उगवतीचे रंग
जो हुकूम मेरे आका...
अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा मला आठवण्याचं एक कारण झालं. माझं जीमेल ओपन केलं की मला वरच्या चौकटीत ठळक लाल अक्षरात एक मेसेज दिसायचा. तो म्हणजे तुमचे स्टोरेज संपले असल्याचा. मग दोन पर्याय यायचे. पहिला पर्याय म्हणजे manage storage आणि दुसरा पर्याय buy storage. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला गोंधळात टाकणारी ही स्थिती. कारण एक तर आम्ही प्रयत्नांती हे सगळं वापरायला शिकलो. त्यामुळे चुकत जायचं आणि शिकत जायचं अशी परिस्थिती. मग एक दोन मित्रांना विचारलं. ते म्हणाले, ' स्टोरेज विकत वगैरे घेऊ नका. तुम्हाला न लागणारे फोटो, इमेल्स, व्हिडीओ वगैरे डिलीट करा. '
मग आम्ही त्यांच्या सल्ल्यानुसार पहिला पर्याय निवडला. तो म्हणजे manage storage चा. नको असलेल्या इमेजेस, व्हिडीओ, इमेल्स धडाधड डिलीट मारल्या. बरेच एम बी, जीबी वगैरे काय असेल तो डेटा डिलीट झाला. पण ती सूचना काही जाईना. त्या जिनचे समाधान होईना. तो आपला समोर सारखा उभा राहायचा. मी डिलीट कर म्हटलं की जो हुकूम मेरे आका म्हणून लगेच डिलीट करायचा. बरंच काही डिलीट करून झालं. अगदी आठवण म्हणून जपून ठेवाव्यात अशा इमेजेस, काही खास क्षणांचे व्हिडीओ सगळं सगळं डिलीट करून झालं. पुन्हा हा आपला उभाच ! कितीही जेवला तरी ज्याचं समाधान होत नाही असा बकासुर आणि हा सतत हाताची घडी घालून समोर उभा असणारा ' जो हुकूम ' वाला यात काय फरक आहे ? त्यांचं समाधान होतच नाही. भीमानं बकासुराचा अंत करणं आणि या जीनला युक्तिप्रयुक्तीनं पुन्हा बाटलीत बंद करणं एवढाच उपाय उरतो मग ! तसं मी त्या जीनला बाटलीत बंदिस्त केलं. तो बाटलीतून गयावया करताना मला दिसत होता पण मी ठरवलं आता याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही.
ती सूचना रोज यायची. मला जिनची आठवण करून द्यायची. पण आता मी ठरवलं होतं की त्याकडे लक्षच द्यायचं नाही. आणि काय आश्चर्य ! बहुधा तो जीन कंटाळला असावा. एक दिवस ती सूचना आश्चर्यकारकरित्या गायब झाली. पण ही घटना मला विचारात टाकून गेली. माझ्या डोळ्यासमोर सगळं काही गिळंकृत करणाऱ्या जिनची वेगवेगळी रूपं नाचायला लागली. जिनचं रूप घेऊन व्हाट्सअप उभं राहिलं. मला म्हणालं, ' मेरे आका, मैं बहुत कुछ कर सकता हूँ. जरा आजमाके तो देखिये. ' मी म्हटलं सांग बाबा काय काय करतोस तू ? मला म्हणाला, ' तुम्हारी दुनिया ही बदल दूंगा. तरह तरह की प्रतिमायें, गाने, व्हिडीओज आपके सामने हाजीर करुंगा. अगर कुछ पढना चाहोगे तो बहुत कुछ पढनेको मिलेगा. किसीसे चॅट करना चाहो तो कर सकोगे. और भी बहुत कुछ हैं, आजमाके तो देखिये जनाब. ' आणि काय आश्चर्य त्याच्या बोलण्याची मला भुरळ पडली. व्हाट्सअपने मला पुरते वेड लावले.
आता जीन मला आणखी नवनवीन रूपे दाखवत राहिला. मी वेड्यासारखा त्याच्या मागे जात राहिलो. फेसबुक दाखवलं. म्हटलं ' अरे वा, जगच जवळ आलं की. निरनिराळे मित्र, मैत्रिणी. त्यांचे रोजचे नवीन उद्योग. सगळं काही कळू लागलं. यु ट्यूब नावाचं आणखी एक वेगळी दुनिया दाखवली. सगळ्या प्रकारचे व्हिडीओ. गाण्याचे, खाण्याचे, नाचण्याचे, याचे अन त्याचे.. तुम्ही फक्त नाव सांगा. व्हिडिओ हजर. म्हटलं ' यार, काय ग्रेट आहे हे सगळं. तो उभाच होता समोर म्हणायला, ' जो हुकूम मेरे आका. ' आतापर्यंत 'आकाला कोणी हिंग लावून विचारत नव्हतं. तू तर काय दुनियाच बदलून टाकलीस मित्रा. तो म्हणाला, ' हे तर काहीच नाही. चल तुला आणखी एक माझे रूप दाखवतो. मग गुगलचे रूप घेऊन तो प्रकट झाला. आता तर मला जणू महाभारतात अर्जुनाला विश्वदर्शन घडवणाऱ्या श्रीकृष्णाची आठवण झाली. तो होताच तसा. ' अमुक एक हवं ' म्हटलं की विविध पर्यायांसह हजर. कमाल झाली यार. सिम्पली ग्रेट ! ' दुनिया मेरी मुठ्ठीमे. मग जग जवळ आलं आहे. द वर्ल्ड इज या ग्लोबल व्हिलेज. ज्ञानाचा विस्फोट यासारखे निरनिराळे शब्द, वाक्य मला आपोआप आठवू लागले. या विश्वरूपदर्शनासमोर मी नतमस्तक झालो.
मी भानावर येत नाही तोपर्यंत त्याच्या हास्याचा गडगडाट कानावर आला. ' पाहिलंस ना ! तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. तुला हवं ते मिळणार. तू फक्त हुकूम करायचास. ' मी म्हणालो, ' तू तर खरंच ग्रेट आहेस यार. पण एक सांग खरंखरं ! ' ' जो हुकूम मेरे आका...' तो तत्परतेने उत्तरला. मी म्हणालो, ' मला माझा गेलेला वेळ देऊ शकशील का ? ' तो हात जोडून म्हणाला, ' ये मेरे बस की बात नही मेरे आका. ' मी म्हटलं, ' ठीक आहे रे. तू मला माझे आरोग्य परत मिळवून देऊ शकतोस का ? ' तो पुन्हा अवघडून म्हणाला, ' मेरे आका, ये मैं नही कर सकता. ' मग मी त्याला विचारत राहिलो की तू हे करशील का, ते करशील का ? तो आपला गयावया करत नाही नाही म्हणत होता.
मग मीच त्याला म्हटलं, ' मित्रा, तू गेलेला वेळ परत देऊ शकत नाहीस. आरोग्य परत देऊ नाहीस. कायमस्वरूपी आनंद, समाधान देऊ शकत नाहीस. मग काय उपयोग या सगळ्याचा ? '
तो तत्परतेने म्हणाला, ' सच बताऊ मेरे आका ? मैं ये सब ले सकता हूँ लेकिन वापस दे नही सकता. मैं तुम्हारा समय निगल जाता हूँ. तुम्हारी सेहत, तुम्हारी निंद, तुम्हारा सुख चैन सब कुछ मैं निगल जाता हूँ. लेकिन मेरी एक खुबी हैं. मैं यह सब करता हूँ इसका पता बहुत कम लोगोंको चलता हैं . '
मी हे सगळं ऐकून थक्कच झालो. ' बापरे ! किती धक्कादायक आहे हे सगळं ! आपण समजतो काय आणि प्रत्यक्षात आहे काय ! आपल्याला वाटतं सगळं फ्री मिळतं आहे पण त्या बदल्यात ते काय मौल्यवान गोष्टी घेऊन जातं ते कळत नाही. आवळा देऊन कोहळा काढण्यासारखंच आहे हे. घरातल्या लोकांशी गप्पा, फिरणं, व्यायामाचा वेळ, मित्रमंडळींशी गप्पागोष्टी या सगळ्याच गोष्टींवर या ' जो हुकूम मेरे आका ' मुळे खूपच वाईट परिणाम झाला आहे. छे छे , काहीतरी करायलाच हवं. मी त्याला म्हटलं, ' अरे बाबा, एवढं सगळं सांगतो आहेस त्याबद्दल धन्यवाद ! पण मग यावर उपाय काय करायचा तो पण तुलाच माहित असेल. तो जरा सांग ना... '
' जो हुकूम मेरे आका. देखो मालिक, मैं ये सब करता हूं इसलिये जरुरी नही की आप भी यह सब अपना सारा समय देकर मेरे पीछे पडे. सबसे किमती चीज तो समय हैं. इसका इस्तेमाल बहुत सोच समझकर करना चाहिए. अपने सभी जरुरी काम पुरे करने चाहिये. उसके बादही कुछ समय निकालकर मेरे पास आईए. मेरा उपयोग सीमित और निश्चित समयके लिये करना चाहिये. जो मेरे पीछे जितना पडेगा, मैं उतनाही उनके पीछे हाथ धोकर पडूंगा इसमें कोई शक नही. लेकिन जो लोग सोच समझकर मेरा इस्तेमाल करेंगे, मैं उनकी मददही करुंगा. '
मी म्हटलं, ' खरं आहे बाबा तुझं. आता मी तुझा मर्यादित वेळेसाठी आणि महत्वाच्या कामासाठीच तुझा वापर करणार. माझ्यासारख्या वापर करणाऱ्यांना तू त्रास देऊ नकोस. '
जीन किंचित झुकून विनम्रतेने म्हणाला, ' जो हुकूम मेरे आका. ' आणि पुन्हा तत्परतेने बाटलीत बंदिस्त झाला.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२९/०७/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा