उगवतीचे रंग
सारे जहांसे अच्छा...
देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. तिरंग्याच्या तीन रंगात अवघा भारत रंगून गेला आहे. प्रत्येकाच्या मनात ' घर घर तिरंगा, हर घर तिरंगा..' हे शब्द गुंजत आहेत. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर माझेही मन तीन रंगात रंगून गेले. याच विचारात रात्री झोपल्याने माझी स्वप्नेही तीन रंगात न्हाऊन निघाली. मी तिन्ही रंगांची सरमिसळ असलेला पोशाख परिधान केला होता. कन्याकुमारीजवळच्या समुद्रात जसे तीन समुद्रांचे पाणी वेगवेगळे पण एकत्र आल्याचा भास आपल्याला होतो त्याचप्रमाणे माझ्या मनामध्ये या तीन रंगांच्या लाटा उसळी घेत होत्या. मनाचा अवघा परिसर या तीन रंगांच्या प्रकाशात त्रिवेणी संगम झाला होता. केशरी, पांढरा आणि हिरवा. देशभक्तीचे अशोकचक्र अभिमानाने गतिमान झाले होते.
एक दिव्य प्रकाशगोल माझ्या अंतःचक्षूंसमोर प्रकटला. त्यातून अवतीर्ण झाले एक अंतराळयान. ते माझ्या घराच्या पुढे येऊन उभे ठाकले. त्यावर तिरंगा डौलाने फडकत होता. एक अज्ञात शक्ती जणू मला खेचून त्या यानाजवळ घेऊन गेली. जणू ते माझ्यासाठीच थांबले होते. यानाच्या बाहेर अंतराळवीरांचा पोशाख परिधान केलेले दोन सैनिक उभे होते. मला पाहताच त्यांनी मला अदबीने सॅल्यूट केला. ' आपल्याला अंतराळाची सफर घडवून आणण्याची आम्हाला आज्ञा झाली आहे. कृपया आपण चलावे, ' असे त्यांनी म्हटले. यानाचा दरवाजा आपोआप उघडला गेला आणि मला आतमध्ये बसण्याचा इशारा करण्यात आला. मी आतमध्ये स्थानापन्न होताच बाहेरील दोघे यानात शिरले आणि आपापल्या जागेवर स्थानापन्न झाले. माझ्या आसनाभोवती असणारे यांत्रिक पट्टे आपोआप आवळले गेले. मी माझ्या आसनावर सुरक्षित असल्याची जाणीव त्यांनी मला करून दिली. यानचालकाला सर्व काही आलबेल असल्याचा इशारा करण्यात आला. यानाचा दरवाजा पुन्हा आपोआप बंद झाला.
प्रचंड आवाज करीत आता यानाने अवकाशात झेप घेतली. मी जमिनीपासून उंच उंच जात होतो. घरे हळूहळू लहान होत गेली. नंतर फक्त जमीन दिसू लागली. मग पर्वतशिखरे आणि नकाशात दिसतात तशा रस्त्यांच्या खुणा. मग समुद्र, पाणी. हळूहळू हे सगळे नाहीसे होत गेले. यान ढगात प्रवेश करते झाले. सूर्यप्रकाशात न्हालेल्या ढगांचे रुपेरी पुंजके नजरेस पडू लागले. ढगांच्या रूपातून जणू समुद्राचा भास होत होता. पुढे पुढे हे हे दृश्य दिसेनासे झाले. आता यानाने अंतराळात प्रवेश केला होता. आता सगळीकडे फक्त अंधार दिसत होता. जणू रात्रीचे साम्राज्य पसरले होते. समोर काळ्या रंगाच्या विशाल पडद्यावर चमचमणारे, फिरणारे ग्रहगोल दृगोचर होऊ लागले. हा सुंदर नजारा पाहून मन हरखून गेले. .
याच ग्रहगोलांच्या प्रदेशातून जात असताना यान किंचित काळ एका ठिकाणी स्थिर झाल्यासारखे भासले. समोर एक निळ्या रंगाचा ग्रह दिसू लागला. इतका सुंदर ग्रह मी कधी पाहिला नव्हता. मी त्यात हरवून गेलो. तेवढ्यात मला सांगण्यात आले, ' ही आपली पृथ्वी. ' पृथ्वी माझ्या डोळ्यासमोर फिरत होती. इतके दिवस पृथ्वीवर राहून तिला अनुभवणारा मी आता अवकाशातून तिला निरखित होतो. ' केवळ अद्भुत..! ' माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले. माझी पृथ्वी निरनिराळ्या रंगात मला प्रतीत होत होती. निळा, पांढरा, राखाडी, काळपट, हिरवा असे विविध रंग जाणवत होते. काही ठिकाणी पृथ्वीवरचे दिवे प्रकाशमान झालेले भासत होते. या दृश्यात हरवून गेलो असतानाच मला माझ्या भारतमातेची आठवण आली. कशी दिसत असेल माझी भारतमाता ? मी त्या अंतराळवीरांना म्हटलं, ' मला जरा माझी भारतमाता दाखवता का ? ' यान थोडे अधिक पृथ्वीच्या जवळ आल्यासारखे वाटले. आणि ' आसेतु हिमालय ' असलेल्या भारतभूमीचे मला दर्शन झाले. अंतराळातून भारत कसा दिसतो ? १९८४ मध्ये अंतराळात गेलेल्या राकेश शर्मा यांना हा प्रश्न तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विचारला होता. त्यांनी मोठे सुंदर उत्तर दिले होते. ' सारे जहांसे अच्छा...' तोच अनुभव मी घेत होतो. हिमालय, दक्षिणेतले समुद्रकिनारे, पांढऱ्या ढगांनी आच्छादिलेलं आकाश या साऱ्यांचं मी मनसोक्त दर्शन घेत होतो. अंतरात साठवीत होतो.
आकाशात अनेक नक्षत्र, तारे दिसत होते. पण मला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शब्द आठवू लागले
नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा
मज भरतभूमिचा तारा
आणि माझा ऊर अभिमानाने भरून आला. परदेशात असणाऱ्या सावरकरांना म्हणूनच भारतमातेची ओढ लागली असावी. म्हणूनच भूमातेचे चरण धुणाऱ्या त्या सागराला त्यांनी म्हटले, ' ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. '
मी यानातील अंतराळवीरांना म्हटले माझे विश्वदर्शन, भारतदर्शन आता पूर्ण झाले आहे. मला आता माझ्या प्राणप्रिय असलेल्या पृथ्वीवर आणि त्याहून प्राणप्रिय असलेल्या मातृभूमीवर घेऊन चला. आणि यानाचा परतीचा प्रवास सुरु झाला. अंतराळातून मला पृथ्वी आणि भारतमातेचे जे दर्शन घडले होते, ते दिव्य होते. त्यात देशांच्या, भाषेच्या, जातीधर्माच्या कोणत्याही सीमारेषा मला आढळल्या नाहीत. आणखीही एका सत्याची मला जाणीव झाली. आपण जसजसे वर जातो तसतशा या सीमारेषा पुसट होत जातात. जसजसे खाली येतो, तसतशा या सीमारेषा स्पष्ट होत जातात. अंतराळातून मला माझा भारत ' सारे जहांसे अच्छा ' दिसत होता. मला तो तसाच हवा असेल तर मला जाती, प्रांत, भाषा या सगळ्यांच्या भिंती पार करून वर जायला हवे. विशाल व्हायला हवे. स्वार्थी, क्षुद्र विचारांच्या पलीकडे जाऊन माझ्या जाणिवा विशाल करायला हव्या. मला नुसता तिरंगा लावून भागणार नाही. तीन रंगांची ही मशाल माझ्या अंतरात सतत तेवती हवी . अभिमानाने तिरंगा तर फडकवायला हवाच पण त्याची शान तेव्हाच राहील जेव्हा शाळेत रोज म्हटल्या जाणाऱ्या प्रतिज्ञेतले ' भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत ' हे शब्द प्रत्यक्षात येतील. माझ्या देशातील प्रत्येक व्यक्ती सन्मानाने आपले आयुष्य व्यतीत करू शकेल. माझ्या देशातल्या माय भगिनींकडे जेव्हा आम्ही एक स्त्री म्हणून नव्हे तर एक व्यक्ती म्हणून, एक माणूस पाहू. मला सेनापती बापट यांच्या कवितेतल्या ओळी आता आठवत आहेत.
हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे...
हे एवढे भान तरी प्रत्येकाने राहू द्या. हे भान असले तर प्रत्येक वेळी कोणतेही काम करताना माझ्या देशाचा विचार माझ्या मनात आधी येईल. मी जे काही करतो ते माझ्या देशाच्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने चांगले आहे ना हा विचार करूनच मी ते करीन. असे झाले तरच राष्ट्रगीतात म्हटल्याप्रमाणे ' भारत भाग्यविधाता ' होईल. ' वंदे मातरम ' नुसती घोषणा नको. तो आदर, ते प्रेम मनात हवे. आचरणात यायला हवे. तरच साने गुरुजींच्या स्वप्नातला ' बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो ' प्रत्यक्षात येईल. आपणा सर्वांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या अमृतमय शुभेच्छा !

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा