उगवतीचे रंग
एक लढा असाही : भाग तीन
चिपको आंदोलन
हिमालयातील वृक्षतोडीचा परिणाम गावागावांवर होऊ लागला. गढवाल-कुमाऊं परिसरातील आठ हजार फूट उंचीवर वसलेले लस्यालगाव गाव नावाचे एक छोटेसे पहाडाच्या कुशीत बसलेले निसर्गरमय गाव. वस्ती जेमतेम पन्नास-शंभर घरांची. डोंगरउतारावर शेती करून त्यावर उपजीविका करणे यावरच तेथील लोकांचे जीवन आधारले होते. डोंगरावरून खाली वाहत येणाऱ्या ओढ्यांमुळे गावात पाण्याची कमतरता नव्हती. त्याच ओढ्यांच्या पाण्यावर उतारावरची शेतीही पिकत होती. पण जसजशी डोंगरावरील झाडे नष्ट होत गेली, मातीचे संरक्षक आवरण नष्ट होत गेले तसतसे हे जीवनदायी असणारे ओढे जीवघेणे ठरू लागले. दोन्ही काठांच्या मधून नियमितपणे वाहणाऱ्या ओढ्यानी काठाची बंधने झुगारून दिली. आजूबाजूच्या डोंगरउतारावर असणाऱ्या छोटया छोट्या शेतांवर त्यांनी आक्रमण केले. तेथील माती, पिके उध्वस्त केली आणि आधीच जगण्याची मर्यादित साधने हाती असणाऱ्या गावकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेतला.
अशी हिमालयातील अनेक गावं. लोकांच्या हाती उपजीविकेची साधने न उरल्यामुळे आपलं गाव, आपल्या जमिनी सोडाव्या लागल्या. वर्षानुवर्षे आपला रहिवास असलेला परिसर सोडून हाती असलेल्या चार दोन भांड्यांसह आणि कच्याबच्यांसह मुलुख सोडण्याचे दुःख काय असते ते अशा लोकांनाच माहिती ! शहरात सुखाने कालक्रमणा करणाऱ्या तुमच्या आमच्यासारख्याना त्याची धग जाणवणार नाही. असेच नैसर्गिक आपत्तीची झळ सोसलेले चामोली जिल्ह्यातील चंडिप्रसाद भट आणि त्यांचे गावकरी. आपल्यावरील संकटाने एकत्र आले. व्यापक रस्तेबांधणी मोहीम सुरु होती. अशा वेळी त्यांनी स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून सहकारी मजूर समितीची स्थापना केली. ही मंडळी सर्वोदयवादी जयप्रकाश नारायण आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहवासात आली. त्यामुळे या विपरीत परिस्थितीविरुद्ध लढण्याची हिंमत त्यांना या कार्यकर्त्यांकडून मिळाली.
हिमालय म्हणजे अनेक औषधी वनस्पतींचे आगर. या औषधी वनस्पतींचा व्यापार बाहेरच्या बड्या व्यापाऱ्यांनी सुरु केला. त्यासाठी स्थानिक लोकांवर दादागिरी सुरु केली आणि प्रचंड नफा कमवायला सुरुवात केली. हे आक्रमण रोखण्यासाठी चंडिप्रसाद भट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दशौली ग्राम-स्वराज्य संघाची स्थापना केली. तसेच गावकऱ्यांना रोजगार पुरवण्यासाठी चीड वृक्षाच्या राळेपासून टर्पेंटाईन आदी बनवणाऱ्या छोटया छोट्या उद्योगांची मुहूर्तमेढ रोवली. पण त्यांच्या प्रकल्पासाठी लागणारा कच्चा माल देण्यास वनखात्याने नकार दिला. खेळणी बनवणाऱ्या कंपनीला झाडांची विक्री केली. झाडांची कत्तल करणारे कंपनीचे एजंट मोठमोठया लॉरी घेऊन गावात दाखल झाले. याविरुद्ध चंडिप्रसाद आणि त्यांच्या साथीदारात प्रचंड संताप उसळला. सगळे एकत्र आले आणि त्यांच्या सभा होऊ लागल्या.
एकंदरीतच या सगळ्या दडपशाहीला लोक वैतागले होते. त्यातून काहींनी निराश होऊन सगळे जंगलच जाळून टाकावे असा संतापून प्रस्ताव मांडला. कोणी म्हणाले की ही लाकडे वाहून नेणाऱ्या मालट्रकांपुढे आपण आडवे पडू या. या गाड्या आधी आपल्या अंगावरूनच पुढे जातील. कोणी या लोकांशी लढण्याची भाषा बोलू लागले. चंडिप्रसाद या सर्वाना शांत करण्याचा प्रयत्न करीत होते. शेवटी त्यांनी असा एक प्रस्ताव मांडला की जो सर्वांना मान्य झाला. ते म्हणाले, आपल्या मुलाबाळांचे वाघांपासून वा जंगली श्वापदांपासून रक्षण करण्यासाठी आई जसे या मुलांना कवेत घेते, तसेच या वृक्षांना आपण कवेत घेऊ या. मिठ्या मारून उभे राहू या. झाड तोडायला येणाऱ्यांना आधी आपल्यावर कुऱ्हाडी चालवाव्या लागतील. प्रसंगी आपली आहुती पडली तरी देऊ पण झाडे तुटू द्यायची नाहीत. ही कल्पना सर्वांनाच पसंत पडली.
कंपनीचे ठेकेदार जेव्हा वृक्षतोडीसाठी आले, तेव्हा गावातील लोकांना वृक्षांना मिठ्या मारल्या. या आंदोलनात स्त्रियांचा देखील लक्षणीय सहभाग होता. कंपनीच्या लोकांनी हर तऱ्हेने सांगूनही ही मंडळी आपल्या जागेवरून तसूभरही हलली नाहीत. कंपनीच्या ठेकेदारांचा नाईलाज झाला. ग्रामस्थांच्या या अनोख्या भूमिकेपुढे त्यांचा कोणताही इलाज चालला नाही. शेवटी वनखात्याला त्यांच्यासोबत केलेला करार रद्द करावा लागला. सगळे एकत्र आले की त्याची ताकद काय असते हे ग्रामस्थांनी दाखवून दिले होते. हेच आंदोलन पुढे ' चिपको आंदोलन ' किंवा ' मिठी मार ' आंदोलन म्हणून प्रसिद्ध झाले. या आंदोलनाचे आणखी एक प्रवर्तक आहेत. ते म्हणजे सुंदरलाल बहुगुणा. सुंदरलाल बहुगुणा हे सर्वोदयी कार्यकर्ते. चीनच्या १९६२ च्या आक्रमणानंतर खरी लढाई प्रादेशिक नसून वैचारिक आहे याची जाणीव त्यांना झाली.
सुंदरलाल बहुगुणा यांचे प्रभावी व्यक्तिमत्व. त्यांची तेथील निसर्ग आणि माणसांवर असलेले प्रेम याचा प्रभाव तेथील माणसांवर न पडता तरच नवल ! सुंदरलाल यांची गांधीजींच्या विचारांवर अतूट श्रद्धा होती. हिमालयातील जवळपास साडेचार हजार किमी चे जंगल या माणसाने पायी तुडवले. पर्यावरणाचा, वृक्षतोडीच्या समस्यांचा अभ्यास केला. त्यांचा पहाडी भागातील जनजीवनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला. पहाडी भागात शेकडा साठ टक्के जंगल असावे असे राष्ट्रीय धोरण असताना, उपग्रहांमार्फत केलेल्या पाहणीत बऱ्याच ठिकाणी हे जंगले १५ टक्क्यांपेक्षाही कमी उरले आहे हे त्यांनी लोकांच्या आणि सरकारच्या लक्षात आणून द्यायचा प्रयत्न केला. आपल्या राष्ट्रीय धोरणाला आपणच कसे हरताळ फासतो आहोत हे त्यांनी पोटतिडीकेने सांगितले. हिमालयात किमान पुढील पन्नास वर्षे वृक्षतोड होऊ नये म्हणजे आपली वनसंपदा पूर्ववत व्हायला मदत होईल असे सरकारला आवाहन त्यांनी केले. टिहरी सारख्या मोठ्या धरणप्रकल्पाना त्यांनी विरोध केला. त्यासाठी ४५ दिवसांचे उपोषण केले. त्यांनी या कारणासाठी तुरुंगवासही सोसला. भागीरथी नदीच्या काठी कोटी या गावाजवळ त्यांचे कार्य आजही सुरु आहे. सुंदरलालजींचा गौरव भारत सरकारने पद्म पुरस्कार देऊन केला. ते आज हयात नाहीत पण बहुगुणा कुटुंबियांचेच तेथील निसर्ग आणि माणसांवर प्रेम आहे. त्यांचा वारसा ते पुढे चालवत आहेत.
आपण ज्या चिपको आंदोलनाविषयी बोलतो आहोत ते साधारण १९७० ते १९७४वृक्ष आणि पर्यावरण वाचवण्यासाठी या कालावधीत सुरु झाले. पण त्यापूर्वीचा एक चित्तथरारक आणि रोमांचक इतिहास या आंदोलनाला आहे. तो आपण थोडक्यात जाणून घेऊ या. इ.स. १७३० मध्ये जोधपूरच्या महाराजांना एक भव्य राजवाडा बांधायचा होता. त्याच्या बांधणीसाठी भरपूर लाकूड लागणार होते. शिवाय या राजवाड्याचे बांधकाम चुन्यात होणार होते. ही चुनकळी तयार करण्यासाठी भरपूर जळणही आवश्यक होते. त्यासाठी भरपूर जंगलतोड करावी लागणार होती. जोधपूर जवळ सोळा मैलांवरच बिष्णोई लोकांची वस्ती असलेली खेजडली गाव होते. या गावाजवळच्या जंगलात खेजरी वृक्षाची मुबलक झाडे होती. राजाने ही झाडे तोडण्याचा आदेश दिला. खेजरी वृक्ष म्हणजे बिश्नोईंचा जीव की प्राण ! शिवाय त्यांच्या दृष्टीने हा पवित्र वृक्ष होता. प्राण गेले तरी बेहत्तर पण खेजरीची झाडे तोडू द्यायची नाहीत असा निर्धार त्यांनी केला. राजाचे सैनिक जेव्हा कुऱ्हाडी घेऊन ही झाडे तोडायला आले तेव्हा बिष्णोई लोकांनी वृक्षांना मिठ्या मारल्या. यात स्त्रियाही आघाडीवर होत्या. अमृतादेवी या स्त्रीने गावातील स्त्रियांना एकत्र केले. त्यांच्यात जागृती घडवली आणि या आंदोलनासाठी त्यांना प्रेरित केले.
सैनिकांनी सांगूनही लोक झाडांपासून हटले नाहीत. तेथील मुकादमाने सरळ आधी लोकांवर कुऱ्हाडी चालवा म्हणून आदेश दिला. या लढाईत बिष्णोई लोकांनी आपले प्राण दिले. या लढ्यात गावातील अमृतादेवीबरोबरच एकूण ३६३ ग्रामस्थ धारातीर्थी पडले. एवढा भीषण रक्तपात झाल्यानंतर राजाला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. तो स्वतः गावात पोहोचला. त्याने गावकऱ्यांची क्षमा मागितली आणि यापुढे एकही हिरवे झाड तुटणार नाही असे आश्वासन त्यांना दिले. गावातील ३६३ जणांच्या प्राणांचे मोल दिल्यानंतरच ग्रामस्थांना हा विजय मिळाला होता.आपल्या सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या या अमृतादेवी, खेजडली ग्रामस्थ, चामोलीतील चंडिप्रसाद भट आणि त्यांचे सहकारी, पर्यावरण रक्षणासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे सुंदरलाल बहुगुणा या सगळ्यांचे कर्तृत्व पाहून या मंडळींना शतशः प्रणाम करावेसे वाटतात. या आंदोलनात अनेक स्त्रिया देखील पुढे आल्या आणि त्यांनी कसे नेतृत्व केले याची रोमहर्षक हकीगत पुढील भागात जाणून घेऊ या. ( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१६/०९/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा