मुख्य सामग्रीवर वगळा

एक लढा असाही - भाग दोन ( जंगलतोडीचे भीषण दुष्परिणाम )

 उगवतीचे रंग 

एक लढा असाही - भाग दोन 

जंगलतोडीचे भीषण दुष्परिणाम

वाचकहो, मागील पहिल्या भागात आपण पाहिले की हिमालयातील विशेषतः उत्तराखंडातील समृद्ध जंगले इंग्रजांनी कशा प्रकारे नष्ट करण्यास प्रारंभ केला. पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा ही जंगलतोड थांबली नाही. तेथील वनखात्याने, सरकारने ब्रिटिशांचाच वारसा पुढे चालवला. आपल्या हाताने आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ लागलो. ब्रिटिशांनी चीड, देवदार, साग, साल आदी वृक्षांच्या लागवडीला आणि वृक्षतोडीलाही उत्तेजन दिले कारण ते त्यांच्या व्यावसायिक उपयोगाचे होते. आम्हालाही तेच वृक्ष महत्वाचे वाटले. पण जंगलात राहणाऱ्या स्थानिक आदिवासी आणि पहाडी लोकांच्या गरजा भागवणारे पमनी, बांज, बुरांझ यासारख्या रुंदपर्णी जीवनदायी वृक्षांकडे हेतुपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. जंगले साफ करण्यासाठी या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल झाली. या वृक्षांवर रोजीरोटी अवलंबून असणारा स्थानिक गरीब माणूस आपल्या अन्नपाण्याला मुकला. या प्रचंड जंगलतोडीने स्थानिक लोकांचा रोजगार हिरावून घेतला. अनेकांना स्थलांतर करण्याची वेळ आली. पोटाला अन्न, हाताला काम उरले नाही. आपल्या कच्च्याबच्यांना घेऊन अनेकांना शहरांचा रस्ता धरावा लागला. जंगलचा राजा असणारा हा पहाडी माणूस कुठेतरी रोजंदारी करू लागला, राखण करू लागला, हॉटेलात कपबशा विसळण्याची वेळ त्याच्यावर आली. लहान मुले हॉटेलात, चहाच्या टपऱ्यांवर कामे करू लागली. स्त्रिया बांधकाम आदी ठिकाणी कष्टाची कामे करू लागल्या. 

कोणी केली ही जंगले साफ ? आमच्याच माणसांनी. कधी शेतीसाठी तर कधी व्यापारी फायद्यासाठी. ज्या वृक्षांना वाढण्यासाठी अनेक वर्षे लागतात ते डौलदार वृक्ष केवळ पाच दहा रुपयांसाठी आमचा स्थानिक माणूस गरजेपोटी तोडून आडवे करू लागला. अनेक वर्षांचे वाढलेले, निसर्ग, प्राणी संपत्तीने समृद्ध असलेले आमचे हिरवेगार जंगल केवळ काही दिवसात, काही तासात आडवे होऊ लागले. वृक्षांची हत्या होऊन त्यांचे निर्जीव कलेवर जागोजागी दिसू लागले. धरतीच्या या निष्पाप लेकरांचा शाप पुढे मानवाला भोवल्याशिवाय राहिला नाही. 

पहाडात राहणारे लोक जंगल उतारांवर शेती करत. पण त्यासाठी झाडे तोडण्याचे प्रमाण सुरुवातीला मर्यादित होते पण या भागात जसजसा आपल्या नागर संस्कृतीचा प्रवेश झाला, तसतसा इथेही निसर्गाचा विध्वंस व्हायला सुरुवात झाली. या पहाडी भागातील लोक वर्षानुवर्षे परंपरेनुसार आपली शेतीची अवजारे अंगू वृक्षाच्या लाकडापासून बनवत. अंगू वृक्षाचे लाकूड वजनाला हलके पण चिवट आणि मजबूत असते. त्यामुळे या वृक्षाच्या लाकडापासून केलेली अवजारे शेतकऱ्यांना वापरण्यासाठी सोयीची असत. पण येथील वनखात्याने ही अंगूची झाडे खेळणी बनवणाऱ्या कंपनीला कराराने विकून टाकली. स्थानिक लोकांना अंगूची झाडे तोडण्यास मज्जाव केला आणि आपल्या शेतीच्या औजारांची गरज इतर वृक्षांचे लाकूड तोडून भागवावी असा अनाहूत सल्ला दिला. 

१९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले. आमच्या सीमाभागात सैनिकांना त्वरेने पोहोचण्यासाठी, रसद पुरवण्यासाठी तातडीने रस्ते करणे आवश्यक होते. सीमावर्ती भागात रस्ते करण्यासाठी काही भागातील जंगल तोडणे अपरिहार्य होते. त्यामुळे बऱ्याच भागात रस्त्यांसाठी वृक्षतोड झाली. याचा दुसरा एक तोटा असा झाला की या दुर्गम भागात नागरी संस्कृतीचा सहज प्रवेश या रस्त्यांमुळे होऊ लागला. मग साहजिकच कस्तुरीमृगापासून ते दुर्मिळ वनौषधी हस्तगत करण्याची माणसांमध्ये स्पर्धा लागली. जंगले आणखीनच ओरबाडली जाऊ लागली. माणसाच्या हावरटपणाला अंत नव्हता. त्यापायी निसर्गाचा मात्र बळी जाऊ लागला. 

याचे दुष्परिणाम लवकरच जाणवायला लागले. नद्यांना महापूर येऊन प्रचंड नुकसान व्हायला सुरुवात झाली. दरडी कोसळू लागल्या. पावसाचे ढग साधारणपणे पाच ते दहा किमी उंच अंतरावर आकाशात असतात. तेथून पडणारे पावसाचे थेंब पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे वेगाने खाली येऊ लागतात. जंगलात जेव्हा झाडांचे प्रमाण मुबलक होते तेव्हा हे वेगाने आदळणारे पावसाचे थेंब आधी झाडांची पाने झेलत. त्यांचा वेग तेथे कमी होऊन ते खाली जमिनीवर पडत असत. तेथे त्यांचा वेग शून्य होई, झाडाखालची माती, गवत यात ते जिरून जात. झाडांमुळे त्यांच्या भोवतालची माती मुळांभोवती पकड धरून असायची. जेव्हा पाऊस खूपच जास्त असे तेव्हाच फक्त तेथून ते खालच्या भागाकडे नदी किंवा प्रवाह बनून वाहत जात. 

पण जंगले नष्ट होऊ लागली. पावसाचे पाणी झाडे नसलेल्या उघड्याबोडक्या जमिनीवर वेगाने कोसळू लागले. आता या पाण्याचा खालच्या भागाकडे वाहण्याचा वेग प्रचंड वाढला. हे पाणी नुसते वाहत नव्हते तर जाताना डोंगर उतारावरील माती आपल्यासोबत घेऊन जात होते. यामुळे आधीच उघड्या झालेल्या डोंगरांचे मातीचे, खडकांचे संरक्षक आवरण नष्ट होत होते. केवळ एक हेक्टर परिसरातली साठ ते सत्तर टन माती किंवा गाळ नद्या आपल्यासोबत वाहून नेत होत्या. यावरून नद्यांचा वेग आणि त्यामुळे होणारी जमिनीची धूप केवढी प्रचंड होती याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल. 

१९७० मध्ये उत्तराखंडला अलकनंदेच्या पुराने जबर तडाखा हाणला. नदीचे पूर, दरडी कोसळणे, गाळ वाहून येणे, जमिनीची धूप होणे या गोष्टी तशा स्थानिकांना नवीन नव्हत्या. पण १९७० च्या पुराने या सगळ्या लोकांची भीतीने अक्षरशः पाचावर धारण बसली. या पुराचे रूप अत्यंत विनाशकारी आणि भयचकित करणारे होते. या पुराच्या राक्षसी प्रवाहात कित्येक पूल वाहून गेले, शेकडो बसेस वाहून गेल्या, शेकडो एकर शेतजमिनीतली पिके नष्ट झाली, शेतातील माती वाहून गेली, गुरेढोरे वाहून गेली, माणसे बेघर झाली. शेकडो लोकांचा मृत्यू झाला. ( अशाच प्रकारची दुर्घटना २०१३ मध्ये केदारनाथ परिसरात घडली. या परिसरातील गावे, घरे वाहून गेली. तर महाराष्ट्रातील माळीण गावातही २०१४ मध्ये अशी दुर्घटना घडली. यात दरड कोसळून त्याखाली संपूर्ण गाव गाडले गेले होते. ) यातूनच पुढे माणसे कशी एकत्र आली आणि या नैसर्गिक ( खरे तर मानवनिर्मित ) संकटाशी कशा प्रकारे लढा द्यायला त्यांनी सुरुवात केली हे पुढील भागात पाहू या. ( क्रमशः ) 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

१३/०९/२०२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...