्रश्न तिला पडले नाहीत. कदाचित असा एखादा दुसरा विचार आलाही असेल, पण ती आपली लढाई लढण्यासाठी ठामपणे उभी राहिली. जी व्यक्ती आपली लढाई एकाकी का असेना पण प्रामाणिकपणे आणि उदात्त ध्येयाने लढत असेल अशा व्यक्तीला मदत मिळतेच. गॉड हेल्प्स देम हू हेल्प देमसेसेल्व्हज अशी एक इंग्रजी म्हण आहे. तिचा अर्थ हाच आहे.
किंकरी देवीचा जन्म हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील एका अतिदुर्गम अशा खेड्यात झाला. लहानपणापासून गरिबी पाचवीलाच पुजली होती. तिचे वडील एक सामान्य असे दलित शेतकरी. त्यांनी तिचे लग्न वयाच्या १४ व्या वर्षीच श्यामू राम नावाच्या एका वेठबिगारी करणाऱ्या मजुराशी करून दिले. पण श्यामू रामचा काही वर्षातच एका आजाराने दुर्दैवी मृत्यू झाला आणि वयाच्या २२ व्या वर्षीच किंकरी देवीच्या माथी वैधव्य आले. उदरनिर्वाहासाठी तिला हातात झाडू घ्यावा लागला. स्वीपर म्हणून ती काम करू लागली. ही स्वच्छता करता करता निसर्गावर अन्याय करणाऱ्या दुष्ट विचारांची सुद्धा सफाई करावी असे तिच्या मनाने घेतले. त्या वेळी खाणमालकांची नजर हिमालयातील चुनखडीच्या खाणींकडे वळली होती. या खाणींचे उत्खनन करून व्यापारातून अफाट नफा कमावणे सुरु असताना ही मंडळी निसर्गाचे मात्र अतोनात नुकसान करू लागली.
खाणींसाठी खोदकाम सुरु असताना झाडे तोडली जाऊ लागली. हिमालयाचे संरक्षक कवच तुटू लागले. त्यातील माती घेऊन नद्या वेगाने खालच्या प्रदेशावर आक्रमण करू लागल्या. पुराचे संकट नित्याचे झाले. शेतातील पिके नष्ट होऊ लागली. दरडी कोसळून त्याखाली घरे, माणसे, गुरुढोरे गाडली जाऊ लागली. खाणीतील चुनखडीयुक्त माती पाण्यात मिसळून पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होऊ लागले. या सगळ्या गोष्टींकडे गावकरी असहाय होऊन बघत होते. किंकरी देवीने मात्र या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे ठरवले. तिने आपल्या स्वतःच्या आणि आजूबाजूच्या गावातील गावकऱ्यांना खाणमालकांनी सुरु केलेल्या बेसुमार खोदकामाबद्दल आणि त्याच्या होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल माहिती द्यायला सुरुवात केली. लोकांमध्ये हळूहळू जागृती होऊ लागली. किंकरी देवीच्या म्हणण्यात तथ्य आहे हे त्यांना कळू लागले.
' पीपल्स ऍक्शन फॉर पीपल इन नीड ' या स्थानिक स्वयंसेवी संघटनेची मदत किंकरी देवीला मिळाली. या संघटनेच्या मदतीने ती या खाणमालकांच्या विरोधात उभी राहिली. सिमल्याच्या उच्च न्यायालयात तब्बल ४८ खाणमालकांविरुद्ध १९८७ साली तिने दावा दाखल केला. खाणमालक श्रीमंत असल्याने उत्तम वकील लावून त्यांनी केसचा निकाल लांबवण्याचा बराच प्रयत्न केला. आपल्या केसवर न्यायालय लवकर निकाल देत नाही हे पाहिल्यावर किंकरी देवी स्वतः सिमल्याला गेली आणि तेथील न्यायालयासमोर तिने उपोषण सुरु केले. या दरम्यान या केसच्या खर्चासाठी तिला आपले जपून ठेवलेले मंगळसूत्र सुद्धा मोडावे लागले. तिच्या उपोषणाची दखल तब्बल १९ दिवसानंतर न्यायालयाने घेतली. तोपर्यंत या अशिक्षित असलेल्या किंकरी देवीच्या असामान्य लढ्याची दखल वर्तमानपत्रांनी घेतली होती. तिचे नाव देशातच नव्हे तर विदेशात जाऊन पोहोचले. किंकरी देवी खाणमालकांकडून पैसे उकळण्यासाठी ही केस लढत आहे आणि आम्ही खाणींचे उत्खनन करताना कोणतेही पर्यावरणाचे नुकसान करत नाही असा बचाव खाणमालकानी केला. पण न्यायालयाने किंकरी देवीची बाजू ग्राह्य धरून निकाल दिला. या निकालाने न्यायालयाने हिमालयातील खाणींच्या उत्खननावर बंदी आणली. किंकरी देवीला मोठ्या प्रयासानंतर न्याय मिळाला. या दरम्यान खाणमालक तिच्या जीवावर उठले. त्यांनी तिला मारण्याचा देखील प्रयत्न केला पण निसर्गावर अत्याचार करणाऱ्या खाणमालकांच्या विरोधात लढाईचा ठाम निर्धार तिने केला होता. मृत्यूची भीती न बाळगता आपला लढा तिने सुरूच ठेवला.
खाणमालक या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात गेले. पण सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालावर शिक्कामोर्तब केले आणि किंकरी देवीचा विजय झाला. १९९५ मध्ये बीजिंगला आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत किंकरी देवीला बोलावून तिचा सन्मान करण्यात आला. अमेरिकेच्या प्रथम महिला नागरिक असलेल्या हिलरी क्लिंटन यांच्या हस्ते किंकरी देवीला सन्मानित करण्यात आले. किंकरी देवीने दिलेल्या या असामान्य लढ्याबद्दल झाशीची राणी शक्ती पुरस्कार देऊन त्यांना १९९९ मध्ये गौरवण्यात आले. किंकरी देवी स्वतः जरी अशिक्षित असली तरी शिक्षणाचे महत्व जाणून होती. आपल्याला परिस्थितीमुळे जरी शिक्षण घेता आले नाही तरी समाजातील कोणताही घटक शिक्षणापासून वंचित राहू नये अशी तिची इच्छा होती. त्यासाठी आपल्या गावात महाविद्यालय स्थापन व्हावे ही तिची धडपड होती. आणि त्या धडपडीला यश आले. २००६ मध्ये तिच्या गावात महाविद्यालय सुरु झाले. २००७ मध्ये किंकरी देवींचे निधन झाले. एक अशिक्षित स्त्री देखील ठरवलं तर काय करू शकते हे तिने तिच्या उदाहरणाने जगाला दाखवून दिले. लाखो लोकांच्या मनात पर्यावरण प्रेमाची आणि शिक्षणाच्या आवश्यकतेची जाणीव तिने जागृत केली. संगडाह या गावात तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ ' किंकरी देवी स्मृती पार्कची ' उभारणी करण्यात आली आहे.
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२३/०९/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा