एक सोहळा :आगळावेगळा...
२० मे २०२२ रोजी पुण्यात एका छोटेखानी हॉलमध्ये एक आगळावेगळा सोहळा पार पडला. हा सोहळा होता व्रतबंध किंवा मुंजीचा. हा व्रतबंध सोहळा होता माझा अतिशय गोड नातू चि. स्वराज याचा. पण मुंजीबद्दल बोलण्याआधी माझी मुलगी चि सौ सारिका हिच्या सासरच्या मंडळींची पार्श्वभूमी सांगणे मला आवश्यक वाटते. सारिकाने आंतरजातीय विवाह केला. तिच्या आनंदाखातर आम्हीही तो आनंदाने करून दिला. तिच्या सासरकडील मंडळी माळी समाजाची. पण तिच्या लग्नापासूनच ही तिच्या सासरकडची माणसे आणि आमच्यामध्ये एवढे प्रेमाचे ऋणानुबंध निर्माण झाले की जातपात हा विचार कुठल्याकुठे पळून गेला.
सारिकाच्या सासरकडील मंडळी मूळ विदर्भातील खामगावची. खामगाव, शेगाव याठिकाणी त्यांचा समाज, नातेवाईक. तिच्या लग्नानंतर काही निमित्ताने या नातेवाईकांना भेटण्याचा योग आला, त्यांच्या घरी जाणे झाले. या सगळ्या मंडळींच्या मनाच्या मोठेपणाचा प्रत्यय वेळोवेळी येत गेला. त्यातील काहींची आर्थिक परिस्थिती उत्तम तर काहींची अगदी साधारण. काहींची घरे लहान तर काहींची मोठी. पण त्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान होती. ती म्हणजे मनाचा मोठेपणा. आपल्याकडे आलेल्याचे भरभरून अगत्याने स्वागत करणे, त्यांचा प्रेमाने पाहुणचार करणे या गोष्टी मनाला स्पर्शून गेल्या. त्या सगळ्यात एक प्रकारचा अकृत्रिमपणा होता. उत्स्फूर्तपणे प्रेमपूर्वक केलेले स्वागत आणि औपचारिक स्वागत आपल्याला सहज लक्षात येते.
चि सौ सारिकाच्या घरची सगळीच माणसे अतिशय प्रेमळ आणि धार्मिक. आल्यागेल्याचे मनापासून स्वागत करणारी. सारिकाचे यजमानही तिच्यासारखेच सी ए. सासरे कृषी अधिकारी म्हणून निवृत्त झालेले. दीर उच्चशिक्षित आणि अत्यंत बुद्धिमान. नणंद डॉक्टर. नणंदेचे दीर, यजमान यांनी स्वतःचा उद्योग सुरु करून आजमितीला एक यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक कमावला आहे. अशा या परिवारात माझी मुलगी सून म्हणून गेली. यथावकाश चि स्वराजचा जन्म झाला. पण लवकरच तिच्यावर एक गंभीर प्रसंग ओढवला. पोटदुखीच्या आजारातून तिला कॅन्सर असल्याचे निष्पन्न झाले. सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. अशा वेळी तिचे यजमान आणि सासरकडील सगळीच मंडळी तिच्या पाठीशी उभी राहिली. त्यांच्या खंबीर पाठिंब्याने आणि प्रयत्नांनी ती सगळ्या दिव्यातून बाहेर पडली आणि आज ती तिचे सगळे काम नियमितपणे करते आहे.
चि स्वराज जेव्हा आठ वर्षांचा झाला, तेव्हा सारिकाला साहजिकच असे वाटले की आपल्या या मुलावर उपनयन संस्कार व्हावा. खरे तर पूर्वी समाजातील सर्वच वर्गात मुलांचा उपनयन विधी किंवा संस्कार केला जात असे दाखले सापडतात. उपनयन संस्कार झाल्यानंतर मुलगा गुरुगृही शिक्षणासाठी जात असे. केवळ मुलांचाच उपनयन संस्कार होत नव्हता तर मुलींवर देखील हा संस्कार केला जात असे. मुलींना देखील सर्व शिक्षण दिले जात असे. पण काळाच्या ओघात काही चांगल्या गोष्टी मागे पडल्या. उपनयन संस्कार हा ब्राह्मण समाजातील मुलांपुरताच मर्यादित राहिला आणि मुलींबद्दल तर बोलायलाच नको. मुलींचा व्रतबंध तर दूरच पण त्यांना शिकवण्याची देखील समाजाची मानसिकता राहिली नव्हती. चूल आणि मूल हेच जणू तिचे कार्यक्षेत्र असे समाजाने ठरवून टाकले होते. अशा परिस्थितीत महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे, आगरकर यांच्यासारख्या थोर समाजसेवकांमुळे मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळाला.
सारिकाने जेव्हा चि स्वराजवर उपनयन संस्कार व्हावा अशी कल्पना तिच्या मिस्टरांजवळ मांडली तेव्हा त्यांनी त्यासाठी त्वरित सहमती दर्शवली. आता प्रश्न होता घरातील माणसांचा म्हणजे तिच्या सासू सासऱ्यांचा. त्यांना ही कल्पना कितपत पसंत पडते अशी शंका होती. पण ही सगळीच मंडळी सुधारित विचारांची आणि मोठया मनाची. त्यांनीही त्वरित होकार दिला. आणि हा उपनयन सोहळा प्रत्यक्षात येऊ शकला. या सोहळ्याचे पौरोहित्य करण्यासाठी श्री जांभेकर गुरुजी यांनी आनंदाने आणि त्वरित होकार दर्शवला. त्यांनी या सोहळ्याचे विधिवत पौरोहित्य करून त्यातील प्रत्येक गोष्टीचे महत्व सर्वांना समजेल अशा पद्धतीने सांगितले. हा सगळाच कार्यक्रम अगदी दृष्ट लागावी इतका देखणा झाला. या सोहळ्याला सारिकाच्या सासरकडील जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि आमच्याकडील सर्व नातेवाईक मंडळी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होती. या अर्थाने हा सोहळा आगळावेगळा.
या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना उपनयन विधी करण्यासाठी तत्कालीन कर्मठ ब्रह्मवृदांनी दिलेला नकार, त्यांचा झालेला छळ सगळे सगळे आठवले. ही गोष्ट तेराव्या शतकातली आणि आज आपण आहोत एकविसाव्या शतकात. काळाच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. समाजात अनेक वाईट प्रथा काळाच्या ओघात निर्माण झाल्या. माणूस महत्वाचा राहिला नाही. जात, भाषा, धर्म, पंथ इ सारखे भेद माणसाला माणसापासून तोडू लागले. ज्ञानेश्वर माउली पासून अनेक संतांनी समाजप्रबोधन केले. अनेक समाजसुधारकांच्या पिढ्या यात खर्ची पडल्या. पण समाजमन हळूहळू बदलते आहे. जातीपातींची बंधने काहीशी सैल होताहेत. २८ मे रोजी पुण्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांचे भाषण आयोजित करण्यात आले होते. या वेळी बोलताना त्यांनी इतर समाजातील काही मुलांच्या झालेल्या उपनयन विधीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. स्वा सावरकरांना देखील अशाच प्रकारचे बदल समाजात अपेक्षित होते असे प्रतिपादन त्यांनी केले.
आणखी एक उदाहरण आपल्यासमोर मांडतो. १७ एप्रिल २०१६ रोजी औरंगाबाद येथे ३० मुली आणि सात मुलांवर उपनयन संस्कार करण्यात आला. महाराष्ट्राच्या इतिहासात शेकडो वर्षानंतर प्रथमच मुलींवर उपनयन संस्कार करण्यात आल्याचे हे उदाहरण असावे. आश्चर्याची आणि समस्त महिला वर्गाच्या दृष्टीने अभिमानाची ठरावी अशी आणखी एक गोष्ट घडली. या उपनयन सोहळ्याचे पौरोहित्य एका महिला विदुषीने केले. त्यांचे नाव आचार्या नंदिता शास्त्री चतुर्वेदी. या सोहळ्यासाठी त्या खास वाराणसी येथून आल्या होत्या. मुलींना उपनयन संस्कारांचा अधिकार आहे याचे दाखले प्रत्येक वेदात आढळून येतात असे प्रतिपादन त्यांनी केले. नंदिता शास्त्री या वाराणसी येथील वेद विद्यालयाच्या प्रमुख अध्यापिका असून त्यांना चारही वेद मुखोद्गत आहेत.आपल्या हिंदू संस्कृतीतील सोळा संस्कारातील हा अत्यंत महत्वाचा संस्कार आहे. प्रत्येक व्यक्तीवर आपल्या मातापित्यांचे, गुरूंचे आणि समाजाचे ऋण असते. उपनयन संस्कारानंतर प्रत्येक व्यक्तीला माता-पिता, गुरु आणि समाज ऋण फेडण्याचा अधिकार प्राप्त होतो असे समजण्यात येते.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
४/७/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा