उगवतीचे रंग
जहाँ डाल डाल पर...
भारतीय स्वातंत्र्याचा आपण नुकताच अमृतमहोत्सव साजरा केला. घराघरांवर तिरंगा डौलाने आणि अभिमानाने फडकत होता. या दिवशी अनेक ठिकाणी देशभक्तीपर गाणी लावली गेली होती. एका ठिकाणी सिंकदर-ए-आजम या चित्रपटातील मो. रफी यांनी गायिलेले ' जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती हैं बसेरा, वो भारत देश हैं मेरा ' हे गाणी कानावर पडलं. अंगावर रोमांच उभे राहिले. मन विचार करता करता भूतकाळात गेलं. खरंच एके काळी माझा देश सोने की चिडिया होता, सोन्याची खाण होता. तो सुवर्णकाळ होता. सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा इतिहास होता. माझ्या पूर्वजांचा अभिमान वाटावा असा गौरवशाली इतिहास होता.
श्रीमंत असणारं सोरटी सोमनाथ देवालय आणि परिसर, देवगिरीच्या यादव राजांचा परिसर, हंपी आणि विजयनगर येथील समृद्ध राज्य, दक्षिण भारतातील मदुराई, पद्मनाभ आदी ठिकाणची आधुनिक स्थापत्यशास्त्रालाही आव्हान देतील अशी मंदिरं, गुजरात, सौराष्ट्र, उत्तर प्रदेश, हिमालयातील केदारनाथ, बद्रीनाथ आदी मंदिरं हे सगळं भारताचं वैभव होतं आणि आहे. सोरटी सोमनाथाचं मंदिर गुजरातमधील वेरावळ या प्राचीन बंदराजवळ आहे. येथून भारतीय व्यापारी आपला माल परदेशात विक्रीसाठी घेऊन जात असत. परदेशातील व्यापारी खरेदीसाठी या बंदरात उतरत. सोमनाथ मंदिरामुळे या क्षेत्राला प्रसिद्धी मिळाली होती. तसेच व्यापारामुळे हा प्रदेश संपन्न होता. या सोमनाथच्या मंदिरावर गझनीच्या महंमदाने अनेक स्वाऱ्या करून येथील अमाप संपत्ती लुटून नेली. महमंद गझनी केवळ एवढे लूटूनच थांबला नाही तर हिमालयाच्या उतरणीवर असलेले नगरकोटमधील पवित्र देवालय त्याने लुटले. त्यावेळी लाहोर भारतातच होते. लाहोर, कनौज, मथुरा, ग्वाल्हेर आदी ठिकाणी स्वाऱ्या करून तेथील देवालये उध्वस्त करून अमाप संपत्ती त्याने लुटून नेली.
प्राचीन भारतीय पराक्रमी राजांची परंपरा भारतात आहे. मौर्य साम्राज्य, गुप्त साम्राज्य, विजयनगर साम्राज्य, देवगिरीचे यादव सम्राट अशा कितीतरी राजांनी आणि राजघराण्यांनी भारताचा गौरव वाढवला आहे. परंतु भारतातील राजांमध्ये असलेले आपसातील हेवेदावे, असूया, मत्सर इ गोष्टींचा फायदा परकीय आक्रमकांनी वेळोवेळी करून घेतला. भारताच्या अस्मितेवर घाला घातला आणि प्रचंड संपत्ती लुटून नेली. पण या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे तो भूतकाळातील वैभवशाली भारताचा. इतिहास समजून घेतल्याशिवाय वर्तमानात जगता येत नाही आणि भविष्यकाळाची आखणी करता येत नाही. फक्त इतिहासाचे गोडवे गाऊन भागत नाही. त्यापासून बोध घ्यावा लागतो, प्रेरणा घ्यावी लागते. देशाला प्रगतीपथावर न्यायचे असेल हा इतिहासाचा जागर आवश्यक ठरतो.
भारतीय मूर्तिकारांना हजारो वर्षांपूर्वी धातुशास्त्र ज्ञात होतं याचे पुरावे प्राचीन काळातील अनेक मूर्ती आजही देतात. आजच्या विज्ञानाला जे धातुशात्र गेल्या शे दीडशे वर्षात ज्ञात झालं आहे त्याचं सखोल ज्ञान आमच्या पूर्वजांपाशी होतं. आज विविध सिमेंट कंपन्यांच्या मजबुतीचा दावा करणाऱ्या अनेक जाहिराती आपण पाहतो पण त्यांचा वापर करून बांधलेल्या अनेक इमारती शंभर वर्षेही मोठया मुश्किलीने टिकतात. काही तर काही वर्षातच पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळतात. पण आमची शेकडो, हजारो वर्षांपूर्वी बांधलेली देवालये मात्र आजही दिमाखात उभी आहेत. सिमेंट, चुना आदींचा वापर न करता केवळ दगडांवर दगड ठेवून मंदिरे बांधण्याची कला ' हेमाडपंती ' म्हणून प्रसिद्ध आहे. हेमाडपंथी नव्हे तर हेमाडपंती. कारण हेमाद्री पंडित किंवा हेमाडपंत हा यादवांचा प्रधान होता. त्याने ही कला विकसित केली. दगड विशिष्ट कोनात कापणे, त्याला खाचा किंवा खुंट्या ठेवून एकमेकात अडकवणे ( लॉक करणे ) यामुळे ही मंदिरे वर्षानुवर्षे टिकून राहिली. वेरूळचे घृष्णेश्वर मंदिर, त्रंबकेश्वराचे मंदिर, चाळीसगावजवळील पाटणादेवी येथील मंदिर अशी अनेक मंदिरे आणि अनेक लहानमोठ्या गावांमध्ये अशी पुरातन मंदिरे उभी असलेली आपल्याला दिसतील.
प्राचीन भारतावर विविध आक्रमकांच्या स्वाऱ्या झाल्या. पण भारतात असलेल्या मंदिर आणि मठांनी आपला इतिहास, परंपरा सांभाळून ठेवण्याचे आणि तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे अमूल्य काम केले. शंकराचार्य आदींनी स्थापन केलेले मठ, समर्थ रामदासांनी स्थापन केलेले आणि पुढे त्यांच्या शिष्य, महंतांनी जपलेले त्यांचे मठ यांनी याबाबतीत मोठेच काम केले आहे. अजूनही ते काम अव्याहतपणे तसेच सुरु आहे. काळ बदलला, युगे बदलली. आक्रमणाची अनेक वादळे आली. या सगळ्यांना तोंड देऊन मंदिरे, मठ यांनी भारतीय इतिहास, धर्म, परंपरा जागृत ठेवली. अनेक ऋषीमुनींच्या आश्रमांनी समृद्ध गुरुकुल परंपरा जपली, पुढे नेली. त्यातून समाजाप्रती आपल्या कर्तव्याप्रती सजग असणाऱ्या पिढ्या घडवल्या. श्रीराम, श्रीकृष्ण अशाच गुरुकुलातून वाढले. ज्या ज्या वेळी भारतातील चैतन्य, अस्मिता क्षीण झालेले दिसले त्या त्या वेळी भारतातील संत, ऋषी मुनी यांनी आमची अस्मिता जागृत करण्याचा प्रयत्न केला. मग ते शंकराचार्य असतील, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास किंवा आणखी इतर संत असतील. या सगळ्यांनी आम्हाला केवळ देव देव न करता आमच्या कर्तव्याची, पुरुषार्थाची जाणीव करून दिली. म्हणूनच एवढी आक्रमणे होऊनही भारतीय संस्कृती टिकून आहे.
धातुशास्त्र, स्थापत्यकला यासोबतच नृत्यकला, नाट्यकला, शिल्पकला भारतात विकसित झाली होती. भरतमुनींचा ' नाट्यशास्त्र ' ग्रंथ याची साक्ष देतो. भारतीय नृत्य, नाट्य आणि संगीतकलेची मुळे या ग्रंथात आपल्याला आढळतात. छंदशास्त्र , व्याकरणशास्त्र, गणितशास्त्र, खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र इ अनेक विषयांवर संस्कृत भाषेत प्राचीन भारतात ग्रंथ निर्मिती झालेली होती. भारतातील नालंदा, तक्षशिला यासारख्या विद्यापीठात अनेक देशातून विद्यार्थी शिकण्यासाठी येत होते.
रेशीम, मसाल्याचे पदार्थ, हिरे, माणके, मोती आदी रत्ने या सगळ्यांच्या व्यापारासाठी भारत प्रसिद्ध होता. वास्को द गामा समुद्रमार्गे भारतात आला आणि भारतातील मसाल्याचा मोठा व्यापार हाती लागल्याचा आनंद त्याला झाला. पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी भारताशी व्यापार करून मसाल्याच्या पदार्थातून अफाट नफा कमावला. भारतावर शक, कुशाण, हूण, मुघल,डच, फ्रेंच,पोर्तुगीज, इंग्रज अनेक आक्रमक आले. त्यातील मुघल आणि इंग्रजांनी प्रदीर्घ काळ भारतावर राज्य केले. इंग्रजांनी भारतातील प्रचंड साधनसंपत्तीची लूट केली. भारतातून कच्चा माल इंग्लंडला नेऊन तेथील कारखान्यात तयार झालेल्या मालाची हक्काची बाजारपेठ भारताला बनवून भारतातील उद्योगधंदे उध्वस्त केले. सातत्याने परकीय आक्रमणे झाली तरी भारताची संस्कृती आणि त्यातील एकता, अखंडता, सहिष्णुता टिकून राहिली. याला कारण म्हणजे भारताची सर्वसमावेश करण्याची उदार मानसिकता. इथे जो जो आला, त्याला आम्ही आपला मानला. तो या संस्कृतीत सामावून गेला.
प्राचीन भारताने जगाला अनेक देणग्या दिल्या आहेत त्यातील तीन प्रमुख आहेत असे मला वाटते. त्यातील पहिली म्हणजे योगशास्त्र. पतंजली मुनींनी लिहिलेली ' योगसूत्रे ' आजही जगाला मार्गदर्शन करीत आहेत. त्याआधारे योगगुरू बी के एस अय्यंगार, बाबा रामदेव, श्री श्री रविशंकर आणि इतर अनेक योगाचार्यानी आधुनिक भारताला आणि जगालाही निरामय आरोग्याची साधना शिकवली आहे. योगासने, प्राणायाम यांचे पुनरुज्जीवन केले आहे. दुसरी देणगी आहे ' आयुर्वेद '. चरक, सुश्रुत आदी आयुर्वेदाचार्यानी त्या काळात जे मार्गदर्शन केले, ग्रंथ लिहून ठेवले त्याआधारे आज भारतातील आयुर्वेद प्रगती करीत आहे. आयुर्वेद केवळ शरीराचा विचार न करता मनाचाही विचार करतो. विविध वृक्ष, वनस्पती, फळे, फुले आदींबाबत निरीक्षण आणि प्रयोग करून प्राचीन आयुर्वेदाचार्यानी आपल्यासमोर जे ज्ञान ठेवले आहे,त्याची महती अवर्णनीय आहे. त्याबाबत आपण त्यांचे ऋणी आहोत. प्राचीन भारताने जगाला दिलेली तिसरी देणगी म्हणजे ' अध्यात्म '. आजच्या मूल्ये हरवत चाललेल्या जगात, धावपळ आणि ताणतणाव असलेल्या जगात सगळ्यांना तारू शकेल, मार्गदर्शन करू शकेल अशी गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे भारतीय तत्वज्ञान आणि अध्यात्म. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत आदी ग्रंथ आजही जगाला प्रेरणा देणारे मोठे स्रोत आहेत.
आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी मागे एकदा लंडनमध्ये बसवलेल्या भगवान बसवेश्वरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की , ' एका बाजूला मॅग्ना कार्टा आणि दुसऱ्या बाजूला महात्मा बसवेश्वरांची वचने ठेवा. तुम्हाला समजेल की मॅग्ना कार्टाच्या कितीतरी शतकांपूर्वी माझ्या देशाचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता ! '
' कृण्वन्तो विश्वमार्यम ' हा आपल्या ऋग्वेदातील मंत्र आहे. हा मंत्र सांगतो की जगातील प्रत्येक मानवाला ' आर्य ' म्हणजे एक श्रेष्ठ आणि आदर्श माणूस घडवू या. हा मंत्र जरी छोटा असला तरी त्यातील अर्थ मात्र विशाल आहे. जाती, धर्म, पंथ, मतमतांतरे इ. च्या गलबल्यातून बाहेर काढून जगातील सर्व माणसांना ' आर्य ' म्हणजेच श्रेष्ठ माणूस बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. प्राचीन ग्रंथात ' आर्य ईश्वरपुत्र : ' असे म्हटले आहे. यावरून ही गोष्ट स्पष्ट होते की प्राचीन भारतीयांना ' आर्य 'म्हणण्याची पद्धत होती. आपल्या देशालाही ' आर्यावर्त ' असे म्हटले जाई. या अर्थाने आपण सगळे आर्यच आहोत. रामायण, महाभारतात त्यातील पराक्रमी वीरांचा उल्लेख करताना किंवा त्यांना संबोधताना त्यांच्या पत्नी त्यांना ' आर्यपुत्र ' असे म्हटल्याचे आपल्याला आढळते.
मग ' आर्य ' कोण ? ' आर्य ' म्हणजे कोणा एका विशिष्ट धर्म, जाती पंथाची व्यक्ती नसून जो पवित्र आणि शुद्ध कर्तव्यकर्माचे आचरण करतो, वाईट गोष्टींपासून दूर राहतो आणि पूर्णांशाने सदाचारी असतो तोच ' आर्य ' होय. पुढील काळात आपल्यातून अशाच सज्जनांची मांदियाळी निर्माण व्हावी आणि आपल्या प्राचीन भारताची वैभवशाली परंपरा आपण पुढे चालवावी, त्याला गतवैभव प्राप्त करून द्यावे असे या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने म्हणावेसे वाटते. पुन्हा आपण अभिमानाने म्हणू शकू, ' जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती हैं बसेरा, वो भारत देश हैं मेरा. '
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२४/०८/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा