मुख्य सामग्रीवर वगळा

एक लढा असाही - भाग चार महिलांचा आंदोलनातील सहभाग

उगवतीचे रंग 

एक लढा असाही - भाग चार 

महिलांचा आंदोलनातील सहभाग - गौरा देवी 

हिमालयातील जंगले जसजशी नष्ट होत गेली तसतशी तेथे राहणाऱ्या स्थानिक लोकांवर संकटे एकामागून एक येत राहिली. सुरुवातीला त्यांचा रोजगार आणि उपजीविकेची साधने हिरावून घेतली गेली. पुराच्या पाण्याने शेतीची वाताहत झाली. दरडी कोसळून गावांची, घरांची वाट लागली. गंगा, यमुनेसारख्या नद्या अंगावर खेळणाऱ्या हिमालयात तेथील जंगलात राहणाऱ्या लोकांना पिण्याच्या पाण्याची देखील मारामार पडू लागली यावर कदाचित आपला विश्वास बसणार नाही पण हे वास्तव आहे. या सगळ्या परिस्थितीचे चटके जेवढे पुरुषांना बसले, त्यापेक्षा अनेक पटींनी जास्त स्त्रियांना सोसावे लागले. कामाच्या शोधार्थ गावातील बरीचशी पुरुषमंडळी शहराकडे निघून गेली. कोणी सैन्यात भरती झाले. वर्षातून एकदा ही मंडळी गावाकडे येत. पण त्यांच्या अनुपस्थितीत स्त्रियांनाच तेथील सगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागे.  मुलांचे लटांबर सांभाळत तुटपुंज्या शेतीवर राबावे लागे किंवा ठेकेदाराकडे मोलमजुरी करावी लागे. त्यातील बऱ्याचशा स्त्रिया तर कधी शाळेतही जाऊ शकल्या नव्हत्या. त्यांच्या मुलाबाळांना देखील त्या भागात शिक्षणाची कोणतीही सोय नव्हती. अशा रीतीने शिक्षणाची प्रचंड आबाळ होत होती. पण जगता जगता आणि निसर्गाशी दोन हात करता करता आयुष्य नावाच्या शाळेत मिळणारी अनुभवाची शिदोरी या महिलांच्या गाठी जमा झाली होती. 

अशाच प्रतिकूल परिस्थितीतून चिपको आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी काही महिला पुढे आल्या. त्यात गौरा देवी प्रमुख होती. गौरा देवीचा जन्म १९२५ मध्ये चमोली जिल्ह्यातील लाता गावात झाला. ती कशीबशी पाचवीपर्यंत शाळेत जाऊ शकली. ती ११ वर्षांची असतानाच तिच्या वडलांनी तिचे लग्न रैणी गावातील मेहेरबान सिंह यांच्याशी करून दिले पण पुढे दहा वर्षांनी तिच्या पतीचे निधन झाले. वयाच्या केवळ २२ व्या वर्षी गौरा देवी विधवा झाली. यावेळी तिचा एकुलता एक असलेला मुलगा केवळ अडीच वर्षांचा होता. त्या मुलाला सांभाळणे, सासू सासऱ्यांची सेवा करणे याशिवाय उपजीविकेसाठी शेतावर काबाडकष्ट करणे असा समस्यांना तिला तोंड द्यावे लागले. 

१९७० मध्ये अलकनंदा नदीला पूर येऊन उत्तराखंडमध्ये प्रचंड नुकसान झाले. यावेळी चंडिप्रसाद भट, गोविंद सिंह रावत आदी मंडळींनी गावोगाव फिरून लोकांना पुराची कारणे सांगून पर्यावरण रक्षणासाठी चळवळीचे आवाहन केले. रैणी गावातही त्यांच्या सभा झाल्या. १९७४ मध्ये रैणी गावातील अडीच हजार देवदार वृक्षांची तोड करायचे नियोजन व्यापारी आणि ठेकेदारांनी केले होते. त्यासाठी जी झाडे तोडली जाणार होती, त्या झाडांवर खुणा ( मार्किंग ) करण्यात आल्या होत्या. यावेळी गौरा देवी तेथील महिला मंडळाची अध्यक्ष बनली होती. तिने गावात अनेक सभा घेऊन महिलांना जागृत केले. 

गावातील पुरुष मंडळी देखील या चळवळीत सक्रिय होतीच पण याच सुमारास त्यांना त्यांच्या शेतीची भरपाई देण्यासाठी चमोलीला बोलावून घेण्यात आले. गावात आता केवळ स्त्रिया उपस्थित होत्या. याच परिस्थितीचा फायदा घेऊन ठेकेदारांनी झाडे तोडण्यासाठी मजुरांना आणले. गौरा देवीला हे कळताच गावातील स्त्रियांना तिने एकत्र केले. सगळ्यांनी मिळून जी झाडे तोडली जाणार होती, त्या झाडांना मिठी मारली. झाडे तोडण्याआधी आधी करवत आमच्या अंगावर चालवा, मगच झाडे तोडा असे आवाहन त्यांनी केले. झाडे वाचली. गौरा देवीने या आंदोलनाचे नेतृत्व केले त्यामुळे तिला चिपको आंदोलनाची जननी समजले जाते. तिच्या कार्याचा गौरव १९८६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते तिला प्रथम वृक्ष मित्र पुरस्कार प्रदान केला गेला. गौरा देवी एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या, ' हे जंगल आमची माता आहे. आमचं माहेर आहे. तेच आम्हाला फळे, फुले आणि उपजीविकेची साधने पुरवते. जर जंगल तोडाला तर पुरासारख्या आपत्ती येणारच. ' आज गौरा देवी हयात नाहीत पण तेथील गावागावात प्रत्येक महिलेच्या मनात आपल्या विचाराने गौरा देवी जिवंत आहे. या चळवळीत योगदान देणाऱ्या आणखी काही स्त्रियांबद्दल पुढील भागात माहिती घेऊ या. ( क्रमशः ) 

© विश्वास  देशपांडे, चाळीसगाव. 

१७/०९/२०२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...