मुख्य सामग्रीवर वगळा

भारतीय संस्कृतीला पडलेली दोन मधुर स्वप्ने : श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वर

 उगवतीचे रंग 

भारतीय संस्कृतीला पडलेली दोन मधुर स्वप्ने : श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वर 

श्रावण वद्य अष्टमी. दोन महापुरुषांचा जन्मदिवस. योगेश्वर श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर. दोघेही लोकोत्तर महापुरुष. श्रीकृष्णाने अर्जुनाला निमित्त बनवून गीता सांगितली ती सगळ्या जगासाठी. तीच गीता सर्वसामान्य माणसाला समजावी म्हणून गीतेचा अमृतकलश ज्ञानेश्वर माउलींनी मराठीत आणला. एकाच दिवशी या दोन महात्म्यांची जयंती हा निश्चितच काहीतरी ईश्वरी संकेत असला पाहिजे. ' ज्ञानियांचा राजा ' म्हटलं की आमच्या डोळ्यांसमोर ज्ञानेश्वर माउली येतात. पण ज्ञानेश्वर माउली काय योगेश्वर श्रीकृष्ण काय, दोघेही तसे ज्ञानियांचे राजेच ! सगळ्या राजांचे राजे. तत्वज्ञानांचे तत्वज्ञानी. 

माउलींनी एवढ्या सुंदर पद्धतीने गीतेचे निरूपण केले की त्यांच्याच  शब्दात सांगायचे तर ' माझा मराठीचा बोलू कवतुकें, परी अमृतातेही पैजा जिंके ' असेच ते आहे. केवळ गीता किंवा ज्ञानेश्वरीच नाही तर मराठी भाषेलाही ज्यांनी गौरव प्राप्त करून दिला अशी माझी ज्ञानेश्वर माउली. म्हणून तर एक तरी ओवी अनुभवावी एवढे महत्व माऊलींच्या शब्दांना प्राप्त झाले आहे. युगानुयुगे आणि शतकानुशतके भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी या दोन्ही ग्रंथांचे भाविक, कवी, विद्वान आणि सर्वसामान्य जन आकंठ रसपान करीत आले आहेत. अनेकांना ते नित्य नवी प्रेरणा देत आले आहेत. व्यवहार आणि अध्यात्म या दोन्हीमध्ये पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे या ग्रंथातून नक्कीच मिळतात एवढी त्यांची थोरवी आहे. 

ज्ञानेश्वर माउलींनी संत निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून ज्ञानेश्वरी सांगितली. निवृत्तीनाथ हे त्यांचे केवळ ज्येष्ठ बंधूच नव्हते तर गुरूदेखील होते. ज्ञानेश्वरी सांगण्याचं कोणतंही श्रेय माउली स्वतःकडे घेत नाहीत. त्याचं कर्तृत्व, मोठेपणा ते आपल्या गुरूंकडे सोपवतात. केवढी ही नम्रता ! प्रत्येक लहानसहान गोष्टीचं श्रेय घेण्याची आपली प्रवृत्ती. त्यातून आपला अहंकार नकळत पोसला जातो. माउलींनी गीतेवरील भाष्य म्हणून नऊ हजार ओव्या लिहिल्या. आणि शेवटच्या नऊ ओळीत मागणे मागितले. विश्वात्मक देवाकडे. मी एवढा वाकयज्ञ केला आहे. या यज्ञाने तू संतुष्ट झाला असशील म्हणून प्रसादरूपी मागणे ( पसायदान ) तुझ्याकडे मागतो. जे मागितले ते स्वतःसाठी नाहीच. जगाच्या कल्याणासाठी. म्हणून तर आपण ' जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे ' असे म्हणतो.

 ज्ञानेश्वर माउलींनी ' खळांची व्यंकटी सांडो ' असे मागणे मागितले म्हणजे दुष्टांचा दुष्टपणा, दुष्टप्रवृत्ती नष्ट होवो. माउलींच्या शब्दात एवढी ताकद होती की त्यांनी या जगातून दुष्ट लोक नष्ट होवोत असे मागणे मागितले असते तरी त्यांची मागणी पूर्ण झाली असती. पण लोकांच्या चांगुलपणावर माउलींचा विश्वास आहे. खलप्रवृत्ती एकदा नष्ट झाली की लोक चांगलेच वागतील. सज्जनांची मांदियाळी निर्माण होईल. या सृष्टीतील यच्चयावत प्राणी, माणसे एकमेकांचे मित्र होतील. असे झाले की माणसे जी काही मागणी परमेश्वराकडे करतील, ती चांगलीच असेल. तेव्हा अशा माणसांना ' जो जे वांच्छिल तो ते लाहो ' म्हणजे त्यांना हवं असेल ते दे अशी मागणी माउली करतात. हे पसायदान केवळ मराठी माणसांचं नाही, केवळ भारतीयांचं नाही. ते साऱ्या जगासाठी आहे. जातपात, धर्म, भाषा, प्रांत आदी सीमा ओलांडून अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी ते आहे. 

देव म्हणजे आकाशातील विस्तीर्ण पटामध्ये आपापल्या तेजानं झळाळणारे तारे असं म्हटलं तर त्या ताऱ्यांमधील सगळ्यात तेजस्वी तारा म्हणजे श्रीकृष्ण आहे असे म्हणता येईल. हाच पट भारतात श्रीराम, श्रीकृष्ण आणि शंकर ( महादेव ) यांच्या उभ्या आडव्या धाग्यांनी आकर्षक आणि मजबूत असा विणला गेला आहे. श्रीकृष्ण, श्रीराम आणि शंकर यांची मंदिरं नाहीत किंवा पूजा होत नाही असा भाग भारतात क्वचितच आढळेल. 

त्यातही श्रीकृष्णाच्या जीवनाचा प्रभाव भारतातील कला, काव्य आणि सांस्कृतिक जीवनावर सर्वात जास्त आहे. अनेक कवी, महाकवी, लेखक यांना स्फूर्ती आणि प्रेरणा देणारे हे व्यक्तिमत्व ! लहानांपासून थोरांना आकर्षित करून घेणारे हे व्यक्तिमत्व. भारताच्या विविध भागातील हजारो लोकगीते, लोककथा, प्राचीन चित्रकला, नाट्यकला, नृत्यकला इत्यादींवर आपली अमीट छाप असणारे हे व्यक्तिमत्व ! लावणी, होरी, कजरी, गवळण आदी काव्यप्रकार तसेच अभिजात संगीतातील राग, ख्याल, ठुमरी या सगळ्यांमधील बराच भाग श्रीकृष्ण चरित्राने व त्याच्या कथांनी व्यापलेला आहे. जसे काव्य,साहित्य प्रकारात नवरस असतात तसा या सगळ्या कला, साहित्यातील ज्याला आपण श्रीकृष्ण रस म्हणूया, तो जर बाजूला काढला तर सगळेच निरस होऊन जाईल. 

श्रीकृष्ण चरित्राने आम्हाला युगानुयुगे मोहिनी घातली आहे, मार्गदर्शन केले आहे म्हणूनच तो युगपुरुष आहे, युगंधर आहे. काळावर आपली छाप उमटवून काळाचा प्रवाह बदलणारे काही महापुरुष असतात, तसाच हा योगेश्वर कृष्ण. त्याने त्याच्या काळातील कंसासह अनेक असुरांचा विनाश केला. दुष्ट प्रवृत्ती नष्ट केल्या. असे करताना त्याने अनेक राज्ये जिंकली. पण एकाही राज्याचा मोह त्याला पडला नाही. वेगवेगळी राज्ये वेगवेगळ्या सुपात्र अशा व्यक्तींच्या ताब्यात सोपवून तो नामनिराळा झाला हे त्याचे मोठेपण आहे. 

श्रीकृष्णाने आपल्या आयुष्यात काही चमत्कार जरूर केले असतील पण त्याचे चरित्र हे महामानवाचे चरित्र आहे. महाभारतातील घटनांचा बारकाईने अभ्यास केला असता श्रीकृष्णाने आपल्या वागणुकीने निरनिराळे आदर्शच प्रस्थापित केले हे आपल्याला दिसून येईल. त्याला त्या काळातील आद्य समाजसुधारकही या दृष्टीने म्हणता येईल. कौरव पांडव युद्धात त्याने पांडवांची बाजू घेतली याचे कारण म्हणजे कौरव त्याचे शत्रू होते म्हणून नव्हे तर कौरव अन्यायाने वागणारे होते म्हणून. पांडवांचा पक्ष घेऊन त्याने सत्य, न्याय, सदाचार यासारख्या नैतिक मूल्यांची प्रतिष्ठापना केली. 

गाई चारणे, गोपाळांशी मैत्री करणे, त्यांच्यासमवेत राहून सामाजिक समतेचे तत्व त्याने प्रस्थापित केले. ' माखनचोर ' म्हटल्या गेलेल्या कृष्णाने सामान्यांच्या मुखात दही, दूध, लोणी पडावे या उद्देशाने हे घडवून आणले. अन्यथा त्याच्या घरी या सगळ्यांची अजिबात कमतरता नव्हती. गोपाळकाला आज आपण चवीने आणि प्रसाद म्हणून खातो पण त्या वेळी सामान्य गोपाळांनी आणलेले खाद्यपदार्थ एकत्र करून त्याने अनोखी सामाजिक समरसता साधली. सर्वांना समान पातळीवर आणले. इंद्रदेवाची केली जाणारी पूजा बंद करून अनाठायी होणाऱ्या पूजा, कर्मकांड इ. च्या विरोधातच तो उभा ठाकला. 

आज स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांची वर्णने आपण आपण पेपरमध्ये, टीव्ही वर पाहतो. श्रीकृष्ण त्याच्या काळात अशाच अत्याचारित स्त्रीवर्गाच्या रक्षणासाठी उभा राहिलेला आपल्याला दिसेल. प्राग्ज्योतिषपूर नावाचे राज्य होते जे बहुधा आजच्या आसाममध्ये असावे. या राज्याचा राजा किंवा प्रमुख नरकासुर होता. अनेक स्त्रियांना पळवून आणून त्याने बंदिवासात ठेवले होते. स्त्रियांचे जिणे खरोखरीच नरक झाले होते. असेही सांगितले जाते या ठिकाणी स्त्रियांचा देहव्यापारासाठी वापर केला जायचा. अशा या स्त्रियांना बंदिवासातून त्याने सोडवले. नरकासुराला संपवले. आता या सोडवलेल्या स्त्रियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला.यात त्या स्त्रियांचा काहीही दोष नसताना त्यांना स्वीकारायला समाज तयार नव्हता. आज सुद्धा समाजात ही मानसिकता आपल्याला टिकून असलेली आपल्याला दिसते. इथे श्रीकृष्णाचा दूरदर्शीपणा आपल्याला दिसतो. त्याने प्रसंगी आपले नाव देऊन त्यांचे पुनर्वसन घडवून आणले हा त्याचा केवढा मोठेपणा ! म्हणून श्रीकृष्ण हा आद्य समाजसुधारक होता असेच म्हणावे लागेल. 

श्रीकृष्णाचे चरित्र सांगताना काळाच्या ओघात कीर्तनकार, प्रवचनकार,पुराणे, भागवतकार आदींनी दिव्यत्वाचा साज चढवला. त्याचे चरित्र हे त्याच्या नेतृत्वाची, कर्तृत्वाची गाथा सांगण्यापेक्षा चमत्काराच्या कथा असे स्वरूप झाले. या सगळ्यात श्रीकृष्णाने आमच्यासमोर प्रस्थापित केलेले आदर्श, त्याने दिलेली शिकवण याकडे आमचे दुर्लक्ष झाले आणि देव म्हणून आम्ही त्याची पूजा करू लागलो. त्याची पूजा करायची नाही का ? जरूर करायची आहे. त्याची नाही तर कोणाची पूजा करायची ? पण त्याच्या गुणांची पूजा आम्हाला बांधता आली पाहिजे. त्याने सांगितलेल्या मार्गावर चालता आले पाहिजे तरच श्रीकृष्ण चरित्र आम्हाला कळले असे होईल. 

या छोट्याशा लेखात श्रीकृष्णाच्या प्रभावी चरित्राला फक्त ओझरता स्पर्श करण्याचा प्रयत्न आहे. एका लेखात सामावणारे हे व्यक्तिमत्व नाही. त्याचं कोणताही नाव घ्या त्यात कमालीचा गोडवा आहे. कान्हा, केशव, माधव, मुरलीधर, मुरारी, देवकीनंदन, मुकुंद सगळीच नावे कमालीची गोड आहेत. तो खरा ' चित्तचोर ' आहे. त्याच्या बालपणीच्या लीलांनी तर सगळ्यांना मोहून टाकले आहे. जसं मी वर म्हटलं की तो आद्य समाजसुधारक मला वाटतो, तसा तो जादूगार संगीतकार आहे. त्याची बासरी सगळ्यांनाच मोहवून टाकते आहे. त्याच्या बासरीचे दिव्य आणि मधुर सूर गोकुळातील गोपी, गोप, आबालवृद्ध एवढेच नव्हे तर गाई, गुरे, रानातील सगळे प्राणी या सगळ्यांना एकत्र आणणारे आहेत. दुष्टांना आपली दुष्ट प्रवृत्ती, हिंस्त्र प्राण्यांना त्यांची हिंस्रता विसरायला लावणारे आहेत. त्याचे संगीत हे असे एक औषध आहे ज्याने सगळे भौतिक ताप हरण केले. 

त्याच्या बोलण्यातील गोडवा, हसतमुख आणि प्रसन्न चेहरा, अभ्यासपूर्ण युक्तिवाद करण्याची पद्धत, दुसऱ्याला न दुखावता समजावून सांगण्याची पद्धत, प्रसंगी कमीपणा घेण्याची तयारी, दोन पावले मागे येण्याची तयारी या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी अनुकरणीय नाहीत का ? त्याने सांगितलेली गीता हा तर वेगळा आणि मोठा विषय आहे. पण त्यातून त्याने दिलेला कर्ममार्गाचा संदेश केवळ अमूल्य असा असून सर्वकालीन मार्गदर्शक असा आहे. श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक छटा आहेत. तो कुशल राजकारणी आहे, धुरंधर असा योद्धा आहे, सर्व प्रकारच्या युद्धात प्रवीण आहे, असे असूनही तो अगदीच शेवटचा पर्याय म्हणून शस्त्र हाती धरताना दिसतो. युद्धात कमीत कमी विनाश व्हावा याकडे त्याचे लक्ष असते म्हणूनच जरासंधाशी युद्ध केल्याने प्रजेची हानी होईल या भीतीने तो पळ काढतो. मग त्याला कोणी पळपुटा म्हटले, रणछोडदास म्हटले तरी फरक पडत नाही असा हा लोकोत्तर नेता आहे. समोर आपल्याच प्रियजनांना पाहून कर्तव्यापासून परावृत्त झालेल्या अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त करणारा हा योगेश्वर कृष्ण आहे. निमित्त अर्जुन असला तरी अखिल मानवजातीच्या कल्याणासाठीच त्याचा हा उपदेश आहे. भारतीय जनमानसात मान्यता असलेले  विविध देव, धर्म, परंपरा, पंथ आदी विविध मार्ग एकट्या त्याच्याकडेच येऊन पोहोचतात. 

आकाशात पतितम तोयं यथागच्छति सागरम 

सर्वदेव नमस्कार: केशवं प्रतिगच्छति 

 आज श्रावण वद्य अष्टमी. श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वर माऊलींची जयंती आहे. त्यांना मनोभावे वंदन. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१७/०८/२०२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...