मुख्य सामग्रीवर वगळा

अवलियांचा गाव : राहाता

उगवतीचे रंग 

अवलियांचा गाव : राहाता 

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता नावाचं गाव. साईबाबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या शिर्डीपासून जेमतेम चार किमी असलेलं. अशा या गावी जाण्याचा अचानक योग आला. झालं असं की या गावात रवींद्र धस नावाचे माझे एक वाचक मित्र राहतात. माझी काही पुस्तके त्यांना हवी होती. मी त्यांना विचारलं की तुम्हाला कुरिअरने किंवा पोस्टाने पाठवून देऊ का ? तेव्हा ते म्हणाले, ' सर, मी पुस्तक घेईन पण ते तुमच्या हातून. तुमची सही असलेलं आणि तेही तुम्ही मला माझ्या घरी येऊन देणार आहात. ' रवींद्रची ही प्रेमळ धमकी म्हणा की आग्रह म्हणा, मनाला कुठेतरी स्पर्शून गेली. त्यातली अकृत्रिमता, जिव्हाळा जाणवला आणि मी ठरवलं की चाळीसगावहून पुण्याला जाताना या रवीला भेटायचं. साईबाबांचं दर्शन पण घेता येईल. मला सात जुलैला पुण्याला जायचंच होतं. मग मी शिर्डी मार्गे पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. सहा जुलैलाच मी आणि माझी पत्नी सौ श्रद्धा चाळीसगावहून निघालो. दोन तीन दिवस आधी रवींद्रना आम्ही येणार म्हणून फोन केला होता. आम्ही दोघेही सायंकाळी पाचच्या सुमारास राहात्याला पोहोचलो. रवींद्र आम्हाला रस्त्यात घ्यायला हजरच होते. रवींद्र आणि त्यांच्या सौभाग्यवती या दोघांनीही आमचे उत्तम स्वागत आणि आदरातिथ्य केले. 

घराच्या खालच्या मजल्यावर रवींद्र यांचे टू व्हीलर दुरुस्तीचे गॅरेज आहे. उच्चशिक्षित असलेला हा माणूसही एक अवलिया आहे. त्यांना जुन्या वस्तू ( अँटिक पीस ) जमवण्याचा छंद आहे. अक्षरशः भंगारातून त्यांनी १९४७ सालची शिलाई मशीन घेतले.  मोठ्या खटपटीने ते सुरु केले. एका दुकानदाराने ते मला द्या आणि त्याच्या बदल्यात पाहिजे ते नवीन मशीन घेऊन जा म्हणून त्यांना ऑफर दिली पण मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने आणलेलं ते मशीन त्यांनी द्यायला नकार दिला. असाच एका दुकानात त्यांना ग्रामोफोन मिळाला. तो त्यांनी सुरु केला. अशा अनेक वस्तू त्यांच्याकडे आहेत. वाचनाची आवड असून उत्तमोत्तम पुस्तकांचा संग्रह आहे. 

चहापाणी झाल्यावर रवींद्र म्हणाले , ' सर, माझ्याबरोबर गावात चला. तुम्हाला काही व्यक्तींची ओळख करून देतो.'  मला भेटण्यासाठी म्हणून रवींद्र यांच्या घरी प्रा. गाडेकर आले होते. रवींद्र आणि प्रा गाडेकर यांनी मला सांगितले की, ' सर, आमचा साई योग फाउंडेशन नावाचा ग्रुप आहे. त्या ग्रुपच्या वतीने आम्ही वृक्षारोपण, वृक्षाचा वाढदिवस साजरा करणे, योगप्रसार करणे इ. कामे करतो. गेली सहा वर्षे झाले आमचे हे कार्य सुरु असून उद्या सकाळी म्हणजे सात जुलैला आम्ही वृक्षांचा वाढदिवस साजरा करतो. आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला उद्या सकाळी साडेसहा वाजताच जायचे आहे. ' मी मनात म्हटलं की चला जाऊ या. एक चांगला कार्यक्रम बघायला मिळेल. 

रवींद्र आणि गाडेकर सरांसोबत मी गावात गेलो. सुरुवातीला आम्ही डॉ. पानगव्हाणे यांच्याकडे गेलो. त्यांचे हॉस्पिटल आहे. दोघेही पतिपत्नी डॉक्टर आहेत. गेल्यांनतर रवींद्र आणि गाडेकरांनी माझी ओळख डॉक्टरांना करून दिली. आणि हे आपल्या उद्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत असे सांगितले. मला आश्चर्याचा धक्का बसला कारण यातील काहीच मला माहित नव्हतं. थोड्या वेळानं आमच्यासाठी चहा आला. तो चहा घेऊन येणारी व्यक्ती म्हणजे स्वतः डॉक्टरांचा मुलगा होता. नुकताच एम एस झालेला. हा मला आश्चर्याचा दुसरा धक्का होता. चहाच आणायचा तर इतर कोणीही व्यक्ती आणू शकली असती. पण हा एम एस ची पदवी प्राप्त केलेला तरुण आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांसाठी स्वतःच चहा घेऊन आला. मला एक गोष्ट जाणवली की हा नुसताच डिग्री मिळवलेला डॉक्टर नाही. डॉक्टर म्हणून घडताना एक चांगला माणूस म्हणूनही तो घडला आहे. 

डॉ पानगव्हाणे तर हसतमुख आणि अतिशय उत्साही असं व्यक्तिमत्व. गावातल्या लोकांसाठी ते दररोज सकाळी योग, प्राणायामाचे वर्ग घेतात. वर्गाला न येणाऱ्या लोकांना स्वतः फोन करतात. त्यामुळे योगासनांच्या वर्गाला उपस्थिती चांगली असते. शिवाय वृक्षारोपण, ग्रामसफाई यासारख्या कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. ' बोले तैसा चाले ' अशी ही व्यक्ती. मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांच्याकडे संजय सदाफळ हे माजी उपनगराध्यक्ष बसलेले होते. दुसऱ्या दिवशी कार्यक्रमात द्यायच्या प्रशस्तिपत्रकांवर ते स्वतः आपल्या सुवाच्य अक्षरात नावे लिहीत होते. एका उपनगराध्यक्ष असलेल्या व्यक्तीचे सुवाच्य अक्षर, स्वतः प्रशस्तिपत्रकांवर नावे लिहिणे हे मी प्रथमच पाहत होतो. 

डॉ पानगव्हाणे यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो आणि रवींद्र आम्हाला आणखी एका व्यक्तीकडे घेऊन गेले. त्या व्यक्तीचे नाव होते. डी यु जोशी. सारं राहाता गाव त्यांना डी यु मामा या नावानं ओळखतं. डी यु मामा आता ८३ वर्षांचे आहेत. पण ते स्वतः स्वागताला दारात आले. त्यांचं गावात एक पुस्तकांचं दुकान आहे. पण डी यु मामांनी केवळ पुस्तकं विकली नाहीत तर लोकांनी उत्तमोत्तम पुस्तके वाचावीत म्हणून प्रेरणा दिली. वाचन संस्कृतीचा जागर त्यांनी या गावात घडवला. प्रसंगी लोकांना कमी पैशात पुस्तके देऊन स्वतः झळ सोसली पण लोक पुस्तक घेऊन वाचताहेत याचा विलक्षण आनंद त्यांना होता. मामांच्या वागण्याबोलण्यात प्रेम, आपुलकीचे दर्शन घडले. रवींद्र म्हणाले की मामा ही एक चालतीबोलती शाळा आहे. त्यांच्याजवळ केव्हाही येऊन बसावे आणि ज्ञानाने समृद्ध व्हावे. अशी माणसं म्हणजे समृद्धीचे महावृक्ष असतात. त्यांच्या छायेत बसावं, त्यांच्या पायाशी बसावं आणि पावन व्हावं. डी यु मामांना भेटल्यावर एका ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला भेटल्याचा आनंद मला झाला. 

रात्री जेवण झाल्यावर रवींद्र यांच्यासोबत गावात फेरफटका मारला. रवीन्द्र आणि त्यांच्या साई योग फाउंडेशनने लावलेली झाडं त्यांनी आम्हाला दाखवली. ही झाडं त्यांनी मुलांप्रमाणे जपली आहेत, वाढवली आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता आम्ही कार्यक्रम स्थळी हजर झालो. सगळ्या उत्साही कार्यकर्त्यांनी आधीच खुर्च्या, ध्वनिक्षेपक यंत्रणा इ व्यवस्था केली होती. पावसाचे हलके तुषार अंगावर झेलत आम्ही आधी वृक्षारोपण केले. नंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. या प्रसंगी त्या गावाचे तहसीलदार श्री हिरे साहेब, गट विकास अधिकारी श्री शेवाळे साहेब, डॉ पानगव्हाणे आणि त्यांचे कुटुंबीय, संजय सदाफळ, लायन्स क्लबचे सदस्य आणि गावातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या. डी यु मामांना त्यांच्या घरून आणण्यासाठी आणि नेण्यासाठी खास व्यवस्था केली होती. 

दरवर्षी सात जुलैला ही सगळी मंडळी वृक्षांचा वाढदिवस साजरा करतात. या प्रसंगी ' आज माझा वाढदिवस ' असे वृक्षांचे मनोगत व्यक्त करणारा फलक लावला होता. वाढदिवसाच्या दिवशी आपण केक कापतो. मग वृक्षांच्या वाढदिवशी तो का नको या भावनेतून एक सुंदर, देखणा आणि वृक्षाची प्रतिकृती असलेला केक तयार करण्यात आला होता. या प्रसंगी पर्यावरणासाठी झटणाऱ्या व्यक्तींचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांचा जसा गौरव करण्यात आला तसाच गौरव अगदी सामान्य कार्यकर्त्यांचा देखील केला गेला. यातून त्या प्रत्येक व्यक्तीला वाटत होतं की हा कार्यक्रम माझा आहे, माझ्यासाठी आहे. या प्रसंगी मला सामाजिक समरसतेचं अनोखं रूप पाहायला मिळालं. लोकांचा उत्साह पाहून या कार्यक्रमात तहसीलदार आदी उच्चपदस्थ व्यक्ती देखील आनंदाने सहभागी झाल्या होत्या. कुठलाही ध्यास घ्यायचा तर वेडं व्हावं लागतं. अशी पर्यावरण प्रेमाचं वेड घेतलेली सगळी अवलिया मंडळी मला इथे बघायला मिळाली. 

या प्रसंगी बोलताना मी म्हणालो, ' जगात दोन प्रकारचे लोक असतात. पहिल्या प्रकारचे लोक वृक्ष लावतात. दुसऱ्या प्रकारचे लोक वृक्ष तोडतात. जेव्हा या गावाच्या पर्यावरण प्रेमाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा या गावातल्या लोकांचं नाव वृक्ष लावणाऱ्यांच्या यादीत असेल. ढासळते पर्यावरण पाहून उद्याची पिढी आपल्याला जाब विचारणार आहे की तुम्ही आमच्यासाठी काय केले ? कोणता वारसा मागे ठेवला ? या प्रश्नाचे उत्तर राहाता वासियांनी आपल्या कृतीतून दिले आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दशरथ तुपे या तरुणानं केलं. वरवर कमी शिकलेला वाटणारा, बोलीभाषेतून बोलणारा हा तरुण पाहिला. त्याच्या बोलण्यात शहरातील माणसांच्या बोलण्यातील सफाईदारपणा नव्हता. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर बोलणं ' पॉलिश्ड ' नव्हतं. पण शिकलेल्यांची ' पॉलीश ' फिकी पडेल अशी उत्स्फूर्तता, अकृत्रिम जिव्हाळा आणि उत्साह त्याच्या बोलण्यातून उतू जात होता. 

' पिंजरा ' चित्रपटात एक गाणं आहे. हे गाव लई न्यारं, हित थंडगार वारं ....' मला हे गाणं आठवलं पण वेगळ्या अर्थानं आणि म्हणावसं वाटलं 

हे गाव लई न्यारं 

हित  समरसतेचं वारं 

याला भेदभाव बिलकुल सोसंना 

सारे जमती, झाडं लावती 

वृक्ष कुणीही तोडंना 

तर असं हे गाव. इथं कार्यक्रम संपल्यानंतर एक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक भेटले. त्यांनी त्यांचे विविध सामाजिक आणि विद्यार्थी हिताचे अनेक उपक्रम सांगितले पण वेळेअभावी त्यांच्याशी फार बोलता आलं नाही. आरोग्य विभागात काम करणारे राजेंद्र फंड भेटले. त्यांचाही अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग असतो. ते लेखक, कवी आहेत. इतिहासाचे अभ्यासक आहेत. दरवर्षी एक दिवाळी अंक प्रकाशित करतात. त्यांनी अगत्याने आम्हाला त्यांच्या घरी नेले. मागील वर्षीचा एक दिवाळी अंक भेट म्हणून दिला. 

यानंतर साईबाबांच्या दर्शनासाठी आम्ही शिर्डी येथे गेलो. तेथे गुरुवार असल्याने दर्शनासाठी बरीच गर्दी होती पण रवींद्र सोबत असल्याने आमचे दर्शन लवकर झाले. दर्शन घेतल्यानंतर रवींद्र यांनी आमची भेट आणखी एका अवलिया व्यक्तिमत्वाशी करून दिली. त्यांचं नाव भाऊसाहेब थोरात. त्यांची तीन हॉटेल्स त्या परिसरात आहेत. थोरात हे आधी विड्याच्या पानांची विक्री करायचे. अत्यंत कष्टातून पुढे आलेलं हे व्यक्तिमत्व. आज आर्थिक दृष्ट्या संपन्न असले तरी आपण पानविक्रीच्या व्यवसायातून वर आलो आहे याची आठवण ठेऊन आजही ते पानविक्री करतात. त्यांच्याशी बोलताना हे व्यक्तिमत्व वेगळं आहे हे जाणवलं. विचारांची खोली जाणवली. चेहऱ्यावर एक प्रसन्न शांतता. कुठेही आरडाओरड नाही. बडेजाव नाही. 

त्यांच्याच एका हॉटेलमध्ये आम्ही दाक्षिणात्य पद्धतीचा नाश्ता केला. त्यांच्याशी गप्पा मारणं ही एक पर्वणी आहे. बोलता बोलता उपवासाचा विषय निघाला. ते म्हणाले, ' सर, आपण उपवास का करतो ? जर पुण्य मिळवण्यासाठी असेल तर एखाद्या भुकेल्या व्यक्तीला पोटभर जेवण द्या म्हणजे तुमचा उपवास सफल झाला. उपवास आरोग्यासाठी असेल तर साबुदाण्याच्या खिचडीसारखे जड पदार्थ खाऊन उपवास करू नका. बोलताना नेहमी चांगलेच बोला. कारण तुम्ही जे बोलाल, त्याला तुमची वास्तू तथास्तु म्हणत असते. ' अशा प्रकारे विविध विषयांवर आमची चर्चा सुरु होती पण वेळेअभावी आवरते घ्यावे लागले. थोरातांची एक दोन पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. तसेच ते विविध ठिकाणी व्याख्यानासाठी सुद्धा जातात असे बोलण्याच्या ओघात कळले. माझ्या लक्षात आलं की एखाद्या व्यक्तीकडे नुसते वरवर पाहून चालत नाही. तिचे गुण, स्वभाव कळण्यासाठी तिच्या सहवासात यावे लागते. बऱ्याच वेळा आपण एखाद्या व्यक्तीच्या बाह्य रंगरूपाकडे पाहून तिचा अंदाज बांधत असतो. भाऊ थोरातांसारखी माणसं पाहिली की अशा गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. 

जाता जाता आणखी एका व्यक्तीची ओझरती भेट झाली. ती व्यक्ती म्हणजे श्याममामा दंडवते. ते बँकेत काम करतात. पुण्यामध्ये अंध व्यक्तींसाठी काम करणाऱ्या आणि स्वतः अंध असलेल्या राहुल देशमुख आणि देवता यांचे ते मामा. अंध परंतु हुशार आणि कर्तबगार अशा राहुल देशमुख यांच्याशी विवाह करणाऱ्या डोळस देवता यांच्या विवाहाला त्यांनी भक्कम पाठिंबा दिला. एक अनोखा संबंध घडून आला. राहुल आणि देवता यांच्या सहकार्याने पुण्यात अंधांसाठीची संस्था उभी राहिली. याचे श्रेय या दंडवते मामांना नक्कीच जाते. 

साईबाबांच्या नगरीत माणसांच्या रूपातअशी साईंची विविध रूपे पाहायला मिळाली आणि धन्य झालो. या सगळ्या माणसांना कसं जगायचं, का जगायचं हे तर कळलं आहेच पण माझ्या मते इतरांचं जगणं सुंदर करणारी ही माणसं आहेत. कविवर्य बा भ बोरकरांच्या शब्दात सांगायचे तर ' जीवन त्यांना कळले हो...' असेच म्हणावे लागेल. निघताना रवींद्र आणि त्यांच्या सौभाग्यवतींचा प्रेमळ निरोप घेऊन आणि अनेक सुखद आठवणींची शिदोरी घेऊन आम्ही पुण्याकडे मार्गस्थ झालो. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

९/७/२०२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...