उगवतीचे रंग
‘ श्री गणेश व त्याच्याशी संबंधित प्रतिके ..’
आजच्या घडीला श्री गणेश ही बहुधा सर्वात लोकप्रिय देवता असावी. परंतु आदी शंकराचार्यांनी श्री गणेशाचा समावेश पाच प्रमुख देवतात केल्यामुळे दिवसेंदिवस गणपतीची लोकप्रियता वाढू लागली. गणपतीची उपासना करणाऱ्यांचा गाणपत्य संप्रदाय निर्माण झाला. पुण्याजवळील चिंचवडचे मोरया गोसावी हे गाणपत्य संप्रदायातील प्रमुख उपासक मानले जातात. श्री गणेशाची माहिती तशी अनेक पुराणातून आलेली असली तरी गणपतीशी किंवा गाणपत्य संप्रदायाशी संबंधित दोन प्रमुख ग्रंथ मानले जातात. श्री गणेशपुराण व मुद्गलपुराण. गणेशपुराणात गणपतीच्या कथा व पूजेच्या पद्धतींची माहिती आलेली आहे. प्रसिद्ध गणेश सहस्त्रनाम स्तोत्र आणि गणेश गीता यांचा समावेश गणेश पुराणात झालेला आहे. मुद्गल पुराणात गणपतीच्या आठ अवतारांचे वर्णन आले आहे.
गणपती हा विघ्नहर्ता म्हणून प्रामुख्याने आपल्याला परिचित आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या बहुतेक मराठी माणसांच्या घरांच्या दरांवर श्रीगणेशाची प्रतिमा असते. गणपती हा विघ्नहर्ता असल्याने घरावर येणाऱ्या संकटाचे निवारण तो करेल अशी घरातील लोकांची श्रद्धा असते.
गणपतीच्या जन्मासंबंधाने वेगवेगळ्या पौराणिक कथा प्रचलित आहेत. त्या येथे सांगण्याचे प्रयोजन नाही. पण त्यामागील प्रतिकात्मक अर्थ पाहणे महत्वाचे. असे म्हणतात की पार्वतीने आपल्या अंगावरील मळ काढून एक मूर्ती बनवली आणि त्यात प्राण फुंकले. तो तिचा पुत्र बनला. त्याचे स्वरूप अत्यंत सुंदर होते. या ठिकाणी पार्वतीने आपल्या अंगाचा मळ काढून त्याला सजीवरूप दिले ही गोष्ट आपल्याला ऐकायला विचित्र वाटते. आणि आजच्या विज्ञानयुगात आपण ती हसून सोडून देऊ. पण त्याचा प्रतीकात्मक अर्थ असा आहे की पार्वतीने आपल्या अंगाचा मळ काढून टाकला याचा अर्थ सत्व, रज, तम या त्रिगुणांचा तिने त्याग केला. मनातील विकार नाहीसे केले. आणि असे जेव्हा होते मन आणि शरीर शुद्धी होते. आणि मांगल्याची सुरुवात होते. ती गणेशाच्या रूपाने झाली. तो तिचा रक्षणकर्ता बनला.
नंतर आपण ऐकले आहे की भगवान शंकर जेव्हा पार्वतीला भेटण्यास आले तेव्हा द्वारपाल या नात्याने गणपतीने त्यांना अडवले. त्यांच्यात युद्ध झाले आणि शेवटी शंकरांनी श्रीगणेशाचे मस्तक उडविले. ही कथा सुद्धा प्रतिकात्मक आहे. गणपती हा मुळात रूपवान आणि सामर्थ्यवान होता. त्याला आपल्या रूपाचा आणि शक्तीचा अहंकार झाला होता. त्यामुळे त्याचा अहंकार नाहीसा करण्यासाठी शंकरांनी त्याचा शिरच्छेद केला. म्हणजे अहंकार नाहीसा केला. अहंकार हा प्रगतीतली मोठी बाधा आहे. अहंकारामुळे थोर लोकांचे सुद्धा अधःपतन झालेले आपण पाहतो. नंतर गणपतीला हत्त्तीचे शीर बसवण्यात आले म्हणून तो गजमुख झाला. गजानन झाला. हे ही प्रतिकात्मक आहे. हत्ती हा राजसत्तेचे प्रतिक आहे. ऐश्वर्याचे प्रतिक आहे. हत्तीचे मोठे डोके हे बुद्धिमत्तेचे प्रतिक आहे. श्रीगणेश ही बुद्धीची देवता आहे. म्हणून गणपती राजसत्ता, ऐश्वर्य आणि बुद्धिमत्तेचे प्रतिनिधित्व करतो. गणपती हा एकदंत का आहे या संबंधीही अनेक पौराणिक कथा आहेत. पण त्याचा खंडित दंत हा विविध मतांचे खंडन करून योग्य निष्कर्षाप्रत पोहचण्याचे प्रतिक आहे. तसेच तो संकटांचे खंडन म्हणजे अंत करणारा आहे. गणपतीच्या हातात मोदक आहे. हा मोदक आरोग्यदायी तर आहेच. पण प्रतिकात्मक सुद्धा आहे. मोद म्हणजे आनंद. क म्हणजे कर्ता. किंवा कर्म असाही अर्थ घेता येतो. गणपती हा मोद देणारा म्हणजे आनंद देणारा आहे. कर्माच्या सारणामध्ये आनंदरुपी पाच पाकळ्या अशी यामागील कल्पना आहे. म्हणून मोदक पाच पाकळ्यांचा बनवतात. या पाच कळ्या म्हणजे ज्ञानाची पाच साधने. अभ्यास, मनन, चिंतन, अवलोकन आणि आकलन. हे सारे मिळून कर्माच्या सारणामधून जो आनंद मिळतो तो मोदक. गणपतीचे सुपासारखे मोठे कान सांगतात की भरपूर ऐका. श्रवणाद्वारे ज्ञान ग्रहण करा. उत्तम श्रोते व्हा. लहान मोठ्या गोष्टी कानात साठवा. त्याचे बारीक असलेले डोळे सांगतात की कुठल्याही गोष्टीचे नीट बारकाईने निरीक्षण करा. त्याशिवाय निष्कर्षाला पोहचू नका. विशाल उदार सांगते की जीवनातील सुखदुःख आपल्या उदरात सामावून घ्या. मोठी सोंड म्हणजे एखाद्या व्यक्तीची वा गोष्टीची चांगले किंवा वाईट दुरूनच ओळखण्याची क्षमता दर्शवते. तसेच संकटांना घाबरू नका. धैर्याने सामोरे जा हे ही ती सांगते.
गणपतीच्या पायामध्ये पैंजण आहेत. कमरेला मेखला आहे. गणपती ही कलेची देवता आहे. तो चौदा विद्या आणि चौसष्ट कलांची देवता आहे. तो संगीतात निपुण आहे. संगीतामध्ये गायन, वादन आणि नृत्य यांचा समावेश होतो. या तीनही कलांमध्ये तो प्रवीण आहे. म्हणून कोणत्याही कलाप्रकारांचे सादरीकरण करताना श्रीगणेशाला आधी वंदन केले जाते. नाटक, सिनेमा आणि निरनिराळ्या लोककला यांचे सादरीकरण करताना आधी श्री गणेशाचे स्मरण केले जाते.
श्रीगणेशाचे वाहन उंदीर आहे. हेही आपल्याला थोडे विचित्र वाटते. पण ते सुद्धा मानवी मनाचे प्रतिक आहे. उंदीर हा प्राणी अत्यंत हुशार, चपळ आणि चंचल असतो. तो एका ठिकाणी कधीच थांबत नाही. मानवी मनही तसेच चंचल आहे. ते सतत इकडून तिकडे धावत असते. गणपती उंदरावर स्वार झाला आहे म्हणजे मानवी मनावर त्याने नियंत्रण मिळवले आहे असा त्याचा प्रतिकात्मक अर्थ घ्यायला हरकत नाही.
मुळात गणेशोत्सवच प्रतिकात्मक आहे. या साऱ्या प्रतिकांचा अर्थ समजावून घेऊन आपण तो साजरा करायला हवा. पण आज गणेश उत्सव अनेक अर्थानी त्याच्या मूळ उद्देशापासून दूर गेला आहे. एखाद्या मोठ्या शहराच्या चौकात उभे राहिले तर चारी बाजूला हाकेच्या अंतरावर चार चार गणेश मंडळे आपल्याला दिसतात. त्यांच्या मंडपात लावलेल्या डी जे किंवा स्पीकरने बधीरत्व येईल किंवा कानाचे पडदे फाटतील असा आवाज असतो. रस्त्यावरील रहदारीला प्रचंड अडथळा या मंडळांमुळे होत असतो. सर्वसामान्यांची कोंडी होते. पण बोलणार कोण ? यामुळे आधीच वाहतुकीचा ताण पडलेल्या शहरांवरचा ताण आणखी वाढतो.
यात काही मंडळी सोयीस्कर भूमिका घेतात. आपल्याच सणांना तुमचा विरोध का, वर्षातून एकदाच तर येतो. पण हे सगळे युक्तिवाद फसवे आहेत. वाढवला थोडा आवाज तर काय बिघडले ? असे म्हणणाऱ्या लोकांच्या घरासमोर जेव्हा दिवसभर आणि रात्री बारा वाजेपर्यंत डी जे वाजवला पाहिजे. त्याशिवाय त्याचा त्रास काय असतो ते त्यांना कळणार नाही. वर्षातून एकदा गणेशोत्सव, एकदा नवरात्र, एकदा दहीहंडी, एकदा ३१ डिसेंबर, एकदा दिवाळी असे एक एक दिवसाचे निमित्त करून अनेक दिवस सर्वसामान्यांना वेठीस धरले जाते. माझा उत्सवांना विरोध नाही. उत्सव तर साजरे झालेच पाहिजेत. ते आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्यही आहे. पण शक्यतो पारंपारिक पद्धतीने, पारंपारिक वाद्यांचा वापर करून ते साजरे करता येणार नाहीत का ? त्या निमित्ताने काही चांगले प्रबोधनपर कार्यक्रम हाती घेता येणार नाहीत का ? हाकेच्या अंतरावर चार चार वेगळी गणेश मंडळे कशासाठी ?आमचे नेते, नगरसेवक इ. मंडळी याबाबतीत का नाही लोकांचे प्रबोधन करीत ? मंडळी, प्रश्न अनेक आहेत. यासाठी समाजप्रबोधन होणे जरुरीचे आहे. काळानुसार उत्सव साजरे करण्याच्या पद्धतीत बदल होणे अपेक्षित आहे.
© विश्वास देशपांडे , चाळीसगाव
२७/८/२०१७
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा