उगवतीचे रंग
एक लढा असाही ( भाग १ )
नुकताच आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. आपण जसा स्वातंत्र्यलढा पाहिला ( अर्थात विशाल अर्थाने हा स्वातंत्र्य संग्राम आहे ) तसे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लढे भारताने अनादी काळापासून अनुभवले आहेत. कधी तो १८५७ चा लढा असेल ज्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ' १८५७ चे स्वातंत्र्यसमर ' असे म्हटले आहे. कधी लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला विदेशी वस्तूंच्या वापराविरुद्धचा लढा असेल वा पुढे गांधीजींनी सुरु केलेली वेगवेगळी आंदोलनं असतील, गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद मुक्ती लढा असेल, अशा अनेक असंख्य लढ्याची पार्श्वभूमी आपल्या इतिहासाला आहे. आज आपण या सर्वांपेक्षा आगळावेगळा असा एक लढा पाहणार आहोत. हा लढा निसर्गावर होणाऱ्या मानवाच्या आक्रमणाविरुद्ध आहे. या लढ्यात जसे पुरुष सामील आहेत, तशाच स्त्रियाही सामील आहेत. किंबहुना महान लढवय्या स्त्रियांच्या प्रेरणादायी त्यागाने हा इतिहास भरलेला आणि भारलेला आहे. अशा काही स्त्रियांचा परिचयही या लेखमालेद्वारे करून द्यायचा प्रयत्न असणार आहे.
खरं तर या लढ्याला ' चिपको आंदोलन ' किंवा ' मिठी मार ' आंदोलन असं म्हणता येईल. पण हा त्या विशाल लढ्याचा केवळ एक भाग आहे. मुख्य म्हणजे त्या त्या ठिकाणच्या स्थानिक जनतेने पर्यावरण वाचवण्यासाठी दिलेला हा लढा आहे. आपण स्वतःला जर भारताचे एक जबाबदार नागरिक म्हणवून घेऊ इच्छित असलो, पर्यावरण प्रेमी म्हणवून घेऊ इच्छित असलो तर हा लढा आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे. कारण हा लढा आपल्याला जणू इशारा देतो आहे की ' सावध ऐका पुढल्या हाका .' या हाका आपल्याला नाही ऐकू आल्या किंवा आपण त्याकडे दुर्लक्ष केले तर निसर्ग आपल्याला क्षमा करणार नाही, आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला क्षमा करणार नाहीत. पर्यावरण म्हणजे नेमके काय हे न शिकलेल्या परंतु निसर्ग आणि पर्यावरण ज्यांच्या जगण्याचा एक भाग आहे अशा अशिक्षित अशा लोकांनी घडवलेला हा इतिहास आहे. तो जर आपण समजून घेणार नसू तर आपल्यासारखे करंटे आपणच असू हे खेदाने म्हणावे लागेल.
भारताच्या उत्तरेला हिमालयाची विस्तीर्ण पर्वतराजी आहे. हिरवीगार वनराई, उंचच उंच वाढलेली सुरु, देवदार आदी वृक्षांची वने , खळाळत वाहणाऱ्या नद्या, विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी जीवन कोणाला आकर्षित करीत नाही ! पण हे खरंच तसं राहिलं आहे का , राहणार आहे का ? आज तरी नक्की सांगता येत नाही. अनेक ठिकाणची वस्तुस्थिती फार भयानक आहे. आपण सहलीसाठी जातो. हरिद्वार, ऋषिकेश, बद्रीनाथ, केदारनाथ वगैरे पाहून येतो. आपण खूप समाधानी असतो. पण हिमालयातील किंवा उत्तराखंडमधील बऱ्याचशा जंगलांची प्रचंड हानी झाली आहे हे विदारक सत्य आपल्याला फारसे जाणवत नाही. चामोली, गढवाल, कुमाऊं, बढयारगड आदी परिसरातील जंगल बऱ्यापैकी नष्ट झाले आहे. पण एके काळी हा सगळा भाग भरगच्च वृक्षराजीने भरलेला होता. नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध होता. तेथे राहणाऱ्या लोकांच्या गरजा भागवणारा होता.
ही विशाल वृक्षराजी म्हणजे भारताचे वैभव ! पण इंग्रज व्यापारी म्हणून या देशात आले आणि राज्यकर्ते बनले. पण मुळात त्यांची प्रवृत्ती व्यापारीच होती. त्यांची दृष्टी या नैसर्गिक सुबत्ता असलेल्या भागावर पडली आणि येथील डौलदार वृक्षराजी पाहून त्यांच्या व्यापारी वृत्ती जाग्या झाल्या. या वनांवर त्यांनी जणू आपली मालकीच प्रस्थापित केली. येथील स्थानिक रहिवाश्याना बेदखल केले आणि आपल्या स्वार्थासाठी, औद्योगिक उपयोगासाठी बेसुमार वृक्षतोड सुरु केली. डोंगराळ भाग असल्याने वाहतूक करणे कठीण होते. अशा वेळी तोडलेले लाकूड नद्यांच्या खळाळत्या पात्रातून वाहून नेण्याचा सोपा आणि बिनखर्चिक उपाय त्यांनी अवलंबला. या जंगलात राहणाऱ्या स्थानिक लोकांच्या समस्यांमध्ये भर पडू लागली. येथील लोकांचे जीवनच या जंगलांवर अवलंबून होते. त्यांना लागणारे अन्न, वस्त्र, निवारा आदी साऱ्या गरजा हे जंगलच भागवत होते. डोंगर उतारांवर ही मंडळी थोडीफार शेती करत होती. सुरुवातीला त्यांना ही वृक्षतोडीची धग जाणवली नाही पण जसजसा काळ गेला, अधिकाधिक वृक्षतोड होऊन नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट होऊ लागली तसतशी ही धग त्यांना जाणवायला लागली. हळूहळू ही मंडळी आपल्या हक्कांविषयी जागृत होऊ लागली. अर्थात १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रज या देशातून गेले. मग ही बेसुमार जंगलतोड, पर्यावरणाची हानी थांबली का ? त्यांचा हा कित्ता आपण कसा गिरवला हे पुढील भागात पाहू या.
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
११/०९/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा